दुधाचे दात पडून नवीन दात येणे म्हणजे आईसाठी एक सुखद घटना असते. पण तेच दात पडल्यानंतर आजी – आजोबांसमोर एक मोठं संकट उभं राहतं. आता खायचं काय? ‘एरव्ही १० मिनिटांमध्ये होणारं जेवण आता अर्धा तास चालतं आणि जेवणातला ‘रसच’ निघून जातो’ – इति आजी / आजोबा.
प्रत्येक व्यक्तीच्या दात पडण्याच्या वयामध्ये दातांच्या आरोग्याप्रमाणे थोडाफार फरक असतो. पण साधारण एकएक करून पूर्ण दात पडायला ६५  / ७० वय होतंच. दात हलायला लागल्यामुळे किंवा पडल्यामुळे कोणते प्रश्न उभे राहतात आणि त्यांची ‘सोप्पी’ उत्तरं काय ते आपण बघूया.
प्र .१ खायला खूप वेळ लागतो आणि मग भूक मंदावते / न चावल्यामुळे पचन होत नाही.
चावता येतील असेच पदार्थ निवडावे आणि जास्त वेळ चावून खाल्ल्याने अन्नाचे पचन चांगले होते. भूक मंदावण्याची/ न होण्याची इतर बरीच करणे असू शकतात, पण जेवणाचे प्रमाण आणि वेळा पाळल्या गेल्या तर बाकी आजार तुम्ही टाळू शकता.
प्र .२ पोळी / भाकरी / काही टणक फळं – भाज्या चावून खाता येत नाहीत.
लहान मुलं आणि तुमचं जेवण ह्यात काही फरक नाही. पोळी / भाकरीचा चुरा, जास्त शिजवलेल्या भाज्या, नरम फळं, भाजी-डाळीचे सूप्स, भाज्या घातलेली खिचडी, खीर, उकड, लापशी वगरे पौष्टिक अन्नपदार्थ तुम्ही अजूनही नक्कीच चावूून खाऊ शकता.
प्र .३ कवळीचा उपयोग होत नाही.
कवळी असली तर उत्तम पण बऱ्याच वेळा कवळीचा उपयोग होत नाही किंवा कवळीच नसते. पण हे लक्षात ठेवा, दात नसताना हिरडय़ा ते काम चोख बजावतात तेव्हा काळजी नको.
प्र .४ कमी खाल्लं गेल्याने अशक्तपणा जाणवतो.
अन्नाचं प्रमाण कमी असेल तरी त्यामधील पौष्टिकत्व आपण वाढवू शकतो. उदा. मसाला दूध, तूप लावलेली पोळी, भाज्या घातलेलं घट्ट वरण, दही-मेतकूट, डाळ-भाज्या घातलेली खिचडी वगरे. कमी खा पण पौष्टिक पदार्थ जास्त प्रमाणात खा.