24 November 2020

News Flash

तडजोड? म्हणजे काय..

‘चतुरंग’मधील आवाहन वाचले आणि मनाची उलथापालथ सुरू झाली. रोजच्या धावपळीची आणि त्यातूनच धडपडत जगण्याची एवढी सवय झाली आहे की, ‘तडजोड म्हणजे काय रे भाऊ!’ असा

| January 10, 2015 01:50 am

‘चतुरंग’मधील आवाहन वाचले आणि मनाची उलथापालथ सुरू झाली. रोजच्या धावपळीची आणि त्यातूनच धडपडत जगण्याची एवढी सवय झाली आहे की, ‘तडजोड म्हणजे काय रे भाऊ!’ असा प्रश्न पडला. नंतर विचार करता करता माझं मन २०-२२ वर्षे मागे गेले.
 पदवी मिळाल्यानंतर वर्षभरातच लागलेली बँकेतील नोकरी. पुढील प्रमोशनचे गणित आखेपर्यंत विभागातल्याच वरिष्ठ सहकाऱ्यासोबत झालेले लग्न आणि हल्लीच्या मुलींच्या मते असणारी मोठी तडजोड म्हणजे पश्चिम रेल्वे सोडून मध्य रेल्वेच्या बाजूला येणे. अंधेरीहून सासरी थेट डोंबिवलीसारख्या उपनगरात दाखल झाले. हे लग्न नावातील बदलाबरोबरच माझ्यातही आमूलाग्र बदल करते झाले.
बाळाची चाहूल आणि नवऱ्याचे बँकेतील प्रमोशन हातात हात घालून आले. त्याबरोबर माझ्यातील करिअरिस्ट स्त्रीला मी स्वखुशीनेच बाजूला ठेवले. माझ्या करिअरची स्वप्ने मी नवऱ्याच्या एकामागून एक येणाऱ्या प्रमोशनमध्ये पाहू लागले. परंतु त्यामुळे मुलाच्या विकासाची सूत्रे माझ्या खांद्यावर घेणे भाग पडले. बँकेतील नोकरी असल्याने बदली ही ठरलेलीच. माझ्या शाखेच्या वेळेप्रमाणे, त्याच्या विविध क्लासची आखणी करू लागते. लोकलच्या गर्दीतून उतरून भाजी घेऊन घर गाठायचे. रात्रीचा स्वयंपाक करता करता त्याला एखाद्या छंद वर्गाला सोडून यायचे. उरलेला स्वयंपाक पूर्ण करायचा आणि परत त्याला आणायला जायचे. सासू, सासरे दिवसभर आपल्या मुलाला सांभाळतात त्यामुळे घरी गेल्यानंतर त्यांना फारशी तोशीस लागू द्यायची नाही याची काळजी घ्यायची. उच्च पदावर असल्याने नवऱ्यास असलेला ऑफिसचा ताण याची जाणीव एकाच क्षेत्रात असल्याने होतीच. त्यामुळे त्यालाही सांभाळून घेणे होतेच.
या सगळय़ा दगदगीत प्रेमळ मैत्रिणी लाभल्या. त्यांच्या नादाने स्कूटी घेतली आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. लग्नापूर्वी सायकलही न चालवलेली मी स्कूटी चालवू लागले. सासूबाईंच्या आजारपणात हॉस्पिटलला हेलपाटे घालण्यात या स्कूटीचा फारच उपयोग झाला. सासूबाईंनंतर घरातील सणासमारंभाची जबाबदारी, एकुलती एक सून या नात्याने साहजिकच माझ्या अंगावर आली. परंतु ती मी आनंदाने झेलली कारण मी मुळातच श्रद्धाळू. घरातील कुळाचार मी व्यवस्थित करते आहे हे पाहूनच समाधानाने सासूबाईंनी प्राण सोडला.
 आयुष्यात कठीण प्रसंग आले नाहीच असे नाही. आई आणि सासूबाई दोघांचीही एकत्रच आलेली गंभीर आजारपणं. सकाळी घरातले सर्व आवरून ऑफिस गाठायचे. लंच टाइममध्ये हिंदुजाला आईला भेटून यायचे. संध्याकाळी परत घरी येऊन घर आवरायचे. तरीही सुट्टी शिल्लक नसल्याने आईच्या शेवटच्या अवस्थेमध्ये तिला सोबत करता न आल्याने मनाला कायमची टोचणी लागून राहिली. मला आठवते, मुलगा वर्षांचा होण्यापूर्वीच सासूबाईंच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. परंतु सासरे आणि सख्खे शेजारी यांच्या मदतीने सासूबाईंचे आणि बाळाचे सगळे कार्यक्रम उरकून डोंबिवली ते कफ परेड अशी रोजची परेड करत होते. या सगळय़ात घर आणि ऑफिस या दोन्हींचे गाडे ओढताना दमछाक होत होती. त्यामुळे प्रमोशन हा शब्दच शब्दकोशातून हद्दपार केला होता.
आज माझ्या बरोबरीचे सहकारी प्रमोशन घेऊन केव्हाच पुढे निघून गेले आहेत. शेवटी मीही एक माणूसच असल्याने वाईट जरूर वाटते, परंतु हेही जाणवते की माझ्या घरासाठी, माझ्या माणसासाठी सर्व करताना मलाही आनंद होतच होता. नवरा वरिष्ठ पदावर पोहोचल्याचे श्रेय जेव्हा नातेवाईक, मित्रपरिवार मला देतात तेव्हा माझ्याही अंगावर मूठभर मांस चढतेच की. आज तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेला माझा मुलगा फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या काळातही त्याच्या भावना माझ्यासोबत मोकळेपणाने बोलतो. हेही नसे थोडके. बँकेचे ग्राहक माझ्या काऊंटरवर येऊन कृतज्ञता व्यक्त करतात. माझ्या कामाचे कौतुक करतात हे माझ्यासाठी प्रमोशनच आहे आणि ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ ही ऊर्मी मनात आहेच. आयुष्यात भरपूर काही करायचे आहे. ते सर्व करायची शक्ती देव देईलच. कारण, ‘जिंदगी से गुजरना है तो रास्ते का मजा लेते जायेंगे’
सायली पाटे, डोंबिवली
(या सदरासाठी मजकुराबरोबर आपला ई-मेल, संपर्क क्रमांक व पासपोर्ट साइज फोटो अवश्य पाठवावा. ई-मेलवर मजकूर पाठवताना- पीडीएफ   
आणि आरटीएफ याच फॉर्मेटमध्ये मजकूर पाठवावा. पाकिटावर वा ई-मेलवर ‘माझा त्याग, माझं समाधान ’लिहिणे आवश्यक.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:50 am

Web Title: what is negotiation
Next Stories
1 पराभवातून जन्म विजयाचा
2 पांढरे विष- साखर
3 चोवीस तास राहा फिट
Just Now!
X