डॉ. नितीन पाटणकर

अलीकडे जीवनसत्त्वांची कमतरता टाळण्यासाठी ‘फूड फॉर्टिफिकेशन’ केले जाऊ लागले. लहान, तान्ह्य़ा बाळांच्या ‘इन्फन्ट फॉम्र्युला’पासून ते लहान मुलांची जास्त चांगली वाढ होऊन त्यांना ‘कलेक्टर, चँपियन, अ‍ॅथलीट’ वगैरे बनविणाऱ्या पावडरींमध्ये ‘ब’ जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात मिसळली जाऊ लागली. तसेच ‘हेल्दी’ आणि ‘हलकी’ म्हणून ‘सीरियल’ नावाचे एक कुटुंब अवतरले आणि ते ‘वाढता वाढता वाढे’ म्हणत जग व्यापून राहिले. सीरिअल्समध्ये खूप जास्त प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्वं मिसळली जातात. त्यामुळेही खूप जास्त जीवनसत्त्वं आपल्या पोटात जातात. या ‘फूड फॉर्टिफिकेशन’चा आणि स्थूलपणा पसरण्याचा खूप जवळचा संबंध आहे.

लाइफस्टाइल डिसिजेस अर्थात जीवनशैलीजन्य आजाराचा इतिहास बघताना १९७० ते १९८० हा कालखंड खूप महत्त्वाचा ठरतो. या काळात काही तरी असे घडले ज्यामुळे बहुतेक प्रगत देशांत स्थूलपणाचे प्रमाण अचानक वाढले. १९८० च्या सुमारास अनेक विकसनशील देशांतील स्थूलपणाचे प्रमाण वाढू लागले. यात आपल्या भारताचाही समावेश होतो.

स्थूलपणा वाढण्याच्या प्रमाणात विकसित आणि विकसनशील देशांत एक फरक प्रामुख्याने दिसून आला. विकसित देशांत गरीब लोकांच्यात स्थूलपणाचे प्रमाण वाढले तर विकसनशील देशांत श्रीमंत लोकांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण वाढले. याच सुमारास आणखी एक गोष्ट लक्षात आली की, आईचं दूध पिणाऱ्या मुलांपेक्षा वरचं दूध पिणाऱ्या मुलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यावरून अनेकांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. या काळात जगभरात खाण्यापिण्यात काही बदल झाले का? ज्यामुळे याच काळात स्थूलपणा, मधुमेहाच्या प्रमाणात वाढ झाली? ‘जंक फूडमुळे हे झाले असावे’ असा सोपा निष्कर्ष अनेकांनी काढला. त्यावर खोलात जात चौकशी झाली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. स्थूलपणा, मधुमेहाच्या या काळातील वाढीसाठी जंक फूडला जबाबदार धरता येणार नाही. मग पुन्हा विचारमंथन चालू झाले.

या सगळ्याची सुरुवात १९३० च्या आसपास झाली. तोपर्यंत आहारातील सूक्ष्म अन्नघटक, खास करून जीवनसत्त्व आणि क्षार हे आपल्या आहारातूनच मिळत. ऋतुमानाप्रमाणे आहारातील जीवनसत्त्वं आणि क्षार यांचे प्रमाण बदलत असे. आपली समजूत असते, की हिवाळ्यात ताज्या भाज्या जास्त तजेलदार असतात म्हणजे त्यातील जीवनसत्त्वं आणि क्षार यांचे प्रमाण जास्त असावे. प्रत्यक्षात मात्र उन्हाळ्यात ताज्या भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्त्वं आणि क्षार असतात. माणूस म्हणून उत्क्रांत होताना या ऋतुबदलांमुळे अन्नाच्या पोषणमूल्यांत होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्याची तयारीही होत गेली.

उन्हाळ्यात अतिरिक्त प्रमाणात अन्नातून जीवनसत्त्वं पोटात गेली तरी याच काळात घामही खूप येतो आणि घामातून ही अतिरिक्त द्रव्यं शरीराबाहेर टाकली जातात. शरीर काही प्रमाणात जीवनसत्त्वं साठवूही शकते. पाण्यात विरघळणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाचे उदाहरण घेऊ. ‘क’ जीवनसत्त्व अन्नातून मिळेनासे झाल्यावरदेखील त्याच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागायला कित्येक महिने लागतात. यावरून खरं तर लक्षात येईल, की रोजच्या रोज जीवनसत्त्वयुक्त आहार नाही मिळाला तरी काही बिघडत नाही. (मधूनमधून मात्र तो घेत जाणे आवश्यक असते.) यासाठीच रोजच्या आहारात किती जीवनसत्त्वं मिळावीत याचे प्रमाण आपण ठरवून घेतलेले असते. त्याला * ईएआर (इस्टिमेटेड अ‍ॅव्हरेज रिक्वायरमेंट्स) आणि # आरडीए (रिकमेंडेड डाएटरी अलाऊन्स) असे म्हटले जाते.

आता कोणालाही प्रश्न पडेल, की सरासरी गरज कधी आणि किती घ्या हा सल्ला देताना ‘थोडा जास्त’ हे काय प्रकरण आहे ?

थोडं जास्त सांगितलं तर पुरेसे मिळते म्हणून या किमती थोडय़ाशा जास्त ठरवल्या आहेत. ‘एवढे पुरे झाले’ऐवजी ‘कमी पडायला नको’ अशा प्रकारे विचार केलेला असतो. बऱ्याच देशांत गरजेपेक्षा खूप जास्त जीवनसत्त्वं आणि खनिजं घेतली जातात. त्यात आपल्या देशातला मध्यमवर्ग आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले लोकसुद्धा आले. याची कारणं पाहायला गेलो तर साधारण अशी दिसतात.

१) बहुतेक भाज्या आणि बरीचशी फळे, वर्षभर उपलब्ध होतात. त्यामुळे जीवनसत्त्वं मिळण्यामधील ऋतुजन्य चढउतार नाहीसे झाले. हे १९७० पासून दिसू लागले. अमेरिकेसारख्या देशात ‘क’ जीवनसत्त्वाच्या आहारातील प्रमाणात भरघोस वाढ झाली.

२) सामिष किंवा प्राणिजन्य आहार घेण्याचे प्रमाण वाढले. विकसनशील देशांतही मांसभक्षण हे प्रतिष्ठेचे, आरोग्याचे लक्षण मानले जाऊ लागले. याची सुरुवात तर १९३० पासूनच झाली. त्यामुळे आहारातील नायासीनचे प्रमाण वाढत गेले.

३) जीवनसत्त्वांची कमतरता टाळण्यासाठी ‘फूड फॉर्टिफिकेशन’ केले जाऊ लागले. लहान, तान्ह्य़ा बाळांच्या ‘इन्फन्ट फॉर्म्युला’पासून ते लहान मुलांची जास्त चांगली वाढ होऊन त्यांना ‘कलेक्टर, चँपियन, अ‍ॅथलीट’ वगैरे बनविणाऱ्या पावडरींमध्ये ‘ब’ जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात मिसळली जाऊ लागली. तसेच ‘हेल्दी’ आणि ‘हलकी’ म्हणून ‘सीरियल’ नावाचे एक कुटुंब अवतरले आणि ते ‘वाढता वाढता वाढे’ म्हणत जग व्यापून राहिले. सीरिअल्समध्ये खूप जास्त प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्वं मिसळली जातात. त्यामुळेही खूप जास्त जीवनसत्त्वं आपल्या पोटात जातात.

या ‘फूड फॉर्टिफिकेशन’चा आणि स्थूलपणा पसरण्याचा खूप जवळचा संबंध आहे. स्वित्झर्लंड आणि डेन्मार्कमध्ये १९३० मध्ये अन्नामध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेली (सिंथेटिक) जीवनसत्त्वं मिसळायला सुरुवात झाली आणि नंतर १९७० मध्ये त्यात आणखी वाढ केली गेली. नेमक्या याच काळात जन्मलेल्या मुलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण अचानक वाढले. हीच गोष्ट इतरही काही देशांत पाहण्यात आली. सौदी अरेबियात १९८८ मध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण तीन टक्के होते. तिथे १९८० नंतर पदार्थामध्ये जीवनसत्त्वं मिसळायला सुरुवात झाली आणि २००५ मध्ये शालेय विद्यार्थ्यांमधील स्थूलपणाचे प्रमाण २५ टक्क्यांवर पोचले. तेच अमेरिका, चीन या देशांतही दिसून आले. आपल्याकडच्या जुन्या शिक्षकांना विचारून पाहा. १९८० ते अगदी १९९० पर्यंत संपूर्ण शाळेत किती मुले लठ्ठ होती? तर ते हाताच्या बोटावर मोजता येत असे. आता शिक्षकांना विचाराल तर ही संख्या नक्कीच वाढलेली असेल.

बहुतेक जीवनसत्त्वं, खास करून ‘ब’ जीवनसत्त्वं, दोन पदार्थाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते म्हणजे चरबी आणि मेंदूतील रसायने. ‘ब १’ आणि ‘ब ६’ ही कबरेदके आणि प्रथिनांपासून चरबी बनवण्यात मदत करतात. ब १, २, ५ आणि ६ ही जीवनसत्त्वं एकत्र आली तर जुन्या काळच्या वेस्ट इंडीज संघातले रॉबर्ट, होल्डिंग, गार्नर आणि मार्शल एकत्र आल्याप्रमाणे चरबी बनवण्याच्या कामाला वेग येतो. नायासीन जास्त घेतले गेले तर चक्क भूक वाढते आणि शरीराच्या आत, अवयवांभोवती चरबी वाढते (व्हिसेरल फॅट). नायासीन आणि इतर ‘ब’ जीवनसत्त्वांमुळे आणखी काय गोंधळ उडतो ते पाहू या. जीवनसत्त्वं न मिसळलेल्या मद्याची रोटी खाल्ली तर रक्तातील साखर खूप वाढते. त्या प्रमाणात इन्सुलिन वाढते. इन्सुलिनमुळे रक्तातील साखर कमी होत जाते. साखर कमी होत जाईल तसे इन्सुलिन कमी होते. आता नायासीन आणि इतर ब जीवनसत्त्वं यांनी फॉर्टफिाय केलेल्या मद्याची रोटी खाल्ली तर रक्तातील साखर पूर्वीइतकीच वाढते. चयापचयाचा पहिला टप्पा म्हणजे अन्नातील नायासीनमुळे शरीरातील बऱ्याच पेशींमध्ये इन्सुलिनला विरोध निर्माण होतो. (इन्सुलिन रेजिस्टन्स). त्यामुळे साखरेचे नियोजन करण्यासाठी इन्सुलिनचे प्रमाण खूप वाढते. नायासीनचा इन्सुलिनला विरोध करण्याचा परिणाम लवकर नाहीसा होतो; पण पाझरलेले इन्सुलिन तेवढय़ा लवकर विघटित होत नाही. त्यामुळे चयापचयाच्या दुसऱ्या टप्प्यात रक्तातील साखर या वाढीव इन्सुलिनमुळे पेशींच्या आत झटपट शिरून रक्तातील साखर एकदम कमी होते. त्यामुळे कडकडीत भूक लागून पुन्हा खाल्ले जाते.

गोष्ट इथेच संपत नाही. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पदार्थात नायासीनबरोबर इतरही ‘ब’ जीवनसत्त्वं असतात. ही साखरेला चरबीत रूपांतरित करतात आणि ती चरबी साठून राहते. ती बाहेर पडून अन्न म्हणून वापरली जाण्याआधीच पुन्हा भूक लागून पुन्हा अन्न घेतले जाते. पुन्हा घेतलेले अन्नही जीवनसत्त्वयुक्त असेल तर? यापुढे जाऊन ही जीवनसत्त्वं मेंदूतील भूक आणि भावना नियंत्रण करणाऱ्या रसायनांवर परिणाम करतात. जीन्सच्या ‘एक्स्प्रेशन’वर परिणाम करतात. या सर्वाचा परिणाम म्हणून स्थूलपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेहाची साथ आली आहे.

या सर्व मंथनातून काय नवनीत निघालं? तर, फॉर्टफिाइड फूड्स, जीवनसत्त्वाच्या गोळ्या या उगाच गरज नसताना घेऊ नयेत. आजकाल अनेक जण फॉर्टफिाइड फूड्स ‘हेल्दी’ म्हणून खातात. त्यासोबत हल्ली मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून वजन कमी करण्यासाठी पावडरी आणि ‘हेल्थ’साठी म्हणून मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या विकण्याचा धंदा जोरात चालू आहे. हे म्हणजे ‘एकदा तापल्या तव्यावर बस आणि नंतर लगेच बर्फाच्या लादीवर बस म्हणजे निरोगी राहशील,’ असे सांगण्यासारखे आहे. त्यातच अनेक अमेरिकेतील श्रावणबाळ आणि बाळ्या आईवडिलांसाठी मोठाले डबे भरून जीवनसत्त्वं, टॉनिक्स पाठवून मातृपितृऋणातून उतराई होऊ पाहतात.

डेफिशिअन्सी वा कमतरतेच्या खुणा असतील तरच जीवनसत्त्वं घ्यावीत आणि ‘फॉर्टिफिकेशन’, ‘जीवनसत्त्वयुक्त’ वगैरे प्रकाराला भुलू नये. खास करून तान्ह्य़ा आणि लहान मुलांना रेडिमेड अन्न देताना आपण मुलांना स्थूल डायबेटिक तर बनवत नाही ना हेही लक्षात घ्यायला हवे.

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com