14 December 2019

News Flash

अनाथांचा नाथ

विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये ११ आजी-आजोबा व ५५ मुलं राहतात. सध्याचं फळणीकराचं काम मुख्यत्वे एकच, हा डोलारा चालवण्यासाठी मदत मिळवणं. ते म्हणतात, ‘तेव्हाही भीक मागायचो.

| July 18, 2015 01:01 am

ch11विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये ११ आजी-आजोबा व ५५ मुलं राहतात. सध्याचं फळणीकराचं काम मुख्यत्वे एकच, हा डोलारा चालवण्यासाठी मदत मिळवणं. ते म्हणतात, ‘तेव्हाही भीक मागायचो. आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच..’ अनाथांचा नाथ बनलेल्या सेवादानाच्या या सत्पात्री दानाविषयी..
पुण्यातील एक सहृदय वाचक शाम खांडेकर यांनी अलीकडेच माझा संपर्क शोधून माझ्या पत्त्यावर एक पुस्तक पाठवून दिलं, ‘पराजय नव्हे विजय!’ विजय फळणीकर नावाच्या अनाथांच्या नाथाचे हे आत्मकथन. मी सहज म्हणून पुस्तक चाळायला घेतलं आणि त्यात इतकी गुंतले की वाचून झाल्याक्षणी मी फळणीकरांना फोन केला व पुढच्याच रविवारी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आमची भेट नक्की करून टाकली.
विजय फळणीकर यांचं आयुष्य ही देवाची देणगी आहे असे वाटते. घरच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून दहाव्या वर्षी नागपूरहून मुंबईला पलायन. त्यानंतर गिरगाव चौपाटीवर बेवारस आयुष्य जगताना आलेले जीवघेणे अनुभव. पुढे मुंबादेवीच्या देवळासमोर भीक मागत सरलेलं दीड वर्ष. काळे गुरुजींच्या परिसस्पर्शाने जीवनाला मिळालेली कलाटणी.. समृद्धीच्या पायऱ्या चढत असताना एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने आलेलं कमालीचं नैराश्य आणि त्यातून स्फुरलेली अनाथ मुलांचा बाप होण्याची प्रेरणा.. या साऱ्याच घटना सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या आहेत.
उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. डोणज्याची जागा तर हिरव्यागार डोंगररांगांच्या मधोमध अगदी निसर्गाच्या कुशीत आहे. इथे अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ग्रामीण भागातील दहावी व बारावी नापास मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, हॉस्पिटल व फिरता दवाखाना असे एकूण पाच उपक्रम (सर्व विनामूल्य) चालतात. सगळ्या कौलारू बैठय़ा इमारती, पाठच्या उतारावर आंबा, नारळ, चिकू, डाळींब यांसह फुलझाडं, भाजीपाला ch10यांची निगुतीने केलेली लागवड. प्रवेशद्वाराशी गणपतीचं लहानसं देऊळ. मागच्या बाजूला भरभक्कम विहीर ज्यामध्ये सर्व छतांवर पडणारं पावसाचं पाणी गाळून सोडण्याची व्यवस्था. धुण्याभांडयाचे पाणीही प्रक्रिया करून बागेला घालण्याची सोय. बोअरचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन युनिट. हा देखणा आराखडा केवळ मॅटिकपर्यंत शिकलेल्या फळणीकरांनी बनवलाय यावर विश्वासच बसत नाही.
गोरगरिबांसाठी एक पैसाही न घेता (जेवणासह) चालवल्या जाणाऱ्या इथल्या रुग्णालयामधील सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, स्त्री- पुरुष रुग्णांसाठी वेगवेगळे वार्ड्स, प्रसूतिगृह, ईसीजी व डिजिटल एक्स-रेची सोय, दंत विभाग व नेत्र चिकित्सा अशा सुविधा अचंबित करणाऱ्या आहेत. शिवाय ‘आपलं घर’ची अद्ययावत मोबाइल मेडिकल व्हॅन डोक्यावर सोलर पॅनल घेऊन दररोज अतिदुर्गम खेडय़ांमध्ये जात असते. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय. इथल्या मुलांची आनंदी व निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमनशिबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान, असा मला प्रश्न पडला! केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असंच हे ‘आपलं घर’ आहे.
आपलं सर्वस्व पणाला लावून अनाथांसाठी आपलं घर उभारणाऱ्या फळणीकरांच्या जीवनावर एखादा चित्रपट सहज निघू शकेल! खरं तर नागपूरच्या एका संपन्न घरात त्यांचा जन्म झाला, पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने नशिबाचे फासे फिरले आणि न शिकलेल्या आईवर चार घरची भांडी घासून कुटुंबाचं पोट भरण्याची पाळी आली. गरिबीला त्रासलेल्या नऊ-दहा वर्षांच्या विजयला, शाळेतील मित्रांच्या गप्पांतून कधी तरी ऐकलेली झगमगती मुंबई खुणावू लागली आणि एक दिवस त्याने हिय्या करून घर सोडलं. खिशात एकुलती एक दहा रुपयांची नोट घेऊन हा मुलगा दादरला उतरला आणि चौपाटीवरील भयानक अनुभव घेत भिरभिरत मुंबादेवीच्या आश्रयाला आला. पहिला दिवस सार्वजनिक नळावरचं पाणी पिऊन ढकलला, पण नंतर प्रबळ भुकेने सदसद्विवेकबुद्धीवर मात केली आणि देवळाच्या पायरीवर भीक मागत त्याचं नवं आयुष्य सुरू झालं. दीड वर्षांत तो पक्का भिकारी बनला, परंतु परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं म्हणून ती घटना घडली. ४२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग फळणीकरांच्या डोळ्यांसमोर आजही जसाचा तसा उभा आहे. एका उंचापुऱ्या रुबाबदार गृहस्थांनी दर्शन करून परतताना अगदी अनपेक्षितपणे त्याचा हात पकडला आणि त्याला खेचतच आपल्या गाडीत बसवून पोलिसांमार्फत डोंगरीच्या बालसुधारगृहात नेलं. या देवदूताचं नाव यशवंत रामकृष्ण काळे. डोंगरीच्या बालसुधारगृहाचे ते त्या वेळी प्रमुख होते. त्यांचा परिसस्पर्श झाला आणि विजयच्या आयुष्याचं सोनं झालं. आजही दर गुरूपौर्णिमेला ते कुठेही असले तरी काळे गुरूजींच्या पाया पडायला जातातच.
सातवी पास झाल्यावर सुधारगृहाच्या नियमानुसार विजयला बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्याने नागपूरला दिवसा नोकरी आणि रात्री शाळा करत मॅट्रिकचा टप्पा गाठला. त्यानंतर पुणे येथील बालचित्रवाणीत मंच साहाय्यक म्हणून नियुक्ती, मग विवाह, मुलाचा जन्म, आकाशवाणीवरील जाहिरात क्षेत्र या नव्या दालनात प्रवेश आणि नंतर प्रतिमा कम्युनिकेशन नावाचं डॉक्युमेंटरी फिल्म्स, मालिका, जाहिराती इत्यादींची निर्मिती करणारं स्वत:चं ऑफिस अशा स्थैर्याच्या व समृद्धीच्या पायऱ्या तो भराभर चढत गेला. पण दुर्दैव दबा धरून होतंच. सुखाच्या ऐन शिखरावर असताना पुन्हा एकदा दु:खाने गळामिठी मारली. त्यांचा एकुलता एक मुलगा वैभव रक्ताच्या कर्करोगाने तडकाफडकी गेला आणि फळणीकर दाम्पत्य पुरतं कोलमडलं. इतकं की मनात आत्महत्येचे विचार प्रबळ होऊ लागले. त्या दरम्यान वैभवच्या विम्याचे पैसे आले. त्यांच्या मनात आलं या पैशातून रुग्णवाहिका घेतली तर वैभवच्या स्मृतीही चिरंतन राहतील आणि समाजालाही फायदा होईल. हा विचार फळणीकरांनी मित्रांजवळ बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला (एप्रिल २००२). फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वापाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली.
दिवसा नोकरी अन् रात्री रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बनून जनतेची चाकरी अशी दुहेरी वाटचाल सुरू झाली तरी मन उदासच होतं. विचार करता करता अनाथ आश्रमाची प्रेरणा मिळाली आणि फळणीकर पती-पत्नींच्या आयुष्याला दिशा मिळाली. स्वत:चे दोन फ्लॅट्स विकून त्यात बायकोच्या दागिन्यांसह होती-नव्हती ती शिल्लक टाकून फळणीकरांनी वारजे येथे दोन गुंठे जमीन खरेदी केली आणि त्यावर बांधकाम होइपर्यंत लगतच छोटंसं घर भाडय़ाने घेऊन ३ ते १० वयोगटांतील १४ मुलांचं ‘आपलं घर’ सुरू झालं (फेब्रुवारी २००३). सुदैवाने मुलांची काळजी घ्यायला अत्यल्प पगारात रत्ना कंधारे आणि ननावरे मावशी पुढे आल्या आणि पालकांची संख्या दोनाची चार झाली.
उद्घाटनासाठी काळे गुरुजींच्या नावाशिवाय दुसरं नाव मनात येणं शक्यच नव्हतं. ‘फक्त लढ म्हणा’ या कवितेची आठवण करून देत ते म्हणाले, देवळासमोर भीक मागणारा, केस वाढलेला, अंगावर फक्त एक फाटकी चड्डी घातलेला विजय मला आजही स्पष्ट आठवतोय. त्याची ही धडपड पाहून मला इतकंच म्हणायचंय की माझ्यासाठी याहून मोठी कोणती गुरूदक्षिणा असेल?
त्यानंतर अनंत अडचणीतून मार्ग काढत संस्था विस्तारत गेली. व्याप वाढू लागले तशी फळणीकरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मग २४ तासही अपुरे पडू लागले. आश्रमात येणाऱ्या मुलांची संख्या वाढतच होती, पण वारज्याच्या जागेत क्षमतेबाहेर मुलं ठेवणं शक्य नव्हतं. तेव्हा आणखी एक अनाथाश्रम आणि त्या सोबत वृद्धाश्रम काढावा असं त्यांच्या मनानं घेतलं. वृद्धाश्रमाच्या संकल्पनेबाबत ते म्हणतात, ‘लहान मुलांबरोबर आजी-आजोबा हवेतच ही माझीच भावनिक गरज होती.’
त्यानुसार जागेचा शोध घेताना सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील हिरवाईने नटलेली पावणेदोन एकराची जागा नजरेसमोर आली. समाजपुरुषाच्या पाठिंब्याने हेही शिवधनुष्य उचललं आणि दोन महिन्यांतच सर्व बांधकाम होऊन निराधार आजी-आजोबांना नातवंडांची ऊब मिळू लागली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांसाठी निरनिराळ्या सोळा व्यवसायांचे नि:शुल्क प्रशिक्षण देणारे केंद्र, गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल व गावोगावी फिरणारी अद्ययावत रुग्णवाहिका अशा आणखी ३ उपक्रमांसाठी मदतीचे अनेक हात पुढे आले आणि स्वच्छ, पारदर्शी काम असेल तर काही कमी पडत नाही याचा निर्वाळा मिळाला.
फळणीकरांचं नि:स्पृह काम बघून अनेक दाते ‘आपलं घर’ संस्थेशी जोडले गेले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर हे संस्थेचे एक ट्रस्टी आहेत. त्यांच्या मनाचा मोठेपणा व संस्थेशी जुळलेली नाळ इतळी घट्ट की एवढय़ा व्यस्त दिनक्रमातूनही महिन्याच्या बैठकीला ते आवर्जून हजर असतात. तेही वेळेच्या पाच मिनिटं आधीच. संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा ‘आपलं घर’ची मानद संचालक आहे. गेली १२ वर्षे ‘आपलं घर’मधील गणपतीची पहिल्या दिवसाची आरती मृणाल कुलकर्णीच्या हस्ते होतेय.
चांगल्या घरातील मुलांना जे जे मिळतं ते ते आपल्या मुलांना देण्याचा फळणीकरांचा प्रयत्न असतो. दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत त्यांना पुण्याबाहेर सहलीला नेलं जातं. कधी समुद्राकाठी तर कधी प्राणीसंग्रहालय बघण्यासाठी. शिवाय सर्कस, संस्कारक्षम सिनेमा अथवा नाटक यांचीही कधीमधी सफर घडते. एअर डेक्कन या विमान कंपनीने तर १५ ऑगस्ट २००५ या दिवशी ‘आपलं घर’च्या सर्व मुलांना व कर्मचाऱ्यांना पुणे, बंगळुरू व चेन्नई अशी विमान सफर घडवली शिवाय चेन्नईत गेल्यावर तर के. पद्मनाभन् या दानशूराने सर्वाची शाही व्यवस्था ठेवली. मुलांच्या मनावर कोरली गेलेली आणखी एक आठवण म्हणजे ‘लिटिल चॅम्प्स’मुळे प्रसिद्ध असलेल्या ‘सारेगम’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात सहभागी होण्याची त्यांना राजन डांगे यांच्यामुळे मिळालेली संधी. इथल्या आजी-आजोबांनीही ‘स्वप्न स्वरांचे, नव तारुण्यांचे’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ही झगमगती दुनिया बघितली. फळणीकर म्हणतात, ‘अशा कार्यक्रमांना समाजच पैसा देतो, मी फक्त नियोजन करतो एवढंच.’
या देवकार्यासाठी फळणीकरांना अनेक पुरस्कार मिळाले. यातील एक पुरस्कार कायम स्मरणात राहील असे ते म्हणतात. नागपूरहून पळून आल्यावर ज्या बिर्ला ऑडिटोरियमच्या बाहेरील पालिकेच्या नळावरचं पाणी पिऊन त्यांनी तहानभूक शमवली त्याच सभागृहात ३४-३५ वर्षांनंतर, २००४ मध्ये सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला. तो क्षण अविस्मरणीय होता. ‘‘या पुरस्कारावर जरी माझं नाव असलं तरी त्यात ‘जेथे राघव तेथे सीता’ हे ब्रीदवाक्य मानून चालणारी माझी पत्नी साधना आणि ‘आपलं घर’च्या सर्व परिवाराचा मोलाचा वाटा आहे,’’ हे त्यांचे उद्गारही पुरेसे बोलके आहेत.
आज ‘आपलं घर’मध्ये ११ आजी-आजोबा व ५५ मुलं राहतात. संस्थेचं मुख्य कार्यालय वारजे येथे आहे. मुलांचा व वृद्धांचा दिनक्रम आखलेला असतो. तो व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी तिथे अनेक र्वष राहणाऱ्या मावशी कंपनीची. फळणीकरांचे काम मुख्यत्वे एकच, हा डोलारा चालवण्यासाठी मदत मिळवणं. हसत हसत ते म्हणाले, ‘तेव्हाही भीक मागायचो, आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच.’ या पूर्ण प्रकल्पाचा महिन्याचा खर्च (२९ सेवकांच्या पगारासह) दरमहा ३ ते साडेतीन लाख रुपये आहे. सरकारची कुठलीही मदत नाही, परंतु समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवणं ही आता समाजाची जबाबदारी.
संपर्क: ०२०-२०२५०७३९
-९८५०२२७०७७
apalaghar@yahoo.com
www.apalaghar.com
संपदा वागळे

First Published on July 18, 2015 1:01 am

Web Title: vijay falnikar apala ghar
Just Now!
X