News Flash

व्यर्थ चिंता नको रे : विचारभ्रमातून जन्मलेली भीती

अनेक उदाहरणं आहेत, ज्यात लोकांनी आपल्या मनातल्या भीतीवर मात करून यशाची शिखरं पार केली आहेत.

डॉ. आशीष देशपांडे dr.deshpande.ashish@gmail.com
मन:चक्षूंची ताकद अपार आहे. एका बाजूला हे मन वास्तवदर्शी स्वप्नांच्या राज्यात नेऊन आनंदाचा साक्षात्कार घडवतं, तर तेच मन काही रसायनांच्या नशेत कल्पनेतील वास्तव मनासमोर आणतं. कधी ‘देव’ तर कधी ‘दानव’ होतं. काही वेळा तेच मन भीतीच्या सावटाखाली साध्या साध्या गोष्टींचा ‘फोबिया’ बाळगत नसत्या ‘विचारभ्रमा’नं स्वत:बरोबर इतरांचंही जगणं अवघड करतं. करोनाकाळात अनेकांना अनुभव आलाच आहे.. त्यावर मात करत असं म्हणता येईल, ‘आम्हीही जगलो बेफाम!’

६ जुलैला संत गुलाबराव महाराजांचा जन्मदिवस झाला. महाराष्ट्राला लाभलेल्या भव्य संतपरंपरेतलं, विसाव्या शतकातलं हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व. वयाच्या नवव्या महिन्यातच अचानक अंधत्व येऊनसुद्धा अमरावती येथे वास्तव्याला असताना वयाच्या ३४ वर्षांच्या आयुष्यात १३० हून अधिक ग्रंथ लिहायचे, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, धर्मशास्त्र, आयुर्वेद, आत्मज्ञान, तर्कशास्त्र, संतसाहित्य, उत्क्रांतीवाद- डार्विन-स्पेन्सर-लोकमान्य टिळक, मधुर भक्ती नि अद्वैत अशा विविध विषयांवर भाष्य करायचं, हे सगळंच विस्मयचकित करणारं आहे. स्वत:ला   ‘ज्ञानेश्वर कन्या’ नि ‘कृष्णपत्नी’ समजणाऱ्या या ज्ञानसागराचीच एक रचना- जी सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केली, नि माझ्या मनात कोरली गेली, ती अशी-

चहु दिशी आजि देखिले सावळे,

केले घन निळे नवल हे।

गगना चढला तोच अंग रंग,

जाहले अभंग हृदय हे।।

मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला या अभंगाचं अप्रूप अशामुळे वाटतं, की एक जवळजवळ जन्मापासून अंध असलेला माणूस ‘मधुर कृष्ण’ भक्तीत ओथंबून, तल्लीन होऊन काव्यविलासात सावळ्याच्या अंगकांतीच्या निळाईनं भरून गेलेला आसमंत ‘पाहातोय’, आणि त्या रंगांची व भक्तीची उधळण इतरांच्या अंत:करणापर्यंत सहज पोहोचवतोय. संत गुलाबरावांच्या समकालीन अमेरिकेतील हेलेन केलर या जन्मांध लेखिकेनं ‘मिडस्ट्रीम’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, त्या रंग कशा पाहातात ते लिहिलं. गुलाबी म्हणजे बाळाच्या गालाचा रंग, पिवळा म्हणजे उगवत्या सूर्याचा रंग, जांभळा म्हणजे तिच्या शिक्षिकेचा आवडता रंग, म्हणून ‘जांभळा’ म्हणजे आवडत्या ‘व्यक्तींचा चेहरा’, लाल म्हणजे उन्हाळ्यातले गंध, राखाडी म्हणजे शाल, चमकी म्हणजे साबणाचे छोटे छोटे फुगे! संत गुलाबराव महाराजदेखील रंग असेच लक्षात ठेवत असतील का? जसं निळा म्हणजे कृष्ण, आभाळही निळं- म्हणजे कृष्ण!  रंगभान अशक्य असतानासुध्दा रंगांची ‘संगत’ वस्तू, आठवण, गंध, एखाद्या गोष्टीचा स्थायीभाव, यांच्याशी जोडून ‘रंगसंगती’ करणं हे मेंदू कसं काय करत असेल? ती ‘रंगसंगत’ अंगवळणी पाडून ‘मन:चक्षूंनी’ रंग इतक्या सहजपणे अनुभवायचे की एखाद्या डोळसालाही पाहता येणार नाहीत.

या मन:चक्षूंचा वेगळा नि विचित्र अनुभव तुम्हाला सांगतो. दृष्टीभ्रम (हॅलुसिनेशन) म्हणजे एखादी नसलेली गोष्ट दिसणं. सायलोसाइब नावाची अळंबी, धोत्रा, विशिष्ट प्रकारचा पुदीना, कॅक्टसची फुलं, हाच अनुभव आपल्याला देऊ शकतात. या झाडपाल्यांचा वापर वेगवेगळ्या धर्मात साक्षात्कारी अनुभवांसाठी केला जातो. स्वप्नवत स्थितीत नेण्याची क्षमता या रसायनांत असते. डोळे बंद असतानाही ‘मन:चक्षूंची सृष्टी’ अनुभवायची किमया ही रसायनं साधू शकतात. निसर्गातल्या या रसायनांवर कुरघोडी करणारी रसायनं आता प्रयोगशाळेतही तयार केली जातात आणि व्यसनांच्या जगात अ‍ॅसिड, श्रूम्स, एक्स्टसी, एंजल डस्ट, के या नावांनी ओळखली जातात. काय होतं या रसायनांमुळे? डोळे बंद असताना स्वप्नवत अनुभव येऊ शकतो, संगीत ‘दिसू’ शकतं किंवा जास्त कर्कश होतं, रंग ऐकू येतात किंवा जास्त प्रखर होतात, स्पर्श, वास सौम्य होतात किंवा उत्कट होतात. काळ, आकार, जाणिवा, भावना, एखाद्या अनुभव-आठवणीचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व बदलण्याची किमया ही रसायनं करू शकतात. काही जणांत तात्पुरती ‘अनुभव-चेष्टा’ करणारी ही रसायनं वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या व्यसनाधीन करण्याच्या गुणामुळे जशी आव्हानं तयार करत आहेत, तशीच काही गंभीर आजारांत उपचारांची संधीही!

संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे- ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ.’ आपल्याला मन:चक्षूंबद्दल कुठे काय माहीत असतं? असं म्हणतात, की काही लहान मुलांत हे मन:चक्षू इतके वाकबगार असतात, की सहजच त्यांना जागेपणीही स्वप्नांच्या राज्यात घेऊन जाऊ शकतात, ((eidetic imagery).  महात्म्यांच्या कर्तृत्वात आपल्याला त्यातला ‘देव’ दिसतो नि दृष्टिभ्रमाच्या रसायनांत नशेचा ‘दानव’! मन:चक्षू तेच, पण त्याचा वापर कसा झाला, कशासाठी झाला? हे ठरवणार अनुभव ‘सुहृद’ ठरणार की नाही ते. एरवी स्वप्नात दरदरून घाम फुटणं आपल्याला अनुभवाचं असतं, पण जेव्हा मन:चक्षू तारतम्य सोडतात तेव्हा जागेपणीसुद्धा जीवघेणी बेचैनी, थरकाप, भयकंप होऊ शकतो आणि तोदेखील नेहमीच्या वस्तू-अनुभवांशी निगडित. प्रसिद्ध दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉकला कोंबडीच्या अंडय़ाची भीती वाटायची, इंग्लंडचा ८ वा राजा हेन्रीला आजारांची भीती वाटायची आणि महिनोन्महिने तो स्वत:ला राजमहालात एकटा कोंडून ठेवायचा; असंही म्हणतात की तो जिवाणूंच्या भीतीनं कधीच सलग २ रात्री एकाच खोलीत झोपायचा नाही. शत्रूच्या मनात आपल्या क्रौर्यानं भीती निर्माण करणारा चंगेझ खान कुत्र्यांना घाबरायचा म्हणे! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन रुग्णालयांना इतके घाबरायचे की त्यांना वाटायचं, की ते जर का हॉस्पिटलमध्ये गेले तर कधी बाहेरच येणार नाहीत. उत्क्रांतीवादाच्या विचारांचा उद्गाता चार्ल्स डार्विन गर्दीला घाबरायचा. स्वत:बद्दल पराकोटीची नकारात्मकता मनात बाळगूनही जगभर बोटीतला प्रवास नि ज्ञानप्रवर्तक लिखाण ते कसं काय करू शकले हे एक कोडंच आहे. फ्रेडरिक चॉपिन हा पाश्चात्त्य संगीतकार आणि ज्याच्या नावानं नोबेल पारितोषिक दिलं जातं ते आल्फ्रेड नोबेल, दोघांनाही जिवंत पुरलं जाण्याची भीती होती. इतकी की दोघांनीही घरच्यांना सांगितलं होतं, की डॉक्टरांनी ‘मृत’ जाहीर केल्यावर त्यांचं हृदय/ रक्तवाहिन्या कापण्यात याव्यात! नेपोलियन बोनापार्टचा पुतण्या तिसरा नेपोलियन मांजरींना घाबरायचा. काही गोष्टी जसं बंद खोल्या/ जागा, रक्त, उंची, सुई, साप, कुत्रे, मांजरी, पक्षी, मासे, किडे, काही आकडे (उदा. १३, ७, १११ आदी), ढगांचा गडगडाट, पाऊस, काही रंग, काही वेळा तर लोकांशी संवाद/ संपर्क/ सहवास हासुद्धा काहींच्या अनाकलनीय भीतीचं कारण होऊ शकतो.

‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’ या म्हणीप्रमाणे इतरांना अशी भीती विचित्र, हास्यास्पद वाटत असली, तरी त्या व्यक्तीसाठी ती इतकी ‘खरी’ नि अस्वस्थ करणारी असते, की त्या क्षणाला ती व्यक्ती बेभान होते. त्या क्षणापासून दूर राहाण्यासाठी ती जिवाचा आटोकाट प्रयत्न करत राहाते. त्या क्षणाची नुसती आठवणसुद्धा तिच्यासाठी भीतिदायक असते. मेंदूची बरीचशी ताकद नि दिवसाचा बराचसा वेळ त्या क्षणापासून स्वत:ला दूर ठेवण्यात जातो. इतका, की कधीकधी त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य या क्षणाला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांतच जातं. अशा विचित्र, विवेकशून्य भीतीला ‘फोबिया’ असं म्हणतात. हाही बेचैनीच्या आजाराचा एक प्रकार आहे. करोनाकाळात हा ‘फोबिया’ वेगवेगळे अनुभव देतोय अनेकांना. ज्यांना गर्दीची (अगोराफोबिया), लोकांची (सोशल फोबिया) भीती वाटत होती, त्यांपैकी कित्येक खूश आहेत. टाळेबंदीमुळे त्यांना त्यांच्या भीतीपासून दूर राहाण्यासाठी नेमकं निमित्त मिळालं. पण ज्यांना आजारांची/ किडय़ांची/ जीवाणूंची भीती आहे, ते अतिरेकानं हात धूत, घरात कोंडून घेऊन आणि घरच्या इतरांनाही या अतिरेकाला बळी पाडत आहेत. आपण करतो आहोत तो अतिरेक असला, तरीही त्याचा अट्टहास नाही केला आणि आजार झाला तर? या प्रश्नानं स्वत:चं वागणं व्यवहार्य ठरवण्याचा प्रयत्नही करत आहेत. हे वागणं योग्य की अयोग्य, या वादात जाण्यात काही अर्थ नाही. पण एक नक्की, की माणसाचा इतिहासातला प्रवास नि प्रगती स्वसुरक्षा आणि जोखीम घेण्याची तयारी यातल्या मध्यम मार्गानंच झालेली आहे.

आमच्या शाळेच्या विहिरीत नाईक सर मुलांना पोहायला शिकवायचे. पहिल्या दिवशी घाबरलेली मुलं त्यांना बिलगून, त्यांच्याबरोबर शिडीवरून फ्लोटर, डबे बांधून पाण्यात उतरायची. नाकातोंडात पाणी जाताच घाबरून रडत, ओरडत सर्वात जवळचा दोरखंड किंवा सरांना पकडायचा प्रयत्न करायची. ५-१० मिनिटं हा प्रकार चालल्यानंतर ही शिकवणी काहीही करून दोरखंड किंवा सर यांना न सोडण्यापर्यंत पोहोचायची. पण हळूहळू इतरांना पोहताना पाहून, सरांच्या आश्वासक सांगण्यावर विश्वास ठेवून बरीच मुलं पाण्यात मोकळेपणानं वावरायला लागायची. डबा/ फ्लोट सोडताना थोडीफार परत भीती वाटायची, पण तात्पुरती. एकदा भीती गेली, की तळ गाठणं, सूर मारणं, मुटकळी मारणं, पाण्याखाली पोहणं, पावसात पोहणं सुरू व्हायचं. सुरुवातीला सरांना ‘आता पुरे ना’ विनवणारी मुलं, नंतर सरांना म्हणायला लावायची, ‘अरे पोरांनो आता पुरे!’ भीती आणि जोखीम घेण्याची तयारी याच्या जोडीला सरांची करडी नजर पोहण्याच्या सुरुवातीला घाबरणाऱ्या मुलामुलींना पोहण्याच्या आनंदापर्यंत पोचवायची. ‘डर के आगेही जीत होती हैं’ हे बाळकडू आपल्यापैकी कित्येकांना कुठल्यातरी विहिरीत, तरणतलावात, नदीत, नाही तर हौदात मिळालं असेल! पण त्यातही अशी मुलं असतीलच, जी मनातल्या (त्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मनातल्या) भीतीमुळे विहिरीपर्यंत पोहोचलीच नसतील आणि पाण्यात मनसोक्त डुंबायच्या अनुभवापासून दूरच राहिली असतील..

अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यात लोकांनी आपल्या मनातल्या भीतीवर मात करून यशाची शिखरं पार केली आहेत. उंचीची भीती असलेले ‘रॉक क्लाइंबिंग’ करायला लागलेत, दम्याच्या भीतीनं त्रस्त असलेले लांब पल्लय़ाचे धावपटू झाले आहेत, भाषण करायची भीती असलेले मोठे वक्ते/ नेते झाले आहेत. प्रत्येक वेळेला भीतीवर मात करत जग जिंकायची गरज नाही, पण भीतीपोटी नेहमीच्या साध्या सुखांपासून जर आपण स्वत:ला वंचित ठेवणार असलो, तर त्याबद्दल काही तरी नक्कीच करायला पाहिजे. नाही का?

गुलाबराव महाराज किंवा हेलेन केलर यांच्या मेंदूनं अंधत्वावर मात करत मन:चक्षूंनी जग स्वत: बघितलं, अनुभवलं नि इतरांसाठी बहरवलं. हेच मन:चक्षू जेव्हा विचित्र वागतात तेव्हा नसलेल्या कमतरताही ब्रह्मराक्षस बनतात. नसता ‘विचारभ्रम’ वाढवतात. साध्या सुखांपासून स्वत:ला नि कुटुंबीयांना वंचित ठेवतात.

पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर-

‘चिऊताई चिऊताई दार उघड, दार उघड,

निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही

आपलं दार बंद म्हणून कोणाचंच अडत नाही

आपणच आपला मग द्वेष करू लागतो,

आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो’

जवळजवळ १० ते १५ टक्के  लोकांना फोबियाचा आजार असतो. स्त्रियांमध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. बऱ्याच वेळा १०-१७ वयवर्षांत त्याची सुरुवात होते. थोडीफार जोखीम पत्करण्याची तयारी, समुपदेशक-डॉक्टरांची ‘करडी’ नजर/ मार्गदर्शन आणि जरूर पडल्यास औषधं हे मन:चक्षूंतील अशा प्रकारचं वेगळेपण सुधारू शकतात. मग तेसुद्धा म्हणू शकतील, ‘आम्हीही जगलो बेफाम!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:05 am

Web Title: vyarth chinta nako re coronavirus anxiety phobia after recovery from covid 19 zws 70
Next Stories
1 मी, रोहिणी.. : ‘विजय दीनानाथ चौहान’ची  माँ!
2 वसुंधरेच्या लेकी : हवामानबदल + वंचितांचा लढा
3 पडसाद : सणवार या जुन्या स्त्रियांच्या ‘कॉफी बीन्स’च