म्हातारपण हा विषय ऐकणारा व ऐकवणारा या दोघांनाही तसा सुरकतलेला, जुनाट वाटायची शक्यता असते. पण तसं मात्र बिलकूल मनात आणून देऊ नका. दुर्गाबाई भागवतांच्या मते वार्धक्य म्हणजे परिपक्व होणे, वृद्धाला जरठ, स्थविर असे शब्द भारतीय भाषेत आहेत. स्थविर या शब्दाला अध्यात्मात मोठा अर्थ आहे.  ‘अष्टावक्राला तो तरुण असताना बाल – मूल म्हटल्यावर तो रागावला. मी बाळ नाही, मी ‘स्थविर’ आहे असे तो म्हणाला. तरुण असून शिकलेला असतो त्याला देव ‘स्थविर’ म्हणतात, असे तो म्हणाला, असे महाभारत सांगते. वृद्धांची महती द्रौपदी गाते.  तिच्या मते, ज्या सभेत वृद्ध नाहीत ती सभा नाही, तरी पण प्रत्येकाला तारुण्यच हवे वाटते. म्हातारपण कोणालाच नको असते. ‘स्थविर’ या शब्दाचा अपभ्रंश ‘थेर’ असा झाला. त्याचे सार्वत्रिक भ्रष्टीकरण ‘थेरडा’ असे झाले. आदर्श आणि वास्तवाला फरक असा आहे!
  आपल्यासारख्या ‘स्थविर मंडळींसाठी ही ‘आनंद साधना’ ‘आनंद’ हा शब्द ‘नंद-नंदयति’ या मूळ संस्कृत धातूपासून आला आहे. ‘आ’ म्हणजे अगदी भरपूर, आकंठ! साधना हय़ा शब्दांचे मूळ ‘साधू-साध्नोति’ हा धातू! साध्यापर्यंत साधकाने करायची वाटचाल ती झाली साधना!
 हय़ा आनंद साधनेचा रस्ता म्हणजे योग. वास्तविक ‘योग’ शब्दांत जोडणे, व वियोग असे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत. जोडणे आहे ते आपल्यातीलच ‘स्व’ताशी! आणि वियोग आहे तो त्याज्य गोष्टींचा! एकदा का खरी आनंदाची जागा सापडली आणि खरी आनंदाची स्वत:त रममाण होण्याची क्लृप्ती सापडली, की मोक्ष दूर नाहीच समजा!
हा मोक्ष सध्या तरी आपल्याला फक्त हवा आहे, तो आपल्या अडचणी, कटकटी कमी होण्यासाठीच!