07 April 2020

News Flash

प्रयोगशील पालकत्व : डोळे भरून पाहू तुज..

किती तरी गोष्टी पुस्तकातून शिकवताना तो अनुभव मुलांना द्यायचा असतो. पण हे घडलं नाही तर अनुभवातून तरी हे घडू दे असं शाळेला वाटू लागलं,

| December 20, 2014 01:01 am

किती तरी गोष्टी पुस्तकातून शिकवताना तो अनुभव मुलांना द्यायचा असतो. पण हे घडलं नाही तर अनुभवातून तरी हे घडू दे असं शाळेला वाटू लागलं, त्यातूनच एक  नवी संकल्पना प्रत्यक्षात आली. मुलांनी प्रत्यक्ष या शाळेला भेट देऊन आगळा अनुभव घ्यावा, असा उपक्रम आकारू लागला.
अ नेक जण भेटायला येऊ लागले. अनेक जण खास शाळा पाहायला येऊ लागले. अनेकांचे फोन येऊ लागले. ईमेल येऊ लागले. शाळेला आनंद होत होता. कारण शाळा ही दिव्याच्या प्रकाशासारखी असते, दीप- असते. हा टय़ूब बल्बचा प्रकाश नसतो. दिव्यानं दिवा लागतो. ही शाळा मनात म्हणते ‘कोणी काय, कोणी काय, इथून घेऊन जातं. तरी इथलं संपत नाही. नेणाऱ्याला वाटतं खूप काही मिळालं आणि माझं काहीच जात नाही, येऊ दे इथे. शाळा म्हणजे प्रत्येक गावातलं श्रद्धास्थान असावं.’
 त्यामुळे या शाळेनं आता हे आपलं कर्तव्यच मानलं. यावं मुलांनी. अनुभवावं. पाहावं. संवेदनशील व्हावं. जाणिवा घेऊन जाव्या. अनुभवापासून लांब जाणाऱ्या मुलांना एका वेगळ्या प्रवासाचा अनुभव द्यायचं या शाळेनं ठरवलंच आता आणि ही शाळा इतरांना सांगू लागली, ‘नुसतं भोज्याला शिवण्यासाठी येऊ नका. या. पाहा. येथे राहा. हे घर तुमचंच आहे.’
‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना म्हणणाऱ्या मुलांनी प्रेमाचा, निसर्गातला साक्षात्कार कधी अनुभवलेलाच नसतो. शहरांची बकाल शहरं नि खेडय़ांची शहरं झालेल्या वातावरणात शब्द कोरडे होतात नि अनुभव निसटून जातो. प्रतिज्ञेलाही अर्थ उरत नाही नि राष्ट्रगीताला दोन मिनिटं स्तब्ध उभं राहवत नाही.

शहरात-गावात असून मुलांना पाहण्याची दृष्टी दिली जात नाही ती आपण देऊ या असा विचार शाळेनं केला. गाय वासराला दूध पाजताना तिच्या डोळ्यातलं वात्सल्य पाहावं मुलांनी. झाडावरची फळं आपल्या हातांनी तोडून खाताना, झाडाची काळजी कशी घ्यायची हेही कळू दे मुलांना. आपण अन्न वाया घालवतो तेव्हा किती तरी मुलांना जेवायला नसतं हे सांगायला हवं मुलांना. आपली कामं आपण करायची सवय लागू दे मुलांना. कामात सगळ्यांचा सहभाग असला तर केवढं तरी काम होतं हे समजू दे मुलांना. किती तरी गोष्टी पुस्तकातनं शिकवताना तो अनुभव द्यायचा असतो हे घडलं नाही तर अनुभवातून हे घडू दे, असंही शाळेला वाटू लागलं, त्यातूनच एक  नवी संकल्पना प्रत्यक्षात आली.
आता कुठूनही आणि कोणीही मुलं २० ते ५०च्या गटानं इथं येतात. दुपापर्यंत शाळेच्या दारात आल्यावर एका सुंदर खेळानं शाळा या मुलांचे औक्षण करते. मग जेवण. पण कुणी वाढायला येत नाही इथं. आपलं आपण वाढून घ्यायचं आणि अन्नच काय पण पाण्याचा थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही हे इथली मुलंच सांगतात. बदाबदा पाणी ओतणारी मुलं जेव्हा ‘पाण्यामुळे’ डोळ्यात पाणी कसं येतं हे अनुभवतात, तेव्हा पाणी वाया घालवायचं नाही हे वेगळं सांगावं लागत नाही मुलांना. तोंडी अनेकदा सांगूनही उपयोग होत नाही पण प्रत्यक्ष इथे पाहून, अनुभवून मुलं अन्न-पाणी यांची नासाडी याबाबत विचार करायला लागतात. कदाचित फार काळ हे टिकतं असं नाही पण निदान जाणीव तरी होते.
कुणाची व्यवस्था कुठे केली आहे हे इथली मुलंच इतर आलेल्या मुलांना दाखवतात. आता असते परिसराची फेरी. कितीतरी प्राणी-पक्षी-वनस्पती मुलं पाहतात नि अनेक विलक्षण घटना त्यांच्यात उत्साह जागवतात. या निसर्गाच्या विश्वातही किती गमती-जमती घडतात. पडद्यावर पाहणं नि प्रत्यक्षात अनुभवणं यातला फरक मुलांना पायी प्रवास करण्यात सुलभता आणतो. जंगलच्या जंगल मुलं पालथं घालतात. अनेक गोष्टी जमवतात. परत येतात तेव्हा सूर्यास्त त्यांना बोलवतो. सगळ्या दमलेल्या मुलांना पाहून शाळा त्यांना आपल्या व्हरांडय़ाच्या कुशीत घेऊन गप्प होते. शरीरातून घाम जाणं, पायी प्रवास यामुळे कडाडून भूक लागलेली मुलं चुलीवरच्या खमंग भाकरीच्या वासाने चुलीभोवती गोळा होतात. नि हातावरची भाकरी आपल्याला थापता येते का याचा प्रयत्न करतात. कुणी पीठ तसंच हळूच खातं.
इथे ‘आई स्वयंपाक करताना’ पाहून मला काय वाटतं यावर गप्पा होतात. अगदी सगळी मुलं आईचं यथास्थित वर्णन करतात. शेवटी ही शाळा मुलांना प्रश्न विचारते, ‘तुम्ही या सगळ्यात आईसाठी काय करता?’ मुलांकडे उत्तर नसलं तरी मनात मात्र मुलं काही ना काही ठरवतातच. रात्री पटांगणात शेकोटी पेटते नि ढोलकी, संबळ, शेकोटीला ताल देते. हातात हात गुंफले जातात नि फेरात लोकनृत्याला सुरुवात होते. ‘हे खूप कठीण आहे,’ मुलं मनात म्हणत असतात पण एकदा ठेका धरला की, आपोआप सगळं सोपं होऊन जातं.
 दिवसभरचा शिणवटा घालवण्याची वेळ येते. मात्र, आपलं अंथरूण आपणच घालून झोपी जायचं असतं नि सकाळी उगवतीचा सूर्य पाहायला सज्ज व्हायचं असतं. अथांग समुद्र हा अरबी समुद्र आहे हे कुठं मुलांना सांगता येतं! समुद्राशी खेळणाऱ्या माणसांना भरती-आहोटीचं गणित सुटलेलं पाहून मुलं त्यांच्याशी गप्पा मारतात. अडीचकी, पाऊणकीपर्यंत पाढे शिकलेली ही माणसं तंतोतंत ‘सम’ सांगतात. वाळूत खेळायला मज्जा येते. चिकट झालेलं अंग पुन्हा शाळेच्या शेजारच्या तळ्यात उडय़ा मारून मुलं स्वच्छ करतात. उंचावरून धडाधड उडय़ा टाकण्यातली मजा, भीती! मुलांना समजतच नाही वेळ कसा संपला तो! मग न्याहारी होते मऊ भात, आंबील यांची!
दुपारचं जेवण होतं. आता मुलांना काही कौशल्यविकसनासाठी उपक्रम दिले जातात. मूलभूत तंत्र दिलं जातं. मग मुलं मुलांच्या विचाराने अनेक गोष्टी बनवतात. हे मी तयार केलं याचा आनंद काय वर्णावा. जमिनीतलं पाणी कसं शोधायचं, उत्तर कसं बनवायचं, सुतारकाम, मातीची भांडी बनवायच्या चाकावरचं काम.. अशा किती तरी गोष्टी मुलं प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात. मुलांना या कार्यशाळेतून उठावंसंच वाटत नाही. परिसरातले अनेक कारागीर, कुशल व्यक्ती इथे स्टॉल लावून उभ्या असतात. हा स्टॉल त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या कौशल्यांचा असतो. शहरात मुलं प्रदर्शनातल्या स्टॉलवर फिरतात. तशी इथे अनेक कलाकुसर येणारी माणसं उभी असतात. ज्याला जे आवडेल त्यानं ते शिकायचं. त्यासाठी लागणारी साधनं या शाळेतच मिळतात. कारण मुलांनीच दुकान चालवायला घेतलंय. विद्यार्थी भांडार.
दुपारचा हर्बल टी होतो आणि मग आलेले शिबिरार्थी गावागावात जातात. गावाची व्यवस्था बघतात. संस्कृती समजून घेतात. ग्रामस्थांशी गप्पा मारतात. हे सर्व चालतच करायचं असतं. संध्याकाळ होते नि मुलं पुन्हा कँप साइटवर येतात. दमलेली असतात, थोडी. पण इतकं वेगळं बघितलेलं असतं की, मनात सगळं आठवताना, साठवताना रात्र होते. रात्रीचे जेवण नि गाढ झोप. गादी आहे का, उशी आहे का याची आठवणही होत नाही.
आता जायचा दिवस उजाडतो. आलेल्या मुलांसाठी अनुभवावर आधारित विषयाची मांडणी केली जाते. विषयाच्या आवडीनुसार गट होतात. नकळत सगळ्या गोष्टींची नोंद होते. अपेक्षा आणि परिपूर्ती यावर मुलांची मतं अजमावली जातात. हे सारं काम कागदावर होतं, त्यामुळे आपापल्या घरी जाताना मुलांचा एक प्रोजेक्टच तयार होतो. आईवडिलांना बघता पण येतं मुलांनी काय काय केलं ते!
अशी ही शाळा प्रवासाची गंमत आता खूप मुलं लुटू लागली आहेत. येताना साशंक असतात पण जाताना खूप आठवणी घेऊन जातात. तेव्हा ही शाळा आनंदाच्या पावसात चिंब भिजत असते. कारण ‘आपल्या जवळ जे आहे ते आपल्यापुरतं न राहता सर्वाना मिळालं तर काय होतं?’ असं या शाळेला वाटतं, माहितीची देवाण घेवाण होते. या शाळेलाही याचा फायदा होतो. मुलांना व्यक्त व्हायला संधी मिळते. एरवी खेडय़ातल्या मुलांना स्वाभाविकपणेच शहरातल्या मुलांचं आकर्षण असतं नि स्वत:बद्दल न्यूनगंड असतो. बरीच गरीब मुलं शहरी झकपकपणाला घाबरतात. या निमित्ताने शिबिरासाठी आलेल्या मुलांबरोबर या मुलांचा संवाद होतो. आपल्यातल्या चांगल्या गोष्टींची जाणीव या शाळेतल्या मुलांना होते. त्यांच्यातला न्यूनगंड कमी व्हायला मदत होऊ लागते.
ही शाळा सगळ्याच मुलांना सांगते, आता आपण इतर गोष्टी, स्थळं, मॉल, थंड हवेची ठिकाणं पाहायला जातो तसंच आपण जिथे घडतो ती वेगळी ठिकाणं पाहू या. ही शाळा म्हणते, आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या रंगांची माती आहे. पाहण्यातून, प्रत्यक्ष अनुभवातून खूप शिकता येतं हा विश्वास शाळेच्या या खास निमंत्रणातून सगळ्या मुलांना मिळतो. शाळेने तेवढं नक्की करून ठेवलंय.(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2014 1:01 am

Web Title: when school talk with students
Next Stories
1 बोधिवृक्ष : निश्चयाचा महामेरू
2 रुग्णसेवेचा वसा
3 चतुरंगमध्ये(२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध झालेल्या ‘जिणे वैधव्याचे’ या लेखावरच्या या प्रतिक्रिया कडवट अनुभव सुसह्य़
Just Now!
X