04 June 2020

News Flash

विचित्र निर्मिती : दोस्तीचा धर्म

‘वेलकम होम’ चित्रपटात एक छोटासा प्रसंग आहे, ज्यात आई कोणा कामगाराकडून अडगळीची खोली स्वच्छ करून घेते.

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्रा भावे

चित्रपटाचं काम करताना समोरचा माणूस किती संवेदनक्षम आहे, आपल्या कामाला किती निष्ठा बांधून आहे, एवढंच दिसत असतं. रझाक शूटिंगच्या कामाची आवराआवर करायचा आणि वेळेला, सांगितलं की शॉटमध्ये उभा राहायचा. हेच काम आमचे दोन ड्रायव्हरही करायचे, नामदेव आणि बिलाल मुल्ला. मुल्ला त्याची गाडी घेऊन अभिनेत्यांची ने-आण करायला यायचा आणि ‘अभिनयाला उभं राहा’ म्हटलं की खूप खूश व्हायचा. वर्षांनुवर्ष नातं टिकवून जीव लावणारी ही माणसं, हिंदू आहेत, की मुसलमान आहेत, की ख्रिश्चन; एकमेकांची खुशाली विचारताना कुठे लक्षात येतं?

‘वेलकम होम’ चित्रपटात एक छोटासा प्रसंग आहे, ज्यात आई कोणा कामगाराकडून अडगळीची खोली स्वच्छ करून घेते. छोटय़ा छोटय़ा भूमिकांसाठी कलाकारांची यादी करत होतो. या सीनशी पोचल्यावर मी म्हटलं, ‘‘फार विचार करून स्मरणाला ताण द्यायचं कारण नाही. आपण तय्यबला बोलावू.’’ नव्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला, हा कोणता कलाकार? तर तय्यब हा कलाकार नाहीये, तो आहे एक छोटा कॉन्ट्रॅक्टर. रंगाची, घरातल्या छोटय़ा-मोठय़ा दुरुस्त्यांची काम करतो; पण त्याचं मुख्य ‘क्वालिफिकेशन’ हे आहे, की तो रझाकचा मुलगा आहे. या सीनसाठी तय्यबला हक्काने बोलावलं. कलादिग्दर्शनही त्यानंच केलं. भराभर, गोष्टी इकडच्या तिकडे करून अडगळ तयार केली. तो सीन तसा पट्कन झाला. तय्यब अभिमानाने म्हणाला, ‘‘आक्का, (म्हणजे मी) मी तुमच्या चित्रपटात पहिल्यांदाच काम केलं पण ‘बाबा’नं कितीदा केलं होतं ना!’’ म्हटलं , ‘‘हो.’’ पुण्यात शूटिंग असलं की रझाक आवराआवरीला, तयारीला यायचा. ‘दहावी फ’मध्ये रेल्वेलाइनच्या पलीकडे मोकळ्या रुळांपाशी एक सीन करायचा होता. ‘दहावी फ’तली मुलं शाळेची लॅब फोडून शाळेतले नकाशे पळवतात. ते एका रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या मुलाच्या हातात पडतात. तो कुतूहलाने ते पळवतो आणि त्याच्या विश्वासाचा माणूस, दादू याच्या ताब्यात देऊन त्याला सांभाळायला बसवतो. दादूचं राहण्याचं ठिकाण स्टेशनमागे, रुळांपाशी. तो, त्याच्या या मानलेल्या पोराचे नकाशे व्यवस्थित लटकवून, त्यांना कुणी हात लावू नये म्हणून पहारा करत बसतो. दादूचं काम करायला रझाकइतका नेमका माणूस मिळालाच नसता.

माझ्या वडिलांचा बंगला बांधताना अनेक कामगारांपैकी एक होती फातिमा, तिचा मुलगा रझाक. तो तिच्याबरोबर कामाला यायचा. माझ्यापेक्षा थोडा लहान. माझ्या आईचं म्हणणं असायचं, घराच्या वास्तुशांतीला नातेवाईक आणि स्नेही मंडळी यांच्याही आधी, ज्या कामगारांनी ते घर बांधलं, त्यांना जेवायला बोलवावं. वास्तुशांतीला (नंतर माझंही घर बांधलं याच घराच्या गच्चीवर, तेव्हाही असेच वास्तुशांतीला फक्त कामगारच बोलावले होते.) कामगारांची पंगत झाली. फातिमा निरोप घेताना येऊन म्हणाली, ‘‘कधीही कसलंही काम असलं की आमच्या रझाकला बोलवायचं आणि आता ईदला आमच्याकडे शीरखुरमा खायला यायचं.’’ पुढे आमच्या घरादाराचा पायंडाच पडला की, कसलंही काम असो, रझाकला बोलवायचं. मग ते बागेतल्या झाडांचं काम असो, घराला रंग देणं असो, सणावारी घर साफ करणं असो, रझाकला बोलवायचं आणि ईदला रझाकच्या घरी जायचं. गेली पन्नासपेक्षा जास्त वर्षे, हे चालू आहे. कधी काही कारणाने ईदला आम्ही जाऊ शकलो नाही तर संध्याकाळी रझाक शीरखुरमा घेऊन घरी यायचा आणि आता तय्यबसुद्धा येतो. चार वर्षांमागे रझाक गेला पण आता त्याचा मुलगा तय्यब आहे. रझाक कुठलंही काम करत असला तरी दुपारचा नमाज चुकवायचा नाही. काम थांबवून म्हणायचा, ‘‘देवळाला जाऊन येतो.’’ त्याच्या, मशिदीला ‘देऊळ’ म्हणण्याची मला मोठी गंमत वाटायची. तो नमाज पढून परत आला की, आई त्याला जेवण वाढायची आणि मग स्वत: जेवायची.

माझा भाचा पार्थ तेव्हा खूपच लहान होता. एकदा शाळेतनं आला आणि म्हणाला, ‘‘मुसलमान वाईट असतात ना?’’ आम्ही घरातले सगळे दचकलोच. माझ्या आईचा उपाय साधा सरळ होता. ती म्हणाली, ‘‘रट्टा देईन असलं काही बोललास तर.’’ मी पार्थला बोलावून घेतलं. म्हटलं, ‘‘ तुला कुणी सांगितलं?’’ तो म्हणाला, ‘‘शाळेत मुलं म्हणत होती. औरंगजेब मुसलमान होता ना!’’ म्हटलं, ‘‘हो, पण सगळेच मुसलमान वाईट नसतात. आपला रझाककाका मुसलमानच आहे की.’’ पार्थला वाटत राहिलं, तो रझाककाका आहे, तो मुसलमान कसा असेल?’’ पार्थला म्हटलं, ‘‘औरंगजेब शिवाजी महाराजांशी वाईट वागला; पण त्यामुळे सगळेच मुसलमान वाईट ठरत नाहीत. रामायणात, रावण सीतेशी, रामाशी वाईट वागला. तो कुठे मुसलमान होता?’ म्हणजे चांगलं वागणारी माणसं आणि वाईट वागणारी माणसं, यांना काही धर्म किंवा जात नसते.’’

शूटिंगच्या कामाची आवराआवर रझाक करायचा आणि वेळेला, सांगितलं की शॉटमध्ये उभा राहायचा. असा तो ‘देवराई’तही आहे. हेच काम आमचे दोन ड्रायव्हरही करायचे, नामदेव आणि बिलाल मुल्ला. बिलाल अगदी मऊ आवाजात, सौम्य बोलणारा माणूस. त्याची गाडी घेऊन तो अभिनेत्यांची ने-आण करायला यायचा आणि ‘अभिनयाला उभं राहा’ म्हटलं की खूप खूश व्हायचा. ‘बाधा’मध्ये डोक्याला मुंडासं बांधून तो धनगर झालेला आहे. वर्षांनुवर्ष नातं टिकवून जीव लावणारी ही माणसं, हिंदू आहेत, का मुसलमान आहेत, का ख्रिश्चन; एकमेकांची खुशाली विचारताना कुठे लक्षात येतं?

बिलालचं लग्न, केव्हा तरी शूटिंगच्या दरम्यान झालं. पुढे त्याला मुलगा झाला. मी त्याचं नाव ठेवलं-अमन. बिलाल मुल्लानं त्याचं नाव काही वेगळं ठेवलंय पण मला भेटला की, ‘तुमचा अमन’ म्हणून त्याची खुशाली सांगतो. परवा येऊन सांगून गेला, ‘‘मावशी, अमन दहावी झाला.’’ हे म्हणताना आठवलं, माझ्या वडिलांचे एक मित्र होते- बेगसाहेब. वाईचे व्यापारी होते. काही कामानिमित्त पुण्याला आले की, जेवायला आमच्याकडेच असायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतकी अदब, बोलण्यात इतकं मार्दव असायचं की, पुढे चित्रपटात बलराज सहानीला पाहिल्यावर मी म्हटलं, ‘‘अरे, हे तर आपले बेगसाहेब.’’

आमच्या ‘जिंदगी झिंदाबाद’मध्ये गुलजारांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे. ‘दिल में ऐसे बसा हुआ है तू, जैसे कोई उदास सी खुशबू.’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आनंद मोडक आणि आम्ही म्हटलं, की या गाण्याला सुफी ‘स्वाद’ हवा. आनंद मोडक आमच्यासारखेच उत्साही. मुंबईतल्या वेगवेगळ्या मशिदी हिंडून त्यांनी एक अस्सल सूफी गायक आणला. त्याचं नाव राकेश पंडित. अत्यंत सौम्य, ट्रान्समध्ये असल्यासारखा. त्यानं स्टुडिओमध्ये कधी गाणं रेकॉर्ड केलं नव्हतं. त्याला तो अनुभव फारच थ्रिलिंग होता. असा हा संपर्कात आलेला सुरेल, सौम्य मुसलमान.

‘जिंदगी झिंदाबाद’मध्ये दोन मित्रांच्या भूमिका करणारे अभय कुलकर्णी आणि निस्सार खान यांची जोडी. ते दोघं नुकतेच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून बाहेर पडलेले. जीव तोडून खरा खरा अभिनय करायचा, या विचाराने झपाटलेले. निस्सारचा अगदी बेसचा गहिरा आवाज. आणि बारीक स्थिर डोळ्यातली धार घेऊन त्यानं ‘जय’ ही व्यक्तिरेखा फार चांगली उभी केली. सनत हा त्याचा मित्र. पॅशनेट पण भित्रा. तो अभयने साकारला. चित्रपटाच्या शेवटी जयचा एड्सने मृत्यू होतो. त्यावेळी एड्सचा संसर्ग इतर कुणाला होऊ नये, त्याचे जंतू पसरू नयेत म्हणून एड्सच्या रुग्णाचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळत असत. शॉटसाठी एका प्लास्टिकला भोक पाडून निस्सारला नीट श्वास घेता येतोय ना, याची खात्री करून स्ट्रेचरवर झोपायला सांगून, त्याच्याभोवती प्लास्टिक गुंडाळलं. ‘स्ट्रेचर नेलं जातंय’, असा लाँग शॉट पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये घ्यायचा होता. तसा तो घेतला. प्लास्टिक बाजूला केल्यावर पाहिलं तर निस्सारला श्वास घेता येईना. त्याचा जीव गुदमरलेला. आम्ही सगळे घाबरे झालो पण ससून हॉस्पिटलमध्येच होतो. तातडीने डॉक्टरना बोलावलं. तसं चिंतेचं कारण नव्हतं. दोनच क्षणांत निस्सार नीट श्वास घ्यायला लागला. पण त्या दोन क्षणांत माझा जीव घाबरा झाला. मी निस्सारला म्हटलं, ‘तुला नीट श्वास घेता येईल अशी सगळी व्यवस्था आपण केली होती. मग काय झालं?’ तर तो म्हणाला, ‘डेडबॉडी दाखवायची होती ना, म्हणून मी श्वास घेणंच बंद केलं.’ या सीनच्या वेळी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची त्याची एक गुरुस्थानी असलेली ज्येष्ठ कलाकार – मिता वसिष्ठ हजर होती. तिने ‘वास्तविक’ अभिनय म्हणजे काय, या विषयावर निस्सारचं मोठं बौद्धिक घेतलं. ‘खरा’ अभिनय म्हणजे ‘खऱ्यासारखा दिसणारा’ अभिनय हे विसरून चालणार नाही.

‘जिंदगी झिंदाबाद’नंतर आम्ही हिंदीत फारसं काही केलं नाही. त्यामुळे निस्सारला कामासाठी बोलावलं नाही; पण ‘संहिता’मध्ये, जंगलात शिकारीनंतर, राजांची संगीताची मफल जमते, असं दाखवायचं होतं. त्यात राजांचे वेगवेगळे संस्थानिक, कलासक्त दोस्त दाखवायचे होते. या दोस्तांना संवाद काही नव्हते. केवळ गाण्याला दाद द्यायची होती. तेव्हा निस्सारची आठवण झाली. आता तो हिंदी सीरियल्समधला लोकप्रिय कलाकार आहे; पण या आमच्या सीनमध्ये काम अगदी छोटं, हुक्का पीत गाण्याला एकदाच ‘वा!’ म्हणायचं. मी निस्सारला फोन केला. ‘तो नवाब कसा दिसायला पाहिजे, तर तुझ्यासारखा, असं वाटल्यामुळे तुला फोन केला.’ निस्सार ‘जिंदगी झिंदाबाद’च्याच एका शॉटसाठी उत्साहाने आला आणि त्यावेळच्याच पॅशनने पण अधिक प्रगल्भतेनं गाण्याला दाद देऊन गेला.

आणखीनही असे काही जण आठवले. चित्रपटाचं काम करताना समोरचा माणूस किती संवेदनक्षम आहे, आपल्या कामाला किती निष्ठा बांधून आहे, एवढंच दिसत असतं. त्या माणसाभोवतालचं इतर सांस्कृतिक वलय अडसर न ठरता, उलट त्याची प्रकाशमय प्रभा ठरते. चित्रपट, माणूस असा बघायला शिकवतो. माणूस असाच असतो, की खरा कसा असतो, ते आपल्याला कुणालाच माहिती नाही. जसा दिसतो, तसा असतो. ‘दिठी’ या चित्रपटात म्हटलं आहे, शत्रू आणि मित्र हे वेगळे नाहीतच. ते दोन्ही आपल्याच मनात असतात.

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:20 am

Web Title: vichitra nirmiti article film shoot stories abn 97
Next Stories
1 मनातलं कागदावर : सेल्फी
2 सृजनाच्या नव्या वाटा : वेगळेपण रुजवणारी ‘इमली महुआ’
3 आव्हान पालकत्वाचे : फुलणाऱ्या दिवसांतली ‘त्याची’ कोंडी
Just Now!
X