06 July 2020

News Flash

मी शाळा बोलतेय! : आमचा अभ्यास आम्हीच ठरविणार

मुलं चक्रावली आणि मनोमन सुखावलीही. वर्षांनुवर्षे दळण घातल्यासारख्या अभ्यासाचं स्वरूप बदललं. नि वर्गात जेवढी डोकी तेवढी विविधता त्यात आली. कॉपी उतरवून काढणं हा भाग कमी

| June 21, 2014 01:01 am

मुलं चक्रावली आणि मनोमन सुखावलीही. वर्षांनुवर्षे दळण घातल्यासारख्या अभ्यासाचं स्वरूप बदललं. नि वर्गात जेवढी डोकी तेवढी विविधता त्यात आली. कॉपी उतरवून काढणं हा भाग कमी होऊ लागला. आणि मुलं म्हणू लागली, ‘आम्हीच ठरवितो आमचा अभ्यास.’
ही एका गमतीशीर अभ्यास रचनेची गोष्ट आहे. अभ्यास आणि गमतीशीर? कसं शक्य आहे? अभ्यास म्हणजे गाइड घ्यायचं आणि उतरवून काढायचं.. या शाळेत मात्र अभ्यास शब्दाचा अर्थच बदलला. त्याचीच ही गोष्ट..
मोठय़ा माणसांची कमालच असते म्हणजे घरी असताना घरची मोठी माणसं पहिला प्रश्न विचारतात, शाळेत अभ्यास काय दिलाय?’ आणि शाळेत गेल्यावर तिथली मोठी माणसं विचारतात, ‘घरी दिलेला अभ्यास झाला का? कालचा अभ्यास कुणी कुणी केला नाही?’ काय छळ आहे हा! म्हणूनच एकदा का दिलेला अभ्यास खरडून टाकला की, मुलं हुश्श करतात. पण या शाळेत आजही असंही घडलं..
वर्गावर्गातून शिक्षक मुलांना एकच प्रश्न विचारीत होते, ‘अभ्यास कुणी कुणी आणला नाही?’ अभ्यास ही काय वस्तू आहे आणायला? शाळेची पहिली काही मिनिटे याच चौकशीत संपतात. अभ्यास न केलेल्या मुलांना वर्गाबाहेर काढलं होतं. काहींना वर्गात उभं केलं होतं. काही जण मैदानात फेऱ्या मारीत होती. असं कुणाकुणाच्या बाबतीत प्रत्येक तासाला घडतच होतं.
हे सारं शाळा पाहत होती..
तिला वाईट वाटत होतं. मुलांना बाकी सारं करायला आवडतं नि अभ्यासच फक्त का आवडत नाही? ‘बाकी सगळ्यात हुशार आहे. फक्त अभ्यास करायला आवडत नाही’ यासारखे शेरे सर्वच मोठी माणसं मारतात. यात बदल व्हायला हवा. नक्की काय घडतंय याचा शोध लावलाच पाहिजे. अभ्यास देण्यात काही मुलांना न आवडणारं घडतंय की काय? मुलांशी मोकळेपणानं बोललंच पाहिजे.
शाळा गप्प गप्प व्हायची तेव्हा ती नक्कीच कसल्या तरी विचारात असते, हे मुलांनाच माहीत होतं. ‘का गप्प आहेस? आम्हाला शिक्षा झाली म्हणून? आम्ही अभ्यास केला नाही म्हणून?’ मुलांनी विचारलं.
‘का अभ्यास करावासा वाटत नाही तुम्हाला? कारणं सांगा मला..’ शाळेने विचारलं आणि मुलांनी धडाधड कारणं सांगायला सुरुवात केली. ‘शाळेत तेच लिहायचं. घरी तेच ते लिहायचं, कंटाळा येतो. आमच्या मनासारखं लिहायलाच मिळत नाही. अभ्यास कसा करायचा समजत नाही. शिकविलेलं समजत नाही तेव्हा अभ्यास पूर्ण होत नाही. अभ्यास म्हणजे फक्त लिखाणच का? अभ्यास म्हणजे धडय़ातलं उतरवून काढणं असतं का, सर फक्त विचारतात, अभ्यास झाला का?’
शाळा मुलांना म्हणाली, ‘यात मार्ग तर शोधलाच पाहिजे. प्रश्न तुम्ही निर्माण केलेत, उत्तरं तुम्ही शोधली पाहिजेत. तुमच्या शिक्षकांशी बोललं पाहिजे.’
मुलं म्हणाली, ‘भीती वाटते. वेळच नसतो. ते ओरडले तर!’
शाळेत नवल वाटलं. प्रत्येक मूल स्वतंत्रपणे विचार करते, कारण ती एक स्वतंत्र स्वत:चं मत असणारी व्यक्ती म्हणून आता घडू लागते. मुलांना काही कल्पना देणं भाग होतं. खरं तर शाळेलाच सुचत नव्हतं. काय सांगावं ते. तरी ती म्हणाली, ‘शिक्षा होण्यापेक्षा तुम्हीच ठरवा तुम्ही कोणता अभ्यास करायचं ते. तुम्हाला अभ्यास कसा हवाय ते. खरं तर दोस्तांनो, तुम्ही समजता तेवढाच अभ्यास शब्दाचा अर्थ नाही. मुख्य म्हणजे अभ्यासाचा मूळ पाया आहे स्वत: विचार करणं आणि विचार मांडणं.. ते जाऊ दे. फार अवघड वाटतंय!’ शाळा म्हणाली.
‘नाही गं! गंमतच आहे ही पण. काय अवघड वाटतं नि काय सोपं हे पण मोठय़ांनीच ठरवायचं? ए! ए शाळा, ठरवू आम्ही आमचा अभ्यास, पण तू जशी आमच्याशी बोलतेस तशी आमच्या सरांशी पण बोल.’
‘काय बोलू?’
‘सांग, मुलांना करावासा वाटेल असा अभ्यास द्या.’
‘चालेल. बोलेन मी. जशी मी तुमच्याशी गप्पा मारते तशी त्यांच्याशीपण बोलते. तुमच्याइतकंच माझं त्यांच्यावरही प्रेम आहेच आणि तुमच्याशी जेव्हा ते कठोर वागतात तेव्हा त्यांना पण ते आवडत नाहीच..’
शाळेबरोबर मुलांच्या गप्पा बराच वेळ रंगल्या. मूळ विषय महत्त्वाचा होता तो म्हणजे मनोरंजक अभ्यास. असा अभ्यास हवा की, मुलांना वाटेल कधी एकदा आपण अभ्यासाला भेटतोय- भिडतोय. शाळा विचार करीत होती. मुलं आपापल्या घरी जायला निघाली. कुणाच्या मनात काय काय सुरू होतं कसं कळणार? शिक्षकही घरी गेले. शाळा अशी एकटी असली की, तिच्या मनात अनेक विचार यायचे. अनेक नव्या नव्या विचारात ती दंग होऊन जाई. सकाळी शाळेच्या घंटेनेच शाळा जागी होई.
आजचा दिवस वेगळा उजाडला. कारण कुणीच खर्डेघाशी अभ्यास सांगितला नाही. नेहमीच्या सरावाने मुलांनी आपापल्या शिक्षकांना विचारलं सर, ‘आजचा अभ्यास काय? प्रश्नोत्तरे लिहू धडय़ाखालची?’ शिक्षकांनी हसून नकार दिला. मुलं चाटच पडली, पण शिक्षक एकत्र बसले तेव्हा विचार झाला की रोज सर्व विषयांचा तोच तो लेखी धडय़ांखालचा अभ्यास करून आणायला सांगायला नको.
एक शिक्षक सातवीच्या वर्गात आले. म्हणाले, ‘तुम्हीच एक उदाहरण संग्रह तयार करून आणायचा. कोणत्या प्रकारची गणितं त्यात असतील हे पण तुम्हीच ठरवायचं. म्हणजे तुम्ही जितकी मुलं तेवढे उदाहरण संग्रह तयार होतील.’
‘आम्हीच गणिताचं पुस्तक तयार करू सर, हो ना?..’
एरवी खरमरीत शब्दांत सरांचे शब्द कानावर पडायचे. ‘सगळ्यांनी आठवा उदाहरण संग्रह सोडवून आणा. नाहीतर शिक्षा होईल. मी अभ्यास तपासणार आहे.’ आज हे काही तरी वेगळंच. इथून पुढे अभ्यासाच्या बाबतीत त्या शाळेत वेगळंच घडलं. जे सुचेल ते शिक्षकांनी दैनंदिनीत नोंदवून ठेवलं. लक्षात आलं शिक्षकांच्या की आपण एकदा वेगळा विचार करायला लागलो की, खूप काही सुचत जातं.
मराठीच्या सरांनी नेहमीचे प्रश्न न सांगता (प्रश्नोत्तरे, रिकाम्या जागा, व्याकरण, पाठांतर) तुम्हाला आवडणारी कविता, कथा तुम्ही निवडायची..’
‘कुठून?’
‘लायब्ररीत जायचं किंवा पुस्तक पेटीतलं पुस्तक घ्यायचं.’ किंवा एका मुलानं विचारलं, ‘सर, माझी आजी रानातली गाणी म्हणते. ते चालेल?’
‘हो. का नाही चालणार! ती पण कविताच- तुम्ही प्रश्न काढा. अर्थ लिहा. अर्थाचं चित्र काढा. चाल लावा. संवाद लिहा. कोणत्याही स्वरूपात चालेल.’ खरंच मुलांच्यात उत्साहाचे वारे वाहू लागले. मुलं अभ्यासात दंग झाली. आकलन महत्त्वाचं, जाणिवा विस्तारणं महत्त्वाचं. स्वत: स्वत:च्या भाषेत व्यक्त होणं महत्त्वाचं. हे सारं या अशा वेगळ्या अभ्यासातून साकार होणार होतं.
मुलं चक्रावली आणि मनोमन सुखावलीही. वर्षांनुर्वष दळण घातल्यासारख्या अभ्यासाचं स्वरूप बदललं. नि वर्गात जेवढी डोकी तेवढी विविधता त्यात आली. कॉपी उतरवून काढणं हा भाग कमी होऊ लागला. आता बॅटिंग मुलांकडे होती. विचार प्रक्रिया घडणार होती. हिंदीचे गुरुजी वर्गात आले नि म्हणाले, ‘भारत मेरा देश है और मुझे अपने देश से प्यार है।’ या ओळीतल्या प्रत्येक शब्दावर एक हिंदी गाण्याची ओळ लिहायची.
‘म्हणजे सिनेमातली गाणी? सर.. चालतील?’ नक्की काय सरांना म्हणायचंय किंवा सर आपली चेष्टा करीत नाहीत ना? असा संशय मुलांना आला. हा अभ्यास मनोरंजकपण होता नि नेहमीपेक्षा वेगळा होता. इंग्रजीच्या बाईंनी ७ वीच्या वर्गात शब्दांची ट्रेन करायला सांगितली. मुलांचे गट पाडून नववीच्या मुलांना समाजसुधारक आणि आजच्या काळात समाजसुधारणा या विषयावर ‘घार हिंडते आकाशी’ पाठाशी निगडित गटचर्चा घडवून आणण्याचे काम दिले. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी चित्रपट दाखवून त्यावर चर्चा होणार होती.
अभ्यास बदलला. स्वरूप बदलले. काही दिवसांनी मुलांनीच आपल्या अभ्यासाची रचना ठरवली. ‘वह्य़ा भरून टाकणं’ हा भाग कमी झाला. तयार झालेलं साहित्य एवढय़ा प्रकारचं होतं की, त्याचीच एक प्रदर्शनी झाली. वेगवेगळ्या वस्तू बनविणं, त्याचं मोजमाप, आर्थिक गणित, अनुभव मांडणी यातून कल्पकता, गणित भाषा अशी क्षेत्रं स्पर्शिली गेली. अभ्यासातला कंटाळवाणेपणा कमी झाला. या सगळ्या गोष्टी घडायला वेळ लागला पण हळूहळू घडू लागलं हे सारं! या शाळेतली मुलं आजही म्हणतात, ‘आम्हीच ठरवितो आमचा अभ्यास.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 1:01 am

Web Title: we will decide our study habits
टॅग Kids,Parents,Study
Next Stories
1 निसर्गाप्रति कृतज्ञता
2 निराधार वृद्धांची यशोदा
3 परमानंद प्राप्ती
Just Now!
X