26 October 2020

News Flash

अवलोकन

‘‘तुमच्या पतीकडे वा पत्नीकडे तुमच्या अगदी जवळच्या संबंधांच्या आठवणींशिवाय, भूतकाळातील स्मृतींशिवाय पाहिलं आहे का? ‘माझी बायको’, ‘माझा नवरा’, असल्या शब्दांशिवाय, साचत आलेल्या कटू...

| June 14, 2014 01:01 am

‘‘तुमच्या पतीकडे वा पत्नीकडे तुमच्या अगदी जवळच्या संबंधांच्या आठवणींशिवाय, भूतकाळातील स्मृतींशिवाय पाहिलं आहे का? ‘माझी बायको’, ‘माझा नवरा’, असल्या शब्दांशिवाय, साचत आलेल्या कटू स्मृती, मत्सर, अपेक्षाभंग हे सारं बाजूला सारून आपल्या माणसांकडे बघायला हवं. जेव्हा भूतकाळ मध्ये न आणता पत्नी वा पतीबद्दल तुम्ही मनात तयार केलेल्या प्रतिमांशिवाय पाहू शकाल त्या वेळी तुमच्यात व तुमच्या जोडीदारात योग्य संबंध प्रस्थापित होईल.
आपण आपलं दैनंदिन संघर्षमय जीवन जगत असतो. सुखदु:खांची साखळी, राग, लोभ, संताप, मत्सरादी विकार, स्पर्धा, यशापयश, पूर्वसंस्कार व अनुभवांमधून येणारे विचार व कृती असं सगळं त्या जगण्यात ठासून भरलेलं असतं, पण या पलीकडे जाऊन जीवनाबद्दलचं सत्य जाणून घेण्याची आत खोलवरची ओढ आपल्या सगळ्यांना असतेच. आपण आपल्या आणि जगाच्या संदर्भात असमाधानी असतो. शांती आणि आनंदाच्या शोधात असतो. या संदर्भातील गोष्टी उलगडून सांगताना जे. कृष्णमूर्तीनी भूतकाळ, त्यातील अनुभव, आवडीनिवडी अशा बाबी दूर ठेवून खरं जीवन समजून घेण्यासाठी अवधान, श्रवण, अवलोकन या सगळ्या गोष्टी कशा असाव्यात याबद्दल सुरेख विवेचन केलं आहे. प्रत्येकाला तसं श्रवण, अवलोकन साध्य होऊ शकतं याबद्दलची ग्वाही ते देतात.
आपल्या जगण्यात प्रत्यक्षपणे काही घडत असतं. ते बघितल्यावर आपण पूर्वानुभवांवरून निष्कर्ष काढतो. चांगलं किंवा वाईट अशी विभागणी करतो. वाईट म्हणून धिक्कार करतो किंवा चांगलं म्हणून भलामण करतो. त्यातून फायदा-तोटा काय होईल ते जोखून स्वीकार करायचा की नाही त्याचे हिशेब करायला लागतो. यापेक्षा अमुक अधिक चांगलं आहे अशी तुलना करतो. मूल्यमापन करतो. आत्ता जे घडतंय त्याला पूर्वानुभावांशी ताडून पाहून त्याबद्दल मतं पक्की करतो. हे काहीही न करता, जुने संस्कार, सवयी, समजुती मध्ये न आणता नुसतं अवलोकन केलं म्हणजे जे घडतं आहे, त्याचं वास्तव रूप आपल्याला समजू शकेल.
जे. कृष्णमूर्ती म्हणतात की, असं अवलोकन हा खरोखर चमत्कार आहे. धिक्कार, तुलना, निवड, मूल्यमापन आदी अनेक गोष्टींनी मूळ वस्तू विकृत करून टाकली जाते. आपण स्वत:लासुद्धा जसे आहोत तसे पाहत नाही. समाज आपल्याकडून काय अपेक्षा करतो, कुटुंब काय म्हणतं, त्यांच्या दृष्टीने आपल्या चुका झाल्या तर त्या झाकण्यासाठी कोणती संरक्षक यंत्रणा उभी करायची, आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी आपण आपल्या संस्कारांविरुद्ध काही केलं, तर आपली आपण निर्माण केलेली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून काय काय युक्त्या योजायच्या या सर्वाचं आवरण आपल्या मनाने चढविलेलं असल्याने आपण नि:पक्षपणे, विशुद्धतेने कोणत्याही अडथळ्याविना आपलं स्वत:चंसुद्धा अवलोकन करीत नाही. या अवलोकनासाठी आपण काय विचार करतो, कसा विचार करतो याचं अवधान हवं. अवधानपूर्वक अवलोकन म्हणजे संस्कारबद्धतेतून मुक्त झालेल्या मनाने केवळ बघणं.
जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘पाहणं, निरीक्षण करणं, अवलोकन करणं म्हणजे काय? आपल्या सभोवतालची परिस्थिती, वृक्ष, पाण्याची तळी, तारे, प्रतिपदेचा चंद्र, सायंतारा, सूर्यास्ताचं वैभव, हे सर्व अवलोकन करणं म्हणजे काय? तुम्ही स्वत:मध्ये, तुमचे प्रश्न, तुमच्या कल्पना, तुमचे विचार इत्यादींमध्ये मग्न असाल तर तुम्ही अवलोकन करू शकणार नाही. तुमचे काही पूर्वग्रह असतील, तुमच्या निष्कर्षांविषयी तुम्ही ठाम असाल, तुमच्या विशिष्ट अनुभवांना चिकटून बसला असाल तर तुम्हाला अवलोकन अशक्य आहे.’’
त्यांच्या या सांगण्याचा आपल्याला दैनंदिन जीवनात प्रत्यय येतच असतो. सळसळत जाणारा सर्प पाहून आपल्याला भीती वाटते. कारण साप चावला की माणूस मरतो म्हणून तो शत्रू आहे, त्याला ठेचून मारायला हवं, असे पूर्वसंस्कार आपल्या मनावर झालेले असतात. एखादा माणूस आपल्याकडे पाहून हसला नाही तर तो गर्विष्ठ आहे असा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. तो काळजीत असेल, त्याचं नीटसं लक्ष नसेल, असं आपल्याला वाटतही नाही. आपण मनात त्याच्याविषयी अढी धरतो, हा अनुभव हा तात्कालिक असतो प्रत्येक वेळी वेगळा असू शकतो. भूतकाळातील अनुभवातून निर्माण झालेल्या विचारांसह आपण एखाद्या वस्तुजातीकडे बघतो, तेव्हा वास्तवता आणि सत्य यांपासून दूर असतो. त्या वेळी, त्या क्षणी त्या वस्तू, जीवितमात्र, घटना वगैरेकडे इतर काहीही गोष्टी मनात न आणता निर्विकारपणे, कोणतंही लेबल न चिकटवता, पूर्वग्रहाच्या अडथळ्याशिवाय पाहतो तेव्हा आपण खऱ्याअर्थी अवलोकन करीत असतो.
कित्येकदा एखादं फूल पाहिल्यावर मनात येतं, याचा रंग आणखी गडद हवा होता. आपण त्या अमुक ठिकाणी पाहिलेलं फूल अधिक सुंदर होतं. चित्र काढताना कोणत्या रंगाच्या पाश्र्वभूमीमुळे हे अधिक उठावदार दिसेल? फुलदाणीत हे तितकसं शोभणार नाही. एखाद् वेळी तर फूल नजरेसमोर असूनही मनातील विचारांच्या गलबल्यामुळे आपण ते पाहिल्याचं लक्षात येत नाही. अशी तूलना, पूर्वानुभव, भविष्यकालीन योजना, मन व्यग्र करणारे विचार या सगळ्यात आपण ते फूल खऱ्याअर्थी पाहिलंच नसतं.
जे. कृष्णमूर्ती असं विचारतात, ‘‘तुम्ही वृक्षांचं सौंदर्य कसं बघता? तुम्ही त्यांच्याकडे खऱ्या अर्थी कधी पाहिलं आहे का? त्यांची पानं, वाऱ्याने होणारी त्यांची सळसळ, पानांवर पडलेल्या किरणांचं सौंदर्य यांसारख्या गोष्टींकडे तुम्ही पाहिलं आहे का? वृक्ष, चंद्राची कोर, आकाशातला तारा, यांच्याकडे चंद्र, तारा, आकाश हे शब्द मध्ये न आणता पाहिलं आहे का? शब्दांच्या मध्यस्थीशिवाय, लुडबुडीशिवाय तुम्ही हे पाहिलं आहे काय? कारण शब्द म्हणजे प्रत्यक्षातील तारा, आकाश, चंद्र नव्हे.’’शब्दही बाजूला ठेवून केवळ त्या वस्तुजातीकडे बघा. मग या अवलोकनातून सौंदर्याची, आनंदाची प्रचीती येईल असं कृष्णमूर्तीचं सांगणं आहे.
आपल्या नातेसंबंधांबाबतही असं अवलोकन घडायला हवं, हे सांगताना कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘तुमच्या पतीकडे वा पत्नीकडे शब्दांशिवाय, तुमच्या अगदी जवळच्या संबंधांच्या आठवणींशिवाय, भूतकाळातील स्मृतींशिवाय पाहिलं आहे का? आपण असं करत नाही. ‘माझी बायको’, ‘माझा नवरा’, ‘माझा मुलगा’ असल्या शब्दांशिवाय, साचत आलेल्या कटू स्मृती, अपमान, मत्सर, अपेक्षाभंग हे सारं बाजूला सारून आपल्या माणसांकडे बघायला हवं. जेव्हा भूतकाळ मध्ये न आणता पत्नी वा पतीबद्दल तुम्ही मनात तयार केलेल्या प्रतिमांशिवाय पाहू शकाल त्या वेळी तुमच्यात व तुमच्या जोडीदारात योग्य संबंध प्रस्थापित होईल. आपल्या जवळच्या अशा जोडीदाराचंसुद्धा आपण पूर्वग्रहाशिवाय, पूर्वानुभवविरहित अवलोकन करू शकत नाही. त्यामुळे एकमेकांशी कधी न मिळणाऱ्या रुळांसारखा संबंध प्रस्थापित होतो. आणि आपल्याला याची साधी जाणीवसुद्धा नसते. आवड-नावड मध्ये न आणता भूतकाळ पूर्णपणे बाजूला सारून अवलोकन करण्याची कला जीवनात मोठा आनंद निर्माण करते.’’
अशा अवलोकनाचं सुंदर उदाहरण देताना कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘सायंकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांनी लखलखणारे पर्वतशिखर पाहणं.. पूर्वी हजार वेळा पाहिलेलं असलं तरी ते पूर्वज्ञान नसणाऱ्या डोळ्यांनी पाहणं, म्हणजे नूतनाचा जन्म होताना पाहणं! हे अवलोकन म्हणजे सृजनच आहे.’’आपल्या सर्वाना असं अवलोकन शक्य आहे याची आश्वासक ग्वाही कृष्णमूर्ती देतात. त्या दिशेने आपण आपली पावलं मात्र उचलायला हवीत..
(madhavikunte@gmail.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:01 am

Web Title: ways to create the best relationship with life partner
टॅग Husband,Relationship
Next Stories
1 आव्हान कचऱ्याच्या डोंगराचं!
2 कचरा उद्योगाचा ‘स्वच्छ’ मार्ग
3 छोटी गोष्ट, मोलाची
Just Now!
X