09 August 2020

News Flash

प्रतिक्रिया नव्हे अनुक्रिया

तरुण मुले अस्वस्थ आहेत. नवविवाहित पत्नीच्या कल्पनांपुढे हतबल आहेत, मध्यमवयीन पुरुषांच्या बायका अचानक स्पष्टवक्त्या कशा झाल्या,

| May 31, 2014 01:01 am

तरुण मुले अस्वस्थ आहेत. नवविवाहित पत्नीच्या कल्पनांपुढे हतबल आहेत, मध्यमवयीन पुरुषांच्या बायका अचानक स्पष्टवक्त्या कशा झाल्या, प्रत्येक बाबतीत त्यांना सामावले जावे, आपले सर्व व्यवहार, पासवर्ड पारदर्शक असावेतचा आग्रह नवीन आहे, आपली पत्नी तिने मिळवलेल्या पैशाचा हिशेब देत नाही, परंतु आपल्या हिशेबावर तिची नजर असते – या सगळ्यामुळे पुरुषांना असुरक्षित वाटत आहे. म्हणूनच आता गरज आहे ती अनुक्रियेची..

पुरुषांचा प्रकर्षांने आढळणारा दोष म्हणजे आधी चूक करायची. मग ती निस्तरण्यात पुष्कळ यातायात करायची आणि मग मी कसा गुंता सोडवला याच्या फुशारक्या मारायच्या! माझा एक मित्र चेनस्मोकर होता. दिवसात ३०-४० सिगारेट सहज ओढीत असे. त्याचे आई-वडील, पत्नी सगळे बोलून थकले पण त्याच्यावर परिणाम शून्य. एक दिवस अशीच पैज लावली. तो म्हणाला, ‘‘ह्य़ा सिगारेट काय मी मनात येईल त्या क्षणी सोडू शकतो.’’ आम्ही मित्र म्हणालो ‘‘तू सोडू शकतोस हे आम्हाला मान्यच आहे. प्रश्न तू काही दिवसांनी परत सुरू करतोस हा आहे. सोडायची असेल तर एकदाच काय ती आयुष्यभरासाठी सोडायची.’’ तो म्हणाला, ‘‘ठीक आहे. पण त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार?’’ ‘‘जे मिळवण्यासाठी माणसं अनेक प्रयत्न करतात आणि आजपर्यंत तुला कोणीही न दिलेली अत्यंत मोलाची गोष्ट देऊ.’’ त्याचे प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीचे काही दिवस वियोग लक्षणांचा विलक्षण त्रास झाला. मग डॉक्टरांनी त्याला निकोटीनचे चिंगम दिले. तरीही त्रास चालूच. मग त्याला मनोविकार तज्ज्ञाकडे जावे लागले. मग हळू हळू गुण येऊ  लागला, त्रास कमी झाला. पण मानसिक ओढ तशीच होती. जेवण झाल्यावर सुरसुरी येई, चहा घेतला की सिगारेट आठवते म्हणून त्याने चहा पिणे बंद केले. सकाळी अस्वस्थ वाटायचे म्हणून पत्नीबरोबर पहाटेचे फिरणे चालू झाले. कपडय़ांना सिगरेटचा वास जाऊन धुण्याच्या पावडरचा वास येऊ  लागला. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत त्याच्याकडे पाठ करून झोपणारी पत्नी कुशीवर वळली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचा कामाचा उरका वाढला. एका जागी स्थिर बसून तो काम करू लागला. रक्तदाबाची गोळी बंद झाली.
त्यानंतर एक वर्ष आम्ही हा विषय काढलाच नाही. पण एक दिवस तो म्हणाला- ‘‘दोस्तहो मी जिंकलो. आता मला काय देणार होतात ते द्या.’’ आमच्यातला एक जण म्हणाला, ‘‘अरे मित्रा आपले आयुष्यभरासाठी ठरले होते! म्हणजे तुला तिरडीवर बांधतील तोपर्यंत तू सिगरेट ओढली नाहीस तर आम्ही भेट देऊ आणि खर सांगायचं, तर आम्ही तुझे स्वास्थ्य तुलाच मिळवून दिलंय. आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त जीवन तुला लाभणार आहे.’’
अरेच्या, मी इतका त्रास सहन केला, मोहावर मात केली त्याचे काहीच मोल नाही का? का नाही? तू फक्त सिगारेट बंद केलीस आणि तू आणि वाहिनी अधिक जवळ आलात, भांडणाचा निदान एक तर विषय संपला, कामात एकाग्रता आली. आता तुझी छाती घरघर वाजत नाही, तुझा दम वाढला आहे, चेहरा उजळला आहे. बीपीची गोळी बंद झाली, अजून कोणती मौल्यवान गोष्ट तुला हवी रे?
तरीही तो म्हणालाच, ‘‘मी होतो म्हणून कायमची सोडली, दुसऱ्या कोणाला हे शक्यच झाले नसते.’’
आम्ही म्हणालो, बघ मुळात सिगारेट ओढणे वाईट, त्याचा अतिरेक करणे त्याहून वाईट. त्यावर जीवन अवलंबून राहणे भयंकर. तिच्यामुळे नातेसंबंधात दरार पडणे त्याहूनही भयंकर. बरे हे सगळे तूच ओढवून घेतलेस. सिगरेटला तू तुझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनवलेस आणि त्या सवयीला तू घट्ट पकडून ठेवलेस आणि आता सोडलेस. छान, पण त्यात अभिमान वाटण्यासारखे काय? तू दक्षिणेकडे तोंड करून होतास आता उत्तरेकडे तोंड केले आहेस. शाळेत आपल्याला पीटीच्या वर्गात आज्ञा मिळते ना तशी तू तुझ्या मनाला आज्ञा दिलीस अबाउट टर्न आणि तू उत्तरोत्तर शारीरिकदृष्टय़ा सक्षम झालास. ही तुझी तुझ्या मनाला दिलेली आज्ञा होती. कितीही सुरुवातीला त्रास झाला तरी नेकीने तू ती आज्ञा निभावून नेलीस आणि फक्त परमेश्वर देऊ  शकतो ते शारीरिक स्वास्थ्य तुला मिळाले. यापेक्षा मोठी आणि मौल्यवान भेट कोणती असणार आहे? अरे सद्गृहस्था रोज १५० मिनिटांप्रमाणे ३६५ दिवस इतके तुझे स्वस्थ जीवन वाढले आहे. ये काफी नाही क्या?
त्याची गोष्ट मी माझ्या व्याख्यानात सांगतो. आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया विचारतो. अनेकदा येणाऱ्या प्रतिक्रिया सरधोपट असतात. कुणी म्हणते त्याचे पैसे वाचल्याचे का सांगितले नाहीत? त्याला हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता कमी झाली हे का विचारले नाहीत. म्हणजे होतं काय मूळ मुद्दा राहतो बाजूलाच.
मग मला सांगावे लागते, आपण सगळे माणूस म्हणून जगत असताना स्वत:कडून, इतरांकडून आणि एकुणातच परिस्थितीकडून आपल्या मनातले घडावे असा आग्रह धरत असतो. आणि स्वत:च स्वत:च्या परीक्षेत नापास झालो तर नैराश्य येते, आपण कुचकामी आहोत, नालायक आहोत असे वाटू लागते. इतरांनी म्हणजे तो सहकारी असेल किंवा वरिष्ठ अधिकारी, आई-वडील असो वा मुलं-मुली आणि अर्थातच पत्नी आपल्या इच्छेप्रमाणे वागले नाहीत तर तळपायाची आग मस्तकात जाते. कित्येकदा या माणसांना बदलवणे शक्य नाही याचाच त्रास होतो. शिवाय परिस्थितीबाबतही आपण आग्रही असतो. तापमानाचा पारा सरासरीच्या वर जाताच कामा नये, पाऊस वेळेवर सुरू होऊ न पुरेसा झाल्यावर थांबलाच पाहिजे हे आग्रहाने मांडत असतो. या विचारात आजचा मध्यमवयीन आणि काही प्रमाणात तिशीतला पुरुष अडकला आहे. आणि त्यातून त्याची प्रतिक्रिया देण्याची रीत अधिक आक्रमक आणि समोरच्या माणसाला गृहीत धरून असणारी आहेत. गेल्याच आठवडय़ातील घटना. ‘मोदी विजय’ साजरा करण्यासाठी आमच्या सोसायटीने पावभाजी आणि आइस्क्रीमची पार्टी केली. त्यात एक सद्गृहस्थ जोराने बडबडत होते. ‘अरे मोदी काय जादूची कांडी आहे?’ सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट बोलून आपल्याकडे लक्ष वेधायचा हा प्रयत्न! न सांगता प्रतिक्रिया आपोआप बाहेर पडतात.
आपल्या प्रतिक्रिया सामान्यत: निसर्ग म्हणजे आपल्या शरीरातील जनुके आणि त्यांच्या प्रतिसाद देण्याच्या पद्धती, त्याच्यावर घडलेले संस्कार, त्याच्या आसपासची संस्कृती आणि त्याचे या पृथ्वीतलावर एकमात्र असणे अशा विविध घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या प्रतिक्रिया आपोआप बाहेर पडतात. या प्रतिक्रियेचे काय काय परिणाम होऊ  शकतील याची दखलही घेतली जात नाही. आणि आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या सवयींवर त्या माणसाला समाज एक लेबल चिकटवत असतो. हा तापट, हा टीकाकार, हा निंदक, हा मनमोकळा वगैरे. अनेकदा प्रतिक्रिया देण्याची सवय म्हणजे पूर्ण माणूस असा अर्थही अडकवला जातो.
या  सगळ्यातून बाहेर पडायचे आहे? नक्की शक्य आहे. फक्त १८० अंशात वळा. बघण्याची दिशा बदलली की दृश्य बदलेल. अरेच्चा, हे पूर्वी माझ्या मनात कसे आले नाही असा प्रश्न पडेल. पण याकरता आपल्या मनात असलेली, भिनलेली विचारप्रणालीच बदलायला हवी. माझा मित्र तन्मय नेहमी सांगतो, ‘माणूस परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकला की त्याच्या विचारप्रणालीत ‘मनाच्या आज्ञा देण्याच्या प्रणाली’त आपोआप पण मंद गतीने बदल हा होतच असतो. त्याला जर प्रयत्नांची जोड मिळाली आणि विचारप्रणालीत बदलाची ओढ वाटू लागली की बदल कसे झपाटय़ाने होतात ते पाहत राहावे!
समकालीन पुरुषापुढे साधारणपणे पुढील आव्हाने आहेत. एक : वाढती महागाई, चैनीच्या वस्तू गरज बनणे, शिक्षणाच्या विशेषत: उच्च शिक्षण खर्चीक, सुरक्षित गुंतवणुकीवर कमी व्याज, घर कर्ज आणि इतर खाजगी देणीघेणी या आव्हानांमुळे मराठी भाषेत तो अतिरेकी स्पर्धक वृत्तीचा झाला आहे तर बहुसंख्य सरकारला, नशिबाला बोल लावत क्रियाहीन बनले आहेत. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ म्हणत पाटय़ा टाकत कामे करीत आहेत. स्त्रियांना विशेष आरक्षण, मागासवर्गीयांना कमी गुणात होणारी शैक्षणिक पात्रता, परदेशाचे वारेमाप आकर्षण त्याला एकाच वेळी रबरासारखे ताणतात आणि ताण असह्य़ झाला की रबर सुटल्यावर जसा फटका लागतो तसा फटका बसल्यावर विव्हळतात ही समस्या आहे. आपल्यापेक्षा कमी वयाची, कमी शिकलेली, कमी पगार असलेली मुलगी पत्नी झाल्यावर आपल्या मनातील प्रतिबिंबापेक्षा वेगळेच काहीतरी घरात आले आहे आणि एकवेळ शारीरिक मीलन होईल, पण मानसिक मीलन होणे अवघड होऊ  लागले आहे. आपल्या लेखी बुद्धीने, अनुभवाने आणि शिक्षणाने कमी असलेली शंभरदा विचार करून निवडलेल्या पत्नीच्या स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्यक्षपणे अनुभवताना कठीण होत आहे. कार्यालयात डोळ्यासमोर स्त्रीवर्गाला दिले जाणारे प्राधान्य, स्त्री कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा व त्यांना मिळणारी वेतनवाढ किंवा श्रेणीतील वाढ जाचक वाटू लागली आहे. सध्या अस्तित्वात असलेले सर्व नातेसंबंधातील कायदे स्त्रियांच्या बाजूला झुकलेले आहेत याची सूक्ष्म भीतीही मनात डोकावत आहे. घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय तिच्या संमतीशिवाय घेता येत नाहीत ही बोच आहेच, परंतु त्यापेक्षा जास्त त्रास पत्नीच्या माहेरच्या व्यक्तींचा दोघांमधील व्यवहारावर देखरेखीचा आहे. त्याला नव्या मुलींची मानसिकताच समजत नाहीये. त्यांची मूल्ये काय आहेत ते उलगडत नाही. मुला-मुलीशी संवाद करायला त्यांना वेळ नसतो, आई-वडील हयात असतील तर तब्येतपाणी याच्यापलीकडे संवादच नाही.
तरुण मुले अस्वस्थ आहेत. नवविवाहित पत्नीच्या कल्पनांपुढे हतबल आहेत, मध्यमवयीन पुरुषांच्या बायका अचानक स्पष्टवक्त्या कशा झाल्या, प्रत्येक बाबतीत त्यांना सामावले जावे, आपले सर्व व्यवहार, अगदी एटीएमचं पिन कोड, आणि पासवर्ड पारदर्शक असावेत असा त्यांचा असणारा आग्रह नवीन आहे, आपली पत्नी तिने मिळवलेल्या पैशाचा हिशेब देत नाही परंतु आपल्या हिशेबावर तिची नजर असते – या सगळ्यामुळे पुरुषांना असुरक्षित वाटत आहे. म्हणूनच समोरची व्यक्ती ही अशी आहे. मग आपण प्रतिक्रियेत अडकायचे का १८० अंशात वळून अबाउट टर्न करायचे हा निर्णय…याची पुरुषांवर वेळ आली आहे.
मी पुरुष आहे म्हणून माझे तोंड ज्या दिशेला आहे त्याच दिशेने चालणार हा हेकटपणा सोडण्यावाचून गत्यंतर नाही. साधी सिगारेट सोडताना कितीतरी त्रास होतो तर वर्षांनुर्वष निसर्ग-संगोपन-संस्कृती आणि आपले म्हणून वेगळे असते त्या विचारप्रणालीला वळवायला कठोर होणे क्रमप्राप्त आहे.
प्रतिक्रिया देण्याचे सोडून आता संभाव्य घटनेचा किंवा परिस्थितीचा आधीच अंदाज घेऊन आपल्याला कमीतकमी त्रासदायक ठरेल अशी क्रिया म्हणजे परिस्थितीस अनुरूप क्रिया, ‘अनुक्रिया’.      (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2014 1:01 am

Web Title: when men feel insecure from wife
टॅग Chaturang,Men
Next Stories
1 विदर्भीय झटका, चवीचा ठसका
2 हारी बाजी जितना..!
3 देता मातीला आकार : सृजनशील घडण
Just Now!
X