25 February 2020

News Flash

परोपकार

‘जो दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावतो, त्याची स्वत:ची जखम भरायला वेळ लागत नाही.’ दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावणं अर्थात कोणाचं तरी दु:ख दूर करणं, कोणाचं तरी सांत्वन

| October 18, 2014 01:01 am

‘जो दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावतो, त्याची स्वत:ची जखम भरायला वेळ लागत नाही.’ दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावणं अर्थात कोणाचं तरी दु:ख दूर करणं, कोणाचं तरी सांत्वन करणं, दुर्बळांना सबळ बनवणं, उपेक्षितांना आधार देणं, वंचितांना न्याय मिळवून देणं, जिज्ञासूंना प्रोत्साहन देणं, थोडक्यात ‘परोपकारी’ असणं!
कविवर रहीम यांचा एक प्रसिद्ध दोहा आहे-
यों ‘रहीम’ सुख होत है,
उपकारी के संग
बाटनवारे को लगे
इयों मेहंदी को रंग।
अर्थात दुसऱ्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, अशी इच्छा असणारी व्यक्ती त्याप्रकारे सुखी होते जसे दुसऱ्यांच्या हातावर मेंदी लावणारी बोटं स्वत:देखील मेंदीच्या रंगात रंगून जातात. एका गावात एक म्हातारी राहायची. खूपच अशक्त व आजारी असायची. राहायचीपण एकटीच! बिचारीचे खांदे सतत दुखत असायचे. पण स्वत:च्या खांद्यावर मलम लावण्यास ती असमर्थ होती. तिला कुणी तरी औषध लावून द्यावे म्हणून बापडी प्रत्येकाची विनवणी करायची. एकदा अशीच ती आपल्या घराबाहेर कण्हत बसली होती. तिच्या घराजवळून एक मुलगा चालला होता. त्याला हाक मारून ती म्हणाली, ‘बाळा हे मलम जरा माझ्या खांद्याला लावशील का? परमेश्वर तुझं भलं करेल.’ उत्तरादाखल मुलगा म्हणाला, ‘आजी माझ्या हातांची बोटंदेखील खूप दिवसांपासून दुखत आहेत. मी कसं तुझ्या खांद्यावर मलम लावू?’ म्हातारी म्हणाली, ‘बाळा तुला मालिश करण्याची गरज नाही, फक्त या डबीतून थोडं मलम काढून माझ्या खांद्यावर हलकेच पसरवून दे.’ त्या मुलाने तसं केलं. औषध लावल्यावर त्या म्हातारीचं दुखणं हळूहळू कमी होऊ लागलं. म्हातारीच्या खांद्याला मलम लावताना मुलाच्या हातालाही ते मलम लागलं. त्याचा असा परिणाम झाला की अनेक दिवसांपासून असलेलं बोटांचं दुखणं हळूहळू कमी होऊ लागलं. आता तो मुलगा रोज आजीला मलम लावण्यासाठी येऊ लागला. काही दिवसांतच ती आजी ठीक झाली व त्या मुलाची बोटंही!  थोडक्यात, ‘जो दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावतो, त्याची स्वत:ची जखम भरायला वेळ लागत नाही.’ दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावणं अर्थात कोणाचं तरी दु:ख दूर करणं, कोणाचं तरी सांत्वन करणं, दुर्बळांना सबळ बनवणं, उपेक्षितांना आधार देणं, वंचितांना न्याय मिळवून देणं, जिज्ञासूंना प्रोत्साहन देणं, थोडक्यात ‘परोपकारी’ असणं!
 कबुतराचा जीव वाचवण्यासाठी कबुतराच्या वजनाइतकं मांस आपल्या शरीरातून कापून देणारा शिबीराजा याच गुणामुळे प्रसिद्ध आहे. आजही आपण मुंग्यांसाठी पीठ-साखर टाकतो. पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था करतो, पक्षांसाठी दाणे टाकतो तेही याच भावनेमुळे. एक राजा होता. तो अपत्यहीन होता. राजा-राणीने संतानप्राप्तीसाठी व्रतवैकल्यं केली, देवीची आराधना केली. राजाच्या मनात मंदिर बनवण्याची इच्छा होती. एका महर्षीनी राजाला अपत्यप्राप्तीसाठी देवीची आराधना करण्याचा सल्ला दिला. देवी राजाच्या आराधनेवर प्रसन्न झाली व तिने राजाला त्याची मनोकामना विचारली, राजाने संतानप्राप्तीची इच्छा प्रकट केली व मंदिर बनविण्याचीही. देवी म्हणाली, ‘या दोन इच्छांमधून तुझी एकच इच्छा पूर्ण होईल. एक तर तू मंदिर बनवू शकशील किंवा तुला अपत्यप्राप्ती होईल.’ राजाने देवीकडून आपल्या पत्नीबरोबर या संबंधी बोलण्याची परवानगी मागितली. राणीने राजाला सांगितलं, की आपण मंदिर बनवावं. राजाने देवीसमोर मंदिर बनवण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून देवी खूपच प्रसन्न झाली व तिने राजांच्या दोन्ही मनोकामना पूर्ण केल्या. थोडक्यात परोपकारात स्वउपकार सुप्त रूपात सामावलेला असतो.’ देव-दानवांमध्ये जेव्हा युद्ध चालू असायचं तेव्हा दानव देवांची अस्त्रं-शस्त्रं चोरण्याचा प्रयत्न करायचे. जेव्हा देवांना हे ज्ञात झालं की आपली एक एक अस्त्रं-शस्त्रं नाहीशी होताहेत तेव्हा त्यांनी विचार केला की ती लपवण्यासाठी एखादी सुरक्षित जागा शोधायची. तेव्हा इंद्र व अन्य देवतागण ‘दधिची’ ऋषींना जाऊन भेटले व त्यांना आग्रह केला की ही सर्व शस्त्रं त्यांनी सांभाळावी. जेव्हा आम्हास गरज पडेल तेव्हा ती आम्ही आपणापासून घेऊ. सहृदय दधिची ऋषींनी लागलीच याला स्वीकृती दर्शवली व ते स्वत: जातीने शस्त्रांचं सक्षण करू लागले.
 देव निश्िंचत झाले व बरेच दिवस ते शस्त्रांची विचारपूस करण्यासही आले नाहीत, परंतु इकडे दधिची ऋषींना विश्वाचं भ्रमण करण्याचा, समग्र पुण्य क्षेत्रांचं दर्शन करण्याचा संकल्प पूर्ण करायचा होता. पण शस्त्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणून दधिची ऋषींनी ती शस्त्रं जाळून भस्म केली व ती राख त्यांनी पिऊन टाकली. असं केल्यामुळे त्या शस्त्रांची सर्व शक्ती सुक्ष्म रूपात दधिची ऋषींच्या शरीरात पसरली व ते शक्तिशाली झाले. त्यानंतर ते आपल्या पत्नीबरोबर तिर्थयात्रेला निघून गेले.
काही काळानंतर पृथ्वीवर ‘वृत्रासुर’ नामक एका दैत्याचा उपद्रव वाढला. परंतु वृत्रासुराला पराजित करण्यासाठी देवांकडे शस्त्रं नव्हती. म्हणून पुन्हा देवतागण दधिची ऋषींकडे आलं व आपली शस्त्रं परत मागू लागले. तेव्हा दधिची ऋषींनी त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली व म्हणाले, ‘जेव्हा माझी पत्नी घरी नसेल तेव्हा या. देवतागण ऋषीपत्नीच्या अनुपस्थितीत आले. दधिची ऋषींनी स्वत:ला जाळण्यासाठी योगाग्नी उत्पन्न केला व देवतांना सांगितलं की, ‘माझ्या हाडांनी तुम्ही अस्त्रं-शस्त्रं बनवा. त्याने आपणास पाप लागणार नाही,’ आणि त्यांनी स्वत:ला अग्नीमध्ये समर्पित केलं. दधिची ऋषींच्या हाडांपासून देवतांनी अनेक अस्त्रं-शस्त्रं बनवली. अशा प्रकारे दधिची ऋषींनी विश्वकल्याणासाठी आपलं सर्वस्व स्वाहा केलं. म्हणून आजही कोणी विश्वकल्याणासाठी स्वत:चं तन-मन-धन समर्पित करतो त्याला दधिची ऋषींची उपमा दिली जाते.
एखाद्याला होणारी पीडा ही शारीरिक असो वा मानसिक पण जेव्हा कुणी कुणाला अशा प्रकारच्या पीडेपासून मुक्त करतो, तेव्हा मुक्त होणारी व्यक्ती मुक्त करणाऱ्या व्यक्तीप्रति कृतज्ञ होते व त्याच्या मुखातून आशीर्वादाचे बोल बाहेर पडतात. हे पाहून मुक्त करणाऱ्या व्यक्तीच्या मनात सर्व प्रकारच्या सद्भावनांचा उगम होतो व त्याचं मन म्हणतं की, मी असाच सदैव विश्वकल्याणासाठी कटिबद्ध राहीन! विश्वातील सर्व व्यक्तींना दु:खमुक्त करीन! जेव्हा अशा प्रकारचा भाव मनात उत्पन्न होतो तेव्हा शरीरात स्थित असणाऱ्या अंतस्रावी ग्रंथींमधून लाभदायक हार्मोन्सचं उत्सर्जन होतं. जे आपणास रोगमुक्त करण्यासाठी साहाय्य करतात. निष्काम भावनेने केलेलं समाजोपयोगी कर्माने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते, प्रशंसा होते. यामुळे ती व्यक्ती आंतरिक समाधान अनुभवते, जी त्याचं शारीरिक स्वास्थ्यही वाढवते. दुसऱ्यांना मदत करून आपणही आपल्यासाठी चांगलं स्वास्थ्य, दीर्घायू, सुनिश्चित करू शकतो.    
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा हा अनुवाद )

First Published on October 18, 2014 1:01 am

Web Title: version of the spiritual preachning
टॅग Chaturang
Next Stories
1 दुर्दम्य इच्छाशक्ती
2 मदतीचा हात – आजी -आजोबांसाठी : आधुनिक श्रावणबाळ
3 पर्यायांच्या शोधात-प्रयोगशील पालकत्व : शोधाचा प्रवास
Just Now!
X