आसिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com

अमेरिके तील ताज्या राजकीय गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर प्रक्षोभक वक्तव्यं करणारे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘ट्विटर’ खातं ट्विटरनं नुकतंच कायमचं बंद के लं. एकीकडे ‘ट्विटर’च्या धैर्याचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा सूर उमटतो आहे. या गदारोळात ‘ट्विटर’नं आपली ठाम भूमिका मात्र सोडली नाही. हा विषय आपणा भारतीयांसाठी विशेष ठरला तो अशासाठी, की भारतात जन्मलेल्या आणि सध्या ‘ट्विटर’ कंपनीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विजया गाडे यांचा या धोरणातील सहभाग.

अमेरिकेचं अध्यक्षपद हे जगात  सर्वात शक्तिशाली केंद्र मानलं जातं. या पदावरील व्यक्तीचा दराराच काही और असतो. सर्वात श्रीमंत, विकसित आणि प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचा राज्यशकट हाकणाऱ्या व्यक्तीच्या वाकडय़ात जाणं हे काही सहजसोपं नाही. त्यातही अशा व्यक्तीकडे जवळपास नऊ कोटी पाठीराखे असतील तर तिच्याशी थेट खुला संघर्ष म्हणजे कठीणच. पण ‘ट्विटर’नं ही हिंमत केलीच..

६ जानेवारीला अमेरिकी संसद ‘कॅपिटॉल हिल’ इमारतीत झालेल्या घुसखोरीनंतर ट्विटरनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं खातं २४ तासांसाठी बंद केलं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांना ट्विटरवरून हद्दपार करण्याचा निर्णयही घेतला. ट्विटरच्या या निर्णयावरून अनेक क्रियाप्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. एकीकडे या धाडसी निर्णयाचं कौतुक होत आहे, तर दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्याला यामुळे प्रोत्साहन मिळेल, असंही म्हटलं जात आहे. गेल्या काही वर्षांत ट्विटरनं आपल्या व्यासपीठावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुराबाबत अधिक गांभीर्यानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांच्यावरील बंदी हे त्या धोरणांचंच फलित आहे. वापरकर्त्यांना मुक्तपणे व्यक्त होऊ देण्यापासून त्यांच्या वादग्रस्त ‘पोस्ट’वर आक्षेपार्ह मजकुराचं ‘लेबल’ लावण्यापर्यंत आणि ट्रम्प यांच्यावर २४ तासांचे र्निबध आणण्यापासून त्यांना पूर्णपणे आपल्या व्यासपीठावरून हद्दपार करण्यापर्यंतचा ट्विटरचा धोरणप्रवास समाजमाध्यम क्षेत्रातील स्थित्यंतराचं द्योतक आहे. या धोरणांचं विशेष कौतुक करण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या मागे असलेला भारतीय चेहरा. ट्विटरच्या विधी, सार्वजनिक धोरण, विश्वास आणि सुरक्षा (legal, public policy and trust and safety lead) विभागाच्या प्रमुख असलेल्या विजया गाडे यांची या प्रक्रियेत केंद्रीय भूमिका आहे. विजया यांचं ट्विटरमधील स्थान इतकं महत्त्वाचं आहे, की ट्विटरचे सहसंस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी जॅक डोरसी हेदेखील निर्णयप्रक्रियेत दुय्यम भूमिकेत असतात, असं म्हटलं जातं.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेत, कंपनीत किंवा पदावर भारतीय व्यक्ती असेल तर देशवासीयांना त्याबद्दल अभिमान वाटणं साहजिकच आहे. आपण भारतीय त्याबाबतीत अंमळ अधिकच भावनिक असतो. ‘पेप्सी’च्या इंद्रा नुयी असोत, की ‘गूगल’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई असोत, की अगदी अलीकडेच अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस असोत. जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतीय वंशाची व्यक्ती दिसते तेव्हा भारतीयांचा ऊर आपोआप अभिमानानं भरून येतो. विजया गाडे यांच्याबाबतीत गेल्या दहा दिवसांपासून भारतीयांची हीच भावना आहे. ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय ट्विटरवरूनच प्रसारित करणारी व्यक्ती म्हणून सुरुवातीला वाटू लागलेलं कुतूहल विजया यांच्या एकूण कारकिर्दीकडे घेऊन गेलं आणि त्यातून एका बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी, भावनिक आणि तितक्याच कणखर व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला.

खरं तर विजया गाडे या भारतीयांच्या प्रकाशझोतात यायला काहीसा उशीरच झाला. कारण गेल्या नऊ-दहा वर्षांपासून ट्विटरमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या विजया यांना ट्विटरच्या विधीधोरणांच्या शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. २०१९ मध्ये न्यूझीलँडमधील एका मशिदीत बेछूट गोळीबार करत शिरलेल्या माथेफिरू श्वेतवर्णीयानं आपल्या या नृशंस हल्ल्याचं थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांवरून प्रसारित केलं होतं. त्यातील काही चित्रफिती ट्विटरवरूनही प्रसारित झाल्या. यातून समाजमाध्यमांवर द्वेषमूलक मजकूर आणि संवादाची मालिकाच सुरू झाली होती. त्या वेळी ट्विटरनं सर्वप्रथम या चित्रफिती हटवून प्रक्षोभक संदेशही खोडून टाकले. त्या वेळीही विजया गाडे यांचं नाव चर्चेत राहिलं. ट्विटरवरून सशुल्क राजकीय जाहिराती प्रसारित करू न देण्याच्या जॅक डोरसी यांच्या निर्णयामागेही विजया यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ‘करोना’काळात या आजाराबाबतचे पसरवण्यात येणारे चुकीचे संदेश वा गैरसमज पसरू न देण्यासाठी ट्विटरनं राबवलेल्या धोरणांच्याही त्याच सूत्रधार मानल्या जातात.

ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय हा कदाचित त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्वाचा मुद्दा असू शकेल. अमेरिकेतील वर्ण, वंशद्वेषाला खतपाणी घालण्याचं काम करणाऱ्या ट्रम्प यांच्यासाठी ट्विटर हे मुक्त व्यासपीठ बनलं होतं. ट्विटर खात्यावरून ट्रम्प यांची प्रक्षोभक विधानं प्रसारित होत असताना त्यावर र्निबध आणण्यासाठी खुद्द ट्विटरमधील कर्मचाऱ्यांकडून आग्रह धरला जात होता. ट्विटरचा वापर करून ट्रम्प देशात दुही पसरवत आहेत, याचे भीषण परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, त्यांच्या वर्णद्वेषी, वंशद्वेषी आणि विरोधकांवरील अश्लाघ्य टीकेला आपणच वचक घालायला हवा, अशी विनवणी ट्विटरमधीलच मोठा गट सातत्यानं जॅक डोरसी आणि अन्य वरिष्ठांकडे करत होता. त्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन मोहीमही चालवली. साहजिकच ट्रम्प यांच्यावरील बंदीचा निर्णय जाहीर करताना, या सहकाऱ्यांना न्याय दिल्याचं समाधान विजया यांना लाभलं असावं. अमेरिकेतील श्वेतवर्चस्ववादी वर्णद्वेषी विचारांच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या विजया यांच्यासाठी या बंदीचं व्यक्तिगत महत्त्व त्याहूनही अधिक असावं.

विजया यांचा जन्म १९७८ मध्ये भारतातच हैद्राबादमध्ये झाला. विजया तीन वर्षांची असताना ती आईसोबत अमेरिकेतील टेक्सास येथील एका छोटय़ाशा शहरात राहाणाऱ्या वडिलांकडे वास्तव्यास आली. अमेरिकेतच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या विजयाच्या वडिलांना अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतरही नोकरी मिळत नसल्यामुळे ते ‘विमा एजंट’चं काम करत होते. पण त्या वेळी फोफावत असलेल्या ‘कू क्लक्स क्लॅन’ या श्वेतवर्चस्ववादी चळवळीमुळे त्यांच्या या रोजगारावरही मर्यादा येत होत्या. बालपणीच्या त्या आठवणींबद्दल सांगताना विजया नेहमीच भावूक होतात. मध्यंतरी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या विधी विभागानं आयोजित केलेल्या मुलाखतीत त्यांनी त्या दिवसांतील कुटुंबाच्या परिस्थितीचं वर्णन केलं होतं. आईवडिलांना आणि त्यांच्यासारख्या स्थलांतरितांना जे भोगावं लागत होतं, ते पाहिल्यानंतर वकील बनून मानवाधिकार क्षेत्रात कार्य करण्याचा निर्धार आपण केला होता, असं त्या या मुलाखतीत सांगतात. पुढे न्यू जर्सीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून त्यांनी उद्योग व मजूर संबंध या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ येथून विधीविषयक व्यावसायिक पदवीही मिळवली. सुरुवातीला जवळपास दहा वर्षर्ं कॅलिफोर्नियातील एका कायदा कंपनीत नोकरी केल्यानंतर त्यांचा सिलिकॉन व्हॅलीत प्रवेश झाला. ‘ज्युनिपर नेटवर्क्‍स’ या कंपनीत विधी विभागाच्या वरिष्ठ संचालक म्हणून काम

करत असताना सिलिकॉन व्हॅलीतील विधीविषयक धोरणांच्या उणिवा त्यांना जाणवू लागल्या होत्या. २०११ मध्ये ट्विटरमध्ये रुजू झाल्यानंतर या उणिवा दूर करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

ट्विटरच्या विधी विभागाच्या प्रमुख म्हणून ट्विटरवरील मजकुराबाबतच्या नियमावलीला त्यांनी आकार दिला. ही एक तारेवरची कसरत आहे. ट्विटर, फेसबुक यांसारखी समाजमाध्यमं मुक्तपीठं म्हणून नावारूपास आली. वापरकर्त्यांना अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य देणारं व्यासपीठ म्हणून लोकप्रिय झालेल्या ट्विटरसारख्या व्यासपीठावरील आक्षेपार्ह, वादग्रस्त मजकुरावर नियंत्रण ठेवणं म्हणजे एक प्रकारे तो मांडणाऱ्यांवर र्निबधच आणणं. त्यामुळे नियंत्रण ठेवलं नाही तर प्रक्षोभक मजकुरामुळे समाजात दुही पसरवत असल्याचा आरोप होण्याचा धोका आणि नियंत्रण आणल्यास वापरकर्त्यांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप होण्याची भीती, अशा दुतर्फा दरी असलेल्या निमुळत्या मार्गावरून जाणं म्हणजे कसरतच. पण विजया यांनी आतापर्यंत ट्विटरसाठी ती बाजू अतिशय समर्थपणे सांभाळली आहे. हे करत असताना त्या इतकी वर्षं पडद्यामागेच राहिल्या. आजही ट्विटरच्या अनेक निर्णयांमध्ये अग्रणी असतानाही त्या प्रत्यक्ष समोर येतच नाहीत. ट्विटरवर राजकीय जाहिरातबाजीला थारा न देण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा जॅक डोरसी यांचं कोण कौतुक झालं, मात्र या धोरणाच्या सूत्रधार विजया याच होत्या. गेल्या दशकभरात विजया यांचं ट्विटरमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचं राहिलं आहे. २०१९ मध्ये जॅक डोरसी आणि ट्रम्प यांची ‘व्हाइट हाऊस’मध्ये भेट झाली तेव्हाही विजया त्यांच्याबरोबर होत्या. डोरसी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीतही विजया हजर होत्याच. ट्रम्प यांच्यावर र्निबध आणण्याचा निर्णय ट्विटरनं घेतला, त्या दिवशी ट्विटरमध्ये नेमकं काय घडलं, याचा वृत्तांत ‘न्यूयॉर्क  टाइम्स’नं प्रसिद्ध केला आहे. त्या वृत्तानुसार, ६ जानेवारी रोजी कॅपिटॉल हिल इमारतीवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला चढवला. त्या दिवशी जॅक डोरसी कुठल्याशा खासगी बेटावर निवांतपणा अनुभवत होते. त्या वेळी त्यांच्या मोबाइलवर विजया यांचा फोन खणाणला. त्यांनी डोरसी यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि ट्रम्प यांचं खातं निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचं डोरसी यांना कळवलं. डोरसी यांना ते मंजूर नव्हतं. पण ट्रम्प यांना प्रक्षोभक वक्तव्य करण्यापासून रोखायचं असेल तर हे आवश्यक आहे, हे विजया यांनी त्यांना पटवून दिलं. डोरसी यांनी आजवर नेहमीच विजया यांच्या मताला महत्त्व दिलं आहे. त्या दिवशीही त्यांनी तेच केलं. लगेच विजया यांनी ट्विटरवरून ट्रम्प यांच्यावरील बंदीची घोषणा केली. त्या वेळी ती बंदी २४ तासांची होती. बंदीकाळानंतर १२ तासांच्या निरीक्षणाअंती त्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल, हे त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं. पण बंदीकाळातही ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांची प्रक्षोभक विधानं सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर ट्रम्प यांचं खातं पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्विटरच्या बंदीनंतर फेसबुकनंही तो निर्णय घेतला. या निर्णयांचं जगभरातून स्वागत झालं. मात्र तरीही ट्विटर अशा निर्णयांतून व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याची टीकाही झाली. पण ट्विटरनं अशा प्रकारची बंदी आमच्यासाठी विजयाची किंवा अभिमानाची गोष्ट नाही, उलट जागतिक पातळीवर सशक्त संवाद घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांत कमी पडल्याचं शल्य वाटतं, असं सांगत टीकाकारांची तोंडं गप्प केली.

ट्रम्प हे अमेरिके चे मावळते अध्यक्ष असल्यानंच ट्विटरनं त्यांच्यावर कारवाईची हिंमत केली, अशी ओरडही ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आली. ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ ही जगभरातील कंपन्यांची रीत असते. पण ट्विटरनं त्यातही आपलं वेगळेपण दाखवलं आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रसिद्धीपथकाला ट्विटरनं अंगावर घेतलं. ट्रम्प यांना हद्दपार केल्यानंतर आणि बायडेन हे बुधवारी (२० जानेवारी) अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार असल्यामुळे अमेरिकी अध्यक्षाच्या ट्विटर खात्याशी संलग्न नऊ कोटी ‘फॉलोअर्स’ बायडेन यांच्याशी संलग्न करा, अशी मागणी बायडेन यांच्या पथकानं ट्विटरकडे केली होती. पण ट्विटरनं ती साफ शब्दांत फेटाळून लावली. हे सोपस्कार करता येणार नाहीत, असं ट्विटरकडून त्यांना निक्षून सांगण्यात आलं. आता यामागे कोण असेल हे वेगळय़ानं सांगायला नको!