लोक  काय म्हणतील? हा अनेक वेळा निर्णयास नेणारा तरीही प्रश्नच. मोठ्ठा स्पीडब्रेकर, प्रगतीतला अडथळा. माणसाने माणसाला घाबरायचं? जे मिळवायची जबरदस्त ओढ, ते सारं सारं सोडायचं? कोणासाठी? अगदी जवळच्यांचा विचार ठीक, पण आपल्या नसलेल्या लोकांसाठी?..आणि त्यातून नेहमीच चांगलं होईल असं कुठे आहे. मग काय करावं?
वसंताला लहानपणापासून पानाचे दुकान टाकायची हौस होती. खूप शिकला, मस्त करिअर, नोकरी, बायको, पैसा, बंगला, गाडी, मुलं सगळं छान झाल्यावर त्याची हौस उफाळून आली. पण पानाचे दुकान टाकायला बायकोने खूप विरोध केला. ‘पानवाला?’ लोक  काय म्हणतील? एव्हढय़ा मोठय़ा हुद्दय़ावर काम केलं आणि आता निवृत्तीनंतर हे भिकेचे डोहाळे. नाही टाकायचं पानाचं दुकान.’’ पण आतला आवाज, लहानपणापासूनची इच्छा वसंताला स्वस्थ बसू देईना. त्याने आपलं म्हणणं खरं केलं. दुकान थाटलं, भलंमोठ्ठं. पानाचं ते दुकान चाललंही छान. लोकिनदेची सुरुवातीची भीती त्याला नव्हतीच. स्वत:ची इमेज जपायची तिचीही धडपड फोल ठरली, इतरांनी केलेलं कौतुक ऐकून नंतर तिची कळीही खुलली.
कायम धोतर नेसणारे बंडोपंत, निघाले मुलाकडे अमेरिकेत. तिथेसुद्धा धोतरच नेसणार असा निश्चय. पण कसलं काय? तिथल्या थंडीची हुडहुडी. सक्तीने गरम कपडे घातले, जीन्ससुद्धा. भारतात येताना बायकोलाच दटावले, ‘‘कुणाला सांगू नका. नाहीतर लोक काय म्हणतील? हसतील मला. तुम्ही तोंड बंद ठेवा.’’ ती नुसती हसली. तिने आणि मुलाने मिळून बंडोपंतांचे फोटो आधीच दिले होते सगळ्यांना पाठवून. लोक काय म्हणतीलची भीती तिला तरी नव्हतीच.
आपल्या मनाविरुद्द काही होणार असे नुसते वाटले तरी समाज काय म्हणेल म्हणून तो विचार करणंही नकोसं होतं अनेकांना. सामाजिक दडपण उगीचच घेणारे लोक  बरेचदा प्रवासात, कोणी बघेल, काय म्हणतील म्हणत नसíगक विधींनाही जात नाहीत. खरं तर कोणी काहीच म्हणत नसतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात, विचारात मग्न असतो. पण यांचं आपलं, घरी गेल्यावर जाईन म्हणत बसतात, पायावर पाय घेऊन. आणि नंतर शारीरिक दुष्परिणामांना तोंड देतात.
राधिकाने स्वत:चंच लग्न ठरवलं. सगळं छान होतं, पण त्याची वेगळी जात छळू लागली. घरात सािंगतलं तर केव्हढा गहजब. ‘‘कुठल्या तोंडाने सांगायची त्याची जात. लोक काय म्हणतील?’’ केवढं दडपण आलं घरातल्यांना. पण ती ठाम राहिली आणि लग्न करून सुखी झाली.
तरुणपणातच कशाला निवृत्तीनंतर वेळ, पसा, स्वास्थ्य आणि मोकळीक सगळंच असतं. तेव्हा आठवतं धकाधकीच्या धबडघ्यात अनेक छोटय़ा गोष्टी करायच्या राहिल्या. ‘‘मी टी शर्ट घालू ?’’, ‘‘पंजाबी ड्रेस शिवू का?’’, ‘‘कधीच मिशी काढली नाही, काळी-पांढरी मिशी चांगली नाही वाटत, आता काढली तर?’’, ‘‘स्टायलिश राहिले नाही, आता सुनबाई म्हणते जरा बदला, मी बदलू, मॉडर्न राहू?’’ असंख्य प्रश्न.  इतक्या छोटय़ा छोटय़ा इच्छा. त्यांना सांगावंसं वाटतं, राहा ना हवे तसे. कोणी काहीही म्हणणार नाही. म्हणाले तर बोलणाऱ्याचे दात दिसतील, तेही काळे-पिवळे, वेडेवाकडे, घाणेरडे, न घासलेले. समजलं!
लोक  काय म्हणतील? हा अनेक वेळा निर्णयास नेणारा तरीही प्रश्नच. मोठ्ठा स्पीडब्रेकर, प्रगतीतला अडथळा. माणसाने माणसाला घाबरायचं? ते मिळवायची जबरदस्त ओढ, सारं सारं सोडायचं? कोणासाठी? अगदी जवळच्यांचा विचार ठीक पण आपल्या नसलेल्या लोकांसाठी?.. जिवाच्या आकांतानेच हे प्रश्न पुन्हा पुन्हा स्वत:लाच विचारायचे.
  बरेचदा, परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यात कुठेतरी चुकते. शिवाय सगळ्यांचे स्वभाव, अहं, हट्ट, अपेक्षा, भूमिका कुठे जुळतात? विचार भिन्न, वागणं तसंच. मानसिकतेचा अंदाज समोरची व्यक्ती कितपत घेते यावर अवलंबून. फक्त वर वर काय तेवढंच बोललं जातं. स्पष्ट मोकळा संवाद दूरच रहातो. तुम्हाला एखाद्या गोष्टीची किती गरज आहे? तुमची गुंतवणूक किती? याची जाणीव इतरांना कितपत असणार? तेव्हा सुरुवातीस जरी विसंवाद वाटला तरीही, मन मोकळं करावं. नंतर जाणवतेही दुसरी बाजू, तेव्हाच सर्व बाजूनी विचार केला जातो.
जेव्हा निर्णय घेता येत नाही तेव्हा मग आपल्याच निर्णयक्षमतेवरील साशंकता, अविश्वास, वैचारिक गोंधळ, इतरांची उदाहरणे, आतल्या आत  कुढणं, यांचाच पगडा जबरदस्त असतो. अनेक वेळा न्यूनगंड बळावतो. ‘यांना घाबरलो’, म्हणत लोकांनाच दोषी धरून  राग राग केला जातो इतरांचा. दोष लादून मोकळे होतो. स्वत:ला आणि इतरांना नाकारत फरफट होते आयुष्याची. तेथेच मत्सराला कोंब फुटतात. कालांतराने ज्यांना तुम्ही घाबरत  होतात, तेच लोक स्पष्ट विचारतात, ‘‘तू असे का केलेस?’’ उत्तर नसतेच. ‘‘मी तुम्हालाच घाबरलो, तुम्ही काय म्हटले असते?’’ असे विचारताही येत नाही.
लोक म्हणजे घरातले, नात्यातले, मित्र-मत्रिणी, ओळखीचे-पाळखीचे, परिचित असे काही वर्षांपूर्वी होते. आता फेसबुक फ्रेंड्स विचारतील, व्हाट्स अपवर विचारतील. जमाना बदलला, त्यानुसार वारं फिरणारच. तरुणाई जुमानत नाही कोणाला. एकमेकांचे बघून डेअिरग करायला धजावतात एकेकजण. प्रत्येक व्यक्ती समाजाचा भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधनाच्या कळत-नकळत मर्यादा असतात. त्याही मानायला हव्यात. एखादा निर्णय घेणं मात्र प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं होतं. तसंच इथेही. मग वाटतं, एखाद्या घटनेचा, कृतीचा बोलबाला करायला वेळ आहे लोकांकडे? स्वत:च्यातच मश्गुल राहणारा समाज, विनाकारण कधीतरी नाक खुपसतो दुसऱ्याच्या आयुष्यात. तोंडी लावायला पाहिजे असते, म्हणून बोलतात लोक. मॉब, घोळका, त्यांची स्मरणशक्ती अल्पकाळ असते, तरीही तिचा पगडा जबरदस्त. आयुष्याची वाट लावायची ताकद नक्कीच असते यांच्या बोलण्यात.
पण एक नक्की ‘लोक काय म्हणतील?’ याचा बागुलबुवा करू नये. टाळ्या वाजवणारे आणि नावं ठेवणारे दोन्ही एकच लोक. आपली इच्छा पूर्ण करण्याची धडपड हे माणसाचे वैशिष्टय़. सामाजिक रूढींना शह देणाऱ्या कृत्यात हीच भीती पटीने वाढते. काही जण केवळ या भीतीपोटी अनेक गोष्टी करायला नकार देतात तर काही लोक ‘‘लोकिनदेला कोण पुसतं? लोक काय म्हणायचेत ते म्हणोत. मी नाही घाबरणार याला. माझं मी, मला हवे तसे, पाहिजे तेच करणार. ते कोण मला सांगणारे?’’ या मतावर ठाम असतात. दोन्ही टोकंच, पण व्यक्तीसापेक्ष.
म्हणूनच निर्णय घेताना त्याच्या सगळ्या बाजू तपासून घ्यायला हव्यात. लोक काय म्हणतील म्हणून नव्हे. पण निर्णय घेताना काही प्रश्न विचारलेच पाहिजेत स्वत:ला. मी हे का करतो- करते आहे? त्यातून मला काय मिळणार आहे? मी काय गमावणार आहे? या दोहोसाठी माझी तयारी आहे ना? मी समाजविघातक काही करीत नाही ना? दुसऱ्या कोणावर अन्याय,अतिक्रमण, सक्ती, जोर जबरदस्ती, फसवणूक अशी विघातक कृत्ये मी करीत नाही, याची खात्री हवी. नंतर मनातल्या इच्छेला समोर िपजऱ्यात उभं करून उलटसुलट प्रश्न आपले आपणच विचारावेत. हजारदा शहानिशा करावी आपल्या निर्णयाची. कोणासही न घाबरता घेतलेला पक्का निर्णय, त्याचे परिणाम, त्रास, यश स्वीकारायची मानसिकता हवी. लोकोपवादाला तोंड द्यायची हिंमत, परिपक्वता हवी. इतरांचे टक्के, टोमणे, घालून पाडून बोलणं कानावर पडत असताना आपल्या मनासारखं करता येणारं आंतरिक बळ हवंच. सारासार सर्व बाजूंनी विचार, सल्लामसलत, समुपदेशन करून साधायचा असतो मध्य प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वेळी, प्रत्येकाने. प्रसंगसापेक्ष बदलतो निर्णय, मानाजोगा, किंवा विरुद्ध. म्हणूनच म्हणतात ना, ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे.’ मग कशाला घाबरायचे?                                                                                 

live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….