News Flash

दुर्घटनेतून उभा राहिला विधायक प्रकल्प

कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून कुटुंब फुटलेली आपण नेहमीच बघतो. त्या लोभातून हत्या झाल्याच्या बातम्या आता नव्या नाहीत.

| December 7, 2013 01:01 am

कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून कुटुंब फुटलेली आपण नेहमीच बघतो. त्या लोभातून हत्या झाल्याच्या बातम्या आता नव्या नाहीत. मालमत्तेवर स्वखुशीने पाणी सोडून ती समाजाच्या हवाली करण्याच्या बातम्या मात्र क्वचितच. अशाच या किनरे बहिणी. आपल्या वडिलांच्या पाच एकर जमिनीत त्यांनी अंधांसाठी शाळा बांधली आणि त्यांचं आयुष्य मार्गी लावलं. किनरे बहिणींची, दुर्घटनेतून उभ्या राहिलेल्या एका विधायक प्रकल्पाची ही कहाणी
‘आम्ही साऱ्या’ या सदरातील ही कहाणी थोडीशी वेगळी. पाच बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची. या कुटुंबावर कोसळलेल्या, सुन्न करून टाकणाऱ्या एका दुर्घटनेतून उभ्या राहिलेल्या एका विधायक प्रकल्पाची. आणि त्यामागे उभ्या राहिलेल्या कुटुंबाच्या एकजुटीचीही. आयुष्याच्या एखाद्या वळणावर, दबा धरून असलेलं एखादं हिंस्र संकट अवचित आपली मानगूट पकडतं, त्या धक्क्याने जीव घुसमटतो, पण अशा वेळीही स्वत:ला सावरून उभी राहणारी माणसं या संकटाचे रूपांतर संधीमध्ये करतात आणि पुन्हा ताठ मानेने जगण्याला सामोरी जातात. तशीच काहीशी ही गोष्ट.
सुनीला कामत, उर्मिला असगेकर, प्रतिभा सेनगुप्ता, कुमुदिनी तेंडुलकर आणि साधना चांदेकर ही या पाच बहिणींची विवाहानंतरची नावे. पण या सगळ्या किनरे माहेरवाशिणी कोकणातील घराडी नावाच्या छोटय़ाशा गावात वाढलेल्या. हे गाव महाडपासून एक तासाच्या अंतरावर. जेमतेम हजार उंबऱ्याचे. त्यांचे वडील गावातील शाळेत शिक्षक आणि मुख्याध्यापक आईही शिक्षिकाच. त्यामुळे घरातील समृद्धी म्हणजे काय तर शिक्षण असाच संस्कार प्रत्येकीवर झाला. नाही म्हणायला, कोकणात प्रत्येक कुटुंबाकडे असते तशी या कुटुंबाची पाच एकराची आंब्या-काजूची एक बाग होती. गावातल्याच शाळेत शिकणाऱ्या या मुलींवर आणि कुटुंबावर पहिला आघात झाला तो वडिलांच्या अकस्मात निधनाचा. पण म्हणून त्या कोणाचे ना शिक्षण थांबले ना लग्न रेंगाळले. आधी पदवीधर, मग पुण्याला जाऊन पदव्युत्तर शिक्षण, मग लग्न अशी कुटुंबाची कहाणी सुफळ संपूर्णतेकडं वाटचाल करीत असतानाच ती भयंकर दुर्घटना घडली. घराडी गावातील त्यांच्या घरावर दरोडा पडला आणि त्यात आईची अमानुष हत्या झाली. घरात एकटय़ा राहणाऱ्या आईने प्रतिकार केला असेल-नसेल पण पैशाअडक्यापेक्षा मौल्यवान गोष्ट या मुलींनी गमावली, त्यांची आई! दहा वर्षांपूर्वी ज्या दिवशी वडिलांचे निधन झाले त्याच दिवशी ही दुर्घटना घडावी हा दैवदुर्विलास.
आई-वडिलांच्या माघारी प्रश्न होता त्या पाच एकर बागेचा आणि त्यांच्या वाटणीचा. कोणालाही सहज मोह व्हावा अशी कोकणातील आंब्या-काजूची बाग. पण या बहिणींना वाटलं याचा काही वेगळा उपयोग करता येईल का? आई-वडिलांच्या स्मृती जागवणारे असे? या वेळेपर्यंत प्रतिभा सेनगुप्ता यांना पुण्यातील एका अंधशाळेत शिकवण्यास भरपूर अनुभव मिळाला होता आणि रत्नागिरीच्या आसपास कोठेही अंधशाळा नाही ही बाब त्यांच्या लक्षात आली होती. मग पाचही बहिणींनी निर्णय घेतला या पाच एकर जमिनीवर या परिसरातील पहिली अंधशाळा सुरू करण्याचा आणि आईच्या नावाने ‘स्नेहलता प्रतिष्ठान’ची स्थापना २००३ साली, आईच्या मृत्यूनंतर नऊ वर्षांनी केली गेली. या ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा त्या कुटुंबात पाचाची पंचवीस माणसं झाली होती. पण कौतुकाची बाब म्हणजे या विधायक विचाराची कोणीही हेटाळणी केली नाही. अर्थात, पाचही बहिणींना गावात येऊन शाळेसाठी वेळ देणे शक्य नव्हते, पण मग गरजेनुसार, सोईनुसार प्रत्येकीने आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहे. यशस्नेहा (म्हणजे वडील यशवंत आणि स्नेहलता) ट्रस्ट या नावाने आता काम करणाऱ्या या शाळेत सध्या तीस मुलं शिकतात. पण २००३ साली शाळा सुरू झाली तेव्हा गुहागर, खेड आणि घराडी गावांतील मिळून जेमतेम चार मुलं शाळेत आली. शाळेचे दैनंदिन काम सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने घेतली ती सगळ्यात मोठी बहीण सुनीला आणि प्रतिभा यांनी. मुलांना शिकवण्याची जबाबदारी प्रतिभाची आणि प्रशासनाची जबाबदारी सुनीलाची. शाळा सुरू करण्यासाठी तेव्हा हातात होती फक्त जमीन आणि मुख्य गरज होती पैशाची. तात्पुरते का होईना बांधकाम, शिकवण्यासाठी लागणारी साधनसामग्री आणि निवासी शाळा असल्याने मुलांचे रोजचं जेवणखाण यासाठी होणारा खर्चही होताच. ही सगळी आर्थिक पायाभरणी या पाचही बहिणींनीच केली. त्या वेळी शाळेत शिकवण्यासाठी येणारे दोन शिक्षक आणि स्वयंपाकी यांच्या पगाराचा खर्चही सुनीला, प्रतिभा अनेकदा स्वत:च्या खिशातून करीत होत्या.    
अंधशाळा सुरू करताना या बहिणींना प्रथम सामना करावा लागला तो या मुलांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा. आपला मुलगा अंध आहे याचा अर्थ तो घराबाहेर पडून काहीच करू शकत नाही अशी जणू त्यांच्या कुटुंबाची पक्की समजूत होती. त्यामुळे मुलाने सतत आपल्या नजरेसमोरच राहावे असा आग्रह असे. या मुलांना स्वावलंबी आणि स्वत:च्या पायावर उभे करणे हे किती गरजेचे आहे हे कुटुंबाला समजावून सांगणे आणि त्यांचे मन वळवून मुलाला शाळेत आणणे हे आव्हान या दोघींनी एकत्रितपणे पेलले, चिकाटी न सोडता. आजही दिवाळीच्या किंवा गणपतीच्या सुट्टीत मुलं घरी जातात, तेव्हा मुलांना लवकरात लवकर शाळेत परतायचे असतात पण आईला मात्र आपलं मूल घरीच राहावं असं वाटत असते.
सर्वसाधारण शाळेत शिकवला जाणारा नववीपर्यंतचा अभ्यासक्रम या शाळेत आज शिकवला जातो. पण त्यापेक्षा वेगळे शिक्षण आवर्जून दिले जाते ते संगीत आणि हस्तकलेचे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, हार्मोनिअम-तबला सारख्या विविध वाद्यांचे वादन आणि त्या बरोबरीने कोकणच्या भूमीत अजूनही तग धरून असलेले लोकसंगीत याचे धडे मुलांना दिले जातात. शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा किंचित सरस अशीच मुलांची संगीतातील कामगिरी आहे आणि त्यामुळे ही मुलं आता केवळ विविध स्पर्धामध्येच यशस्वी होत नाहीयेत तर त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम कोकणात जागोजागी होतायेत आणि गाजतायत. या कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनाचा एक भाग शाळेला. एक त्या मुलांसाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांना आणि तिसरा मोठा हिस्सा मिळतो तो मुलांना. या प्रत्येक मुलाच्या नावाने पोस्टात उघडलेल्या खात्यात हे पैसे जमा होतात आणि आज प्रत्येकाच्या खात्यात पाच ते दहा हजारांपर्यंतची रक्कम जमा आहे.
या मुलांना आर्थिक स्वावलंबन शिकवणारा दुसरा प्रयोग आहे केनवर्कचा. केनच्या पिशव्या, बॅगा, खुच्र्या, फ्लॉवरपॉटस्, लॅम्पशेड्स अशा अनेक गोष्टी बनवून त्याच्या विक्रीतून या मुलांना आर्थिक स्वावलंबन शिकवले जाते. शाळेतील शिक्षकांचे पगार, दैनंदिन खर्च, मुलांच्या निवास-भोजनाच्या सोयीसाठी होणारे खर्च हे सर्व काही देणगीदार किंवा अनेकदा या बहिणींच्या जमवलेल्या पैशातून होते, कारण या मुलांना शाळेची किंवा वसतिगृहाची कोणतीही फी आकारली जात नाही. पण या सगळ्या प्रयत्नांबद्दल, धडपडीबद्दल समाधान वाटावे अशी या मुलांची प्रगती आहे, असे प्रतिभाताई अभिमानाने सांगतात. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड’ या संस्थेतर्फे ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा राज्यस्तरावर घेतल्या जातात त्यात या मुलांनी आजवर मिळविलेले यश घवघवीत म्हणावे असेच आहे. विशेषत: ब्रेल वाचन, लेखन स्पर्धेत ही मुलं कायम अव्वल असतात. बुद्धिबळ स्पर्धेत ती बाजी मारतात आणि गायन-वादन हा तर खास या मुलांचाच प्रांत आहे. त्यामुळे या शाळेला आज ‘अ’ दर्जा मिळालेला आहे. या स्पर्धामध्ये भाग घेण्याचा किंवा ठिकठिकाणी संगीताचे कार्यक्रम करण्याचा दुसरा फायदा कोणता तर या मुलांचा वाढलेला आत्मविश्वास. स्पर्धाच्या निमित्ताने होणारे प्रवास, नवीन ठिकाणी मुक्काम, तऱ्हेतऱ्हेच्या लोकांशी होणाऱ्या भेटी आणि स्पर्धेत भेटणारे राज्यभरातील विविध वृत्ती-प्रवृत्तीचे स्पर्धक या सगळ्या गोष्टींना तोंड देताना येत गेलेले व्यावहारिक शहाणपण त्यांच्यासाठी खूप मोलाचे आहे. जगात वावरण्याचा आत्मविश्वास देणारे आहे.
ही शाळा सुरळीत चालण्यासाठी सुनीला आणि प्रतिभा यांचे जे प्रयत्न असतात त्याला बाकीच्या बहिणींचे हातभार लागतात ते दुरूनच पण म्हणून त्याचे मोल कमी नाही. कारण शाळेसाठी देणग्या मिळवणंही गरजेचे आहे. शाळेची मुलं जेव्हा त्यांच्या स्पर्धाच्या निमित्ताने बहिणींच्या गावी जातात तेव्हा त्या मुलांची पूर्ण जबाबदारी या बहिणी घेतात. त्यात मुक्कामापासून ते ने-आण करण्यापर्यंत कितीतरी बाबी असतात. आज शाळेत चौदा शिक्षक आहेत. शाळेची छोटीशी इमारत आहे. त्यात या मुलांसाठी लागणाऱ्या अनेक सोयी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळा पुढे चालू ठेवणारी दुसरी फळी गावातूनच उभी राहिली आहे. हा या बहिणींना सर्वात मोठा दिलासा आहे.
किनरेंच्या बागेतील आंबे-काजू किनरेंच्या गावोगावी आणि परदेशीही राहणाऱ्या नातवंडांना मिळोत न मिळोत शाळेतील मुलं मात्र ते खाऊन तृप्त होतात. पण या तृप्तीमागे उभ्या आहेत या पाच बहिणी, त्यांचे पती, मुल-सुना सगळे.. कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून कुटुंब उभी फुटलेली आपण नेहमीच बघतो. एकमेकांच्या हत्या त्या लोभातून झाल्याच्या बातम्या आता नव्या नाहीत. मालमत्तेवर स्वखुषीने पाणी सोडून ती समाजाच्या हवाली करण्याच्या बातम्या मात्र क्वचितच आणि म्हणूनच चौकटीत दिसतात. अशा दुर्मीळ घटनांपैकीच ही एक..    
vratre@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 1:01 am

Web Title: vidhayak project by kinare sisters
Next Stories
1 हिरव्या वाटेवरचे हिरवे उत्तर
2 शुभार्थीची यशस्वी वाटचाल
3 आनंद स्वराकार
Just Now!
X