राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्य़ांतून मला जे दूरध्वनी आले त्यात फसवणुकीची प्रकरणे सर्वाधिक होती. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शरीरसंबंध ठेवणे आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडणे, अशी बरीच प्रकरणे घडल्याचे लक्षात आले, यामध्ये मुलींचे प्रमाण खूप जास्त होते. काही मुलींचं असं म्हणणं पडलं की, आम्हाला हे सर्व विसरून नवीन आयुष्य जगावयाचं आहे. तर बऱ्याच  तरुणींमध्ये मात्र सूडभावना प्रकर्षांने जाणवत होती, त्यातून त्यांचा राग व संताप जाणवत होता. प्रेम करताना आणि विशेषत: त्यातलं पुढचं पाऊल उचलताना सावध राहायलाच हवं, आणि अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा, हेच या सगळ्यांचं सांगणं होतं.
एक सामाजिक कार्यकर्ती व वकील म्हणून  मुंबईत काम करत असताना आतापर्यंत लंगिक अत्याचारग्रस्त मुली किंवा स्त्रियांच्या संपर्कात मी प्रत्यक्षपणे येत होतेच, परंतु ‘एक अटळ शोकांतिका’ हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मला महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्य़ांतून दूरध्वनी व ई-  मेल आले, तसेच लेखाबाबत, मधूच्या कहाणीबाबतही मला अनेक संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. अनेकींनी या विषयावर माझ्याशी चर्चाही केली. आणि जाणवलं की अल्पवयीन मुलींवर तिच्याच नातलगाकडून होणारा किंवा इतर कुणीही केलेला लैंगिक अत्याचाराचा विषय आता टाळायचा विषय राहिलेला नाही. अत्याचारग्रस्तच नव्हे तर त्यांचे नातेवाईकही आता हा विषय लपवून ठेवण्याऐवजी त्याविषयी बोलू लागले आहेत. त्याविरोधात तक्रार करायला लागले आहेत. पोलिसांपर्यंत पोहोचून न्याय मिळवण्याचा प्रयत्नही होतो आहे. ‘मी आता गप्प बसणार नाही,’ असं म्हणणाऱ्या मुलींची संख्या वाढते आहे. हे चांगलं लक्षण आहे.
 दूरध्वनी व ई-मेलद्वारे आलेल्या तक्रारींमध्ये मुख्यत: महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या मुलींचे फोन होते. त्यांच्या तक्रारींमध्ये त्यांच्यासोबत शिकणारी मुले छेडछाड करतात, अश्लील मस्करी करतात; इतकंच नव्हे तर अनेकदा पाठलागही करतात. सिनेमा बघण्यास तसेच चौपाटी, हॉटेल, मॉल, बागेत आदी ठिकाणी फिरावयास येण्यासंबंधी बळजबरी करतात, आदी तक्रारी होत्या. त्यातल्याच एका तरुणीने आपली कैफियत मांडली. तिचे महाविद्यालयात असताना एका मित्राशी प्रेमसंबंध होते, त्यावेळी त्यांचे शारीरिक संबंधही आले होते. परंतु पुढे त्यांच्यात वाद झाला आणि तिने त्याच्याशी  संबंध तोडले, परंतु तो तरुण आता तिला वारंवार भेटून समाजात तुझी बदनामी करीन असे सतत धमकावत आहे. त्यामुळे भीतीमुळे मनाविरुद्ध ती त्याच्याशी पुन्हा संबंध ठेवून आहे. ‘मला आता माझ्या आयुष्यात स्थिर व्हायचे आहे, मला यातून बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा,’ अशी कळकळीची विनंती ती करत होती. यावर मी तिला सांगितलं की आधी आईवडिलांना विश्वासात घे. आणि त्यांना हे सारे काही सांगून टाक. त्या तरुणाला मोबाइलवरून व ई-मेलद्वाराही सक्त ताकीद दे. त्याने पाठलाग करणं आणि संपर्क साधणं थांबवलं नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची तूच धमकी दे. असे करून देखील जर त्याने त्रास देणे थांबविले नाही तर पोलिसांकडे रीतसर तक्रार कर. अशा वेळी तू पाठविलेल्या मोबाइल/ ई-मेल मेसेजचा पुरावा म्हणून वापर करता येईल. बदनामी होईल म्हणून घाबरत बसलीस तर कुणाचंच भलं होणार नाही.’
 मुलींना माझं हेच सांगणं आहे. कुणीही तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. त्याविरोधात तक्रार करण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वत: अशी पावलं उचलत नाहीत तोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार नाही. याच संदर्भात एक तरुणी मला प्रत्यक्ष भेटायला आली, तिने आपली व्यथा सांगताना सांगितले की, गेले एक वर्ष ती एका तरुणाला, अजयला (नाव बदलले आहे) ओळखत आहे, ऑफिसच्या पिकनिकमध्ये त्यांची भेट झाली. त्याने तिचा फोटो फेसबुकवर पाहिला आणि तो त्याला आवडला म्हणून त्याने तिच्याशी मैत्री वाढवली होती. अजय तिच्याशी सतत मोबाइलवर संपर्क ठेवून होता, भेटायलाही यायचा. एके दिवशी त्याने तिला सांगितले की, ‘‘मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. लवकरच मी तुला माझ्या आई-वडिलांकडे घेऊन जाणार आहे.’’ त्याच्यावर विश्वास ठेऊन ती त्याच्या सोबत गेली, ते एका हॉटेलवर थांबले, त्यांचे शारीरिक संबंध आले. त्यानंतरही त्यांच्या भेटी होत गेल्या त्यावेळीही त्यांचे शारीरिक संबंध येत गेले. परंतु त्यानंतर तीन महिन्यांनी अजयने अचानक भेटणं कमी केलं. नंतर तर संपर्क साधणं सोडून दिलं, इतकंच नव्हे तर मोबाइल नंबर आणि ई-मेल आय. डी.ही बदलला. अचानक काय झालं हे तिला कळेना. तो भेटत नाही म्हणून तिने त्याच्या मित्रांकडे चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी मुली बघत आहेत. तेव्हा मात्र तिने त्याची प्रयत्नपूर्वक भेट घेतली. त्यावर मला तुझ्याशी लग्न करावयाचे नाही असे त्याने बेधडक सांगून टाकले. आत्तापर्यंत तिने अजयला बऱ्याच भेटवस्तू दिल्या होत्या तसेच आíथक मदतदेखील केली होती. या नात्यात ती तनामनाने पूर्ण गुंतलेली होती. आणि आता या उद्ध्वस्त मनस्थितीत तिच्या मनातल्या रागाने त्याला धडा शिकवायचं ठरवलं आहे. ‘मी आयुष्यभर लग्न करणार नाही, पण त्यालाही सोडणार नाही. त्याला धडा शिकवणारच. माझ्यासारखं आणखी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये इतकंच.’ असं ती सांगते.
 लक्षात ठेवा, लंगिक अत्याचाराला जरी ती तरुणी बळी पडत असली तरी त्यात तिची अब्रू जात नाही. उलट अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने वाईट कृत्य केलेलं असतं, हा विश्वासघात असतो. याबाबतची त्याला समज मिळणं गरजेचं आहे. शिक्षा मिळणं गरजेचं आहे. तेव्हा गप्प न बसणं हेच योग्य आहे.     
 मला राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्य़ांतून जे दूरध्वनी आले त्यात अशाच प्रकारच्या फसवणुकीची प्रकरणे सर्वाधिक होती. लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणं आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडणं, अशी बरीच प्रकरणं घडल्याचं लक्षात आलं, यामध्ये शालेय-महाविद्यालयीन मुलींचं प्रमाण खूप जास्त होतं. काही मुलींचं असं म्हणणं पडलं की, आम्हाला हे सर्व विसरून नवीन आयुष्य जगावयाचं आहे. बऱ्याच तरुणींमध्ये मात्र सूडभावना प्रकर्षांने जाणवत होती, त्यातून त्यांचा राग व संताप जाणवत होता. त्यांची मनं दुखावली गेली होती आणि कुणावर तरी मनापासून प्रेम केल्याची खंत त्यांना वाटत होती. आता यापुढे लग्न करायचंच नाही, अशी  या मुलींची भावना होती. प्रेम करताना आणि विशेषत: त्यातलं पुढचं पाऊल उचलताना सावध राहायलाच हवं, असंच या तरुणींचं म्हणणं पडलं.
त्या सगळ्यांना मी सांगितलं की, ‘लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी अत्याचारग्रस्त  स्त्रिया पोलीस ठाण्यात बलात्काराचं प्रकरण दाखल करू शकतात. तसंच स्त्रिया वा तरुणी त्यांना नको असणारे दूरध्वनी व त्यांचा पाठलाग करून त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम ३५४ भा.दं.वि. या नवीन कायद्यांतर्गत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करू शकतात. पोलिसांकडून अशा प्रकरणी कडक कारवाई करण्यात येते. आतापर्यंत किरकोळ समजलं जाणारं कृत्य (छेडछाड, पाठलाग करणं, अश्लील फोटो काढणं इत्यादी) हे क्रिमिनल (अमेंडमेंट) अॅक्ट, २०१३ प्रमाणे गंभीर स्वरूपाचं आहे व यामध्ये किमान एक वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण व्यक्ती तशा प्रवृत्ती. स्त्रियांना छळण्याचे प्रकार वाढते आहेतच, पण स्त्रियांकडूनही छळलं गेल्याची प्रकरणे समोर आलीच. काही पुरुषांनी स्त्रियांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाविषयीही तक्रार केली. एका पुरुष तक्रारकर्त्यांने मला ई-मेल पाठवून  त्यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला. ते दोघे प्रेमात पडले. त्यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या, पुढे त्यांच्यात शारीरिक संबंधही आले. परंतु ती तरुणी आता त्याच्याशी लग्नास तयार नाही. त्याला या प्रकरणी सल्ला हवा होता. अशा प्रकरणांमध्ये फसुवणीव्यतिरिक्त कुठलीच तक्रार करू शकत नाही. तसंच मुळातच त्यांचं लग्न ठरलं नसल्याने फसवणुकीच्या आरोपाबाबतही साशंकता आहे. पण पुरूषही हा अनुभव घेत आहेत.
 मला आलेल्या अनेक दूरध्वनींमध्ये अनेक पालक होते. मुलं एकसारखी फोन किंवा फेसबुकवर असतात. कितीही समजावलं तर उद्धटपणे बोलतात, सारखी रागावत असतात, अजिबात ऐकत नाहीत, मुलगे बऱ्याच उशिरा रात्री घरी येतात. वाईट संगतीत असतात, असे अनेक त्रस्त पालक सांगत होते. त्यांना मुलांशी सुसंवाद साधा ही एकच कळकळीची विनंती मी केली. मुलांशी ते लहान असल्यापासूनच सगळ्या विषयांवर बोलणं, सुसंवाद राखणं गरजेचं आहे. एक सामाजिक कार्यकर्ती व वकील म्हणून मला माझा अनुभव सांगावासा वाटतो. आजही अनेक घरात सेक्स हा विषय निषिद्ध आहे. मुला-मुलीमध्ये लंगिकतेबाबतची जी जिज्ञासा आहे, त्याबाबत चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. समाजामध्येही या विषयावर मोकळेपणाने बोललं जात नाही. पौगंडावस्थेत होणाऱ्या शारीरिक आणि भावनिक बदलाची शास्त्रीय आणि वैद्यकीय माहिती पालक व शिक्षक मुलांना देत नाहीत त्यामुळे त्यांचा बौद्धिक गोंधळ (टील्ल३ं’ ३४१्रे’) उडतो. या वयात आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे, विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं हे नसíगक व स्वाभाविक आहे. परंतु याबाबत अनेक पालक /शिक्षक स्वत: अनभिज्ञ असल्याने या विषयावर निसंकोचपणे चर्चा करण्यास ते असमर्थ असतात.
जाणते अजाणतेपणे आजही अनेक घरांत िलगभेद मानला जातो. मुलींना जास्त कडकपणे वागवलं जातं. त्यांच्या वागण्यावर, कपडय़ांवर, मुलांशी न बोलणं, घरी लवकर येणं इत्यादी बाबत वेळोवेळी बंधने घातली जातात, तर या उलट मुलांच्या बाबतीत बरीच मोकळीक दिली जाते. या मुलांना सेक्सविषयी अर्धवट माहिती मिळालेली असते. त्यातून कुतूहलापोटी काही मुलं शरीरसंबंधांबाबत  प्रयोग करू पाहतात. परंतु या संबंधांचे परिणाम व जबाबदारी त्यांना माहीत असतेच असं नाही. म्हणूनच लहानपणापासून मुलांना चांगले/वाईट तसंच सुरक्षित/असुरक्षित स्पर्शाबाबत माहिती दिली पाहिजे व मुलांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे. यामुळे कुठलाही कटू प्रसंग ओढवल्यास ते आपल्या पालकांना येऊन सांगतील, आणि त्यामुळे पुढचे धोके टाळणं शक्य होईल.
लैंगिक संबंधांची जशी अनेकांना माहिती नसते तशी अत्याचाराचीही अनेकांना माहिती नसते. त्यामुळे सावध रहाणं म्हणजे काय हाच अनेकांसमोर प्रश्न असतो. जो स्पर्श मला आवडत नाही तो लंगिक अत्याचारामध्ये मोडतो. छेडछाड, पाठलाग करणं, फोनवरून वारंवार त्रास देणं, अश्लील फोटो काढणं व दाखविणं हे प्रकार नवीन कायद्यानुसार लंगिक अत्याचारामध्ये मोडतात. तर मनाविरुद्ध व संमतीशिवाय झालेले लंगिक संबंध, लग्नाचं आमिष दाखवून केलेले लंगिक संबंध, पती असल्याचे भासवून ठेवलेले लंगिक संबंध, वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक संबंध होण्याच्या दृष्टीने ऑब्जेट इन्सर्शन, फोंडिलग ही कृत्ये बलात्कारामध्ये मोडतात. त्यामुळे अशा प्रकारचा अत्याचार मुली, तरुणींच्या बाबतीत होत असेल तर त्यांनी आधी आपल्या आई-वडिलांना, जवळच्या व्यक्तींना विश्वासात घेऊन याची कल्पना देणं गरजेचं आहे.  
 लंगिक अत्याचारामुळे मुली व तरुणींचं मानसिक खच्चीकरण होतं व त्या आत्मविश्वासही गमावून बसतात, यामधून सावरण्याकरिता विशेषत: वैद्यकीय उपचार व मानसिक – सामाजिक आधाराची नितांत गरज असते. तेव्हा अत्याचार झाल्यानंतर अनेक रुग्णालये, महिला संस्थांशीही संपर्क साधता येईल.  आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते चांगलं जगता यावं यासाठी खूप दक्ष आणि जबाबदारीने वागायला हवं, मात्र एखादी अप्रिय घटना घडली की त्याचा पश्चात्ताप वा दु:खं करत बसणं हे तात्पुरतं असायला हवं. आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध दाद मिळवणं आणि जे आपल्याबाबतीत झालं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा ‘प्रिकॉर्शन इज बेटर दॅन क्युअर.’ जखमा सांभाळत बसण्यापेक्षा त्या होऊ नये याची आधी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पालकांनो,  आणि आजचे हुशार, स्मार्ट मुलगे आणि मुली दोघांनीही सावध.    n
    

To Avoid Tragedy
Tragedy in life, Sexual Victimization , women saftey,  abuse, chaturang, chaturang news, marathi, marathi news
शोकांतिका टाळण्यासाठी
आरती कदम -arati.kadam@expressindia.com
‘एक अटळ शोकांतिका’ हा माझा लेख १ फेब्रुवारीच्या ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नेहमीप्रमाणे प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अर्थात हा लेख म्हणजे मधूची अटळपणे घडलेली शोकांतिका होती. तिच्यावर अपरिपक्व वयात झालेल्या लैंगिक अत्याचाराचा इतका दूरगामी परिणाम झाला की तिच्या शरीराची ती गरज बनली, जी वेळीच वैद्यकीय आणि मानसिक उपचार न घेतल्याने शोकांतिकेत बदलली. या लेखाचा उद्देश मधूच्या माध्यमातून काही गोष्टींवर प्रकाश टाकणे हा होता. मुख्य म्हणजे आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची अपरिपक्व वयात जाणीव नसल्याने, तेच प्रेम वाटल्याने ती वाहवत गेली. आणि अशा वेळी आई-वडिलांचा भरभक्कम आधार न मिळाल्याने तिची शोकांतिका झाली. नवरा म्हणून जो जोडीदार तिने निवडला, तोही तिच्या भावना समजून न घेणारा निघाला आणि तिचं दु:ख अधिकच टोकदार झालं. आपल्या जवळच्या व्यक्तीची साथ आयुष्यात किती महत्त्वाची असते हेच या गोष्टीतून व्यक्त होतं. जे आता हरवत चाललं आहे.
हा लेख प्रसिद्ध करताना केवळ मधूची कहाणी सांगावी एवढाच उद्देश नव्हता. समाजातल्या अशा प्रकारचा अन्याय सहन करणाऱ्या लोकांना काही मदत मिळावी यासाठी आम्ही डॉ. हरीश शेट्टी आणि  अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर यांचे ईमेल आणि दूरध्वनी क्रमांक दिले. त्याचा असा फायदा झाला की लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी आपल्या दु:खाला वाचा फोडली. डॉ. शेट्टींच्या मते सावधानता आणि वेळीच उपाय हाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, तर   अ‍ॅड. कद्रेकरांच्या मते अन्यायाला वाचा फोडणे हाच पुढच्या अत्याचाराला रोखण्याचा मार्ग आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर या दोघांनाही आलेल्या प्रतिसादावर एक एक लेख द्यायला सांगितला होता. तो या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. दोघांच्याही मते, लैंगिक अत्याचार, बलात्कारासारख्या घटना घडू नये म्हणून पालकांनी आणि मुलांनीही सावध राहायला हवे. पालक-शिक्षक-मुलं यांच्यात मोकळा संवाद व्हायला हवा. चर्चा व्हायला हव्यात. या दोन्ही तज्ज्ञांना लैंगिक अत्याचाराच्याच नव्हे तर इतरही अनेक विषयांवर मार्गदर्शन विचारणारे ईमेल आणि दूरध्वनी आले. आणि लोकांना कोणकोणत्या दु:खाला सामोरं जावं लागतंय याचा परिचय झाला. या मार्गदर्शनातून काही जण जरी त्यांच्या दु:खातून बाहेर पडले असतील तरी या सगळ्या परिश्रमाचं चीज झालं असं म्हणता येईल.
मधूच्या कहाणीतून आणि आता डॉ. शेट्टी आणि अ‍ॅड. कद्रेकर यांच्या लेखातून एक गोष्ट ठळकपणे सामोरी येते ती म्हणजे, बोलायला माणूस नसणं. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या जगात, सतत लेखी संवादाच्या रूपात एकमेकांशी ‘जोडली’ गेलेली ही पिढी खरंच एकमेकांसाठी वेळ देऊ शकतेय का? एखाद्याचं दु:ख ऐकायला, समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायला कुणाकडे वेळ आहे का? घरातलाच संवाद जिथे हरवला आहे तिथे बाहेच्या स्पर्धात्मक जगात तो टिकेल याची शाश्वती राहिली आहे का? घरात माणसं असूनही घरातले वयोवृद्धच नव्हे तर इतरही एकांतवासाची शिक्षा भोगत आहेत. अशा वेळी आयुष्यातल्या दु:खद घटना कोणाकडे आणि कशा बोलणार? म्हणूनच आत्ताच सावध व्हायला हवं, आभासी जगात, तात्पुरत्या आनंदात रमण्यापेक्षा आपल्या माणसात राहण्याचा, त्याच्यातल्या चांगल्या-वाईट स्वभावासह त्यांना मनापासून  स्वीकारण्याचा आणि आपल्याला स्वीकारू देण्याचा मोठेपणा आणायला हवा. जितकी माणसं आपण प्रेमाने जवळ करू तितकं आपलं आयुष्य समृद्ध, संपन्न, आनंदी असणार आहे.
आणखी काय हवं माणसाला?