अर्चना जगदीश

जगात, भारताच्या कानाकोपऱ्यात पर्यावरणविषयक अनेक चांगले प्रयत्न सुरू आहेत. जंगले कशी टिकवून ठेवायची, वातावरण बदल आणि तापमानवाढ यावर कशी मात करायची याबद्दल अनेक प्रयोग सुरू आहेत. पर्यावरण आणि जीवनाशी जोडल्या गेलेल्या सर्व समस्यांवर, उपायांवर चर्चा करणारं, समस्येमागची कारणमीमांसा आणि उपाय शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न- धडपड याबद्दलची माहिती देणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

अर्चना जगदीश गेली २५ वर्षे जंगल -पर्यावरण संरक्षणासाठी उत्तर सह्य़ाद्री, कोकण भागात काम करत आहेत. मानव वनस्पतीशास्त्रात त्यांनी पीएच.डी. मिळवली असून शासकीय वनस्पती सर्वेक्षण विभागातील नोकरी सोडून त्यांनी तिसाव्या वर्षी प्रत्यक्ष जंगल संरक्षण करण्यासाठी ‘अप्लाइड एन्व्हायरन्मेंटल रिसर्च फौंडेशन’ची १९९४ मध्ये स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नाने चाळीसहून अधिक गावांत देवराई संरक्षण व पुनरुज्जीवन कार्यक्रम सुरू असून रत्नागिरी जिल्ह्य़ातील १४ गावांमध्ये ४००० एकर जमिनी-वरील जंगल २०२५ पर्यंत सुरक्षित झाले आहे. त्यांना ब्रिटनस्थित व्हीटले फौंडेशनतर्फे २००७ मध्ये  पुरस्कार मिळाला आहे, तर क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हने २०११ मध्ये विशेष सन्मान केला आहे.

पर्यावरणविषयक बातम्यांचा वेध आपण रोजच घेतो. सकाळी फिरायला गेलेल्या लोकांवर बिबटय़ाचा हल्ला इथपासून ते चक्रीवादळ, खाली-वर होणारे तापमान आणि सध्या हिवाळा असूनही लापता होत चालली थंडी, भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या चर्चा आणि ऊहापोह. तसंच आता आपल्या स्मार्टफोनवर येणारे रोजचे हवामानाचे अंदाज. कधी कधी सगळी माहिती गोळा होते; पण विश्लेषण करायला वेळच नसतो, तर कधी सगळ्या परिस्थितीचा अंदाज येऊनही आपण सवयीने दुर्लक्ष करतो; पण खरं तर पर्यावरण हा विषय असा दुर्लक्ष करून चालण्यासारखा नाही. कारण पर्यावरणाचे प्रश्न आता आपल्या रोजच्या जगण्याशी आपल्या नकळत जोडले गेलेले आहेत.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आलं, वेगवान मोटारी आणि विमान वाहतुकीमुळे आपला वेळ वाचायला लागला; पण त्याचबरोबर बाजारप्रणीत विकासाच्या वेगामुळे निसर्ग, आपलं पर्यावरण बिघडत चाललं आहे. वाढतं शहरीकरण आपल्याला निसर्गापासून आणखी दूर नेत आहे. अशा परिस्थितीत कुठे तरी कुणी तरी निसर्ग-जंगलं- झाडझाडोरा टिकवून ठेवला पाहिजे असं आपल्याला मनापासून वाटतं. कारण एक प्रजाती म्हणून निसर्गाचा एक भाग म्हणून पंचमहाभूतांशी आपली नाळ अजूनही जोडलेली आहे.

वैश्विक वातावरण बदल आणि तापमानवाढ यामुळे सर्व पर्यावरण समस्या, मग त्यांचे मूळ कुठेही असले तरी जगातल्या प्रत्येकाला भेडसावणार आहेत हे नव्याने समोर येऊ लागले आहे. आपण वापरत असलेल्या वातानुकूलन यंत्राला लागणारी ऊर्जा मोठय़ा प्रमाणावर जलविद्युत आणि औष्णिक प्रकल्पांमधून येते आणि त्यामुळे जंगले तर तुटतातच; पण हरितगृह वायू तयार होतात, वातावरण बदलाला चालना मिळते. परिणाम अनेक पातळ्यांवर होतो. जंगल तुटल्यामुळे झाडांमध्ये साठवून ठेवलेला कार्बन वातावरणात येतो आणि या प्रकल्पांसाठी होणारे प्रदूषण आदी वेगळे. जंगलं कमी झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट होतो आणि मग मानव-वन्यप्राणी संघर्ष आपल्या दारापर्यंत येऊन ठेपतो. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा हे उपाय झटक्यात करता येण्यासारखे नाहीत, त्यासाठी तंत्रज्ञान आणि आíथक गुंतवणूक लागते. वेगवेगळ्या कारणांनी प्रचंड वाढणारी शहरं, त्यांच्या आजूबाजूचे रोजगार पुरवणारे उद्योग आणि त्यातून होणारे वायू प्रदूषण आणि पुन्हा हरितगृह वायू आणि पर्यायाने तापमानवाढीला मदत असं दुष्टचक्र जगात सर्वत्र दिसतं.

माणसाला निसर्गाबद्दल अनादिकालापासून प्रचंड कुतूहल वाटत आलं आहे आणि निसर्ग समजून घेण्यासाठी तेव्हापासून सुरू झालेली धडपड आजवर अव्याहत सुरू आहे. औद्योगिक क्रांतीनंतर निसर्गाचे स्वरूप बदलत आहे याची जाणीवही काही शहाण्या माणसांना, संशोधकांना होऊ लागली होती; पण त्याचा परिणाम समाजजीवनावर होणं आणि त्यासाठी जाणीव निर्माण होणं हे मात्र गेल्या काही दशकांतलं. आपल्याला विकास हवा आहे. सर्व समाजांना चांगल्या प्रतीचं सहज जीवन मिळावं अशी इच्छाही आहे, परंतु त्याच वेळी ज्या निसर्गावर, पर्यावरणावर आपण अवलंबून आहोत त्यात किती मर्यादेपर्यंत बदल केलेले चालतील याची मानकं ठरवणं, शाश्वत विकासप्रणाली आणि निसर्गपूरक जीवनशैली समाजमान्य होईल का याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे.

भारतासारख्या मोठय़ा आणि विविधतेने संपन्न असलेल्या देशात सर्वसमावेशक धोरणं, त्याची अंमलबजावणी तसेच त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पर्यावरण संरक्षण, त्यात लोकांचा सहभाग आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक विकास इथपर्यंत पोहोचायला आपल्याला बराच वेळ लागणार आहे. अर्थात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यावरण समस्यांच्या मुळापर्यंत जाणे, पर्यावरण विचार समजून घेणं आणि प्रत्येक वेळी जगभरात तसेच देशातही प्रत्यक्ष काय काम चाललं आहे याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं असा सर्वागीण दृष्टिकोन ठेवला तरच उपाय सापडतील, आहेत ते उपाय आणखी प्रसृत करता येतील तर त्यातूनच नवे उपाय शोधण्यासाठी ऊर्जा मिळेल.

पण ही जबाबदारी कोण घेणार? इतका विनाश झाल्यानंतर परिस्थिती बदलणं शक्य आहे का? शिवाय बदल हा फक्त निसर्गाच्या बाह्य़ स्वरूपावर झालेला नाही, तर आपली हवा, आपलं पाणी, अन्न हे सगळंच कमीअधिक प्रमाणात प्रदूषित झालेलं आहे. कीटकनाशकं आणि रासायनिक खतं यामुळे पाण्याचं प्रदूषण होतंच, शिवाय आपल्या अन्नातूनही घातक रसायनं आपल्या पोटात जातात, त्यातून होणारे कर्करोगासह अनेक आजार हे आजचं वास्तव आहे; पण मुळाशी जाणं कुणालाही नको आहे. कारण खतं तयार करणाऱ्या कंपन्या आणि राजकारणी यांचे हितसंबंध प्रगतीसाठी जास्त महत्त्वाचे ठरतात. शिवाय पर्यावरण आणि जीवनमान खऱ्या अर्थाने बदलण्यासाठीचे उपाय सरकार, इतर संस्था किंवा अन्य कुणी तरी करावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकदा उपाय खूप सोपे आहेत असंही प्रसृत केलं जातं. म्हणूनच शतकोटी वृक्ष लागवड हा सर्व प्रकारच्या जंगल तोडीवरचा, वातावरण बदलावरचा उपाय आहे असा गरसमज पसरवणं सोयीचं ठरतं. खरं तर मौल्यवान जंगलं म्हणजे फक्त इमारती लाकूड नव्हे, तर त्यातली जैवविविधता, इतर सर्व प्राण्यांचा अधिवास हे खूप अधिक महत्त्वाचे असते हे आता जगभरात सिद्ध झाले आहे; पण अशी जंगलं टिकवण्याऐवजी, केवळ वृक्षलागवडीवर भर दिला जातो, कारण त्यात आकडे सांगता येतात. वृक्षलागवडही उपयोगाची आहे; पण त्याबद्दलचा सर्वागीण अभ्यास केल्यानंतरच ती करणं सयुक्तिक ठरतं.

बऱ्याचदा पर्यावरण प्रश्नाबद्दल बोलताना आपण निराशावादी होतो आणि खचूनही जातो; पण जगात, भारताच्या कानाकोपऱ्यातही अनेक चांगले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यावरून शिकण्यासारखं आहे. जंगले कशी टिकवून ठेवायची, वातावरण बदल आणि तापमानवाढ यावर कशी मात करायची याबद्दल अनेक प्रयोग सुरू आहेत. या यशस्वी तसेच अयशस्वी प्रयोगांवरूनही खूप काही समजतं. अनेक संशोधक नव्या पर्यावरण प्रश्नांची शास्त्रीय अभ्यासातून उकल करण्यात गुंतले आहेत, तर काही उपायांची गरज आणि प्रत्यक्ष काम यात गुंतले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था आणि आंदोलक शाश्वत पर्यावरणासाठी जागृती, आंदोलन करून समाजामध्ये स्फुल्लिंग निर्माण करण्यासाठी झटतात. शिवाय अशा विरोधामुळे शासन आणि धोरणकर्ते यांच्यावर दबाब आणून तिथेही मोठय़ा प्रमाणावर बदल घडायची शक्यता तयार होते. काही ‘थिमाक्का’सारखे ‘एकला चलो रे’ म्हणून स्वत:च जबाबदारीने शेकडो वटवृक्ष लावतात, पुढच्या पिढय़ांसाठी जपतात. तर कुणी हिरिरीने यावर लिहीत असतात. अशा पुस्तकांबद्दल, लेखांबद्दल आणि जमिनीवर काम करणाऱ्या शिलेदारांबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सरकार, कंपन्या, संस्था आणि वैयक्तिक पातळीवरदेखील महत्त्वाची आहे. चिपको आंदोलन करणारी उत्तराखंडची गौरादेवी आणि १८५५ मध्येच निसर्ग आणि माणूस यांचं नातं काय असायला हवं हे सांगणारा रेड इंडियन चीफ, यांना आपण विसरून गेलेलो नाही ना हे तपासून बघायला हवं.

अशा वेगवेगळ्या पर्यावरण आणि जीवनाशी जोडल्या गेलेल्या सर्व समस्यांवर, उपायांवर चर्चा करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी हे नवीन सदर. इथे फक्त समस्या नाही तर त्यामागची कारणमीमांसा आणि उपाय शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न- धडपड याबद्दलही माहिती दिली जाईल. पर्यावरण बिघडत चाललं असलं तरी सगळीच परिस्थिती निराशाजनक नक्कीच नाही. आशेचे किरण सतत डोकावतात, फक्त त्यातून पाझरणारा छोटासा कवडसा आपल्याला पकडता आला पाहिजे.  ते आशाकिरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे सदर.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com