२४ वर्षांपूर्वी मुंबईत शिकलेली, डॉक्टर झालेली मी कोकणातल्या छोटय़ा चिपळूणमध्ये आले ती लग्न होऊन. ते वय व्यवसायाच्या मागे धावण्यासाठी आसुसलेलं होतं. सासरच्या मंडळींचा नकार नव्हता. त्यामुळेच छोटं गावसुद्धा मी स्वीकारलं होतं. आता खरी परीक्षा होती. स्वयंपाकघरातली कामं करण्याचीही तितकीच आवड होती. पती केईएम रुग्णालयातून एम.डी. (मेडिसिन) पदवी घेतलेले. त्यामुळे २४ तासच जणू व्यवसायाला बांधलेले. मी दंतवैद्य असल्यामुळे माझा दवाखाना बाजारपेठेतच ९ ते १ आणि ४ ते ७ वेळात सुरू झाला. दवाखान्यासाठी मोक्याची जागा मिळाली आणि या संधीचं मी सोनं केलं. आज प्रथितयश डॉक्टर म्हणून आम्ही दोघंही नावारूपाला आलो, ही देवाची कृपा. मात्र हे सगळं सांभाळताना, निभावून नेताना मला अनेक अडचणीही आल्या, पण न डगमगता मी धिराने उभी राहिले.
 मला मुलगा झाला आणि सव्वा महिन्यात मी पुन्हा कामाला लागले. कारण नवीन व्यवसायाची घडी बसवायची होती. त्यामुळे दर दोन तासांनी त्याची भुकेची वेळ सांभाळण्यासाठी पटकन घरी जाऊन १५-२० मिनिटांत परत दवाखान्यात येत असे. २ महिन्यांचा असताना सासूबाईंच्या हाताचं हाड मोडलं. पुन्हा त्यांचा सांभाळ करण्याची अडचण निर्माण झाली, पण मी दवाखान्यात नियमित जावं यासाठी माझ्या पतींनी आग्रह धरला. त्यामुळे कामाला हाताशी मुलगी ठेवली. तिच्या मदतीमुळे दिवसातले काही तास तरी चिंता नसे. पुढे पुढे तर सासूबाई गावाला गेल्या की मुलाला सांभाळायला दवाखान्यात न्यायची वेळ येऊ लागली. पण तरीही नाराज न होता त्याचा सांभाळ करीत व्यवसाय सुरू ठेवला. पण या सगळय़ात मुलाच्या बाळलीला नजरेत टिपून ठेवण्याचा आनंद मात्र हरवला. सहजीवनाचाही आनंद घेता आला नाही. कारण आमचा वेळ रुग्णांसाठी बांधील होता. कुठं बाहेर निघालो की हमखास दारात रुग्ण उभा राहायचा की आम्ही पुन्हा घरात! घरात कधीही कार्यक्रम आवर्जून करता आला नाही. सणवार, त्यानिमित्ताने मजा, नटणं-मुरडणं हे सारं काही गमावलं, पण मंगळागौर शिवामूठ यांसारख्या पूजा करून दवाखान्यात जात असे. फक्त त्याचा म्हणावा तसा आनंद घेता आला नाही.
आमचा मित्रपरिवार जास्त करून वैद्यकीय क्षेत्रातला होता. पण त्यांच्या बायका व्यवसाय करणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे मी खूप एकटी पडायचे. मला फारशा मैत्रिणी झाल्याच नाहीत. आणि त्या वेळी मुंबईला जाणं सारखे शक्य नसल्यामुळे जुन्या मैत्रिणींशीही संपर्क राहिला नाही. तरीही मी माझ्या संसारात अत्यंत समाधानी आहे. मुलांना जागरूकपणे वाढवलं, घडवलं, चांगला माणूस बनवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे तीही खूप छान घडली याचं समाधान नक्कीच आहे. आमचं सहजीवन अबोल, अव्यक्त राहिलं खरं, पण प्रेम कमी झालं नाही. विश्वासाच्या नात्याने आम्ही सुजाण असल्यामुळे एकमेकांच्या नेहमी जवळ होतो. आणखी काय हवं?
डॉ. मीनल धात्रे, चिपळूण