ch031पालिकेची नजर चुकवत रस्त्यावर भाजी विकायची, त्याच्याच जिवावर म्हाताऱ्या आईची काळजी घेत स्वत:ला जगवायचं एवढंच तिचं आयुष्य आहे. भविष्याचा विचारही तिचा थरकाप उडवतो. भाजीची पाटीच तिला सोबत करते. सांगतेय, भाजीवाली शैलू शेख.
पहाटेचे पाच वाचलेत. बाजारात आज लय गर्दी हाये; पण भाजीचा दर उतरलाय. मिरची संग कोथिंबीर, मेथी बी घ्यावी पंचवीस जुडय़ा. गावठी कोथिंबीरपण भरपूर दिसतेय. दोन पाटय़ा तरी लावता यील भाजी. माल स्वस्त मिळाला म्हणून घेतला, पण आता ओझं उचलना झालंय. दोन वर्षांमागं शेतातून माल आणताना काळोखात पडले, कंबरेचं हाड मोडलं. ऑपरेशन करावं लागलं. तवाधरनं कंबर दुखते, चक्कर येते. डॉक्टर म्हणतात, वजन उचलू नको. असं म्हणून चालतंय? पाटी  उचलायलाच हवी. समोर टेम्पोवाला दिसतोय, घालते माल टेम्पोत आन मी जाते रेल्वेनं धंद्याच्या जागी! नाय तर बोजा घेऊन रेल्वेत चढताना भीती वाटते, गाडीखाली जाईन का काय? भ्या वाटतं.
पस्तिसावं वरीस पुरं झालं गेल्या महिन्यात. मी सव्वा महिन्याची असताना वडील वारले. आईनं भाजीचाच धंदा करून आम्हा चार मुलांना वाढवलं. भाऊ विचारत नाय. बहीण मरून दहा वर्स झाली. मरताना एक पत्र्याची तिची खोली व्हती ती देऊन गेली आन म्हनली, आईला सांभाळ! म्हनलं, ठीक हाय. मग लग्न नाय केलं. लग्न केलं तर तिला कोण बघनार? आमच्या धर्मातली लई मुलं सांगून आली, पण मी नाय म्हटलं. पण मी कोणाजवळ खरं नाय सांगत. कोणी विचारलं तर सांगते, आमच्यात मंगळसूत्र नाय घालत. माझा नवरा हाय गावाला. कायपण सांगते. अहो, उँगली दिली तर हाथ धरत्यात मानसं!
आता सहा वाजले. टेम्पो आला की दोन पाटय़ा लावून भाजी घिऊन बसनार ते रात्री धा वाजेपतुर! ज्या बिल्डिंगखाली पाटी लावती त्याचा मालक चांगला हाय. भाजी धुवायला खालच्या नळावर जागा दिलेय. माल आणला का धुवायची भाजी आन लावायची, पण हल्ली पयल्यासारका धंदा नाय होत. फेरीवाले जास्त झालेत. ते दारांत नेऊन देतात भाजी, तर बायका कशापायी रस्त्यावरून भाजी घेतील? नोकरदार बाया स्टेशनवरच भाजी घेतात आन रिक्शात बसून भुर्र्र जात्यात. त्ये गिऱ्हाईक बी भेटत नाय. दोन दिवस माल नाय उठला तर गेला कचराकुंडीत.. माल बी आन आपले पैसे बी! आम्हाला स्टेशनसमोर धंदा लावायला देत नाय. आमी गरीब लोकं. ते लोकं हप्ते देतात. मग दादागिरी करून स्टेशनसमोर रस्ता अडवून बसतात. त्यांना हालवायची कोणाची हिंमत हाय? आम्ही दोन पाटय़ा लावल्या तर ते पंधरा पाटय़ा लावतात. संध्याकाळी स्टेशनबाहेर पाय ठेवायला जागा नसते, पण त्यांना आवाज कोण देणार? त्यांच्यावर ‘किरपा’ हाय. आन् मी सिद्धी बसते रस्त्याच्या कडला, तर  रोज एक मानूस दम देतो. ‘‘एक ना एक दिवस तुजा माल उचलून नेतो का नाय बग!’’ अजून मी त्याच्या हातात गावले नाय. एक तर पालिकेची गाडी दिसली की मी भराभर टोपल्या उचलून बिल्डिंगीच्या कडला नेऊन ठेवते. माज्या म्हाताऱ्या आईलाबी तिथून उचलते. गाडीकडं लक्ष नाय ग्येलं तरी मी पाटी मागं लावते.  नाय तर पार उलटी करून टाकतात भाजीची पाटी आन सगळा माल मग गटारात! त्यापरीस मागं लावल्या पाटय़ा तर मालाला हात नाय लावत.
आता त्यांचं काय चुकत नाय हे आमालाबी कळतं. वॉर्डाच्या नेत्याकडं पब्लिक तक्रार करत्यात, का आमाला फुटपाथवर चालायला मिळत नाय. का मग ते म्युनिशिपालटीला कळवतात. मग येते त्यांची गाडी! ते त्यांची डय़ुटी करतात, पण आमी पोट कसं भरायचं? म्हागाईनं कंबर तोडलेय. आम्ही दोघी दिवसभर इथं बसतोय. घरात लाइट, पंखा वापरत नाय. टी.व्ही. नाय तरी लाइटीचं बिल किती? सातशे-आठशे रुपये! विलेक्शन जवळ आलं का येत्यात ‘मत आमाला द्या’ सांगत. आमच्या समोरून मोठय़ा गाडय़ातनं भर्रकन जात्यात. विलेक्शननंतर आमची हालत बगायला एकजन फिरकत नाय. आमाला काय मिळणार हाय ते जिंकले तर? उन्हा-पावसात रस्त्यावरचंच जिणं आमचं?
पावसात छत्री लावायला मिळत नाय. दिवसभर ओल्याचीप कपडय़ात बसायचं, न्हाय तर सरळ घरांत बसून दिवस काढायचे. हातावर पोट! भाजीची पाटी नाय लावली तर घरांत पैसा नाय? पैसा नाय भेटला तर पाणी पिऊन झोपून जायचं. चार-चार दिवस घासभर अन्न मिळत नाय. शेजारी बिर्याणीवाला ऱ्हातो. त्याचं काम क्येलं, भांडी घासली, का तो उरलेली बिर्याणी देतो घासभर! त्याच्यावर दिवस काढायचा; पण मी कोणापुढं हात पसरत नाय की वंगाळ काम करत नाय? सिद्धी ऱ्हाते. सिद्धा भाजीचा धंदा करते. आम्हाला गॅस परवडत नाय. महिन्याला पाच लिटर रॉकेल मिळतं. ते पुरतं व्हय? मग हाडं फुटणाऱ्या थंडीत बी थंडगार पाण्यानं पहाटे आंघोळ करायची आन् मार्केटला निघायचं. पाठीशी पैसा असला तर रोखीने नाय तर उधारीने भाजी उचलायची. आईच्या येळेपासून वळख हाये, देतात उधारीवर माल! पण मी उधारी थकवत नाय. पैसा आला की लाइट बिल, टॅक्स सगळं दिऊन टाकते.
आता हिथं फुटपाथचं काम चाललंय. एकदा फुटपाथ झाला की, मला उठवणार! जबरीने धंदा लावून बसले तरी आली गाडी का पळा पाटय़ा घेऊन! मी येकटी बाई माणूस! ती पाच-सहा मुलं पटापटा येतात, माल गाडीत घालतात, घिऊन जातात. नेलेला माल परत भेटला नाय का पडली पोटावर लाथ! मला भय वाटतं, कवा बी धंदा जाईल! आन डोस्क्यावरचं छप्पर बी! झोपडपट्टीत पत्र्याची एक खोली हाय! पण  ती आमच्या नावावर हाये का याचीच शंका येते इतके जण ती आमची खोली हाय म्हनून सांगून गेलेत. रुम खाली करा म्हणून दमदाटी करतात. मला भय वाटतं. कधी बी घर तोडत्याल की आम्ही रस्त्यावर. मला कळत नाय कुठं दाद मागायची? मी अंगुठाछाप! शिक्शन नाय. जवळ पैसा नाय का सोननाणं नाय! आम्हाला सरकारी योजना कळत नाय! आमच्यासाठी राजीव गांधी योजना हाये म्हनतात, पण तहसीलदार कार्यालयात जानार कोण? वेळ कुणाला हाये? एक दिवस धंदा लावला नाय तर खानार काय?
आता अंगात ताकद नाय राह्य़ली नाय. पुढची चिंता वाटते. पेपरवाले येतात, लिहून घेत्यात, फुढं काही होत नाय. मला साधी ऑफिस साफ करायची नोकरी भेटली तरी आधार होईल! मी आजारी पडले व्हते मागे तर कोणी बी विचारलं नाय. घरच्यांनी, बाहेरच्यांनी, का जात-धर्माच्या माणसांनी!
या दुनियेत मला कोणाचा आधार नाय. आधार हाय तो या समोरच्या पाटीतल्या भाजीचा.. कोथिंबीर-मिरचीचा! माझ्यासाठी तीच माय. लोकांना मिरची तिखट लागतीया. मला तिच मिरची गोड लागतीया!
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले