जेव्हा सामाजिक, राजकीय, आíथक समस्यांकडे उर्दू ग़ज़्‍ाल वळली तेव्हा तिच्यातला रोमँटिसिझम अस्तंगत होतो की काय? असे वाटत असतानाच परवीन शाकिरची रेशीमस्पर्शी ग़ज़्‍ाल उर्दू साहित्य क्षितिजावर गंधाळली अन् फैजच्या शब्दात सांगायचं तर निष्पर्ण वैराणात हळुवार वसंतवारा वाहू लागला.
गो ष्ट १९७५-७६ मधील मार्च महिन्यातली असावी. दिल्ली येथे दिल्ली क्लॉथ मिलतर्फे इंडो-पाक मुशायरा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष होते ग़ज़्‍ालकार    फिराक गोरखपुरी. मार्च महिना असूनही बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. पेंडॉल गळत होता. पण हजार श्रोते तशातही मुशायरा सुरू होण्याची वाट पाहत होते..
     तोच एका नव्या पाकिस्तानी कवयित्रीला सूत्रसंचालकाने ग़ज़्‍ालवाचनासाठी आमंत्रित केले. एक हाडकुळी, सावळीशी पंचवीस-सव्वीस वर्षांची मुलगी माइकसमोर आली अन् प्रभावी आवाजात तिने आपल्या ग़ज़्‍ालचा मतला ऐकविला.
पाब-गिल सब है, रिहाई की करें तदबीर कौन?
दस्त-बस्ता शहर में खोले मेरी जंजीर कौन?
(दलदलीत सारेच फसले आहेत, बाहेर निघण्याचा उपाय कोण सांगू अथवा करू शकेल? साऱ्यांचेच हात बांधले आहेत. अशात शृंखलाबद्ध असलेल्या मला शृंखलामुक्त कोण करील?)
    हा शेर तत्कालीन पाकिस्तानी राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीवर केलेले प्रतीकात्मक भाष्य होते. श्रोत्यांना जाणवलं की थोडय़ाबहुत फरकाने हा शेर इथल्याही वातावरणास लागू पडतोय अन् त्यानंतर तिच्या प्रत्येक शेराला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. ही मुलगी ‘परवीन शाकिर’ होती. जिने उर्दू कवयित्रींना त्यांची हिसकावली गेलेली भाषा परत मिळवून दिली. यापूर्वी उर्दू कवयित्री पुरुषी भूमिकेतून लिहीत असत. परवीनने स्त्रीमनाच्या विशेषत: तरुणी कुमारिकांच्या प्रेमविषयक, देही आकर्षणाच्या सुप्त भावनांना नि:संकोचपणे काव्यरूप दिलं. अन् अर्थातच, रूढीप्रिय समाज प्रथमत: विस्मयचकित झाला. भानावर आल्यावर खवळला- त्यांच्या भडकण्यास कारणीभूत ठरलेले काही शेर पाहा.

हुस्न को समझने को उम्र चाहिये जानाँ
दां घडी की चाहत में लडकियाँ नहीं खुलती
(मुलींचं आंतरिक सौंदर्य कळायला तुला आयुष्य घालवावं लागेल, प्रेमातील दोन-चार भेटीत मुली मन मोकळं करीत नसतात.)

उसके ही बाजुओं में और उसको ही सोचते रहे
जिस्म की ख़्वाहिशों पे थे रुह के और जाल भी
(त्याच्या मिठीत असूनही, त्याचाच विचार, देहाच्या इच्छांवर आत्म्याचं जाळंही परसलेले होतं.)
ये क्या कि वो जब चाहे मुझे छीन ले मुझसे
अपने लिए वो शख़्स तडपता भी तो देखूं

बदन के कर्ब की वो भी न समझ पाएगा
मं दिल में रोऊँगी, आँखों में मुस्कुराऊँगी
 
अब भी बरसात की रातों में बदन टूटता है
जाग उठती है अजब ख़्वाहिशें अंगडाई की
   वरील शेर स्पष्ट आहेत. इतक्या निर्भीडपणे तारुण्यगंधा उर्दूत तरी कधीच बहरली नव्हती. परवीनची शायरी टीकेचा विषय झाली, पण त्या शायरीतील भाषा, विचार, कल्पनाशैली टवटवीतपणा आहे हेदेखील समीक्षकांनी मान्य केलं.
    परवीन शाकिरने लहान वयात लिहायला सुरुवात केली. वयाच्या चोविसाव्या वर्षीच तिचा पहिला काव्यसंग्रह खुशबू (१९७६) प्रकाशित झाला अन् हातोहात विकला गेला. अन् ती किश्वर नाहीदच्या परंपरेतील लक्षणीय कवयित्री म्हणून विख्यात झाली. त्यानंतर सदबर्ग (शतदल – १९८०) खुदकलामी (आत्मसंवाद – १९९०) संग्रह तिच्या प्रगल्भ काव्यदृष्टीचे द्योतक म्हणता येतील.
     परवीनचे वडील सय्यद शाकिर अली मूळचे पटना (बिहार)चे, स्वातंत्र्यपूर्व काळातील संमिश्र संस्कृतीत वाढलेले त्यांचे घराणे असल्याने, अन्य उर्दू लेखकांप्रमाणे परवीनला देखील श्रीकृष्ण, गंगा इत्यादीबद्दल सश्रद्ध आत्मीयता होती. श्रीकृष्णांबद्दल लिहिताना तिने सहले- मुम्तना म्हणजे  सुबोध भाषेचा अवलंब केला आहे. सलमा-कृष्ण या कवितेच्या काही ओळी पाहा-
तू है राधा अपने कृष्ण की
तेरा कोई भी होता नाम
मुरली तेरे भितर बजती
किसी बन करती विराम
या कोई सिंहासन बिराजती
तुझे खोज ही लेते श्याम
जिस संग भी फेरे डालती
संजोग में थे घनश्याम

   परवीन शाकिर दोन-तीन कवितेत मोहन, गिरधर, श्यामसुंदर, कन्हैया, गोकुळ के राजा, मनोहर, कृष्ण गोपाल आदी संबोधनांनी कृष्णाला आळविताना दिसते. हीच भाषा फहमिदा रियाज या ज्येष्ठ उर्दू कवयित्रीने आपल्या एका काव्यसंग्रहात वापरली आहे.
परवीन म्हणजे आकाशगंगा, अन् शाकिर म्हणजे कृतज्ञ. परवीनच्या ग़ज़्‍ालात व कवितेत तरल भावनांच्या तारकापुंजच दृष्टीस पडतो. अन् कृतज्ञता तर तिच्या समग्र काव्यातून जाणवते. ‘गंगा से’ या कवितेत गंगानदीला ती म्हणते-
जुगबीते
दजला से एक भटकी हुई लहर
जब तेरे पवित्र चरणों की छूने आई तो
तेरी ममता ने अपनी बाहें फैला दी..
….
गंगा प्यारी !
     कन्यादान, गोरी करत सिंगार, मनोहर आदी कविता अशाच मनमोहक आहेत. राय कृष्णांसह हिन्दू मिथकांचा वापर उर्दू साहित्यात विपुल प्रमाणात झालेला आढळतो. पण मुस्लीम संस्कृती व तिच्यातले मिथक यांचा विनियोग अन्य भारतीय साहित्यात अभावानेच आढळतो हे वास्तव आहे. कारण सांस्कृतिक विलगतेच्या मानसिकतेने आपण शायरीव्यतिरिक्त अन्य उर्दू साहित्याचं अवलोकन करीतच नाही.
परवीनच्या श्याम में तोरी गइयाँ चराऊँ  या कृष्णकाव्याच्या काही ओळी पाहा-
आँख जब आइने से हटाई
श्याम सुन्दर से राधा मिलने आई

आए सपनें में गोकुल के राजा
देने सखियों को बधाई

अब तो जल का ही आँचल बना लूँ
पेड पर क्यों चुनरिया सुखाई

रंग डाली मेरी आत्मा तक !
क्या मनोहर के मन में समाई

शाम, मैं तेरी गइयाँ चराऊँ
मोल ले ले तू मेरी कमाई

कृष्ण गोपाल रस्ता ही भूले
राधा प्यारी तो सुध भूल आई

सारे सुर एक मुरली की धुन में
ऐसी रचना भला किसने गाई?

कैसा बंधन बंधा श्याम मोरे
बात तेरी समझ में न आई
  महात्मा गांधींना अभिप्रेत होती ती हिन्दुस्थानी भाषा हीच आहे. ही फारसी व देवनागरीत लिहिली जावी. अन् ती हिन्दी व उर्दू भाषिकांना सहज समजू शकेल, अशी त्यांची धारणा होती. एवढेच नव्हे तर अन्य भारतीय भाषिकांनाही समजण्यास ती सुलभ आहे हे आपल्या लक्षात येईल.
    परवीन शाकिरचा जन्म २४ नोव्हेंबर १९५२ ला कराची येथे झाला. ती इंग्रजी साहित्य व भाषाशास्त्रात एम. ए. होती तसेच तिने बँक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्येही एम.ए. केले. पीएच.डी. घेतली व हॉवर्ड युनिव्हर्सटिीतून पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची मास्टर डिग्री घेतली होती.  १९८२ मध्ये ती पाकिस्तानची सेंट्रल सुपिरियर सíव्हसची परीक्षा पास झाली. १९७६ साली तिचा विवाह नात्यातील डॉ. नासीर अलीशी झाला. तिला मुलगा सय्यद मुराद अली झाल्यानंतर वैचारिक मतभेदामुळे तिचा घटस्फोट झाला.
  सिव्हिल सíव्हसमध्ये जाण्यापूर्वी ती नऊ वष्रे शिक्षिका होती. १९८६ मध्ये ती इस्लामाबाद येथे सेकंड सेक्रेटरी या पदावर होती. २६ डिसेंबर १९९४ रोजी कारने घरून कार्यालयाकडे जाताना बसशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात तिचे निधन झाले.
   घटस्फोटानंतर परवीनला जीवनात, जे एकाकी तरुणीला येतात तेच अनुभव आले-
मैं इतने सांपों को रस्ते में देख आयी थी
कि तेरे शहर में पहुंची तो कोई डर ही न था
परवीन पतीपासून विभक्त होऊनही त्याच्या प्रेयसी रूपातच ग़ज़्‍ालेत साकारत राहिली.

मेरे चेहरे पे ग़ज़्‍ाल लिखती रहीं
शेर कहती हुई आँखें उसकी
खामोशी कलाम कर रही है
जज्बात की मुहर है सुखन पर
(मौनातच संवाद करतेय. संभाषणावर भावनेची मोहर उमटली आहे.)
  परवीनच्या शेरात सुखद आश्चर्याचा धक्का देणारी ग़ज़्‍ालियत पदोपदी जाणवते अन् हीच ग़ज़्‍ालियत तिला तिच्या समकालिनाहून पृथक् करते.
ये कैसे शिकारीने जकडा है मुझ को
कि खुद मंने उडम्ने की ख़्वाहिश कतर दी
परवीन प्रियकररूपी पतीपासून विभक्त झाली त्याचे कारण ती देते-
कुछ तो मेरे मौसम ही मुझे रास कम आये
और कुछ मेरी मिट्टी में बग़ावत भी बहुत है
अन् हे ही मान्य करते की-
कांप उठती मं यह सोच के तनहाई में
मेरे चेहरे पे तेरा नाम न पढम् ले कोई
परवीनच्या ग़ज़्‍ालेत कवितेचा आस्वाद आहे अन् कवितेत ग़ज़्‍ालेतील सूत्रबद्ध तरलता आहे. काही रचना पाहा-
   तेरी चाहत के भीगे जंगल में
   मेरा तन, मोर बन के नाचता है
अन् एक नाजूक कविता जिद ऐका
   मैं क्यों उसको फोन करुं?
   उसको भी तो इल्म होगा
    कल शब,
    मौसम की पहली बारिश थी
जेव्हा सामाजिक, राजकीय, आíथक समस्यांकडे उर्दू ग़ज़्‍ाल वळली तेव्हा तिच्यातला रोमँटिसिझम अस्तंगत होतो की काय? असे वाटत असतानाच परवीनची रेशीमस्पर्शी ग़ज़्‍ाल तरळत उर्दू साहित्य क्षितिजावर गंधाळली अन् फैजच्या शब्दात सांगायचं तर निष्पर्ण वैराणात हळुवार वसंतवारा वाहू लागला.
    परवीन शाकिरला जाऊन वीस वष्रे झाली. फातिमा हसन, इश्रत आफरीन, तिची प्रेयस परंपरा पुढे नेतही आहेत परंतु परवीनच्या जाण्याने उर्दू गजलेतील -सुंदर, कोमल सपनों की बारात गुज़्‍ार गयी जानाँ.. एवढे मात्र खरे.

       शब्दांचे अर्थ-
कर्ब- तडफड, अंगडाई- आळोखे पळोखे, दजला- बगदादजवळची एक नदी, बगावत- बंडखोरवृत्ती, पर-पंख,
लहजा-ढग, इल्म-ज्ञान, ज्ञात.