घरावर केवढी मोठी जबाबदारी असते. घरी आलं की छान वाटलं पाहिजे. स्वस्थ, शांत वाटलं पाहिजे. दडपणं उडून गेली पाहिजेत. ते कशानं घडतं? आई- वडिलांच्या डोळ्यांत दाटून आलेल्या प्रेमानं, त्यांच्या स्पर्शातून, मुलांसाठी सतत धडपडत राहणाऱ्या त्यांच्या स्वभावातून.
केवळ घरानेच द्याव्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात. मुलं ज्या घरात वाढतात तिथे त्यांना प्रेम आणि शांती या दोन गोष्टींचा अनुभव यायला हवा. तुम्ही म्हणाल पालकांचं मुलांवर प्रेम नसतं की काय? असतं तर! पण ते आपल्याच मनात खोलवर तळाशी नुसतं असलेलं चालत नाही. ते मुलांपर्यंत पोचावं लागतं. आपल्या बोलण्यातून, त्यांच्यासाठी काही खास करण्यातून, आपल्या स्पर्शातून, आपल्या चेहऱ्यावर जे दिसतं, आपण इतरांशी मुलाबद्दल काय बोलतो त्यातून आपलं प्रेम व्यक्त होत असतं.
पालकांना कधी म्हटलं की आपल्या मुलाचे गुण-दोष सांगा तर एक- दोन गुण जेमतेम सांगतात आणि दोष मात्र सविस्तर सांगतात. मुलांना असं आवडतं असं त्यांना वाटतं की काय? दोषांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर मुलं बिघडतील असं पालकांना वाटतं. मुलं बिघडतील या भीतीपायी त्यांच्यावर अकारण किती बंधनं लादायची?
मुलं कशानं बिघडतात? शिस्त लावली नाही म्हणून की प्रेम मिळालं नाही म्हणून? यावरचं संशोधन असं सांगतं की प्रेम मिळालं नाही म्हणून मुलं बिघडतात. सुरुवातीला काही काळ तरी आई- वडील हेच मुलांचं जग असतं. त्यांच्यावर ती अवलंबून असतात. उठल्यावर काही काळ चिकटून बिलगून बसण्यासाठी आई- बाबाच लागतात. दात घासायला आई, दूध पाजायला आई, खेळायला आईच, जेवण- अंघोळ- बाहेर जाणं, झोपणं सगळ्याला आई लागते किंवा बाबा लागतो.
आई- वडिलांच्या स्पर्शाचं लहान मुलांच्या लहानपणाच्या काळात फार महत्त्व असतं. हा स्पर्श जेवढा जास्त मिळेल तेवढी मुलांच्या वाढीला मदत होईल. काही आदिवासी जमातीत तान्ह्य़ा बाळाला सुरुवातीचे महिना-दोन महिने तरी आई स्वत:च्या उराशी चिकटून, बांधून ठेवते. मूल आईच्या हृदयाचे ठोके ऐकत झोपून जातं. पोटात असताना तोच आवाज ते ऐकत असतं, त्यामुळे त्याला स्वस्थ वाटतं. मोठेपणीदेखील वयस्कर आईनं पाठीवर हात ठेवला तरी छान वाटतं. प्रत्येक वयात आपलं प्रेम मुलांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते बोलून, चौकशी करून, कधी त्यांच्याबरोबर एखाद्या ठिकाणी जाऊन, आजारपणी शुश्रूषा करून, कधी त्यांना हवी ती वस्तू देऊन, कधी गप्पा मारून.. आपल्या घराचा आधार त्यांना वाटायला हवा.
माझा मुलगा पंचवीस वर्षांचा होता तेव्हा त्याला मी एकदा निवांत असताना विचारलं, ‘‘तुझी वाढ कुठे झाली रे? घरात की घराबाहेर?’’ तो विचार करू लागला. ताबडतोब उत्तर द्यायची त्याची पद्धत नव्हती. माझ्या मनात मात्र असं होतं की मी चांगली आई आहे. तो म्हणेल, ‘‘ माझी घरातच वाढ झाली.’’ पण त्याने माझा भ्रमनिरास केला. तो हसून म्हणाला, ‘‘ कुठल्याही मुलाला पंचवीस र्वष घरात ठेवून बघ ना त्याची वाढ होते का! वाढ होण्यासाठी बाहेरच जावं लागतं. अनुभव घ्यावे लागतात. समज मी एक झाड आहे आणि बाहेरच्या वातावरणात मी छान वाढलो आहे. पण जेव्हा मला फुलं यायची असतात, त्या बहरासाठी माझी मुळं घराकडेच वळतात. ते रसायन घरातच मिळतं.’’ तो वनस्पती सृष्टीचा संशोधक त्यामुळे त्यानं उपमाही त्याच सृष्टीची दिली. मी त्याला म्हटलं, ‘‘ फुलं, बहर म्हणजे आनंद. मुलांना आनंदासाठी घरी यावंसं वाटतं हे छान सांगितलंस.’’
बापरे! घरावर केवढी मोठी जबाबदारी टाकली या मुलानं! घरी आलं की छान वाटलं पाहिजे. स्वस्थ, शांत वाटलं पाहिजे. दडपणं उडून गेली पाहिजेत. ते कशानं घडतं? आई- वडिलांच्या डोळ्यांत दाटून आलेल्या प्रेमानं, त्यांच्या स्पर्शातून, मुलांसाठी धडपडत राहणाऱ्या त्यांच्या स्वभावातून. बहिणाबाईनं म्हटलं आहे जोग्याला उत्तर देताना, ‘‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.’’         
आपली लेक माहेरी आली की तिला आधार मिळावा, तिला आनंद वाटावा, मोकळं वाटावं म्हणून सासरचा त्रास सोसूनही आई सासरी नांदत असते. घरं जपायची ती यासाठी. हल्ली मुली माहेरपणाला येतात तशी मुलंही येतात. नेहमी धावपळीत असणारी मुलं आज घरी येतात तेव्हा मुलगी म्हणते, ‘‘तुझ्याकडे आलं की मला भूकच लागते.’’ तिच्या घरी बिचारी कायम मुलाबाळांत गुंतलेली असते, कामात बुडालेली असते, तिला स्वत:च्या भुकेकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. मुलगा असा बोलणारा नाही पण मी ऑक्सफर्डला त्यांच्याकडे गेले की त्याला पोह्य़ांपासून मोदकांपर्यंत सगळे पदार्थ करून घालते. त्याची बायको ग्रीक आहे. तिला हे पदार्थ येत नाहीत. तीही आनंदानं चवी घेते. मुलगा पहिला घास तोंडात गेला की ‘छान!’ असं म्हणतो. त्याच्या एका शब्दावरून पुढचे नव्याण्णव आपण समजून घ्यायचे.
घरात भांडणं नाहीत. नवरा-बायकोचं प्रेमाचं, समजूतदारपणाचं नातं असलं तर घरात शांती नांदते. भांडणं, मारामाऱ्या, मतभेद, अपेक्षा, रुसवे-फुगवे-अबोले, तणतणाट असले तर शांती पळून जाते. शांतीच्या वातावरणात मुलं प्रसन्नपणे वाढतात, शिकतात, त्यांना त्यांचा मोकळा अवकाश मिळतो.
घरात प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. मग ते लहान मूल असो किंवा मोठे आजोबा, आजी असोत. माणसाला नुसतं खाणं-पिणं थोडंच हवं असतं? त्याच्याबरोबर ‘आम्हाला तुम्ही आवडता, तुमचं काही काम करायला आम्हाला आनंद वाटतो, तुम्ही काही काळजी करू नका, शांत राहा, आम्ही आहोत ना! हा विश्वासही हवा असतो. असा विश्वास सर्वाना देतं ते घर.
संवाद हे घराचं वैशिष्टय़ आहे. घरातली सगळी माणसं एकमेकांशी मोकळेपणानं बोलतात, विचार व्यक्त करतात, धुमसत राहात नाहीत असं घडायला हवं. पूर्वी आया मुलांना सांगत, ‘‘वाईट बोलू नका, वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो.’’ घरात कोणी अपशब्द उच्चारू नयेत, कोणी मेलं असं म्हणू नये म्हणून हे बंधन असे. आपण घरासाठी काही केलं तर घरही आपली काळजी घेतं. घर आपल्याला स्वस्थपणा देतं, त्यामुळेच बाहेरच्या प्रवासातून घरी आलं, आपल्या घरचं पाणी प्यायलं, आपल्या पद्धतीचा चहा घेतला, आपल्या पद्धतीने आवरून ठेवलं की प्रसन्न वाटतं. मुलांना घरात मनापासून काम करण्याची शिकवण मिळायला हवी. घरातली कामं सर्वानी आनंदाने वाटून घेतली तर एका माणसावर ताण पडत नाही. आमच्या एका जवळच्या मत्रिणीकडे अशी पद्धत होती की रोज सकाळी उठल्याबरोबर एक मुलगी स्वयंपाकात मदत करते, आई स्वयंपाक करत असते, बाबा भाजी चिरून देतात आणि मोठी मुलगी एखादं पुस्तक मोठय़ानं वाचून दाखवते. हे घराचं चित्र सुंदर नाही का? कामं सांगायची, मग इतरांनी ती टाळायची, कटकट करायची, त्यावरून पंचाईत व्हायची त्यापेक्षा समजुतीनं घ्यावं. मनापासून कामं करावीत.
घरात निरपेक्षतेचे धडे मुलं शिकली तर जातील तिथे आनंदानं राहतील. कारण कुणाकडून अपेक्षा करू नयेत. कुणावरही अवलंबून राहू नये. याचा अर्थ सर्वापासून दूर राहा असा नाही. पण निरपेक्षपणे कुणासाठी काही केलं तर त्यानं समाधान मिळतं.
घरानेच मुलांना मूल्यं शिकवायची असतात. कसं वागावं, कसं वागू नये, काय चांगलं, काय वाईट, कशाच्या आधाराने निर्णय घ्यायचे हे शिकवणं म्हणजे मूल्य शिकवणं. मूल्य चांगली समजली की ती आपल्याला पाळत बसावी लागत नाहीत. मूल्यंच आपलं संरक्षण करतात.
मुलांना पंख देणं हेही घराचं कर्तव्य! पंख म्हणजे कायम भरारी घेण्याची शक्ती, इच्छा, तयारी, क्षमता. अलीकडे लहानपणीच मुलं ‘बोअर’ व्हायला लागलीत. त्यांनी बोअर होऊ नये म्हणून त्यांना एकीकडे शांती अनुभवायला द्यायला हवी, तसंच त्यांना जे आतून हे करू का, ते करू असं वाटत असतं त्याला भरपूर वाव हवा. हातांनी सतत त्यांनी काहीतरी करावं आणि अनेक गोष्टी शिकाव्यात. व्यायाम- खेळ- चित्रकला- हस्तकला- गोष्टी- गाणी- वेगळी भाषा- नृत्य- नाटक- वाचन- सहली- पक्षीनिरीक्षण- डोंगरभ्रमंती- वाद्यवादन कितीतरी शिकता येतं. पण हे सगळं वाघ मागे लागल्यासारखं नाही तर शांतपणे करायचं. घर छान करायला खूप पसे लागतात का? नाही. दुसऱ्याचा आनंद कळण्याइतकी मनं संवेदनक्षम असावी लागतात, मग झोपडीतही स्वर्ग अवतरतो.
झोपडीवरून आठवलं, एक जगप्रसिद्ध चित्रकार होता. त्याची एकदा टी.व्ही.वर मुलाखत चालू होती. त्याला प्रश्न विचारला, ‘‘तुम्हाला लहानपणापासून खूप पेनं, पेन्सिली, खडू, रंग, कागद दिले असतील ना पालकांनी?’’ तो म्हणाला, ‘‘नाही. माझे वडील मी फार लहान असताना वारले. आई मजुरी करायची. आम्ही एका झोपडीत राहायचो. ती रोज सकाळी कामाला जाताना सगळं घर सारवून जायची आणि मग मी कोळशाचा तुकडा घेऊन घरभर चित्रं काढत बसायचो. संध्याकाळी आली की हसून म्हणायची, ‘काढली का चित्रं?’ मग मला परत उत्साह यायचा चित्र काढण्याचा.’’ असा हा चित्रकार घडला. कारण त्याच्या आईला आपल्या मुलाचा आनंद कशात आहे हे कळलं. तिनं त्याला चित्रं काढायला अवकाश मिळवून दिला.
झोपडीतूनही जगप्रसिद्ध कलाकार तयार होतात, तर इतर घरंही मुलांना काय काय देऊ शकतील नाही का? मुलं आई-वडिलांकडून घरात पुढील पाच वाक्यं ऐकायला उत्सुक असतात.
* तू मला आवडतेस-आवडतोस,
 * माझा तुझ्यावरच विश्वास आहे,
* हे तू छान केलंस हं!,
* तुझं मत मला सांग.  
*माझं चुकलं बरं का! याचे बरेच अर्थ आहेत. ते पुढच्या लेखात (२८ फेब्रुवारी) वाचूया.
शोभा भागवत –  shobhabhagwat@gmail.com