दारू प्यायल्यानंतर पुरुषामध्ये येणारी सैतानी शक्ती व त्यापायी होणारा हिंसाचार यांनी ‘राजीव गांधी नगरा’तल्या त्या दोन-तीन वर्षांत मला हादरवून टाकलं. त्या वस्तीतला एकही जण त्या वर्षांत व्यसनमुक्त झाला नाही. मन निराश व्हायचं. पण आता काही वर्षांनी वाटतं, या अपयशानं समस्येची भीषणता आणखी स्पष्ट करून दाखवली. ही वाट सोडायची नाही, असा अटळ निश्चय करण्याचं बळ मिळू शकलं. आज पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळांतून पालक सभा घेते आहे. आगामी वर्षांत मुलं, शिक्षक, पालक, स्वयंसेवक यांच्यासोबत काही करण्याचं ठरतं आहे, तेव्हा मनात काही वर्षांपूर्वीचं ते अपयश जागं आहे, हे समजतंच ना!

आ युष्यातल्या वेगवेगळ्या वळणांचा विषय निघाला की हटकून एक आठवण येतेच आणि हसू फुटतं.. एकदा वनवासी कल्याण आश्रमाच्या विद्यार्थ्यांना भेटायला गेले होते. सकाळी जाग आली तर बाहेर इतकं सुंदर वातावरण होतं. शिबीर असल्यानं स्थानिक मंडळी गळ्यापर्यंत कामात बुडालेली होती. म्हणून तिथल्या मुख्य दादांना सांगून फिरायला निघाले. दादांनी जाता, जाता ‘वाट चुकाल बरं! अनोळखी रस्ता आहे!’ असा इशारा दिला. पण आपण वाटा नक्की लक्षात ठेवू असा फाजील आत्मविश्वास बाळगून मी निघाले आणि वाट चुकलेच. रानातले ते लक्षात ठेवलेले सगळेच रस्ते एकसारखे दिसायला लागले. वळणांमागून वळणं! पण अचूक वळण मात्र एकसुद्धा नाही.
तोपर्यंत सूर्य डोक्यावर यायला लागला होता. उन्हाचे चटके जाणवत होते. माझ्या व्याख्यानाची वेळही येत होती. काय करावं हे सुचेना. डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं. तेवढय़ात, एक तरुण मुलगा धावत, धावत कुठूनसा अवतरला, अक्षरश: आकाशातून टपकल्यासारखा. म्हणाला, ‘आक्का हरवलीशी दिसतेस?’ मी डोळे पुसत ‘हो’ म्हटलं. मग थोडय़ा जुजबी चौकशा करून त्यानं मला हाताला धरून अक्षरश: धावडवायला सुरुवात केली. पुढच्या दहा मिनिटांत आम्ही वनवासी कल्याण आश्रमाच्या दारात येऊन पोचलो. संयोजक काळजीत पडले होते. त्यांच्यापाशी तो तरुण मुलगा गेला, त्यानं मला त्यांच्या हातात सोपवलं व म्हणाला, ‘घ्या तुमची आक्का (मोठी बहीण) हरवली होती रानात, रडत होती. वेडी कुठली!’
‘वेडी कुठली’, असं म्हणाला, वळला आणि चालू लागला. मिनिटा-दोन मिनिटांत दिसेनासा झाला. पण माझ्या मनात मात्र ‘वेडी कुठली वाट-चुकवली! ’ हे त्या निर्मळ मनानं काढलेले कोवळे उद्गार उमटत राहिले. वाटा वळणांच्या असतात त्यातून मार्ग शोधण्याची धडपड चालू असते. पण म्हणून ईप्सित ठिकाणी आपण पोचतोच असं थोडंच आहे? मग कुणी तरी हळूच म्हणतं, ‘वेडी कुठली!’
साधारण पस्तीस वर्षांपूर्वी एका वेगळ्या वाटेशी जोडली गेले. तोपर्यंतचं आयुष्य साधारण एका चाकोरीतलं. शाळा, महाविद्यालय, नोकरी, लग्न, मूल वगैरे. पण चाकोरीत असलं तरी बालपणातली सुरक्षितता, उबदारपणा त्यात मुळीच नव्हता. बालपणी खूप असुरक्षितता आणि एकाकीपण यांचं प्राबल्य होतं. मोकळं, स्वच्छंदी, निरोगी बालपण नव्हतं ते! सदैव भीती वाटावी, असं वातावरण होतं. पण तरीही कौटुंबिक चौकट होती. जवळची माणसं प्रेम करत होती, काळजी घेत होती. अगदी एम.ए. होईपर्यंत. वडील कौतुकानं फी भरत होते.
मग अचानक आई-वडील सहा महिन्यांच्या कालावधीनं गेले आणि हे सगळंच बदललं. तोपर्यंत माझं लग्न झालं होतं व मी एका मुलाची आई होते. तरीही पंचविशीतल्या मला हा धक्का पचवता आला नाही खरा. अगदी विकल, एकाकी आणि दु:खी वाटायचं. त्यातून वर यायला थोडा काळ जायला लागला. वंचित मुलांच्या जगाशी जोडून घेतलं ते याच दिवसांत.
हे असं असलं तरी वेगळी वाट दाखवणारं बोट धरलं ते पुस्तकांनी, असं मात्र मला खात्रीनं वाटतं. सहचरानं आयुष्यात प्रवेश केला तो, दुसऱ्या हातात पुस्तक धरूनच. तोपर्यंत चांगल्या वाचनाचा गंध देखील नव्हता. पण मग भेट म्हणून सहचरानं दोन पुस्तकं दिली. त्यातलं एक लिओ टॉलस्टॉय यांचं चरित्रात्मक पुस्तक आणि दुसरं ह. वि. मोटे संपादित ‘विश्रब्ध शारदा.’ ‘विश्रब्ध शारदे’त मला सर्वात आधी भेटल्या डॉ. आनंदीबाई जोशी. यात आनंदीबाईंनी आपल्या पतीला म्हणजे गोपाळरावांना जी पत्रं लिहिली आहेत, त्यांचा समावेश तर आहेच पण त्यांचे विविध विषयांवरील विचारही उद्धृत केले आहेत. त्यातील एका वाक्यानं माझ्या मनावर अगदी कायमचा आणि सर्वात मोठा सकारात्मक परिणाम केला आहे, असं मला, आज किती तरी वर्षांनीदेखील वाटतं. अमेरिकेस जाण्यासाठी सुरुवातीला गोपाळरावांची सोबत होणार होती, परंतु पुढे ते शक्य होईल, असं दिसेना. तेव्हा गोपाळरावांनी हे सत्य आपल्या पत्नीपुढे मांडलं. १८८० चा तो काळ. अन् पत्नी अवघी सोळा-सतरा वर्षांची. ती घाबरून जाईल याविषयी गोपाळरावांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. मात्र तसं काहीच न होता आनंदीबाई म्हणाल्या, ‘जीवन जर गुलाबाच्या फुलाप्रमाणे क्षणिक असेल, तर एकाने दुसऱ्यावर का अवलंबून राहायचे? एकाच्या पाठीवर दुसऱ्यानं का बरं बसावं? आपण काळजी करू नये. मी जाईन एकटी.’ पुढे खरंच आनंदीबाई एकटय़ा गेल्या. डॉक्टर झाल्या. हा इतिहास आहे. माझ्या मनात मात्र त्या पोरसवदा तरुणीनं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दिलेलं ते उत्तर कायम रेंगाळत राहिलं.
अशा पुस्तकांनी आयुष्य सुगंधी करून टाकलं. रवींद्रनाथांचं ‘एक विंशती’ आनंद यादवांचं ‘झोंबी’ रवींद्र सिंग यांचं ‘आय वॉज अ ड्रग अ‍ॅडिक्ट’, वेद मेहतांचं ‘द लेज् बिटवीन द टू स्ट्रीम्स’, ‘हंड्रेड बेस्ट स्टोरीज ऑफ द वर्ल्ड’, ‘प्रेमचंद की कहानियाँ’ आणि सगळ्यात लक्षात राहणारं       रट्टी जिन्हा यांचं चरित्र. यांनी घटनांकडे, प्रसंगांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. पण तरीही खास आभार ‘पोतंभर पुस्तकं नेहमी बाळगा’ असा सल्ला देणाऱ्या सॉमरसेट मॉमचे. एकाच घटनेकडे किती अंगांनी बघता येईल वा भिडता येईल हे अत्यंत नेमक्या शब्दांत सांगणारा मॉम माझ्यासाठी तरी लेखक कमी व समुपदेशक जास्त आहे. मॉमच्या कथांची मी अक्षरश: पारायणं केली आहेत, त्याच्या प्रत्येक कथेत एक सूक्ष्म प्रश्न आहे. मानवी जीवनातील समस्यांची उत्तरं लेखक मॉम आपल्या परीनं देतो, पण समुपदेशक मॉम मात्र वाचकाला ज्याची त्याची उत्तरं शोधून काढायला किती सहजपणे उद्युक्त करतो. मॉमचं हे माझ्या आयुष्यात असणं (लेखक व समुपदेशक या नात्याने) मला जर कुठल्या वाटेवर ते सर्वात जास्त उपयोगी पडलं तर व्यसनी व्यक्तींशी बोलताना!
व्यसनी व्यक्ती माझ्या बालपणी काही ना काही नात्यानं जवळ होत्या. त्या व्यसनांची भयावहता मी बघत होते. त्यातल्या हिंसाचाराच्या दर्शनाने अतिशय भयभीत होत होते. पण लग्न झालं व व्यसनाची माझ्या आयुष्यातून अक्षरश: हकालपट्टी झाली. काही काळ तो विषयच मागे पडला. पुढे पुण्यात आाल्यावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या निमित्तानं, पुन्हा त्या दुनियेत गेले. तोच भयाकार, तोच हिंसाचार व तीच पराकोटीची वेदना. या वेळी मी लहान नव्हते. शिवाय एक महत्त्वाची शास्त्रीय बाब समजत होती. काही प्रमाणात तरी यावर उपाययोजना करता येतात. काही जणांना यातून वाचवता येतं, कुटुंब सावरता येतात. गरज असते ती फक्त मदतीची, प्रेमाची!
वाटलं, लहानपणी समजून घेता आलं नाही, मदत करता आली नाही, उलट तेव्हा राग यायचा, द्वेष वाटायचा, त्यापोटी किती अन्याय झाला, आता असं होऊ द्यायचं नाही असं ठरवलं. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, कृपा व्यसनमुक्ती केंद्र, त्यांचे सहचरी गट अगदी आपले झाले. सहचरी तर गाढ मैत्रिणी झाल्या, याचं मला समाधान वाटतं. त्यांच्याविषयी किती आणि काय लिहू? या सहप्रवासात मी किती जणांना गमावून बसले. या व्यसनाच्या जालीम विळख्यानं व्यसनी लोकांचा तर मृत्यू झालाच पण किती तरी सहचरी अकाली हे जग सोडून गेल्या. मुलं निरोगी, निकोप राहू शकली नाहीत. मला आठवतंय, कास्प संस्थेच्या मदतीनं व पुढं एकटीनंच धीर करून मी सिंहगड रस्त्यावरील (पुण्यातील) राजीव गांधी नगर इथं जात राहिले. व्यसनांचं अक्राळ विक्राळ रूप व त्यापोटी आलेलं भयानक दारिद्रय़, मुलांची होणारी ससेहोलपट यांचा खूप प्रतिकूल परिणाम मनावर व्हायचा. विकल वाटायचं. काच, कचरा गोळा करणाऱ्या महिलांनी अनंत यातना भोगून गोळा केलेला पैसा दारूत, ड्रग्जमध्ये जाताना बघितला. मुलांना दुपारचा डबा ही संकल्पनाच माहीत नाही. त्यामुळे आजही आहार देणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळांना सुट्टी आहे, असं ऐकल्याबरोबर पोटात कालवूनच येतं. दारू प्यायल्यानंतर पुरुषामध्ये येणारी सैतानी शक्ती व त्यापायी होणारा हिंसाचार यांनी ‘राजीव गांधी नगरा’तल्या त्या दोन-तीन वर्षांत मला हादरवून टाकलं. अगदी खरं सांगू, त्या वस्तीतला एकही जण त्या वर्षांत व्यसनमुक्त झाला नाही. मन निराश व्हायचं. पण आता काही वर्षांनी वाटतं, या अपयशानं समस्येची भीषणता आणखी स्पष्ट करून दाखवली का? ही वाट सोडायची नाही, असा अटळ निश्चय करण्याचं बळ एखादं काम फसलं असं वाटल्यावर मिळू शकतं. आज पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळांतून पालक सभा घेते आहे. आगामी वर्षांत मुलं, शिक्षक, पालक, स्वयंसेवक यांच्यासोबत काही करण्याचं ठरतं आहे, तेव्हा, तेव्हा मनात काही वर्षांपूर्वीचं ते अपयश जागं आहे, हे समजतंच ना!
काही संधी मात्र माझ्यासमोर अनपेक्षितपणे चालून आल्या खऱ्या. त्यांतली सर्वात मोठी संधी दिली ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेनं! त्याचं झालं असं की, मुंबईतल्या कुमारी मातांच्या संदर्भात काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेनं किती तरी र्वष ते काम केलं होतं. त्या कामाचं परिशीलन करणं ही बाब टाटा इन्स्टिटय़ूटला खूप आवश्यक वाटत होती. कुमारी मातांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे की नाही, याचा वस्तुनिष्ठ अभ्यास करायचा होता. त्या अभ्यासाच्या एका पातळीवर मी काम केलं. त्या विशिष्ट कालावधीत जितक्या मुली/स्त्रिया विवाहबाह्य़ संबंधांतून माता बनणार होत्या, त्यांच्याही मनोवस्थेचा अभ्यास करायचा होता. मला आठवतंय त्याप्रमाणे हा अभ्यास साधारणपणे वर्षभर चालला. मी रोज संस्थेत जात असे व तिथल्या पानापानात मला भेटणाऱ्या स्त्रियांच्या जीवनाचा मागोवा घेत असे. या कामात अतिशय गुप्तता राखणं अभिप्रेत होतं व अर्थातच आम्ही सर्वानी केलं. जे मी वाचत असे, संस्थेतील जुने जाणते लोक सांगत होते, ते अक्षरश: बुद्धी, मन सुन्न करून टाकणारं होतं. पुरुषप्रधान समाजाच्या चौकटीत स्त्री किती भयंकर अत्याचारांना बळी पडू शकते, याचा पट उलगडत असताना माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनातच किती फरक पडला हे शब्दात सांगता येणार नाही. त्यातही ज्यांनी काही घटना प्रत्यक्ष पाहिल्या आहेत, त्यांच्याकडून त्या ऐकताना तर अधिकच गलबलून येत असे. अगदी जवळच्या माणसाकडून अत्याचार होत असत. त्यातून जन्माला आलेलं बाळ व त्यांची आई समाजाच्या रोषाला बळी पडून बहिष्कृत होत असे, पण करणारा मात्र उजळ माथ्यानं समाजात वावरत राही, नव्हे समाजच त्याला तसं वागायला प्रतिबंध करण्याचं नाव काढत नसे. प्रत्यक्ष पित्याकडून अत्याचारित झालेल्या मुलीला आपल्या इतर मुलांसाठी संपवून नवऱ्याबरोबर संसार करणारी आई मला इथेच वाचायला मिळाली.
खरं सांगू, या कामाला जवळपास तीस र्वष होतायेत. जेव्हा हे काम केलं तेव्हा तिशीत होते. या तीस वर्षांत जे वाचलं, त्यातलं अवाक्षरदेखील मनातून पुसलं गेलेलं नाही. जे वाचलं, जे ऐकलं त्यातून त्या निरपराध मुलींच्या प्रतिमा माझ्या मनावर उमटत गेल्या. माझ्यापुरत्या त्या आजही खऱ्या आहेत. रजिस्टरमधल्या पानांतून मनाच्या आत उतरल्या आहेत. त्याच तर सारख्या इतरांवर घाईघाईनं शिक्के मारण्यापासून परावृत्त करतात, थांबवतात, समजून घेण्यासाठी उद्युक्त करतात.
माणसं जगतात. प्रलयानंतर जगतात. भूकंपानंतर उठतात. प्रिय जनांचा चिरविरह झाल्यावरही सावरतात. पुन्हा जगू लागतात. पण या जगण्यातलं ‘जीवन’ हरवून बसतं अनेकदा. आजूबाजूच्यांना यात जरूर मदत करता येते. पण पुष्कळदा तीच होत नाही. अत्युच्च गरजेच्या क्षणी माणसांना मदत मिळत नाही. निराशेची पकड घट्ट होते. माणसं कोसळून पडतात. या कोसळण्याच्या वळणापासून जपायला पाहिजे स्वत:ला आणि इतरांनाही. शक्य असेल तिथे, शक्य असेल तेव्हा!
माझा एक मामा होता. त्याला आम्ही अण्णा म्हणायचो. वर्णानं काळा, छान तरतरीत रूपाचा व उत्तम इंग्रजी बोलणारा हा मामा मला आवडायचा व त्यालाही मी आवडायचे (असं माझी आई सांगायची) या मामाचं दुर्दैव असं की, त्यानं आणलेली अगदी काळजीपूर्वक बघून, तपासून आणलेली कुठलीही वस्तू निदरेष, टिकाऊ ठरत नसे. त्यात काही तरी दोष निघायचाच. तो ज्या कंपनीत काम करायचा, त्या कंपन्यांनादेखील अनेकदा टाळी लागायची व हा घरी बसायचा. या वारंवार घडलेल्या घटनांतून अपयशी असा शिक्का त्याच्यावर बसला. नंतरच्या काही वर्षांतच त्याची वागणूक अशी काही असंबद्ध झाली की ‘वेडा’ हा शिक्का त्याच्यावर पक्का बसला व त्याची रवानगी मनोरुग्णालयात झाली. शेवटपर्यंत त्याची घरी येण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्याचा अंत त्या मनोरुग्णालयातच झाला. एका जीवनाचा दारुण अंत झाला. पुढे किती तरी र्वष माझ्या मातुल गृहाला या मृत्यूमुळे कमालीचं दु:ख झालं. आपण चुकलो, भावाला अधिक समजून घ्यायला हवं होतं, याची जाणीव मामाच्या भावंडांना झाली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. बाण हातातून निघून गेला होता. आजही मामाच्या आठवणीने फार खिन्न वाटतं. तो ‘वेडा’ नव्हता. त्याला ‘वेडं’ केलं गेलं हे समजतं. या करण्यामागे कोणतीही हेतुपुरस्सरता अथवा कौर्य नव्हतं. जाणून बुजून काही केलं गेलं नव्हतं. तरीही मनाच्या जडणी-घडणीविषयी घोर अज्ञान व उदासिनता त्यांनी ते झालं, याचं भान येणंदेखील महत्त्वाचं आहे, हे समजलं. त्या वेळी मामाला भेटायला जाताना बघितलेली मनोरुग्णालयाची अवस्था आजही मन खिन्न करून सोडते.
अशा लक्ष वेधून घेणाऱ्या, खिन्न करून सोडणाऱ्या असंख्य गोष्टी आजूबाजूला दिसतात. दिवाळीच्या ऐन लखलखटात आनंदानं कुठं तरी निघालं असताना पुण्याच्या सेनापती बापट मार्गावर काळोख्या कोपऱ्यात एक साताठ वर्षांची मुलगी दिसली. अंगावरच्या चिंध्या सावरत, पुढय़ातला कोणी तरी दिलेला फराळ ती मोठय़ा चवीनं खात होती. आजूबाजूचं भान नाही, दिवाळीच्या आनंदाशी, आवाजाशी नातं नाही अशी निर्विकार मुलगी बघताना आलेली अस्वस्थता, ही बैचनी, आयुष्याला मिळालेलं हेच वळण योग्य आहे, असं वाटतं खरं! त्यातली किती तरी मुलं आज आमच्यापाशी (संस्थेत) राहतात. त्यांचं मुक्त बालपण बघताना वाटतं, निसर्गानं यांना सर्वाना क्षमा करण्याची केवढी मोठी शक्ती दिली आहे. या शक्तीचा अनुभव घेण्याचा योग मिळावा, हीच केवढी सुंदर गोष्ट घडली आपल्या आयुष्यात.
वेगवेगळ्या वाटा-वळणांनी सर्वात जास्त फायदा जर कुठला झाला असेल, तर वाचनाला मर्यादा राहिल्या नाहीत आणि कथाकथनाची कला घडत गेली. वेगवेगळ्या माणसांशी संवाद घडताना ‘कथा’ या माध्यमाचा मला खूप उपयोग झाला. उपदेश, तात्त्विक वाक्य या सगळ्यांना टाळून कथा सरळ हृदयाला भिडते, हे तर स्पष्ट जाणवलंच पण ती दुसऱ्यांच्या आयुष्याची असल्यानं ऐकणाऱ्याला जास्त चांगला विचार करायला लावते, हेही लक्षात आलं. या कथाकथनाच्या माध्यमाविषयी मला फार ऋणी वाटतं. कुणालाही भेटावं, सहज म्हणून कथेची मैफल जमवावी, मनाच्या तारा जुळाव्यात व तृप्त मनानं एकमेकांचा निरोप घ्यावा बस्स!   
रेणू गावस्कर -ekalavyatrust@yahoo.co.in