29 November 2020

News Flash

जीवन विज्ञान : कर्करोग होतो म्हणजे..

कर्क रोग होतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊ या.

कर्क रोग १०० टक्के टाळता येईल का, हे अज्ञात असलं तरी आहारविहार आणि प्रतिकारशक्ती उत्तम राखणं हे आपण नक्कीच करू शकतो.

डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

कर्करोग कशामुळे होतो हे अजून नेमके पणानं माहीत नाही. परंतु आनुवंशिकता, प्रकृती, सवयी, आहारविहार, आजूबाजूचं वातावरण अशा विविध कारणांमुळे आणि त्यांच्या एकमेकांवरील परिणामांमुळे कर्क रोग होऊ शकतो. त्यामुळे कर्क रोग १०० टक्के टाळता येईल का, हे अज्ञात असलं तरी आहारविहार आणि प्रतिकारशक्ती उत्तम राखणं हे आपण नक्कीच करू शकतो. हा आजार झाल्यावरही एकदम घाबरून न जाता त्याविषयी जाणून घेऊन हिमतीनं त्याचा सामना करायला हवा. कर्क रोग होतो म्हणजे काय होतं, हे समजून घेऊ या.

कर्करोग हा शब्द ऐकल्यावर अनेकांना खरोखरीच एखादा खेकडा अंगावर चढल्याप्रमाणे घाबरायला होतं. हा रोग शरीरात कोणत्याही अवयवाला होऊ शकतो. हाडाचा आणि रक्ताचा कर्करोगदेखील असतो. ‘ग्रोथ हार्मोन्स’च्या मदतीनं नवीन पेशी बनतात. जुन्या पेशींना  नैसर्गिक मरण येतं (अ‍ॅपोपटॉसिस). निरोगी शरीरात पेशीवाढीचा आणि पेशी मरण्याच्या प्रमाणाचा तोल सांभाळला जातो. हे नियंत्रण काही कारणानं बिघडलं तर पेशी एखाद्या ठिकाणी अर्निबध वाढून गाठ येते. जुन्या पेशी मरत नाहीत आणि नवीन पेशी शरीराची शिस्त पाळणं सोडून देतात आणि माणूस कर्क रोगग्रस्त होतो.

‘लुकेमिया’मध्ये (रक्ताचा कर्करोग) अशी गाठ अथवा मांसाची वाढ (टय़ूमर) नसते. निरोगी शरीरात रक्तातील  ‘टी सेल्स’ (‘थायमस पेशी’- ‘डब्ल्यूबीसी’) आणि ‘बी सेल्स’ (‘बोन मॅरो- अस्थिमज्जेतील डब्ल्यूबीसी’) प्रतिपिंड तयार करून रोगजंतूंप्रमाणे कर्क रोगाच्या पेशींना

(कॅ न्सर सेल्स) मारतात. परंतु कॅन्सर सेल्स प्रमाणाबाहेर वाढू लागल्या तर मात्र ‘टी’ आणि ‘बी’ पेशींचा पराभव होतो. भारतात रोज काही हजार लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. गेली कित्येक र्वष जगभर या विषयावर संशोधन चालू आहे. कर्करोग का होतो आणि झाल्यास तो बरा होण्यासाठी काय उपाय करावा, अशा दोन्ही बाजूंवर संशोधन चालू आहे. रोग होण्याची कारणं कळली तर तो होऊ नये म्हणून थोडेफार प्रयत्न करता येतील. पण ही कारणं शोधणं सोपं नाही. या रोगाचे जंतू नसतात आणि हा शरीरात कु ठेही होऊ शकतो. त्यामुळे कारणांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबलचक असणार. कर्क रोगावर बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ हे दोन उपाय के ले जातात. पण दोन्ही वेदनाकारक- अनेकदा रुग्णाला मरणयातना भोगायला भाग पडणारे ठरू शकतात. ‘सुक्याबरोबर ओलं जळतं’ तसं कर्करोगाच्या पेशींबरोबर इतर चांगल्या पेशीदेखील मरत असल्यामुळे पचनशक्तीचा नाश होऊन वजन झपाटय़ानं कमी होते. अंगात ताकद यायला चांगलं पोषक अन्न खाल्लं पाहिजे आणि ते पचून अंगी लागलं पाहिजे. अशा वेळी घरातील सगळ्यांचंच आयुष्य अवघड होतं.

रक्ताच्या कर्करोगामध्ये रक्त आणि अस्थिमज्जा यांवर दुष्परिणाम होतो. श्वेतपेशी निर्मितीप्रक्रियेत बिघाड होतो. परंतु प्रतिकारशक्तीसाठी काम करणाऱ्या काही पेशी कर्करोगाच्या पेशींना ओळखून मारून टाकतात. म्हणून प्रतिकारशक्तीवर आधारित ‘इम्युनो थेरपी’ काही विशिष्ट कर्करोगावर उपाय म्हणून वापरतात. पण दुर्दैवानं कर्करोगामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि कर्करोगावरील उपचारामुळेदेखील रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते. बऱ्याच वेळा ‘अँटी कॅन्सर ड्रग’ ही विशिष्ट प्रतिपिंडाला जोडून (टॅग- याला ‘एमएबीएस’ म्हणतात) रुग्णाच्या शरीरामध्ये सोडतात- ज्यामुळे ते औषध फक्त कर्करोगाच्या पेशींना मारतं आणि इतर निरोगी पेशींवर होणारा विषारी परिणाम टाळता येतो. आधुनिक संशोधन असं सांगतं, की कर्करोग होण्याची कारणं अनेक असून त्यांचे एकमेकांवरील परिणाम काय असतील यावर हा रोग होतो किंवा होत नाही असं दिसून आलं आहे. उदाहरणार्थ- तंबाखूमुळे (तंबाखू खाणे अथवा सिगारेट ओढणे) अनुक्रमे तोंडाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग होतो हे सिद्ध झालं असलं, तरी तुमच्या माहितीत अशी काही माणसं असू शकतील ज्यांना तंबाखू खाऊन अथवा सिगारेट ओढूनदेखील कर्करोग झालेला नाही. वैज्ञानिक असं मानतात, की आनुवंशिक कारणं, वातावरण आणि शारीरिक ठेवण यांच्या एकत्रित परिणामामुळे कर्करोग होतो. आनुवंशिक कारणांमध्ये काही गुणसूत्र दोष असे असतात, ज्यांमुळे प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या ‘टी’ आणि ‘बी’ पेशी अयोग्य प्रकारच्या बनतात- ज्या स्वत: कर्करोगाच्या पेशी होतात. तसंच लहान मुलांमध्ये आढळणारे कर्करोग काही वेळा आनुवंशिक असतात. वातावरणाचा परिणाम म्हणजे कर्करोगकारक (कार्सिनोजेनिक) रसायनं शरीरात जाणं. उदा. ‘डीडीटी’ आणि इतर ‘पेस्टीसाइड’युक्त (कीटकनाशकयुक्त) अन्नाचं दीर्घकाळ सेवन, प्रयोगशाळेत अथवा कारखान्यात ‘फॉरमाल्डिहाइड’चा वापर असल्यास अशा हवेत दीर्घकाळ श्वास घेणं. तसंच किरणोत्सर्ग होणं हाही वातावरणाचा परिणाम आहे आणि त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. ‘बीएआरसी’मध्ये (भाभा अ‍ॅटॉमिक रीसर्च सेंटर) काम करणारे लोक नेहमी छातीवर एक खास बिल्ला लावून काम करतात आणि शरीरावर चुकू न किरणोत्सर्ग तर झाला नाही ना हे पाहण्यासाठी तो बिल्ला तपासून तसं झालं असेल तर लगेच योग्य ते उपचार करतात. याचा अर्थ असा, की कर्करोग बरा करण्यासाठी (कर्क रोगाच्या पेशी मारण्यासाठी) रेडिएशन घेतल्यावर पुन्हा शरीरात दुसरीकडे कु ठेतरी किरणोत्सर्ग या कारणामुळे कर्करोग होऊ शकतो. या नव्या पेशी अधिक बलवान झाल्यामुळे जुन्या उपायांना दाद देत नाहीत आणि अशा स्थितीत रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. हे सगळं विचित्र आहे, नाही का?

लहान मुलांना होणारा कर्क रोग हा मूळ पेशींमध्ये (स्टेम सेल्स) अचानक बदल (म्युटेशन) होऊन सुरू होतो, तर मोठय़ा माणसांच्या कर्क रोगाची सुरवात ‘एपिथेलिअल पेशी’ म्हणजे त्वचा अथवा शरीरातील पोकळीमध्ये होते. आनुवंशिकता म्हणजे काय आणि चांगले-वाईट गुणावगुण आई-वडिलांकडून मुलांकडे कसे जातात? आपले आईवडील हेही त्यांच्या आई आणि वडिलांकडून जनुकं (जीन्स) आणि गुणविशेष घेत असल्यामुळे आपल्या शरीरात सात पिढय़ांतील किंवा त्याहूनही आधीच्या पिढीतील वाडवडिलांकडून आलेले गुण (ट्रेटस्) असू शकतात. या  कर्करोगाशी निगडित जनुकं कोणती ते बघू या.

आँकोजीन- या जनुकामुळे सगळ्या पेशींची साधारण आणि योग्य वाढ होते. ही जनुकं एखाद्या ‘ऑन-ऑफ’ बटनाप्रमाणे काम करतात. जसं एखादा विद्युत स्विच अचानक नादुरुस्त होऊन काम करेनासा होतो, त्याचं दर्शनी कारण काहीच नसतं तसंच काहीसं याही जनुकांचं असतं. पेशींच्या वाढ नियंत्रणाचं काम ती अचानक करू शकत नाहीत आणि पेशींची अनैसर्गिक आणि अर्निबध वाढ सुरू झाल्यामुळे कर्करोग होतो.

गाठीची वाढ थांबवणारी जनुकं कर्करोग टाळण्याचं काम करतात. यांना कर्करोगाच्या- म्हणजेच सदोष, बिघडलेल्या पेशी कोणत्या हे समजतं आणि ती अशा पेशींच्या वाढीला रोखतात. परंतु काही वेळा ही जनुकं बदल (म्युटेशन) झाल्यामुळे नीट काम करत नाहीत आणि कर्करोगाची गाठ वा पेशींचा मांसगोळा वाढू लागतो.

पेशीनिर्मितीमध्ये झालेलं विजोड काम ओळखून दुरुस्त करणारी जनुकंदेखील निसर्गानं आपल्याला बहाल केली आहेत. यांना ‘मिस मॅच रीपेअर जीन्स’ असं नाव आहे. नवीन पेशी बनवताना गुणसूत्रांच्या अनेक प्रती (कॉपी) बनतात. प्रत बनवताना काही चूक झाल्यास ही जनुकं त्यामध्ये दुरुस्ती करतात. हे दुरुस्तीचं काम थांबलं तर चुकीच्या आणि बिघडलेल्या पेशी निर्माण होऊन पुढे कर्करोग होऊ शकतो.

एखाद्याला कर्करोग झाला की ती व्यक्ती मुळापासून हादरून जाते. पुढे काय होईल, ‘केमो’ किंवा रेडिएशनच्या यातना, रुग्णाचे होणारे हाल, वेदना आणि कदाचित पुढे अकाली मृत्यू याचं भय वाटतं. मुख्य प्रश्न पडतो, की कर्करोगावरती उपचार चालू असताना रुग्णाला काय आहार द्यावा आणि नंतर शक्ती येण्यासाठी रुग्णानं काय खाल्लं पाहिजे? पेशीनिर्मितीमध्ये तसंच शरीर चांगलं राखण्यासाठी स्नायू बळकट हवेत आणि याकरिता प्रथिनांचा समावेश आहारात करणं आवश्यक आहे. परंतु बऱ्याचदा रुग्णाची पचनशक्ती कमी झालेली असते. तसंच प्रतिकारशक्ती दुर्बल झाल्यामुळे संसर्गाची (इन्फेक्शन) भीती असते. याशिवाय रुग्णाला मानसिक आधाराचीदेखील खूप गरज भासते. पुण्यामध्ये ‘संजीवनी- लाइफ बियॉन्ड कॅन्सर’ ही समाजसेवी संस्था गेली काही र्वष विनामूल्य काम करत आहे. त्याच्या संचालिका स्वत: कर्करोगमुक्त झाल्या असल्यामुळे रुग्णावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर काय प्रसंग ओढवतो याची त्यांना कल्पना आहे. त्यांच्या कार्यात आहार हा एक विषय आहे. मुख्य भर मानसिक संतुलन, परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता निर्माण करणं आणि गरजूंना आर्थिक मदत करणं यावर आहे. अशा इतरही अनेक संस्था आणि वैयक्तिक पातळीवर  काम करून कर्करुग्णांना आधार देणारे लोक आहेत.

काही जण म्हणतात, रुग्णानं रोज १२ तास उपवास करावा. कर्करोगाच्या पेशी भराभर वाढत असल्यामुळे त्यांना खूप आणि वारंवार खाणं लागतं. जर रुग्णानं सकाळी १२ वाजेपर्यंत फक्त फळं खाल्ली तर कर्करोग पेशी वाढण्यावर आळा बसेल असाही विचार आहे. अपुऱ्या आणि कुपोषित आहारामुळे रुग्णाचं आधीच कमी झालेलं वजन आणखी कमी होतं. भूक मरणं, उलटीची भावना होणं,हे खूप रुग्णांना होतं. तोंड, स्वरयंत्र, अन्ननलिका, आतडं अशा खाण्याशी निगडित अवयवाचा कर्क रोग झाला असल्यास, तसंच शस्त्रक्रियेमुळे खाण्याची पंचाइत होते. वासना मरते, गिळणं कठीण होतं, तोंडाला कोरड पडते, जिभेची चव जाते, असे अनेक अनुभव येतात. खाण्यापूर्वी नीट हात धुणं, कोणत्याही प्रकारे शरीरात रोगजंतूंचा शिरकाव होऊ नये म्हणून खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. कच्चं, बाहेरचं, तेलकट, तिखट, मसालेदार अन्न वज्र्य. सायीसकट दूध, दही, आईस्क्रीम खाणं- जे गिळणं सोपं, चवीला चांगलं, कमी खाऊन जास्त उष्मांक (कॅलरी) देणारं अन्न चांगलं. अंडी, चिकन असेही पदार्थ खावे. काही डॉक्टर दुधाचे पदार्थ खाऊ नका, असं सांगतात. सुकामेवा आणि नट्सची पूड घालून, काहीतरी धान्य- ज्यात प्रथिनं आहेत अशी (गहू, नाचणी, मुसेली) वापरून बनवलेली खीर अथवा पॉरिज करून खावं. बाजारामध्ये प्रथिनयुक्त, लो-ग्लायसेमिक, कोंडायुक्त, लॅक्टोजविरहित तयार पावडरी विविध स्वादांमध्ये मिळतात. त्या इतर खाण्यावर चटणी पुडीसारख्या वरून घालून अथवा दूध, दही, पाणी मिसळून घेता येतात. तसंच द्रवरूप ‘सप्लिमेंट्स’ आहेत. ती बहुतेक वेळा दुधामधून घेतात. याशिवाय जीवनसत्त्वं, खनिजं, यांचाही समावेश आहारात केला जातो.

बहुतेक सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ याविषयी योग्य सल्ला रुग्णाला आणि त्याच्या घरच्यांना देतात, आणि तो घ्यायला हवा. ताजं आणि सकस अन्न खावं. कर्करोगाच्या उपचारांमुळे प्रतिकारशक्ती कमी होत असल्यानं इन्फे क्शन होऊ नये याची खूप काळजी घेणं आवश्यक. थोडक्यात म्हणजे कर्करोग होऊ नये म्हणून आहारविहार सांभाळून आरोग्य राखायला हवं. तुमच्या आप्तस्वकीयांपैकी कु णाला हा आजार झाला असल्यास त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आशावादी विचार ठेवा.  कर्करोगातून बरे झालेल्याची संख्या वाढते आहे. त्या यशस्वी कथा डोळ्यांसमोर ठेवा. ‘या भयंकर आजाराच्या विळख्यात सापडलो, तरी मी सहीसलामत बाहेर येणार आणि निरोगी आयुष्य जगणार,’ हीच धारणा महत्त्वाची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 2:32 am

Web Title: what is cancer caused by jeevan vidnyan dd70
Next Stories
1 यत्र तत्र सर्वत्र : जैवविज्ञानाच्या विश्वातली क्रांती
2 व्वाऽऽ हेल्पलाइन : आम्ही असू पांगळे..
3 अपयशाला भिडताना : ओझं