आशीष देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com
अनेक शारीरिक आजारांचं मूळ माणसाच्या मनात असतं हे खरंच आहे. हे कसं घडतं, त्याची शरीरात होणारी प्रक्रिया रंजक तर आहेच, पण मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून परिपूर्ण आरोग्य साध्य करताच येणार नाही,

हे ठळकपणे अधोरेखित करणारं आहे. ‘सायकोसोमॅटिक’ आजार बरे करण्यासाठी मनाची दुखरी नस जाणून घेऊन ती आधी मान्य करायला हवी, तरच शरीराचा आजार दूर करता येईल.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

काळ्या-पांढऱ्या टीव्हीच्या जमान्यात हिंदी/मराठी पंचापिळव (अर्थात भावनिक-मसाला!) चित्रपट पाहायला नि त्याबद्दल चर्चा करायला काय मजा यायची! चित्रपट संपायचा नि दृक्श्राव्य माध्यम बंद व्हायचं. ‘बिंजिंग’च्या आधीचा जमाना होता तो. मग त्या चित्रपटातल्या अगणित ‘अशक्यांची’ जेवणाच्या ताटावर बसून पोटभर चर्चा आणि आईबाबांच्या अट्टाहासाखातर  जेवणावरून उठता उठता पटलेल्या गोष्टींची केलेली मनाविरुद्ध उजळणी. नंतर खेळामध्ये केव्हा ना केव्हा ते ‘डायलॉग-गाणी-प्रसंग’ ‘मारायची-गायची-इनॅक्ट करायची’ संधी मिळायची. कारण सगळ्या मित्रांनीही तोच चित्रपट पाहिलेला असायचा.

त्यातला मला सर्वात गमतीशीर वाटणारा प्रसंग म्हणजे घरातल्या मुलीनं काही तरी केल्यामुळे ‘खानदान की इज्जत मिट्टी में मिला दी’चा सीन! भावनाविवश होऊन पृथ्वीराज कपूरांसारख्या वयाचा एखादा कलाकार विच्छिन्न मनस्थितीत, ‘बॅकग्राउंड’ला हिंदोल रागाच्या चढत्या सुरावटीचा साज, छातीच्या डाव्या बाजूला आपसूक गेलेला हात, कोलमडणारं शरीर, वर गेलेले डोळे नि घरच्यांची उडालेली तारांबळ..

– शाळेत, मैदानात, घरात केलेल्या स्वत:च्या किंवा मित्रांच्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी विशीपर्यंत या सीनची नक्कल करणं हा आमचा ‘अक्सर इलाज’ होता. म्हणजे वातावरण आपोआपच हलकं फुलकं  व्हायचं!

पुढे काकांच्या आजारपणात ते रुग्णालयात असताना त्यांच्या एका जवळच्या मित्राच्या निधनाची बातमी आम्हाला कळली. अतिदक्षता विभागातून बाहेर आल्यानंतरसुद्धा डॉक्टरांनी घरच्यांना ‘ती बातमी त्यांना सध्या तरी सांगू नका’ असा दिलेला सल्ला मी चोरून ऐकला. शरीरावर वाईट बातम्यांचा काहीतरी वाईट परिणाम होत असणार हे मला तेव्हापासून माहीत झालं. तसा बहुतांशांच्या विद्यार्थी‘दशे’तला ‘परीक्षा’नामक ‘खलनायक’, पौगंडावस्थेतल्या ‘संप्रेरकी प्रमादा’मुळे होणारं मनाचं चालचलन, दोहोंमुळे वेळीअवेळी होणारं ‘छातीतलं कधी दाहक नि कधी मोहक धडधडणं’ मीही अनुभवून होतो. त्याच सुमारास मंगेश पाडगावकरांच्या अनेक गेय कवितांशी माझी ओळख यशवंत देवांमुळे झाली. त्यांच्या परत परत ऐकत राहाण्यासारख्या कवितांपैकी एक म्हणजे यशवंत देवांनी स्वरबद्ध केलेली ‘जरी या पुसून गेल्या’ ही कविता.

प्रियकरापासून दुरावलेली प्रेयसी म्हणते,

‘ते श्वास कापरे अन् आभास सावल्यांचे,

रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे।

अन चूर चूर झाल्या त्या सर्व भावना रे

जरी या पुसून गेल्या, साऱ्या जुन्या खुणा रे।’

आपल्या भावना नि शरीर यांचं नातं माणसानं सतत अनुभवलं आहे. भीतीनं हातपाय थरथरणं, छातीत धस्स होणं, पोटात ढवळून येणं, कढी पातळ होणं, हृदयाचा ठोका चुकणं, शरीर पांढरंफटक पडणं, तोंड कोरडं पडणं, असे सभ्य नि कित्येक असभ्य वाक्प्रचार फक्त मराठीतच नाही, तर जगातल्या प्रत्येक भाषेत आढळतात. त्यामुळे भीती-विरह-काम-क्रोध, या मनाला चूर चूर करणाऱ्या भावना शरीरात काहीतरी करवून आणतात हे सर्वज्ञात आहे. पण ते होतं कसं? हे गेल्या ५-६ दशकांतच मानसशास्त्राला कळलंय.

‘केईएम’मध्ये शिकत असताना आलेल्या अनेक अद्भुत अनुभवांपैकी एक असाच वेगळा अनुभव मला या मन-शरीर संबंधांबद्दल खूप काही शिकवून गेला. रेल्वे अपघातात कोपरापासून हात कापला गेलेला एक दुर्दैवी रुग्ण एक विचित्र अनुभव सांगत होता. त्याच्या नसलेल्या हाताच्या नसलेल्या मधल्या बोटाला दुखत होतं! चक्रावून गेलेला शिकाऊ डॉक्टर त्याला वरिष्ठांकडे घेऊन गेला. ‘फँटम लिंब’ म्हणून परिचित असणाऱ्या या अनुभवाला आपल्या शरीरातल्या मज्जासंस्थेची रचना कारणीभूत असते. हात गेला तरी त्या हाताचा स्पर्श वाहून नेणारी मज्जापेशी कोपरापुढे तशीच असते. कधीकधी ती भरणाऱ्या व्रणात अडकते नि उत्तेजित होते. आणि नसलेल्या हाताच्या मेंदूच्या जागांपर्यंत संवेदना पोहोचवते. म्हणजेच ही पेशी कोपर, खांदा, पाठीचा कणा, कवटी किंवा त्यानंतर येणारे मेंदूचे विविध भाग, कुठेही उत्तेजित झाली तरी ‘फँटम लिंब’ होऊ शकतो.

शरीरातल्या कानाकोपऱ्यातल्या असंख्य पेशींतून वेगवेगळ्या संवेदना पाठीच्या कण्याच्या ‘रेल्वे ट्रॅक’सदृश निमुळत्या जागेतून वर जात असतात आणि त्यांचं मेंदूनं दिलेलं उत्तर उलटटपाली परत येत असतं. निमुळत्या कण्यातून कवटीत येताच त्या सुरनळीतून येणाऱ्या या पेशी एखाद्या कारंजाप्रमाणे आदी मेंदू, भाव मेंदू नि विचार मेंदू असा फुलत प्रवास करतात. तशाच मेंदूच्या विविध भागांतून उलटटपाली येणारे संदेश याच कारंज्यातून वाट काढत, आपला मार्ग शोधत कण्यापर्यंत पोहोचत असतात. दाहक नि मोहक भावनांचा मेंदूतला स्रोत वेगळा असला, तरीही वाहक पेशी या मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे एकच असतात. ‘अप’ आणि ‘डाऊन’ गाडीप्रमाणेच चांगली बातमी आणि वाईट बातमी घेऊन जाणारे सर्वच प्रवासी गाडीतच असतात. बहुतेक वेळा ते आपापल्या स्टेशनला उतरतात नि बातमी योग्य ठिकाणी पोहोचवतात. पण कधी गर्दीच्या रेटय़ामुळे एखादा प्रवासी मधल्याच स्टेशनवर उतरला तर? मज्जासंस्थेत प्रत्येक संवेदना ही त्या अवयवाच्या विशिष्ट जागेपर्यंत पोहोचवण्याची मज्जापेशींची रचना असते. त्यामुळे या चुकीच्या स्टेशनवर उतरलेल्या प्रवाशाला इथेतिथे फिरायची मुभा नसते, किंवा परत मागे फिरण्याचीही मुभा नसते. त्यामुळे आता त्याला गर्दीच्या रेटय़ानं ज्या प्रवाहात ढकललं आहे, त्या मार्गानं वाहात जाणं क्रमप्राप्त बनतं. तो जिथे येऊन पोहोचतो त्या जागेला त्या संदेशांचा काहीच संदर्भ नसतो. विचार-भावनांच्या गदारोळात हा गर्दीचा रेटा वाढतो नि संदर्भ नसलेले संदेश फेकू लागतो. ‘फँ टम लिंब’सारखे ‘फँटम अनुभव’ यायला लागतात. सगळे तपास  करूनही, उपचार करूनही काहीच हाती लागत नाही आणि औषधानं काहीच परिणामही होत नाही. कसा होणार? कारण गर्दीच्या रेटय़ाचं ठिकाण विचार-भावनेचा मेंदू आहे नि रुग्णाला दिलेल्या औषधांच्या कामाचं ठिकाण तो अवयव! म्हणजे थोडक्यात आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी! आजार बरा होणार तरी कसा?

बऱ्याच वेळा माझे फिजिशियन मित्र माझ्याकडे अतिरक्तदाबाचे रुग्ण पाठवतात. त्यावेळी ‘साधा रक्तदाब वाढला तर मानसोपचारतज्ज्ञ कशासाठी? काहीतरी साटंलोटं असणार डॉक्टरांचं,’ असा गैरसमज करून घेतला जातो. अशाच एका रुग्णाला धास्ती होती, की त्यांनी जर मला सांगितलं की त्यांना ताणतणाव आहेत, तर मी त्यांना औषधं देईन. म्हणून अचानक नोकरी गेली असताना, मुलगा वाईट संगतीला लागला असताना, मुलीनं पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घेतला असताना, झोप येत नसताना, विचारांचं काहूर उठलेलं असताना, हे महाशय उसनं अवसान नि हसू तोंडावर आणून ‘त्याचा मी स्ट्रेस घेत नाही’ असं आवर्जून सांगत होते. काही पित्ताचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, त्वचेचे आजार, दम्याचे आजार, पोटाचे आजार हे या मज्जारचनेमुळे वाढू शकतात. अशा आजारांना ‘सायकोसोमॅटिक आजार’ असं म्हटलं जातं. मनातल्या गदारोळानं शरीरामध्ये ‘धमाशान माजवणारे’ हे विकार ताणतणावांच्या वावटळीत वाढायला लागतात.

हेनरी लेबोरीत हा एक फ्रेंच डॉक्टर होता. त्याच्या कामासंबंधी ‘माय अमेरिकन अंकल’ हा एक चित्रपट १९८० मध्ये करण्यात आला. माझे ‘केईएम’चे शिक्षक डॉ. असित शेठ यांच्या दवाखान्यात मी तो पाहिला. जीन (तो), जॅनिन (ती) आणि रेनो (तो) यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. जीन हा रेडिओ नि राजकारणात रंगणारा मातब्बर गडी, जॅनिन ही आपलं मध्यमवर्गीय आईबाबांचं घर सोडून पॅरिसला पैसे कमावण्यासाठी आलेली फॅशन तज्ज्ञ आणि रेनो हा भडक माथ्याचा, कुटुंबापासून विभक्त झालेला, पोटापाण्यासाठी क्लार्कचं काम करणारा नि नुकताच नोकरी गेलेला युवक. तिघांच्या वेगवेगळ्या घडणाऱ्या आयुष्यात जॅनिन-जीन एकमेकांच्या प्रेमात पडतात, रेनो जॅनिनच्या ओळखीनं नोकरी मिळवायचा प्रयत्न करत असतो, नि जीन आपली महत्त्वाकांक्षा नि प्रेम यांच्या द्वंद्वात! ‘धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं’ अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या, पण तरीही ‘सुंभ जळला तरी पीळ जळत नाही’ अशा थोडय़ा अतिरेकी स्वभावविशेषांच्या त्यांच्या आयुष्यनाटय़ावर आधारलेलं ते एक भाष्य आहे. लेबोरीतच्या प्रस्तावनेतून सुरू होणारा हा चित्रपट  पॅरॅलिसिसनं होणाऱ्या कोंडमाऱ्यामुळे होणाऱ्या सायकोसोमॅटिक आजारांबद्दल जाणिवा जागवतो.  मनाच्या गदारोळातनं तयार होणारे, पण शरीराच्या व्याधींसारखे भासणारे किंवा शरीराच्या व्याधी वाढवणारे आजार समाजातल्या ताणतणावाचं प्रतिबिंब असतात. बदलती सामजिक परिस्थिती, नवनवीन आव्हानं नि त्यांना तोंड देणारी एकली माणसं, या ‘युलिसिस सिंड्रोम’ला (स्थलांतरण व तत्सम समस्यांमुळे एकाकीपणा, भीती, असहाय्यतेची भावना व यातून निर्माण होणाऱ्या दीर्घकाळच्या दु:खातून उद्भवलेला तणाव.) बळी पडतात. उपचारशास्त्राच्या विविध शाखांमध्ये मदतीसाठी जाणाऱ्या या रुग्णांचं नि आजारांचं मोजमाप करणं हे महाकठीण. असं म्हटलं जातं, की कमीतकमी २० टक्के  रुग्णांच्या आजारांमध्ये सायकोसोमॅटिक कारण असतंच असतं. भारतामध्ये होमिओपॅथी, आयुर्वेद या शाखांमधील तज्ज्ञ या विकारांवर कित्येक वर्षं उपचार करत आहेत. पण मानसशास्त्राचा वापर करण्याकडे मात्र लोकांचा कल दिसत नाही. बऱ्याच वेळा आधुनिक वैद्यकशास्त्रातील इतर शाखांच्या डॉक्टरांना नाइलाजानं मानसोपचाराच्या गोळ्या द्यायला लागतात, कारण ‘मानसोपचार घ्या’ हा उपदेश कसा स्वीकारला जाईल, याबद्दलची त्यांच्या मनातली साशंकता! पण फक्त गोळ्यांनी हे आजार बरे होत नाहीत. जीवनशैली, विचारशैली नि भावनांचं समायोजन तिन्हीची गरज असते.

मानसोपचारात सर्वच सायकोसोमॅटिक आजारांचं निराकरण होऊ शकतं अशी दर्पोक्ती मला अजिबात करायची नाही. कारण इतर सर्वच शास्त्रांप्रमाणे मानसशास्त्रही ‘पूर्णशास्त्र’ नाही. वाईट वाटतं, ते मानसोपचार स्वीकारण्याबद्दलच्या अडचणीबद्दल.

गझलसम्राट स्वर्गीय गुलाम अलींनी गायलेल्या  अहमद फराज यांच्या रचनेत सांगायचं म्हटलं तर,

तू खुदा हैं न मेरा इष्क फरिश्तों जैसा,
दोनों इन्सा हैं तो क्यों इतने हिजाबोंमें मिले!