12 August 2020

News Flash

सायक्रोस्कोप : प्रतिकूलतेचे बळी

‘व्हिक्टिम’ मानण्याची सवय म्हणजे प्रतिकूल घटना किंवा इतर माणसांच्या प्रतिकूल वागणुकीचे आपण बळी आहोत, अशी ठाम धारणा असणे होय.

(संग्रहित छायाचित्र )

डॉ. अंजली जोशी

anjaleejoshi@gmail.com

‘व्हिक्टिम’ मानण्याची सवय म्हणजे प्रतिकूल घटना किंवा इतर माणसांच्या प्रतिकूल वागणुकीचे आपण बळी आहोत, अशी ठाम धारणा असणे होय. ही सवय असलेल्या व्यक्ती स्वत:च्या वाटय़ाला आलेल्या परिस्थितीबाबत स्वत:ची कीव करत राहतात व दुर्दैवाचा पाढा सतत उगाळत बसतात. त्यामुळे आत्मकरुणेची भावना त्यांच्या मनात प्रबळ असते. अशी दुर्दैवी परिस्थिती आपल्यावर लादण्यास इतर लोक किंवा आपल्या आयुष्यातील घटना जबाबदार आहेत, त्यामुळे ती परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही, असे वाटून त्यांना हतबलता येते. पण असं बळी होणं टाळता येतंच. कसं?

नुकतीच इंजिनीअरिंगची पदवी हातात मिळालेला आदित्य आज हताश होऊन बसला आहे. तो म्हणतो, ‘‘माझ्या नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात. मी जन्माला आलो तेव्हा बाबांना मोठं आजारपण आलं, त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायला आईला फारसा वेळच मिळाला नाही. प्राथमिक शाळेत माझा एक जिगरी दोस्त होता. नेमकी त्याच्या वडिलांची बदली दुसऱ्या शहरात झाल्यामुळे तो शहर सोडून गेला. मी ज्या इयत्तेत जायचो नेमका त्याच इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जायचा. मग पुस्तकं उशिरा मिळणं, परीक्षेच्या प्रश्नांपासून ते वेळापत्रकापर्यंत घोळ होणं हा प्रत्येक वर्षीचा नित्यनेम झाला. मी बारावीला गेलो आणि त्याच वर्षी इंजिनीअरिंगच्या पात्रता परीक्षेचे नियम ऐनवेळी बदलले गेले. या गोंधळामुळे ज्या कॉलेजमध्ये मला प्रवेश हवा होता तो थोडक्या गुणांनी चुकला. मग एका दुसऱ्या कॉलेजमधून मी इंजिनीअर झालो. पण माझ्या दुर्दैवाचे फेरे एवढय़ावरच संपले नाहीत. ज्या कंपनीत नोकरी मिळण्यासाठी मी कसून तयारी केली होती त्या कंपनीने मंदीमुळे भरतीप्रक्रियेलाच स्थगिती दिली. नेमकं असं काहीतरी घडतं की जे मला हवं असतं ते मिळत नाही. हे इतक्या वेळा वारंवार घडलं आहे की मी कमनशिबी आहे, याबाबत माझी खात्री पटली आहे. त्यामुळे मी कितीही तयारी केली तरी चांगल्या कंपनीत नोकरी मिळणे माझ्या नशिबात नाही.’’

पंचाहत्तरीच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या मंगलाबाईंची व्यथा वेगळी आहे. दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यापासून त्या एकटय़ा पडल्या आहेत.  खरं तर मुलगा, सूनबाई, नातवंडं असं त्यांचं भरलेलं कुटुंब आहे, पण उतारवयात त्यांच्याशी चार शब्द बोलायलाही कुणाला वेळ नाही. ‘मोबाइलमध्ये तुझा चांगला वेळ जाईल’, असे म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना एक स्मार्ट फोनही घेऊन दिला आहे. पण त्याचा वापर तर दूरच राहो, पण त्यांना तो साधा उचलताही येत नाही. त्यांना वाटतंय की मोबाईलपेक्षा कुणी प्रत्यक्ष बोललं तरी बरं वाटेल. पण त्यांची ही साधी अपेक्षा ना त्यांच्या कुटुंबीयांकडून पूर्ण होत, ना इतर नातेवाईकांकडून! मंगलाबाईंना वाटतंय की मुलगा-सुनेपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनीच गोड बोलून आपला उपयोग करून घेतला आणि आपणही आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी बाजूला सारून त्यांच्यासाठी खस्ता काढत राहिलो. पण त्याबाबत चांगले उद्गार ऐकणेही आपल्या नशिबी नाही. ‘जग फार कृतघ्न आहे’, असे त्यांना वाटत राहते. ‘सीनिअर सिटीझन’च्या एका क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा मुलगा-सून त्यांना आग्रह करतात, पण तिथेही असाच अनुभव येईल असे वाटून त्या तिथे जात नाहीत. एकटेपणामुळे त्या मनातल्या मनात कुढत राहतात. आपलं सारं आयुष्य असंच ओघळून गेलंय, अशी खंत त्यांना वाटत राहते.

आदित्य आणि मंगलाबाई वयाच्या वेगवेगळ्या टप्प्प्यांवर आहेत. त्यांचे अनुभव व व्यथाही वेगळ्या आहेत. पण त्यांच्यात एक गोष्ट मात्र समान आहे. ती म्हणजे त्यांनी स्वत:ला ‘व्हिक्टिम’मानण्याची, परिस्थितीचा बळी मानण्याची सवय लावून घेतली आहे. ‘व्हिक्टिम’ मानण्याची सवय म्हणजे प्रतिकूल घटना किंवा इतर माणसांच्या प्रतिकूल वागणुकीचे आपण बळी आहोत, अशी ठाम धारणा असणे होय. आदित्यला वाटत आहे की त्याच्या वाटय़ाला आलेली प्रतिकूल परिस्थिती (नशीब) त्याच्या हताशेला कारणीभूत आहे. मंगलाबाईंना वाटतंय की इतरांनी दिलेली कृतघ्नतेची वागणूक त्यांच्या एकटेपणाला कारणीभूत आहे.

ही सवय असलेल्या व्यक्ती स्वत:च्या वाटय़ाला आलेल्या परिस्थितीबाबत आदित्य व मंगलाबाईंप्रमाणे स्वत:ची कीव करत राहतात व दुर्दैवाचा पाढा सतत उगाळत बसतात. त्यामुळे आत्मकरुणेची भावना त्यांच्या मनात प्रबळ असते. अशी दुर्दैवी परिस्थिती आपल्यावर लादण्यास इतर लोक किंवा आपल्या आयुष्यातील घटना जबाबदार आहेत, त्यामुळे ती परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटून त्यांना हतबलता येते. अशा हतबलतेमुळे आदित्य तर तरुण वयातच हातपाय गाळून बसला आहे व मंगलाबाईही मनातल्या मनात कुढत बसल्या आहेत.

‘व्हिक्टिम’ मानण्याची सवय आत्मघातकी?

आदित्य कदाचित असा प्रश्न विचारेल की माझ्या आयुष्यात प्रतिकूल घटना खऱ्याच घडल्या आहेत. तरीही मी दुर्दैवाचा बळी आहे, असे म्हणायचे नाही का? किंवा मंगलाबाई म्हणतील की माझ्या आजूबाजूचे लोक माझ्याशी खरेच कृतघ्नतेने वागत आहेत. तरीही मी माझ्या मनस्थितीस त्यांची वागणूक जबाबदार धरायची नाही का? यासाठी आपण खरेच बळी आहोत का याचे उत्तर आदित्य व मंगलाबाईंनी शोधले पाहिजे. आदित्यच्या आयुष्यातील प्रतिकूल घटना या खरोखर घडल्या असल्या तरी ‘मी कमनशिबी आहे’, हा आदित्याने त्या घटनांचा लावलेला अर्थ वस्तुस्थितीवर आधारलेला नाही. आदित्यने स्वत:स हे विचारले पाहिजे की बदललेला अभ्यासक्रम किंवा पात्रता परीक्षेचे बदललेले नियम ही त्याच्या एकटय़ाच्या बाबतीत घडलेली घटना नसून ती त्याच्या बॅचमधील सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेली घटना आहे मग ती संपूर्ण बॅच दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकली का?

माझ्या आयुष्यात प्रतिकूल घटनाच वारंवार घडत असतात, हे आदित्यचे म्हणणे पूर्णपणे सत्य नाही. आदित्यच्या आयुष्यात प्रतिकूल घटनांबरोबरच काही अनुकूल घटनाही घडल्या असतील. उदाहरणार्थ, त्याच्या हातात इंजिनीअरिंगची पदवी आहे, ही अनुकूल घटना नव्हे काय? परंतु व्हिक्टीम वा बळी मानण्याच्या सवयीमुळे अशा अनुकूल घटनांकडे आदित्यचे लक्षच जात नाही. तो फक्त प्रतिकूल घटनाच लक्षात ठेवतो व त्याच मनात घोळवत ठेवतो व स्वत:वर ‘कमनशिबी’असा शिक्का मारून घेतो. असा शिक्का मारल्यामुळे पुढेही प्रतिकूलच घडणार अशी त्याची ठाम समजूत होते. त्यामुळे ती परिस्थिती पालटण्यासाठी तो कुठलेच प्रयत्न करीत नाही. प्रयत्न न केल्यामुळे पुन्हा प्रतिकूल घटना घडण्याची शक्यता वाढते व स्वत:च्या नशिबाला बोल लावण्याची अजून एक संधी आदित्य आपणहून ओढवून घेतो.

मंगलाबाईंच्या बाबतीतही काही व्यक्ती त्यांच्याशी कृतघ्नपणे वागत असल्या हे खरे मानले तरी त्यावरून ‘जगच कृतघ्न आहे,’ हा त्यांनी काढलेला निष्कर्ष अवास्तव आहे. त्यांच्या आयुष्यात अशाही अनेक व्यक्ती असतील की त्या मंगलाबाईंशी कृतघ्नतेने वागल्या नसतील. परंतु त्या व्यक्ती मंगलाबाईंच्या स्मरणात नाहीत. इतकेच नव्हेत तर इतरांशी सदासर्वदा कृतज्ञतेने वागणे त्यांना स्वत:ला तरी शक्य झाले आहे काय, असाही प्रश्न त्या स्वत:स विचारत नाहीत. तसेच कुणीच विचारपूस करीत नाही, हे त्यांचे म्हणणेही वस्तुस्थितीला धरून नाही. उदाहरणार्थ, त्यांचा एकटेपणा हलका करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मोबाइल घेऊन दिला आहे किंवा सीनिअर सिटीझन क्लब शोधून काढला आहे. म्हणजे त्यांचे कुटुंबीय त्यांना आनंद देण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण स्वत:स व्हिक्टीम मानण्याची सवय मंगलाबाईंच्या मनात इतकी घट्ट रुजली आहे की कुटुंबीय सुचवीत असलेले मार्ग त्यांना नकारात्मकच वाटतात. त्यामुळे एकटेपणा कमी करण्यासाठी इतरांनी त्यांना मदत न करण्यासच त्या नकळतपणे खतपाणी घालतात. परिणामी त्यांचा एकटेपणा वाढत जातो.

व्हिक्टीम मोड ऑफ करा.

स्वत:स व्हिक्टीम मानण्याची प्रवृत्ती जन्मजात नसते. आपल्या आयुष्यात सतत प्रतिकूल घडत आहे व भविष्यातही प्रतिकूलच घडत राहणार अशा निराधार विचाराची स्वत:ला लावून घेतलेली ती सवय आहे. कुठलीही सवय जशी आपण लावून घेऊ शकतो, तशी सोडूनही देऊ शकतो. म्हणूनच एखादा मोड ज्याप्रमाणे तुम्ही ऑन किंवा ऑफ करू शकता त्याप्रमाणे ही सवय ‘ऑफ’ करण्याचे बटण तुमच्याकडे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वत:ला परिस्थितीचे किंवा इतरांच्या वागण्याचे बळी समजत राहाल, तोपर्यंत स्वत:च्या भावनांचे व वागण्याचे नियंत्रण परिस्थितीकडे किंवा इतरांकडे सोपवत राहाल व निष्क्रिय व्हाल. ‘व्हिक्टिम मोड ऑफ करणे’ अर्थात बळी जायला नकार देणे म्हणजे प्रतिकूलता ही अटळ नियती नाही असे समजून स्वत:च्या भावनांचे व वागण्याचे नियंत्रण स्वत:कडे घेणे. ते घेतलेत तर भविष्यात अनुकूल घडण्याच्या शक्यतेवर काम करू शकाल व त्यासाठी स्वत:स सक्रिय कराल.

आदित्यने व्हिक्टिम मोड ऑफ केला तर स्वत:चे भविष्य नियतीवर सोपवणार नाही. स्वत:चे उद्दिष्ट गाठण्यासाठी एखादा मार्ग बंद झाला तर पर्यायी मार्गाचा शोध घेऊन अधिक खडतर आव्हाने झेलण्यासाठी स्वत:स प्रवृत्त करेल. मंगलाबाईंनी जर व्हिक्टिम मोड ऑफ केला तर कृतघ्न लोकांव्यतिरिक्त इतर चांगली वैशिष्टय़े असलेल्या व स्वत:शी  जुळणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी त्या स्वत:च पुढे सरसावतील. त्यासाठी कुटुंबीयांनी सुचविलेले मार्गही तपासून पाहतील. इतरांवर अवलंबून असण्याची सवय मोडून स्वावलंबी होतील व आयुष्यातील उर्वरित काळ न कुरकुरता समाधानात व्यतीत करू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 1:02 am

Web Title: victims of adversity chaturang psychroscope article abn 97
Next Stories
1 गद्धेपंचविशी : ‘एनएसडी’तले दिवस..
2 कथा दालन : सुनीता
3 चाइल्ड पॉर्नोग्राफीचा भस्मासुर
Just Now!
X