News Flash

सूक्ष्म अन्नघटक : हवी मोकळी हवा नि सूर्यप्रकाश

कर्करोगात सर्वात जास्त गरज असते ती जीवनसत्त्व ड, क, ब १, फॉलिक अ‍ॅसिड आणि जीवनसत्त्व के यांची.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नितीन पाटणकर

हल्ली नवीन संशोधन पुढे येऊ लागले आहे, की जीवनसत्त्वांच्या सेवनामुळे कर्करोगाच्या औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, आयुर्मर्यादा वाढते. कर्करोगात सर्वात जास्त गरज असते ती जीवनसत्त्व ‘ड’, ‘क’, ‘ब १’, फॉलिक अ‍ॅसिड आणि जीवनसत्त्व ‘के’ यांची. याशिवाय सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या परानील – ब (अल्ट्राव्हायोलेट बी – यूव्हीबी) किरणांचे स्नान घेतल्याने चौदा कर्करोगांत मृत्यू पुढे ढकलला जातो.

‘जागतिक कर्करोग संशोधन संस्थे’चा (इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर – आयएआरसी) अहवाल सांगतो, की जगभरातल्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे विकसनशील देशातील असतात. विकसित देशांमध्ये जगातील अठरा टक्के लोकवस्ती आहे आणि विकसनशील देशांमध्ये जगातील ऐंशी टक्के लोक राहतात. या देशांमध्ये जसजशी आयुर्मर्यादा वाढत चालली आहे तसे कर्करोगाचे प्रमाणही वाढत चालले आहे. मोठे आतडे आणि त्याखालील भाग (कोलोरेक्टल), फुप्फुसे, स्तन किंवा प्रोस्टेट यांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. कर्करोगावर कर्कऔषधे (किमोथेरपी), किरणोपचार (रेडिएशन थेरपी) किंवा शस्त्रक्रिया असे मान्यताप्राप्त उपचार उपलब्ध आहेत.

हे सर्व उपचार चालू असताना जीवनसत्त्वे, बलवर्धक औषधे, अँटीऑक्सिडंट्स, प्रतिकारशक्ती स्थिरक (इम्युनो स्टॅबिलायजर) अशा विविध गोष्टींचे सेवन केले जातेच. बहुतेक वेळा हे असे उपचार डॉक्टरला न सांगता केले जातात. कर्करोगावर ठोस उपचार नाही, यासोबत या रोगाची भीती आणि त्यासोबत जोडलेल्या मृत्यूच्या शक्यतेमुळे, या रोगावर औषधाच्या नावाखाली अनंत प्रकारचे फसवण्याचे उद्योग चालू असतात. या रोगावर उपचार करणारे डॉक्टर आशेचे किरणदेखील दाखवायला कमी पडतात आणि डॉक्टर नसलेले लोक आशेचे किरण दाखवण्याची भाषा बोलतात. ‘करून तर बघू, झाला उपयोग तर झाला’ या भावनेतून लोक अशा फसवणुकीला आपणहून बळी पडतात.

या फसव्या उपचारांचे सोडून द्या. अगदी ‘जीवनसत्त्वं घेऊ का?’, असे विचारले तरी एकेकाळी डॉक्टर नकार देत. कर्करोगांवरील उपचार हे पूर्वी बरेचदा, ‘कर्करोगी पेशींमधील जीवनसत्त्वांचा वापर बंद करून त्याद्वारे पेशी मारणे’ अशा स्वरूपाचे असत. त्यामुळे डॉक्टरांचा असा समज होता, की कर्करोगावर उपचार चालू असताना जीवनसत्त्वे घेतली, तर उपचारांचे परिणाम कमी होतील किंवा होणारच नाहीत. म्हणून डॉक्टर यास परवानगी देत नसत आणि यावर रुग्णांचा अजिबात विश्वास न बसून ते चोरून अशी औषधे घेत राहत. हल्ली औषधांचे स्वरूप बदलले आहे. नवीन संशोधन पुढे येऊ लागले आहे, की अशा जीवनसत्त्वांच्या सेवनामुळे औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, आयुर्मर्यादा वाढते. त्यामुळे आता कर्करोगवर उपचार करणारे डॉक्टर स्वत:हून अशा पूरक गोष्टी देऊ लागले आहेत. वय, कर्करोगाचा प्रकार आणि स्थिती इत्यादी विचारात घेऊन हल्ली कर्करोगतज्ज्ञ स्वत:च कर्कऔषधांसोबत असे उपचारही करू लागले आहेत. यातून रोगावर नियंत्रणासोबत फसवेगिरीलाही चाप लागेल असे वाटते.

कर्करोग झाल्यावर सूक्ष्म अन्नघटकांची कमतरता असण्याचे मुख्य कारण अन्नातून हे घटक न मिळणे हे नसून, अन्नाची इच्छा मरणे,  अन्नपचन न होणे, यांसारख्या गोष्टीतून होणारे कुपोषण आहे. या रोगात मूळ रोग आणि त्यावरील उपचार, हे दोन्ही घटक कुपोषणाला जबाबदार असतात. त्यामुळे सर्वात मोठा आघात होतो, तो स्नायूंवर. खंगणे (कॅकेक्सिया) हा दृश्य परिणाम. त्यामध्येसुद्धा श्वासनलिका, जठर आणि स्वादुग्रंथी यातील कर्करोगामध्ये सर्वात जास्त खंगणे दिसून येते. कर्करोगासाठी जीवनसत्त्व देताना त्याची मात्रा बघावी लागते. सगळी जीवनसत्त्वे, क्षार आणि इतर पदार्थ असलेली ‘कम्प्लीट’ किंवा ‘टोटल’ या नावांनी जी पूरके मिळतात त्यातून खरे तर काहीच मिळत नाही. हे शब्द ‘विक्री कलाकार’ सतत वापरतात. उदाहरणार्थ ‘डी.एच.ए.’ हे बहूअसंपृक्त मेदाम्ल (पॉलीअनसॅच्युरेटे‘ड’ फॅटी अ‍ॅसि‘ड’) मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त असते. त्याची गरज ही शेकडो ते हजार मिलिग्रॅममध्ये असताना, पदार्थात फक्त दहा मिलिग्रॅम ‘डी.एच.ए.’ घालून, ‘आमच्या उत्पादनामुळे मेंदूची वाढ होण्यास मदत होते.’ असे फसवे विधान केले जाते. या विधानावर आधारित मग ‘याचे सेवन केल्याने मुलगी आयएएस झाली,’ अशा फसव्या जाहिराती करता येतात.

तीच गोष्ट ‘कम्प्लीट’ या शब्दाची. ‘कम्प्लीट हेल्थ चेकअप’ हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. तसाच ‘कम्प्लीट न्युट्रिशन सप्लिमेंट’ हा प्रकार. याला खरे तर ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असेच म्हणावे लागेल. कर्करोगात जी पूरके उपयोगी ठरतात त्यांचे प्रमाण अशा सर्व समावेशक पदार्थामधील प्रमाणापेक्षा खूप जास्त असते.

कर्करोगात सर्वात जास्त गरज असते ती जीवनसत्त्व ड, क, ब १, फॉलिक अ‍ॅसिड आणि जीवनसत्त्व के यांची. यासोबत झिंक हा क्षार पुरेशा प्रमाणात पुरवावा लागतो. सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या परानील – ब (अल्ट्राव्हायोलेट बी – यूव्हीबी) किरणांचे स्नान घेतल्याने चौदा कर्करोगांत मृत्यू पुढे ढकलला जातो. मूत्राशय, स्तन, मोठे आतडे, लहान आतडे, पित्ताशय, वृक्क (किडनी), ध्वनीश्वासयंत्र, यकृत, फुप्फुसे, मुख, स्वादुग्रंथी (पॅनक्रियाज), पूर:स्थ ग्रंथी (प्रोस्टेट), गुदाशय, हे ते चौदा कर्करोग ज्यामध्ये सूर्यस्नान घेतल्याने मृत्यू पुढे ढकलत येतो हे सिद्ध झाले आहे. याचे कारण म्हणजे या सूर्यस्नानातून निर्माण होणारे जीवनसत्त्व ‘ड’. हे विधान खूप अतिरंजित वाटेल म्हणून याचा संदर्भ –  (PMCID : PMC uyqyyzr, PMID

२६९८५९०४ (वैद्यकीय क्षेत्रातली शास्त्रीय माहिती जिथे उपलब्ध असते त्या सूचीला पीएमसीआयडी म्हणतात.)

पूर्वीच्या काळी मोकळी हवा आणि सूर्यप्रकाशासोबत सकस खाणे आणि आराम हे महत्त्वाचे उपाय होते. या व अशा आजारांना, ज्यात क्षयरोगसुद्धा आला, पूर्वी औषधे नव्हती, तेव्हा आरोग्यधाम (सॅनटोरियम) हीच उपचारांची जागा असे आणि त्यातूनही औषधांशिवाय बरे होणारे लोक होतेच. आता लंबक दुसऱ्या दिशेला आलेला दिसतो आणि आता आधुनिक उपचार घेताना आपण ‘मोकळी हवा आणि सूर्यप्रकाशासोबत सकस खाणे आणि आराम’ हे उपचार चतुष्टय़ विसरत चाललो आहोत.

‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही आज खूप सर्वसामान्य गोष्ट झालीय. जेवढय़ा रुग्णांची ‘ड’ जीवनसत्त्वाची चाचणी केली, त्यांच्यापैकी ९० टक्के लोकांमध्ये त्याची कमतरता दिसून येते. यात दिवसभर वातानुकूलित कार्यालयात बसून राहणाऱ्यांपासून ते दिवसभर उन्हात वावरणाऱ्या लोकांचा समावेश होतो. त्यामुळे सूर्यप्रकाशात न जाण्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्व कमी पडते असे नसावे. इतरही काही करणे असावीत हे नक्की. हाडांचा ठिसूळपणा किंवा मृदूपणा (ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओमलेशिया) आहे का नाही हे पाहणे, रक्तातील कॅल्शिअम तसेच पॅराथॉर्मोनची पातळी पाहणे या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून ‘ड’ जीवनसत्त्वाचा प्रभाव कमी आहे का हे ठरवून त्यावर उपाय केले जातात.

पण कर्करोगाच्या सर्व प्रकारांत ४० ते ६० आंतरराष्ट्रीय मापके (इंटरनॅशनल युनिट्स) प्रति किलोग्रॅम (व्यक्तीचे वजन) याप्रमाणे ‘ड’ जीवनसत्त्व पुरकाच्या स्वरूपात द्यावे लागते. जेणेकरून रक्तातील ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी ४० ते ६० नॅनोग्रॅम प्रति मिलिलिटर इतकी राहील. खासकरून खंगलेल्या, रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) असलेल्या, थकवा जाणवणाऱ्या किंवा सतत तोंड येणे ही तक्रार असणाऱ्या रुग्णांना ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक असते.

सेलेनियम हा एक क्षार ‘ड’ जीवनसत्त्वानंतरचा दुसरा शिलेदार (म्हणता येईल). कर्कऔषधी किंवा किरणचिकित्सा करण्यापूर्वी सेलेनियम दिले तर उपचारांचे दुष्परिणाम टाळता येतात. सोडियम सेलेनाइटचे इंजेक्शन अशा उपचारांपूर्वी दिले जाते. मशरूम, टोफू, सूर्यफुलाच्या टरफलरहित बिया किंवा चिआ सीड या पदार्थामधून सेलिनिअम मिळू शकते. असे उपचार घेणाऱ्या लोकांच्या आहारात या पदार्थाचा वापर जर उपचारापूर्वी दोन ते तीन दिवस आधी केला तर त्याचा उपयोग होतो. रुग्णाने जर सेलेनियमयुक्त पदार्थ सतत सेवन केले तर मात्र त्याचा उलट परिणाम होऊन; उपचारांचा प्रभाव कमी होतो.

ज्यांच्यामध्ये स्नायूंचे प्रमाण खूप कमी झाले आहे अशा लोकांसाठी (कर्करोगात स्नायू ज्या फायबर्सनी बनलेले असतात त्यांची संख्या कमी होते) ‘एल- कार्निटीन’ हा पदार्थ उपयोगी पडतो. निदान एक ग्राम तरी कार्निटीन दिवसाला पोटात गेल्यास त्याचा स्नायुवृद्धीसाठी उपयोग होतो. त्यामुळे ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढते. ‘एल- कार्निटीन’ आणि जिममध्ये दिले जाणारे क्रिएटिन हे एकच नव्हे हे लक्षात ठेवायला हवे. तसेच जीवनसत्त्व ‘क’ आणि ‘ब १’ यांचासुद्धा वापर करावा लागतो. कर्करोगाबद्दल एक चमत्कारिक गोष्ट दिसून आली आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार, कर्करोगावरील उपचार हे मूळ रोगापेक्षा जास्त त्रास देतात. त्याचे एक कारण असेही असते, की प्रत्यक्ष कर्करोगापेक्षा कर्करोग झाला हे कळल्यानंतर वाटणारी भीती त्या माणसाला मृत्यूसमीप घेऊन जाते. ही भीती कशी दूर करायची हा कळीचा प्रश्न आहे. कुठल्याही रोगात, जेव्हा तो रोग दीर्घकालीन (क्रॉनिक) होतो तेव्हा रोगासोबत रोगाकडे आणि एकूण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. अगदी मधुमेह असो, की कर्करोग, रुग्णाला काय झाले आहे, याचबरोबर त्याला काय वाटते आहे, हेसुद्धा बघण्याची दृष्टी हवी. दुर्दैवाने त्यासाठी कुठली चाचणी नाही आणि डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात हे शिकवत नाहीत.

‘ज्याचं जळतं, त्याला कळतं’ असं म्हणतात. तसेच सध्या तरी औषधोपचाराशिवाय स्वत:ची मानसिक ताकद वाढविण्यासाठी एकलव्य होणे हेच श्रेयस्कर!

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:11 am

Web Title: want free air and sunshine dr nitin patankar abn 97
Next Stories
1 विचित्र निर्मिती : तथा-वास्तू
2 ‘मी’ची गोष्ट : स्थिर जगण्यातली अस्थिरता
3 सृजनाच्या नव्या वाटा : मरुदम फार्म स्कूल निसर्गस्नेही शेतीशाळा
Just Now!
X