अलका पावनगडकर – alkapawangad@gmail.com

स्त्रियांवर हिंसाचार अनेक शतकांपासून होतच आहेत. या जुन्या गोष्टीत नवीन आहे ते त्याबद्दल स्त्रियांमध्ये होत असलेली जाणीवजागृती. गेल्या काही वर्षांत, आपल्या घरातच आपल्यावर अत्याचार होतो आहे आणि तो होता कामा नये, याविषयीचे भान स्त्रियांना येऊ लागले आणि स्त्रिया स्वत:वरील अन्यायाच्या विरोधातच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन इतर स्त्रियांसाठी उभ्या राहू लागल्या आहेत. आपणही माणूस आहोत हे कळणे असेल किंवा आपल्यावर होणारा शारीरिकच नव्हे तर मानसिक, शाब्दिक, आर्थिक अन्याय हीसुद्धा िहसाच आहे, हेही आता-आता स्त्रियांना कळू लागले आहे. म्हणूनच शहरातच नव्हे तर ग्रामीण पातळीवरही विविध आधारगट अनेक स्त्रियांना िहसाचारविरोधात ठाम भूमिका घ्यायला लावत आहेत. अशाच या काही जणी.. स्वत:वरील अन्यायाविरुद्ध तर त्यांनी संघर्ष के लाच, पण  इतरांनाही ‘मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी’ म्हणत अन्यायाविरोधात लढायची ताकद दिली.. त्यांच्या कामाविषयी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबपर्यंतच्या स्त्री हिंसाविरोधी पंधरवडय़ानिमित्ताने..

स्त्रियांविरोधातील सर्व प्रकारच्या हिंसेचा विरोध करण्याचा दिवस म्हणून २५ नोव्हेंबर हा दिवस पाळला जावा असा ठराव १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात झाला. या दिवसाचं औचित्य काय आहे? तर, अमेरिकेलगत असलेल्या ‘डॉमिनिकन रिपब्लिक’ या चिमुकल्या देशात २५ नोव्हेंबर १९६० रोजी पॅट्रिया, मिनव्‍‌र्हा आणि मारिया तेरेसा या तीन बहिणींचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना मिराबेल भगिनी म्हणून ओळखले जाते. या तिघींची गणना त्या देशाच्या रफाएल त्रुहियो नामक लष्करी हुकमशहाच्या राजवटीला प्रश्न विचारणाऱ्या राजकीय विरोधकांमध्ये होते. या तिघी बहिणींच्या मृत्यूनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि त्रुहियोची राजवट संपवली गेली. त्यानंतर मिराबेल भगिनींचा अपघात ही राजकीय हिंसा होती, असे उघड झाले आणि त्या तिघींना देशात हुतात्म्यांचे स्थान प्राप्त झाले.

१९६० मधल्या या घटनेनंतर स्त्रियांचे समान अधिकार, स्त्रीमुक्ती या विषयांवर अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले गेले. त्यानंतरच्या दशकात स्त्रियांप्रति केल्या जाणाऱ्या भेदभावाचे समूळ उच्चाटन व्हावे या उद्देशाने ‘सीडॉ’नामक (Convention on Elimination of all forms of  Discrimination Against Women-CEDAW) सनद तयार झाली. या सनदेवर भारतासह अनेक देशांच्या सरकारांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि  स्त्रियांप्रति भेदभाव करणारे वर्तन बदलण्यासाठी योजना राबवणे, जरूर तर कायद्यात बदल करणे, यासाठीची वचनबद्धता दर्शवली. याच क्रमात १९९९ मध्ये मिराबेल भगिनींच्या मृत्यूदिनाला स्त्रियांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसेच्या विरोधातला दिन म्हणून मान्यता दिली गेली.

पुण्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या ‘मासूम’ संस्थेच्या संस्थापक आणि सह-समन्वयक मनीषा गुप्ते यांनी सांगितले, की हा एकच दिवस नाही, तर २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा काळ हिंसाविरोधी पंधरवडा म्हणून पाळला जातो. १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी अधिकारांचा जाहीरनामा घोषित केला, पण स्त्रियांचे हक्कही मानवी हक्क आहेत, अशी मान्यता १९९४ मध्ये मिळाली. त्यामुळे मानवी हक्क दिन आणि मिराबेल भगिनींच्या हत्येचे संदर्भ या पंधरवडय़ाला आहेत. ‘स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क’ ही मान्यता- म्हणजे एका अर्थी स्त्रीला मानव म्हणून मान्यता मिळायला १९९४ हे वर्ष उजाडले ही बाब खेदजनक आहे खरी. स्त्री-पुरुष असमानता हिंसेला जन्म देते आणि हिंसेने असमानता अधोरेखितही होते. पारंपरिक विचारसरणीत ‘घर ही स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित जागा’ असे मानले जाते, वास्तवात मात्र माहेरचे किंवा सासरचे घर हीच स्त्रीला हिंसेचा अनुभव देणारी पहिली जागा ठरते. मनीषाताई याबद्दल सांगतात, की बाईला हिंसामुक्त जगता येते, पण तो अधिकार म्हणून मान्य नसतो, तर घरच्यांच्या शर्तीवर मिळणारी सुविधा असते. हिंसामुक्त जगण्याचा तिचा हक्क हा कागदावरच राहातो. जर माहेर-सासर या चौकटीबाहेर स्वत:चा अवकाश तिला मिळाला, तर तो अधिकार म्हणून उपभोगता येईल.

स्त्रियांवरच्या हिंसेचा अवकाश आजही कौटुंबिक आणि लैंगिक स्वरूपाच्या हिंसेने व्यापला आहे हे खरे. सर्वच क्षेत्रांत होणाऱ्या हिंसेचे स्थूल आणि सूक्ष्म पदर उलगडून दाखवणारे कार्यक्रम या पंधरवडय़ात करण्याचा आणि स्त्री अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या सर्वच समुदायांविरोधातल्या हिंसेचा विरोध करण्याचा स्त्री चळवळीचा रिवाज आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आदी ठिकाणी असे कार्यक्रम होतात; पण त्यापलीकडे या पंधरवडय़ाबद्दल

कु णाकु णाला माहिती आहे याचा धांडोळा घेतला, तर आश्चर्यकारकरीत्या असे आढळले, की कोकणात लांजा तालुक्यात काम करणारी ‘हेरिटेज, कल्चर, आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट’ ही संस्था तिच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी न चुकता हिंसेच्या एखाद्या मुद्दय़ाला धरून कार्यक्रम करते. या वर्षीदेखील ‘कोविड’काळात सुरक्षिततेची खबरदारी घेऊन मर्यादित स्वरूपात का होईनात, पण हिंसाविषयक जागृतीचे कार्यक्रम करणार असल्याचे संस्थेच्या अपर्णा पवार यांनी सांगितले.

हिंसेची व्यापक व्याख्या पाहिली, तर विनयभंगापासून म्हणजे बाईची छेडछाड, गर्दीत धक्के मारणे, नवरा करत असलेली मारहाण, समाजमाध्यमांवरील ‘ट्रोलिंग’ हे सारे त्यात मोडते. त्या अर्थाने जगातल्या प्रत्येक बाईने कोणत्या ना कोणत्या हिंसेचा अनुभव घेतलेला असतोच असतो, हे विधान अतिशयोक्त नाही, पण त्याबद्दल कुणीही सहजपणे बोलत नाही.  स्त्रियांवरच्या हिंसेचा विषय निघाला, की ‘बाईच बाईची शत्रू असते’ हे विधान ऐकायला मिळते. त्यातला फोलपणा आणि तो समज पसरवण्यामागचे पितृसत्ताक राजकारण स्त्रीवाद्यांनी अनेकदा उकलूनही दाखवले आहे; पण आपल्या परिचयातली एखादी स्त्री दुसरीशी वाईट वागते किंवा टीव्हीवरच्या मालिकांत खलप्रवृत्तीच्या स्त्रिया असतात त्यांचे दाखले दिले जातात; पण स्वत: हिंसेचा अनुभव घेतलेल्या अनेक स्त्रियांनी इतरांवर अन्याय होऊ नये, त्यांना मदत करता यावी, म्हणून अगदी तळमळीने काम केले आहे, हे माहीत असूनही ‘बाई बाईची शत्रू’ याचे सार्वत्रिकीकरण के ले जाते.

मी ऐंशीच्या दशकात सामाजिक काम करायला लागले तेव्हा हिंसापीडितांसाठी संस्था चालवणाऱ्या शहनाझ शेख, फ्लेविया अ‍ॅग्नेस ही मुंबईतली उदाहरणे माझ्यासमोर होती. नंतरच्या काळात अ‍ॅसिडहल्लय़ातून उभ्या राहिलेल्या लक्ष्मी अगरवालची संस्था, खतना प्रथेविरुद्ध बोलणाऱ्या आरेफा आणि सहकाऱ्यांचा ‘सहियो’ गट, वेश्या व्यवसायातल्या स्त्रियांसाठी आणि तृतीयपंथी व्यक्तींनी स्थापन केलेले गट वा संस्था असे विशिष्ट प्रकारच्या हिंसेला वाहिलेले कामही ठिकठिकाणी सुरू झाले होते.  स्वत: हिंसेचा अनुभव घेतलेल्या आणि आता इतर स्त्रियांना मदत करणाऱ्या काही जणी या निमित्ताने बोलत्या झाल्या..  दीपाने( नाव बदलले आहे) सांगितले, की ती स्वत: महाविद्यालयात असल्यापासून स्त्रीमुक्ती संघटनेशी संबंधित होती. लग्नानंतर सुखवस्तू मध्यमवर्गीय आयुष्य जगत होती; पण काही काळाने घरातच तुरळक हिंसेचे अनुभव यायला लागले आणि नंतर तर ते वाढतच गेले, पण तिने त्याचा कुठेही उच्चार केला नाही. असह्य़ झाल्यावर तिने नवऱ्याबरोबरचे नाते संपवले. हिंसेला नकार देण्याचा ठामपणा कमवायला आपल्याला इतके जड गेले, तेही संघटनेशी संबंध असताना; मग सर्वसामान्य स्त्रीला ते किती जड जात असेल, याची जाणीव या प्रवासादरम्यान तिला झाली आणि मग तिने ठरवले, की अशा पीडित स्त्रियांना मदत करायची. ती आज संघटनेशी जोडून काम करते आहे.

मारहाण, शिवीगाळ यांसारखी उघड दिसणारी नसेल तर  मानसिक आणि आर्थिक हिंसा अनेकींना ओळखताही येत नाही. यासाठी केतकी (नाव बदलले आहे) जबाबदार धरते संस्कारांना. वकील असलेली केतकी गेली तीन वर्षे पुण्यात एका स्त्री संघटनेच्या समुपदेशन केंद्रात स्वयंसेवक म्हणून काम करते आहे. सहन करण्याचे, त्याग करण्याचे संस्कार बाईला गुदमरवून टाकतात. कायद्याचे उच्च शिक्षण असूनही आपल्याला मिळणारी वागणूक म्हणजे आर्थिक आणि भावनिक शोषण आहे, हे ओळखायला तिला स्वत:लाच ६-७ वर्षे लागली. आता ती ज्या संघटनेसोबत काम करते, तिथे स्वयंसेवक म्हणून जायला लागल्यानंतर तिच्यासमोर कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यात नमूद केलेल्या हिंसेचे सर्व पदर उलगडले गेले. आता तिचा आत्मविश्वास वाढला आहे आणि अनेकींना समजून घेऊन मदत करता येते याचे समाधानही तिला लाभते आहे.

हिंसा  शारीरिक असो वा मानसिक, ती करणाऱ्याला त्यातून साधायचे असते ते समोरच्याचे मानसिक खच्चीकरण आणि स्वत:च्या सामर्थ्यांचे प्रकटीकरण. स्त्री कितीही शिकलेली असली किंवा श्रीमंत असली तरी तिला हतबल वाटायला लावण्याचे सामथ्र्य हिंसेच्या अगदी लहानशा कृतीतही असते. अशा वेळी सामाजिक हस्तक्षेप करून बाईला मदत केली पाहिजे, या स्त्री संघटनांनी मांडलेल्या भूमिकेचा आता अनेकांनी स्वीकार केला आहे. अपर्णा पवार यांनी २००८ पासून लांजा तालुक्यातील अनेक गावांतून आधारगट स्थापन केले आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना ‘मासूम’ संस्थेतून मिळाले. ‘मासूम’च्या जया नलगे यांनी सांगितले, की आधारगटाची संकल्पना २००० मध्ये मांडली गेली. गावागावांतून स्त्रियांची निवड करून, त्यांना प्रशिक्षण देऊन आधारगट स्थापन केले गेले. नंतर काही वर्षे स्त्रियांवरील हिंसेविरोधात महाराष्ट्रातल्या शंभरहून अधिक संस्था आणि त्यांच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांपर्यंत ही संकल्पना पोहोचवली गेली. आज अनेक गावांतून असे गट वेगवेगळ्या नावांनी काम करताहेत. गावातल्या स्त्रीवर  हिंसा झाली तर गटातले सदस्य तिला मदत करतात. कौटुंबिक हिंसेचा सामना करणाऱ्या अनेक जणी आधारगटांत असतात. ‘मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी’ अशा तत्त्वावर हे काम चालते.

स्त्री-मुक्ती संघटनेचे मुंबईतल्या वस्त्यांमधून याच प्रकारचे काम चालते. त्यात काम करणाऱ्या स्त्रियांना स्थानिक समुपदेशक (कम्युनिटी काऊन्सिलर) असे म्हटले जाते, असे संघटनेच्या शोभा कोकितकर सांगतात. हिंसेबद्दलचा समज, हस्तक्षेपाच्या मर्यादा आणि व्याप्ती यांबद्दल प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्यांपैकी ५० टक्के स्त्रिया स्वत: हिंसाग्रस्त आहेत, असे शोभाताई म्हणाल्या. हिंसेच्या प्रश्नांना भिडण्यासाठी २०१५ पासून राज्यव्यापी हिंसामुक्ती परिषददेखील भरवली जाते. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या या परिषदेच्या अधिवेशनात हिंसेच्या विरोधात काम करणाऱ्या लहान-लहान गावांतल्या कार्यकर्त्यांपासून अभ्यासक, संशोधक यांचा समावेश असतो.

‘मासूम’च्या आधारगटांशी जोडून असलेल्या तिघींपैकी एक मालन झगडे. ग्रामीण भागातल्या सुखवस्तू एकत्र कुटुंबात स्त्रीवर असणारी बंधने तोडून मालन यांनी आज स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे; पण २५-३० वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्या सांगतात, की त्यांच्या नवऱ्याकडून त्यांना हिंसाचाराचा अनुभव आला नाही; परंतु त्यांच्या कुटुंबाचे प्रमुखपद दिराकडे होते आणि त्यांचे दारू पिणे, शिवीगाळ, भांडणे यापायी सर्वच त्रासले होते; पण विरोध करण्याची हिंमत कु णाची नव्हती. तेव्हा दारूबंदीसाठी संघटित होऊन काम करणाऱ्या गावकरी स्त्रियांमध्ये मालनताई एक होत्या. काही वर्षांनी ‘मासूम’ संस्थेने तिथे काम सुरू केले, तेव्हा त्यांच्या नवऱ्याने त्यांना प्रशिक्षणासाठी जायला प्रोत्साहित केले; पण त्यामुळे त्या घरात नवरा-बायको दोघांचाही छळ सुरू झाला. अर्थात मालनताईंनी ‘मासूम’च्या व्यासपीठावरून सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवर सातत्याने काम केले आणि अनेकदा निवडणूक लढवून, जिंकून राजकीय आघाडीवरदेखील सक्रिय राहिल्या. मालनताई स्वभावानेच लढाऊ होत्या, तर त्यांच्या एक सहकारी वत्सला देवकर अगदी साध्या,सरळमार्गी. सासरच्या त्रासात माहेरचा आधार होता; पण नवऱ्याने दुसरे लग्न केले तरी त्या सासरीच राहिल्या. सासर सोडून माहेरी परतलेल्या स्त्रीकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी अशी  १६ वर्षे काढली. २००० पासून गावात ‘मासूम’ संस्थेचे काम सुरू झाले. त्यानंतर त्यांचा जणू वेगळ्याच जगात प्रवेश झाला. संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून त्या घडत गेल्या. हिंसेचा मुकाबला करत त्यांनी घरात स्वत:चे असे स्थान निर्माण केले, आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले. ‘मासूम’च्या हिंसाविरोधी काम करणाऱ्या आघाडीत काम करणाऱ्या बिनीच्या कार्यकर्त्यां अशी आज त्यांची ओळख आहे.

स्वत:वरच्या हिंसेवर मात केली, तरी त्याच कामात झोकून देणे अनेकींना अवघड जाते असे माझे एक निरीक्षण आहे. त्याचे कारण हिंसाग्रस्त स्त्री जे सांगत असते, ते ऐकून अनेकींना आपलाच भूतकाळ दिसायला लागतो. जुन्या, मागे टाकलेल्या आठवणी आणि वर्तमानातले जीवन यांची सांगड घालताना त्रास होतो. माझ्याच परिचितांपैकी दोघींनी स्वत:च्या घटस्फोटानंतर अशा केंद्रांमध्ये जाणे सुरू केले; पण भावनिक आरोग्याचे प्रश्न वाढल्याने त्या त्यापासून दूर झाल्या.  समस्या घेऊन आलेल्या स्त्रीचे कथन ऐकताना आपल्या मनातल्या भावना काबूत ठेवाव्या लागतात, आपले प्रतिसाद नियंत्रित करावे लागतात. ‘मासूम’कडून हिंसामुक्तीसाठी दिलेल्या प्रशिक्षणात हे शिकवले जाते, असे चित्राताई ( नाव बदलले आहे) सांगतात. स्त्रियांवर हिंसा होते त्यामागे अनेक कारणे असतात. ग्रामीण भागात संयुक्त कुटुंबांत स्त्रीच्या नवऱ्याचे स्थान काय, तिला मूल आहे की नाही, मूल असेल तर ती मुलगी आहे की मुलगा, किती मुले, हे जसे निर्णायक घटक असतात, तसे जातीचे वास्तवही असते. चित्राताईंनी सांगितले, की माहेरी मुलगी म्हणून आईचा, त्यांचा दुस्वास केला गेला आणि सासरी पैशांची मागणी होती, संशय घेतला जायचा, शिवाय कुटुंबात नवऱ्यालाच मान नव्हता. ‘मासूम’ आयोजित शिबिरांत स्त्रियांचे अधिकार, कायदे, सरकारी कामकाज यांची माहिती मिळत गेल्यानंतर आणि सत्रांतून बोलायची संधी मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. एकदा ग्रामसभेत नेमका प्रश्न विचारण्याचा धीटपणा त्यांनी दाखवला, तेव्हा त्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले आणि मग गावात मान मिळतोय म्हटल्यावर घरच्यांचा जाच कमी झाला.

कौटुंबिक हिंसा म्हटले की लग्न आणि सासर या समीकरणाला छेद देणारे उदाहरण आहे गैतीचे. तिच्या घरात आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि आंतरप्रांतीय प्रेमविवाहांची संख्या इतकी होती, की तिचा समज झाला की घरातले सर्व जण सुधारकी विचारांचे आहेत; पण घरातल्या पुरुषांचा दृष्टिकोन समानतेचा नाही आणि स्त्रियांनाही पितृसत्ताक विचारांचा विळखा वेढून आहे, हे काही घटनांवरून तिच्या लक्षात येऊ लागले. तिने स्वत: लग्न न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या कमाईवर नियंत्रण, तिचा संरक्षक म्हणून तिने भावाला मान आणि धनही देण्याची अपेक्षा, हे तिला खचवून टाकणारे होते. त्यातून बाहेर येत तिने स्त्रियांवर होणाऱ्या सूक्ष्म हिंसेचे प्रकार अभ्यासले. तिच्या स्त्रीवादी जाणिवा अधिक उजळल्यानंतर आता ती स्वयंसेवक म्हणून आपल्या वकिली ज्ञानाचा फायदा कौटुंबिक हिंसाग्रस्त स्त्रियांनाही देते. कुटुंबासोबत राहिले असते तरी खूप मोठी किंमत चुकवावी लागली असती आणि आता स्वतंत्र राहातेय तरी वेगळ्या प्रकारे त्रास दिला जातोच, असे तिचे म्हणणे; पण तिने याआधी केलेल्या कामामुळे तिच्याकडे मदत मागायला लोक येत राहातात आणि त्या कामात ती तिच्या व्यथा विसरू पाहाते. अशीच एक रेचेल.(नाव बदलले आहे) लग्न झाले तेव्हा कु णीच आपला धर्म बदलला नाही आणि ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार लग्न करायचे जोडीदाराने मान्य केले यावर ती खूपच खूश झाली; पण हा आनंद फार काळ टिकला नाही. नवऱ्याचे हिंसक वागणे अनेक वर्षे सहन करून या वर्षी ती ते नाते संपवण्याच्या विचारात असतानाच टाळेबंदी झाली. त्या काळात जगभरातच वाढलेल्या कौटुंबिक हिंसेच्या बातम्या वाचून तिच्या मनात आले, की आपल्या परिसरात काय परिस्थिती आहे त्याचा अंदाज घ्यावा. तिला या प्रकारच्या कामाचा काही अनुभव नव्हता, की तसे तिचे शिक्षणही नाही; पण केवळ इतरांना मदत करण्याच्या विचारातून तिने एक प्रश्नावली बनवून चर्चमध्ये नियमितपणे येणाऱ्या स्त्रियांना गाठून घरात त्यांना हिंसेचा प्रश्न सतावतो का, हे तपासले. त्यापुढची पायरी म्हणून त्यांच्यासाठी काही मदत केंद्र सुरू करावे असा तिचा मानस होता. चर्चच्या महिला समितीची मदत घेऊन तो फॉर्म तिने ५००० जणींना पाठवला. त्यातल्या केवळ ५० जणींनी तो भरून दिला. मात्र याचा अर्थ उर्वरित स्त्रियांना हिंसामुक्त जीवन जगायला मिळते असा ती काढत नाही. शारीरिक हिंसेत मोडत नाही अशा प्रकारची हिंसा स्त्रियांच्या ध्यानात येत नाही याची तिला खात्री आहे. ती या विषयावर अधिक माहिती घेण्यास उत्सुक आहे.

हिंसेच्या झाडाच्या फांद्या हुंडा, छेडछाड, बलात्कार, जोडीदार निवडीला विरोध, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार, लैंगिक ओळख जाहीर करण्यातला विरोध, संपत्तीत हिस्सा नाकारणे, अशा जूनही आहेत आणि नुकत्या फुटलेल्या प्रसारमाध्यमांतला पंचनामा, समाजमाध्यमांतले ‘ट्रोलिंग’ अशाही आहेत; पण कदाचित कौटुंबिक छळानं या अवकाशातील खूप मोठी जागा व्यापली आहे आणि त्यावर दीर्घकाळ काम झाल्यामुळे त्याबद्दल बोलण्याची सहजता आता आता काही स्त्रियांमध्ये आली आहे. बाकीच्या हिंसा प्रकारांबद्दल बोलायचा टप्पा गाठायला वेळ लागेल. स्त्री हिंसा विरोधी पंधरवडय़ाच्या निमित्ताने किमान आपापल्या वर्तुळात स्त्रियांवरील हिंसेविरोधात बोलू या. आपली हिंसेविरोधातली भूमिका तपासू या. ती जर करुणेच्या पोटी जन्मलेली असेल तर त्यात बदल करून आपला दृष्टिकोण हक्काधारित करू या आणि ‘मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी’ म्हणत  एकमेकांसाठी उभ्या राहू या.

(लेखिका गेली अनेक वर्षे स्त्री चळवळीत सक्रिय आहेत.)