07 December 2019

News Flash

बारा तासांच्या शाळा

‘शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात माहिती कोंबणं नव्हे, तर त्या मुलांमध्ये जे सुप्तगुण आहेत ते शोधणं, ते बाहेर येऊ देणं.’ हा शिरस्ता मानून शिक्षकांकडून मुलांना घडवण्याची

| November 8, 2014 04:05 am

ch11‘शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात माहिती कोंबणं नव्हे, तर त्या मुलांमध्ये जे सुप्तगुण आहेत ते शोधणं, ते बाहेर येऊ देणं.’ हा शिरस्ता मानून शिक्षकांकडून मुलांना घडवण्याची प्रक्रिया आकारू लागते तिथे शिक्षकही अध्यापनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकतात. हेच सूत्र मानून १२ तासांच्या शाळा सुरू झाल्या, गुरुकुल पद्धतीच्या. घरच्या घरी शाळा या पर्यायाप्रमाणे वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या पालक-विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा.‘घरच्या घरी शाळा’ ही संकल्पना अनेकांना आवडली. पण आवडणं वेगळं आणि पेलणं वेगळं. म्हणूनच वेगळी वाट चोखाळायची आहे अशांसाठी पर्याय बारा तासांच्या शाळेचा. पंचकोशधारी विकास म्हणजेच मुलांचा आहार-विहार, मनोमय कोष, प्राणमय कोष, विज्ञानमय कोष, आनंदमय कोष यांच्या विकासासाठी धडपडणारी शाळा. अभ्यासाचा खरा अर्थ उलगडून दाखवत स्वत:च अभ्यास करायचा असतो असं पटवून देणारी, विचार करायला लावणारी कल्पना, अभिव्यक्ती सर्जनशीलता, कृतिशीलता, प्रयोगशीलता यांना वाव देणारी. सामाजिक बांधीलकी, कृतज्ञता, मातृभूमीवरील प्रेम मुलांच्यात रुजवणारी, मराठी माध्यमाची परीक्षेसाठी एस.एस.सी. बोर्ड आणि अभ्यासासाठी सी.बी.एस.सी, एस.सी एस. सी. बोर्ड फॉलो करणारी. अनुदानित म्हणूनच किमान फी असणारी गुरुकुल १२ तासांची शाळा.
पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या अभ्यंकर यांची ही संकल्पना. अशी पहिली शाळा सुरू झाली निगडीला. आजमितीला अशा एकूण १२ शाळा आहेत. तत्त्व एकच, परिसरानुसार कार्यपद्धतीत थोडा बदल. या शाळा परस्परांच्या संपर्कात असतात. त्यांची एकत्र शिबिरे होतात. मुंबईतील अशी शाळा आहे वांद्रय़ाला शासकीय वसाहतीत, महात्मा गांधी विद्यालय. काही वर्षांपूर्वी होती इतर मराठी माध्यमांच्या शाळांसारखीच. पण इंजिनीअर बांधकाम व्यावसायिक मििलद चिंदरकर शाळेच्या व्यवस्थापनावर आले आणि शाळेनं कात टाकली. त्यांची मुलं एका नामवंत शाळेत शिकत होती, पण त्यांना काही वेगळं हवं होतं. मग ते, त्यांची पत्नी चिन्मयी यांनी या वेगळेपणाचा ध्यास घेतला. काही समविचारी पालकही भेटले. भेटी, चर्चा, अनुभव यातून निघालं नवनीत. आता सहा वर्षांनंतर शाळेची घडी बरीचशी बसली आहे. मात्र अजून खूप मजल गाठायची आहे, असं त्यांना वाटतं. इथला प्रत्येक विद्यार्थी ‘मास्टर ऑफ वन’ आहेच. स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, ‘होमी भाभा’सारख्या प्रत्येक स्पर्धापरीक्षेला तो बसतो. दहावीचा निकाल १०० टक्के लागतो. पहिला नंबर ९६ टक्के, कोणत्याही क्लासला न जाता, जागरण न करता. राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक स्पर्धेत भाग घेत. विजयी होत. अभ्यासाचं माध्यम मराठी, पण मुलं इंग्रजी, हिंदी, संस्कृत, पाली उत्तम वाचू, बोलू शकतात. मराठी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही इष्टापत्ती समजून शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी शाळेनं कंबर कसली. कल्पना मििलद यांच्या, पण राबवण्याची जबाबदारी स्वीकारली चिन्मयी चिंदरकर यांनी, जोडीला खास अधीक्षक म्हणून निवृत्त शिक्षिका चित्रा साखळकर शाळेत येऊ लागल्या. काही शिक्षक आणि पालकही पुढे सरसावले. आज या शाळेकडे पाहिलं जातं एक आदर्श शाळा म्हणून. पण चिंदरकरांना वाटतं,‘आताशी कुठं घडी बसली आहे. अजून खूप करायचं आहे. खासकरून
भाषासमृद्धीसाठी.’ शाळेच्या आसपास येताच शाळेचं वेगळेपण जाणवू लागतं. भिंतीवरील चित्रं-पोस्टर्स शाळेच्या उपक्रमांचा परिचय करून देतात. इथला प्रत्येक कोपरा, भिंत, जिना मुलांशी बोलत असतो- बातम्या, वचनं, समीकरणं, व्याख्या अशा अनेक गोष्टींतून. आसपासच्या झोपडपट्टीत राहाणारी विविध जातीय धर्माची, शैक्षणिक पाश्र्वभूमी नसणारी मुलं जशी इथे येतात तशीच उच्चभ्रू घरातील परळ, गिरगाव, गोरेगाव, पार्ले, अंधेरी येथूनही येतात. स्पोर्ट युनिफॉर्ममध्ये केवळ जेवणाचे डबे घेऊन ७.३० वाजता शाळा भरते. मग प्रार्थना, प्रतिज्ञा, स्तोत्र पठण, सूर्यनमस्कार, व्यायाम, योगासने. ८.३० ला शाळा नाश्ता देते. ९ ते १२ शाळा, मग मधली सुट्टी, मग परत १ ते ४ शाळा, नंतर थोडाफार गृहपाठ वा स्वयंअध्ययनाला वेळ आणि नंतर छंदवर्ग, खेळ. प्रत्येक वर्गाचं वेळापत्रक आखलेलं. शाळेच्या बाहेरचे तज्ज्ञ काही माजी विद्यार्थी शिकवायला येतात. ओरेगामी, गायन, नृत्य, अभिनय कौशल्य, तबला, चित्रकला, दोरीच्या उडय़ा, कबड्डी, खो-खो, हँडबॉल, फुटबॉल आणि अवांतर वाचन. प्रत्येक जण कशात ना कशात सहभागी होतो. ७.३० ला मुलं घरी जायला निघतात. गरज भासली तरच अभ्यासाचं वा संदर्भासाठीचं पुस्तक सोबत घेतात. एरवी दप्तराचं ओझं नाही.
इथे वर्गाच्या खोल्या नाहीत. तर सहा विषयांच्या सहा खोल्या आहेत. विद्यार्थी तिथे जातात. प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड, त्या विषयाच्या संदर्भातील पुस्तकांचं वाचनालय, जे चालवतात मुलंच, अभिव्यक्ती फलक आणि मुलांनी वा शिक्षकांनी बनवलेली खेळणी, शैक्षणिक साधन इत्यादींची कपाटं. मुलं गटागटात खेळतात. खेळातून शिकतात. त्यांच्या बाई पुस्ती जोडतात. ‘आमची मुलं खेळ, खास करून ‘डॉमिनो’ बनवण्यात एक्सपर्ट आहेत बरं का’ असं सांगतात. अभिव्यक्ती फलकावर कधी कविता, चुटके, माईंडमॅप, कोडी, चित्रं, मॉडेल्स, आकृत्या असतील तर कधी ‘सेव्ह द टायगर’, ‘सफाई दिन’सारखे प्रकल्प. हा असतो मुलांच्या कल्पनेचा, कलांचा आविष्कार. वैशिष्टय़पूर्ण वर्कशीटस् हे शाळेचं वैशिष्टय़. इयत्ता नववीपर्यंत शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य- अभ्यासक्रम कोणता, किती व कसा शिकवावा याचं. त्यानुसारच मुलं चर्चा करतात, माहिती जमा करतात, सादर करतात. संकल्पना समजणं आणि त्याचं उपयोजन करता येणं महत्त्वाचं मानलं जातं. उजळणी, सराव यासाठी माईंडमॅपचं तंत्र प्रभावीपणे वापरलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्यांनं प्रत्येक विषयाची केलेली डिरेक्टरी असते. इंग्रजी वृत्तपत्र प्रत्येक जण रोज वाचतोच. प्रत्येक वर्ग म्हणजे एक टीम. यात प्रत्येक विषयाचा तज्ज्ञ विद्यार्थी असतो. पण कोणी मागे राहाणार नाही यासाठी प्रयत्न असतो. ८ वीच्या एका वर्गाला यंदा २६ आणि शाळेला ७२ मेडलस् आतापावेतो मिळाली आहेत. ‘अभ्यासात मागे असणाऱ्याला मदत करता म्हणजे काय करता?’ यावर त्या सांगतात, ‘त्या मित्राचं आम्ही लेखन-वाचन, उजळणी घेतो. पाठांतर घेतो आणि त्यासाठी खास वर्कशीटस् बनवतो. म्हणून वर्गातलं वातावरण चैतन्यमय भासतं. मुलं रमतात.’ शाळेविषयी किती सांगू आणि किती नाही असं त्यांना होतं.
शनिवार त्यांचा आवडता वार. या दिवशी असते कुमार सभा, किशोर सभा, अनुभव मंडप. मुलं फिल्ड व्हिजिटला जातात, मुलाखती घेतात, तज्ज्ञांचे, विविध क्षेत्रांतील नामवंतांचे अनुभव ऐकतात, चित्रपट पाहातात, त्यावर चर्चा करतात. कोणी गाणं, कविता तर कोणी नाटक किंवा प्रकल्प सादर करतो.
शाळेत साजरा होणारा प्रत्येक सण वेगळा. वर्षांची सुरुवात वर्षांरंभ उपासनेनं होते, तर इयत्ता ९वीची विद्याव्रत संस्काराने. गणपतीची मूर्ती बनवणं, प्रतिष्ठापना, पूजा वगैरे सर्व विद्यार्थीच करतात. राख्या बनवतात. प्रत्येक जण किमान २५ राख्या घरोघरी जाऊन विकतो. मराठी, हिंदी, इंग्रजी दिन त्या त्या भाषेतल्या विविधरंगी कार्यक्रमांनी सजतात. विज्ञान दिनाच्या दिवशी वैज्ञानिक खेळणी- प्रयोग यांचं प्रदर्शन भरवलं जातं. राष्ट्रीय सणांना त्या सणाशी संबंधित माहिती गोळा करतात. राष्ट्रीय प्रश्नांचा शोध घेतात. त्यांच्या परीनं उपायांवर चर्चा करतात. दिवाळीची सुट्टी केवळ सात दिवस. त्याच वेळी दरवर्षी शाळेत भरते बाजारपेठ. पालकांकडून मागणी मागवली जाते. घाऊक बाजारपेठेतून सामान आणण्यापासून सगळ्याचा हिशोब ठेवण्यापर्यंत सारं मुलंच करतात. हजारो रुपयांची उलढाल होते. गणित-विज्ञान हे विषय मुलं इथे जगतात आणि मग जातात मातृभूमी दर्शनाला. पुणे, अमरावती, गडचिरोली, हेमलकसा अशा ठिकाणी सहलीसाठी. तिथला निसर्ग, माणूस समजून घ्यायचा प्रयत्न करतात. जे समजलं ते पत्र, निबंध, अनुभवकथन, कविता, चित्रं विविध माध्यमांतून सादर करतात. असंच दीर्घकालीन शिबीर होतं. वार्षिक परीक्षा संपल्यावर या सगळय़ातून मुलं कमालीचा आत्मविश्वास कमावतात.
अशा भरभरून घेतलेल्या अनुभवांमुळेच मुलांकडमून शाळेचं खास वृत्तपत्र चालवलं जातं. त्याचं नाव ‘स्वामी.’ वार्ताहर, बातमीदार, संपादक सर्व विद्यार्थीच. ज्याची छपाई संगणकावर होते. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी शाळेच्या संदर्भातील बातम्या देतात. हे वृत्तपत्र म्हणजे जणू शाळेच्या कार्याचा आरसा. एकूण १० प्रती काढल्या जातात. यातून पालकांनाही शाळेत काय चालू आहे हे समजतं. मराठी माध्यमाची शाळा म्हणून विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही असं होऊ नये म्हणून शाळा खास प्रयत्न करते. इयत्ता आठवीपासून गणित, विज्ञान, इंग्रजीत शिकवलं जातंच, पण मुलांनी इंग्रजी वाचावं- बोलावं यासाठी खास प्रयत्न होतात. गेल्याच वर्षी मुलांनी अडीच तासांचा कार्यक्रम संपूर्णपणे इंग्रजीत सादर केला होता. लवकरच एस.एस.सी. बोर्डाकडे मराठीप्रमाणेच इंग्रजीही प्रथम भाषा निवडण्याची परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नाला यश येईल असं शाळेला वाटतं.
खरं तर ही आहे केवळ शाळेची तोंडओळख. शाळेला खरं जाणून घ्यायचं तर तुम्ही प्रत्यक्ष शाळेलाच भेट द्या. विद्यार्थी, शिक्षकांशी बोला. त्यांच्यातील वेगळेपण तुम्हाला जाणवेल. इथले सारे शिक्षक इतर शाळांसारखेच, पण इथे त्यांच्या क्षमतांना मिळालं आव्हान. म्हणूनच ते सांगतात, ‘शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात माहिती कोंबणं नव्हे तर त्यांच्यात जे आहे ते शोधणं, ते बाहेर येऊ देणं.’ आम्ही अनुभवत आहोत. त्याला आमचाही अपवाद नाही. म्हणूनच इथे सारे सांगतात, ‘हे काम करताना खूप खूप मजा येते.’ मराठी शाळा, त्यांचा दर्जा, मराठी संस्कृती टिकवायची असेल तर आज गरज आहे अशा अनेक शाळांची महाराष्ट्रभर. तेव्हा चला, आपण भेट देऊ या शाळेला..
मिलिंद चिंदरकर ९३२२२४२५६९.
चिन्मयी चिंदरकर ९३२३१२१९८०.
चित्रा साखळकर ९८९२२४१८५४.

First Published on November 8, 2014 4:05 am

Web Title: what is needed for education system in india
Just Now!
X