या गोष्टी आजही अनाकलनीयच भासतात. काय गंमत आहे पाहा, ‘माणूस जन्माला येणार असतो, त्याची चाहूल नऊ महिने आधीच लागते, पण जेव्हा तो या जगातून कायमचा निघून जाणार असतो तेव्हा काही वेळा त्याची चाहूल लागतच नाही.’ शेजारील माणसाला त्याच वेळी काळझोप लागते किंवा माझ्यासारखीच उठून दूर जाण्याची बुद्धी होते..
अतो दिवस आठवला की अजूनही मनात धस्स होतं. चार महिने झाले त्याला, पण ती गोष्ट काही मनातून हलत नाही. एखाद्या दारामागे कोंडलेल्या मुलीप्रमाणे दरवाजा खटखटवते. मग रुखरुख लागून राहते.
त्या दिवशी सकाळीच मी पुण्याला पोहोचले होते. तडक आजीच्या घरी गेले. घरात फक्त आजी आणि नर्सबाई दोघीच होत्या. आजी पलंगावर झोपली होती. माझी चाहूल लागली तशी खूश झाली. नर्सबाईंनाही बरं वाटलं. मला म्हणाल्या, ‘‘बरं झालं आलीस तू. सकाळपासनं पोटात काही नाही. डॉक्टरांना बोलवायला हवंय. पण मी निर्णय कसा घेणार? तू आलीयेस, आता तूच ठरव.’’ तडक मी आजोबांना फोन लावला. मामा-आजोबा समोरच्याच बंगल्यात राहतात. लगोलग ते आले तसे आम्ही दोघे अॅम्ब्युलन्स आणायला म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांना तब्येतीची सर्व कल्पना दिली. तब्येत अगदीच ढासळल्याचंही सांगितलं. गोळ्या घेऊन आम्ही घरी आलो. नर्स बाईंनी खीर पाजली होतीच. आजोबांचा त्या बाईंवर फारसा विश्वास नव्हता, केवळ नाइलाजास्तव तिला कामावर ठेवलं होतं. त्यामुळे, ‘आजीला गोळी तूच दे’ असं त्यांनी मला निक्षून सांगितलं. मीदेखील त्यांच्या समोरच आजीला गोळी दिली आणि मग तिला झोपवलं. जेवण उरकून आजोबा त्यांच्या घरी गेले. आदल्या दिवशीच परीक्षा संपलेली आणि त्यात पहाटेच सहा वाजता घरातून बाहेर पडल्यामुळे आता मलाही झोप येऊ लागली. ऑक्सिजन मशीनची असह्य़ घरघर चालू होती. पण त्यातही मला झोप येईलसं वाटू लागलं. आजीचं विव्हळणं चालूच होतं. तिला त्या ऑक्सिजन मशीनचा फार त्रास होत असे. ती सारखा तो मास्क काढूनच टाकायची. डोकं दुखतं म्हणायची. पण ते तितकंच गरजेचंही होतं हे तिला ती स्वत: नर्स असूनही का कळत नव्हतं देवच जाणे. आता ती सारखीच मास्क काढायला लागली. त्यामुळे नर्सबाई मला म्हणाल्या, ‘प्रतिमा, सध्या ऑक्सिजन बंद कर. रोज आम्ही एक तासच लावतो. आज तू आलीयेस म्हणून दोन तासभर लावून घेतलाय त्यांनी. जरा झोप काढू दे त्यांना. मग परत लावू आपण.’ खरंतर तो ऑक्सिजन मला काढायचाच नव्हता. पण आजीचा त्रासही बघवत नव्हता. मी ऑक्सिजन मशीन बंद केली. मशीनची घरघर थांबली तसं आजीला शांत वाटलं. मी बेडवर जाऊन पडले. माझा डोळा लागणार इतक्यात आजीने हाक मारली. बघते तर काय.. आजी उठून बसली होती.. अगदी फ्रेश दिसत होती. तिने माझ्याकडे माझ्या आईविषयी चौकशी केली. दोन शब्द बोलली. खरं तर त्याक्षणी तिला इतकं फ्रेश बघून मलाच खूप हुरूप आला. आता आजी ठणठणीत बरी होणारच, अशी खात्री पटली. थोडय़ा वेळाने ती परत आडवी झाली आणि छताकडे बघायला लागली. मी तिच्या जवळ जाऊन बसले. तिचा चेहरा अगदी निर्विकार नि स्तब्ध होता. अगदीच शांत भावनाशून्य भासावा असा. मी विचारलेल्या प्रश्नांची केवळ मानेनंच ती उत्तरं देत होती. आत चटईवर नर्सबाई झोपल्या होत्या. त्यांनी आवाज दिला, ‘‘आजीला झोप लागली काय गं?’’ मी पटकन बोलून गेले, ‘‘शांत आहे ती. आता लागेलच झोप.’’ थोडय़ाच वेळात नर्सबाई चहा करायला उठल्या. चहा म्हणजे आमच्या आजीचं आवडतं पेय! हॉस्पिटलमध्ये हिला दूध नको पण चहा पहिला हवा असे!
नंतर का कुणास ठाऊक मी उठून गॅलरीत गेले आणि स्तब्ध उभी राहिले. बधिर झाल्यासारखी! नर्सबाईंनी मला चहा आणून दिला. त्या चहाचा एक घोटही घेतला नाही तोच त्या आजीच्या नावाने जोरात हाका मारू लागल्या. मीही चहा तशीच ठेवून पळाले. त्यांनी मानेनेच ‘नाही’ म्हणून खुणावले. सगळाच खेळ संपला होता. आजी गेली होती. पुढे सर्वकाही विधिवत करण्यात आलं. पण त्याक्षणी जे प्रश्न मला पडले ते आजही तसेच आहेत. कधी कधी वाटतं की मी ऑक्सिजन बंद करायलाच नको होता. पण लोक म्हणतात, ‘व्हायचं ते होतंच.. प्रारब्ध टळत नाही.’ त्या वेळी आजी सतत तिच्या बोटाला लावलेल्या ऑक्सिजन मोजणी यंत्राकडे बघत होती. ती नर्स होतीच. साहजिकच आपल्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाला आहे, त्यामुळे आपण मास्क काढून टाकणं अयोग्य आहे हे तिला कळत होतं आणि तरीही ती तसंच करत राहिली. याचा अर्थ ती स्वत:च या सर्व गोष्टींसाठी तयार होती का? मध्येच ती उठून बसली होती. फ्रेश वाटत होती. हाच अनुभव मला माझ्या आजोबांच्या वेळीही हल्लीच ऐकायला मिळाला. दिवा विझायच्या आधी ज्योत जशी भडकते तसंच काहीसं झालं होतं.. पण या गोष्टी आजही अनाकलनीयच भासतात. माणूस सर्व शक्ती एकवटून उभा राहतो त्या वेळी त्याला समोर उभा ठाकलेला काळ दिसत असेल काय? काय गंमत आहे पाहा, ‘माणूस जन्माला येणार असतो, त्याची चाहूल नऊ महिने आधीच लागते, पण जेव्हा तो या जगातून कायमचा निघून जाणार असतो तेव्हा काही वेळा त्याची चाहूल लागतच नाही.’ शेजारील माणसाला त्याच वेळी काळझोप लागते किंवा माझ्यासारखीच उठून दूर जाण्याची बुद्धी होते. आजही मला काहीच कारण नसताना मी गॅलरीत जाऊन स्तब्ध उभी का राहिले हे कोडं उलगडलेलं नाही. कदाचित मी माझ्या आजीला सोडणारच नाही अशी भीती वाटली असावी काळाला! पण आजही मी त्याला ओरडून सांगेन, ‘मी तुला माझी आजी दिलेलीच नाही, तिला मी माझ्या हृदयात जपून ठेवलंय. आणि तुला तिथून तिला न्यायचं असेल तर तुला माझं हृदयच न्यावं लागेल!’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 18, 2014 1:02 am