News Flash

विचित्र निर्मिती : मी चित्रपट का बनवते

मोठय़ा आर्थिक उलाढालीचा, मोठय़ा व्यवस्थापनाचा आणि संघटनाचाही आहे. कदाचित त्यामुळेच की काय, अजूनही स्त्रिया मोठय़ा संख्येनं यात दिसत नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्रा भावे

‘चित्रपट का बनवता?’ या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्या, अशी कुणी अट घातली तर मी म्हणेन, जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठीचं, एक सशक्त अवजार माझ्या हाती आल्यावर, तो घेण्याइतका आनंद चित्रपटाशिवाय दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात मिळाला नसता.  म्हणून मी चित्रपट बनवत राहिले आणि बनवते. त्यातूनच उपयुक्ततावादाच्या पलीकडे जाऊन, आपण स्वत: जीवनाचा शोध घेण्यासाठी चित्रपट बनवावेत. त्यातून प्रेक्षकांनाही अनुभव मिळतील, त्यांच्या दृष्टिकोणाच्या कक्षा विस्तारतील, अशी श्रद्धा वाढत गेली..

पहिला लघुपट मी १९८४ ला चित्रित केला. म्हणजे यंदा पस्तीस वर्ष पूर्ण झाली. शिवाय, गेली पस्तीस वर्ष, काळ मध्ये न तोडता, सतत काम केलं. पहिला चित्रपट केला तेव्हा वाटलंच नव्हतं की, दुसरा करेन. इतकी वर्ष मी चित्रपट बनविण्याचा उद्योग का करत राहिले?

सुनील सुकथनकर बरोबर होता; पण माझ्या जबाबदाऱ्या कमी नव्हत्या. हा उद्योग कलात्मक, सर्जनशील, पण त्याचबरोबर मोठय़ा मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक श्रमाचासुद्धा आहे. मोठय़ा आर्थिक उलाढालीचा, मोठय़ा व्यवस्थापनाचा आणि संघटनाचाही आहे. कदाचित त्यामुळेच की काय, अजूनही स्त्रिया मोठय़ा संख्येनं यात दिसत नाहीत. आता हा ट्रेंड बदलतोय, हेही तितकंच खरं. अनेक तरुण मुली लघुपट बनवत आहेत. केवळ दिग्दर्शकच नाही तर तंत्रज्ञ होत आहेत. नाही तर पूर्वी स्त्रिया या क्षेत्रात फक्त अभिनेत्री म्हणूनच वावरायच्या.

अगदी ‘चित्रपट का बनवता?’ या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्या, अशी कुणी अट घातली तर मी म्हणेन, ‘चित्रपटात मला जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठी, त्यांची छोटी प्रतिकृती स्वत: करून बघण्यासाठी, एक सशक्त अवजार माझ्या हाती आलं तेव्हा तो घेण्याइतका आनंद, दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात मिळाला नसता.’ म्हणून मी चित्रपट बनवत राहिले आणि बनवते. पहिला लघुपट ‘बाई’ ही स्त्रियांच्या असंख्य गटांमध्ये दाखवला. खूप चर्चा केल्या. बायका उत्साहा-उत्साहाने, ही कथा पाहून नि:संकोचपणे स्वत:ची कथा आणि स्वत:चं दैन्य, दु:ख दूर करण्यासाठी, आपण काय काय केलं, हे खुशाल चव्हाटय़ावर सांगत असत. या लघुपटात, एका प्रसंगात, थोरली बहीण दहावीला नापास होते म्हणून धाकटा भाऊ तिला नाही-नाही ते बोलतो. तो तिला म्हणतो, ‘‘पोरीची जात तुझी, चुलीसमोर बसायचं.’’ आणि मग आईला सल्ला देतो की, ‘‘शाळेतून काढ टाक तिला.’’ आई उसळून उठत म्हणते, ‘‘मेल्या, माझी लेक शिकंल. नापास झाली तरी काही बिघडत नाही. पुन्हा परीक्षा दील.’’ आणि तिचं स्वत:चं तर्कशास्त्र वापरून मुलाला सुनावते, ‘‘पुरुष मानसं आईच्या पोटात नऊ महिने काढत्यात आन बाया काय पाच महिने व्हय?’’

या तत्त्वातून तिला स्त्री-पुरुष समानता समजली आहे, हे तत्त्व आमच्या प्रेक्षकातल्या एका वृद्ध बाईला इतकं पटलं की, समोर चित्रपट चालू आहे, याचं भानच गेलं आणि तिने शेजारी बसलेल्या नातवाच्या पाठीत धपका घातला. म्हणाली, ‘‘ऐक मेल्या, रोज घरात दादागिरी करतंय. हेच तर आम्ही तुला सांगत असतोय. बाप्या आन बायकांच्या अकलेत काही फरक नसतोय.’’ प्रेक्षकांत एकच हलकल्लोळ उडाला. म्हणजे जगण्याशी जवळ असणारी कथा आणि वास्तवचित्रण असलं की माणसाचं काळीज हलतं. त्यांना आपल्या स्वत:च्या जगण्याकडे बघण्यासाठी आधार मिळतो, हे पहिल्या चित्रपट दाखवण्याच्या अनुभवांमधून आम्हाला पक्कं समजलं होतं.

त्यामुळे आमच्या ‘स्त्रीवाणी’ नावाच्या अभ्यास प्रकल्पाचा हा निश्चित निष्कर्ष होता, की चित्रपट हे शिक्षणाचं, म्हणजेच परिवर्तनाचं, अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याला वय, लिंग, वर्ग कशाचीच अट नाही. शिवाय, चित्रपटाचा परिणाम मुख्यत: अंतर्मनावर (सबकॉन्शस माइंड) होत असल्याने, तो गोंदवल्यासारखा पक्का होतो. बलात्काराच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या, की वाटतं, किती निष्ठेनं परिवर्तनासाठी, आपल्या माणूसपणाचा अर्थ लावण्यासाठी, चित्रपटांतून आजच्या ‘आधुनिक संस्कृती’ची चिकित्सा होणे आवश्यक आहे. दुसरा ‘पाणी’ हा लघुपट झाल्यावर, मला शिक्षण क्षेत्रातल्या एक बाई म्हणाल्या, ‘‘अशा कशा तुम्ही, शिक्षण क्षेत्र सोडून एकदम भलत्याच क्षेत्रात गेलात?’’ मी फारसा विचार न करता सहज बोलून गेले, ‘‘छे छे, मी कुठं क्षेत्र बदललं? शिक्षणाची (अभ्यासाची) पद्धत बदलली. ती अधिक जगण्याच्या जवळ नेली. जगण्यातल्या विसंगती समजण्यासाठी, स्वत:च्या आणि इतरांच्या अधिक काळजाजवळ नेली. अदृश्य माणसांना, (‘दहावी-फ’मधील मुलं आणि ‘नितळ’मधली कोड आलेली मुलगी), प्रश्नांना (‘देवराई’ आणि ‘राधा’मधले आजार) अधिक दृश्यमयता दिली.

आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना, या माध्यमाचं महत्त्व जितकं वाटायला पाहिजे, तितकं वाटलेलं नाही. या माध्यमाच्या दृश्यमयतेमुळे, हे माध्यम एकाच वेळी स्थानिक, व्यक्तिगत आणि तरी वैश्विक आणि सार्वत्रिक होऊ शकतं, हे त्यांनी घ्यायला हवं तेवढं समजावून घेतलेलं नाही. अर्थात, या विधानाला अपवाद आहेतच. त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या गरजा जाणून, त्यांच्या मदतीने अभ्यास करून, विशिष्ट प्रेक्षकाला व सर्वसाधारण प्रेक्षकालाही जागरूक करतील, असे अनेक लघुपट बनवले आहेत. अंध, मूकबधिर, मतिमंद, दत्तक मुले, बालकामगार, बाललैंगिक अत्याचारग्रस्त मुलं, मुलांचा सुधारगृहाचा अनुभव, नेत्रदान, थॅलसिमिया, एड्स, आदिवासींचे विस्थापन, रात्रशाळा, जंगल अधिकार इत्यादी इत्यादी इत्यादी. असे लघुचित्रपट पन्नासच्या वर झाले आहेत. त्यातून प्रश्न मांडावेत आणि समाजाला निश्चित, ठोस संदेश मिळावा, असं सुरुवातीला वाटत होतं.

जसजसे हे लघुपट दाखवत गेलो आणि लोकांशी चर्चा करत गेलो, तेव्हा लक्षात येत गेलं, की माणसाची स्मरणशक्ती बौद्धिक, तार्किक, तत्त्वं आणि पुरावे लक्षात ठेवण्यापेक्षा, स्वत:चे भावनिक अनुभव जास्त लक्षात ठेवते. स्वत:च्या आणि फक्त स्वत:च्या नाही, तर समाजाच्या लाभासाठी, व्यक्ती आणि समाज, दोघेही जितक्या प्रमाणात, अशी लाभदायी स्मरणं तयार करतील, तितकी ती स्मरणं वर्तणुकीत उतरण्याची शक्यता वाढेल. अशी स्मरणं तयार करण्याचं काम विविध कला आणि त्यांची जपणूक करणारी संस्कृती, जीवनशैली करत असते.

आम्ही ‘पाणी’ नावाचा दुसरा लघुपट करायचा ठरवला. (असा चित्रपट करावा, अशी मागणी आमचा पहिला लघुपट पाहून, आदिवासी स्त्रियांकडून आली होती.) त्यासाठी पैसे नव्हते. ही गोष्ट १९८६ ची आहे. एका निमसरकारी, पाण्यासंबंधी खेडोपाडी विविध योजना राबवणाऱ्या, राष्ट्रीय पातळीवरच्या मंडळाला, आम्ही या चित्रपटाची कल्पना सांगितली. त्यात गावच्या स्त्रिया, श्रमदानाने, एकजुटीने, शासनाच्या मदतीशिवाय, स्वयंस्फूर्तीने, गावातला गाळ भरलेला पाझर तलाव स्वच्छ करून, त्याच्या तळाचे झरे मोकळे करून, गावाला पुरेल एवढं पाणी गावात आणतात, असं दाखवायचं होतं.

हे राष्ट्रीय मंडळ आम्हाला म्हणालं, ‘‘तुम्हाला एखाद्या गावात विहीर खोदायची असेल तर त्यासाठी अनुदान देऊ; पण असा चित्रपट करण्यासाठी अनुदान देणे, आम्हाला योग्य वाटत नाही.’’ मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, सांगून बघितलं. गावोगावी विहीर खोदणं महत्त्वाचं आहेच; पण त्याबरोबरीने गावकऱ्यांना हे काम स्वयंस्फूर्तीने होऊ शकतं, ही शक्यता जाणवणं, हे खूप महत्त्वाचं आहे. एक विहीर, एक पाझर तलाव एका गावाला पाणी पुरवेल; पण असा एक लघुपट अनेक गावांमध्ये जाणीव जागृती करेल आणि गावकऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने अनेक गावांमध्ये अनेक विहिरी किंवा पाझर तलाव तयार होऊ शकतील. पुढे लोकांच्या सहभागातून हा लघुपट तयार झाला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं.

गावोगावी हा लघुपट दाखवल्यावर काही काळ तरी विचारमंथनही झाले. दोन गावांतल्या स्त्रियांनी तर प्रत्यक्ष कृतीही केली. हा चित्रपट झाल्यानंतर सुमारे वीस वर्षांनी, कॅनडामध्ये पाणी प्रश्नासाठी वेगवेगळ्या विकसनशील देशांमध्ये काम करणाऱ्या एका समाजकार्यकर्तीशी गाठ पडली. आमचं नाव कळल्यावर ती हुरळून गेली. म्हणाली, ‘‘तुमचा ‘पाणी’ हा चित्रपट भारतातल्या खेडय़ांमध्ये जितका दाखवला गेला असेल, त्याहून जास्त पाकिस्तानातील खेडय़ांमध्ये मी दाखवला आहे. बायकांशी संवाद करून त्यांच्यातली भीती, आळस, निराशा झटकायला लावली आहे.’’ हे ऐकताना ‘पाणी’ चित्रपट बनवतानाचे कष्ट, शंका-कुशंका, झालेल्या मनमोडी, या चित्रपटातल्या ‘फ्लॅशबॅक’प्रमाणे झर्रक्न माझ्या डोळ्यांसमोरून येऊन गेल्या आणि डोळे पाणावले.

असे लघुपट करताना आणि त्यांच्यावर चर्चा घडवताना, नेहमीच लक्षात येत गेलं, की चित्रपटात दिलेल्या ठोस संदेशापेक्षा, भावनिक संवादातून किंवा भावनांच्या अमूर्त अभिव्यक्तीतून जे काळजाशी पोचतं, तेवढंच प्रेक्षकांच्या जवळ राहतं. ‘त्याला तूच जबाबदार आहेस,’ असं म्हटल्यावर, हे विधान कितीही खरं असलं तरी, माणसाची पहिली प्रतिक्रिया प्रतिवादाचीच तयार होते. त्यामुळे आपली वर्तणूक आपल्या आणि इतरांच्या भल्याची आहे की नाही, ते माणसाने स्वत:च्या अंतरंगात खोलवर जाऊन, स्वत:शी प्रामाणिक होऊन स्वत:च ठरवावं. म्हणजे चित्रपटातून माणसांच्या मनोव्यापारातले, सूक्ष्म भाव समजून घेऊन, या सूक्ष्म अनुभूती समाजासमोर ठेवून, माणसांच्या आंतरिक दृष्टीला आवाहन करावं, हे अधिक योग्य ठरेल, असं वाटू लागलं.

या तऱ्हेची भावना तयार झाल्यावर अनेक उत्तमोत्तम, भारतीय आणि विदेशी चित्रपटकर्त्यांचे, सखोल, ऊर्जा देणारे, हसवणारे-रडवणारे चित्रपट पाहिल्यावर, हळूहळू आमच्याही चित्रपटांची शैली बदलत गेली. चित्रपट माध्यमाचा, स्वत:च्या जाणिवांचा, सामाजिक प्रश्नांचा, चित्रपट तंत्राचा आणखी-आणखी अभ्यास करावासा वाटू लागला. कुणीकुणी असंही म्हणतात, की तुमचे चित्रपट सध्याच्या मनोरंजनाच्या निकषांनुसार पुरेसे रंजन करणारे नसतात. प्रेक्षकांच्या संख्येच्या निकषाने त्यांना अयशस्वीही म्हणता येईल. एक प्रकारे प्रश्न रास्तही आहे. या प्रश्नाचा मी आदर करते; पण स्वत:पुरतं मी उत्तर शोधलं आहे. खरं तर, जीवनाचा, मनुष्यजगत आणि निसर्गजगत यांचा शोध घेणाऱ्या सर्वच माणसांना अवकाश व संसाधनं मिळायला हवीत.

उपयुक्ततावादाच्या पलीकडे जाऊन, आपण स्वत: जीवनाचा शोध घेण्यासाठी, चित्रपट बनवावेत. त्यातून प्रेक्षकांनाही अनुभव मिळतील, त्यांच्या दृष्टिकोणाच्या कक्षा विस्तारतील, अशी श्रद्धा वाढत गेली. त्यासाठी स्वत:शी अधिकाधिक प्रामाणिक होत चित्रपटाच्या भाषेवरचं प्रभुत्व वाढवण्याचा ध्यास लागला. त्यामुळे आता पंचाहत्तरी उलटून गेली तरी चित्रपट बनवण्याचा माझा खेळ खेळतेच आहे.

दिग्दर्शकाला चित्रपटामध्ये ‘टीमचा कॅप्टन’ म्हटलं जातं. म्हणजे अनेक महत्त्वाचे निर्णय दिग्दर्शकानं घ्यायचे असतात. दिग्दर्शकाचे चित्रपट हे त्याचं/तिचं ‘व्हिजन’ असतं, हे खरंही आहे आणि तरीही ते ‘व्हिजन’ तयार करण्यामध्ये आणि साकारण्यामध्ये अनेकांचा सर्जक सहभाग असतो, हेही तितकंच खरं. त्यामुळे प्रत्येक चित्रपटाच्या आठवणीत सर्वप्रथम निर्माते, सहकारी, मग तंत्रज्ञ, अभिनेते आणि त्या चित्रपटाच्या निर्मितीचं व्यवस्थापन बघणारे, या सर्वाचीच आठवण येते. चित्रपट बनवण्याचा व्यापार इतका तीव्र, ‘इंटेन्स’ असतो, की हे सगळे छोटय़ा काळासाठी जवळ असले तरी- मजुरीवर म्हणा, मानधनावर म्हणा, काम करणारे कामगार न बनता, सख्खे नातेवाईक बनतात.

ही तर सगळी त्या आतल्या मध्यवर्तुळातली माणसं; पण त्याच्याबाहेर चित्रीकरण स्थळ शोधताना ज्यांची मदत झाली, तिथलं नेपथ्य उभं करताना किंवा पोशाख करताना ज्यांची मदत झाली, तेही असेच आठवतात. त्यांच्या बाहेरचा वर्तुळाचा परीघ म्हणजे जवळच्या नातेवाईकांचा किंवा मित्रमंडळींचा, ज्यांना चित्रपटाची संहिता वाचून दाखवून, त्यांची मान्यता मिळाल्याशिवाय चित्रपट पुढे सरकत नाही. असे सगळे मिळून चित्रपटाचा गोवर्धन उचलला जातो.

नव्या चित्रपटाच्या पहिल्या खेळासाठी, चित्रपटगृहात अंधार झाला की, मनात कितीही हुरहुर असली तरी, पुढच्या चित्रपटाच्या दिशेनं आपोआप पावलं सरकायला लागतात..

(सदर समाप्त)

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:26 am

Web Title: what makes a movie vichitra nirmiti article sumitra bhave abn 97
Next Stories
1 ‘मी’ची गोष्ट : स्वप्नांच्या वाटा चालताना..
2 सृजनाच्या नव्या वाटा : शाळेची सृजन वाट..
3 आव्हान पालकत्वाचे : सिंहावलोकन
Just Now!
X