डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

आयुष्य संपवावंसं वाटतं याचाच अर्थ ‘आता आयुष्यात करण्यासारखं, जगण्यासारखं काहीच नाही,’ याहीपेक्षा ‘मला ज्या पद्घतीने आयुष्य जगायचं होतं, त्यात मला सपशेल अपयश आलंय, माझ्या सगळ्याच योजना फसल्यात आणि ही हार मी स्वीकारूच शकत नाही,’ हा विचार. कोंडी फोडताना किंवा या हरलेल्या, अपयश आलेल्या स्थितीतून नंतर येतं ते प्रचंड नराश्य आणि वैफल्य. कोणत्याही प्रसंगापुढे, स्थितीपुढे, छातीठोकपणे उभं राहून त्याचा सामना करण्याची इच्छाच संपून जाते किंवा इथे सामना हा केवळ प्रसंग, व्यक्ती, घटना असा न राहता त्याचं गुणोत्तर संपूर्ण आयुष्याशी मांडलं जाऊन, ती झुंज निर्णायक ठरवली जाते..

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

‘इतकं सगळं घडल्यानंतर माणसाने जगायचं तरी कसं? कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार येऊन गेला. एकदा तर अगदी स्वत:ला समुद्रात झोकून देणार इतक्यात मुलांचा विचार आला आणि थांबलो. काय करावं कळत नाहीये.’

चाळिशीच्या उंबरठय़ावर पोचलेल्या एका सद्गृहस्थाची ही कैफियत. लग्न होऊन चौदा वर्ष झाली. पत्नी आणि ते स्वत: प्रतिथयश कंपनीमध्ये नोकरी करणारे. दोन मुलं असलेलं, सर्वसाधारण सुबत्ता असलेलं कुटुंब. वरकरणी पाहता, सगळं कसं समाजाच्या आदर्श चाकोरीत बसणारं. पण तरीही आत्महत्येचे विचार यावेत इतकं काय बरं घडू शकतं? हे चित्र प्रत्येक दहा कुटुंबामागे एका कुटुंबात दिसलं तर आश्चर्य नाही. ‘आत्महत्या केली, जीव दिला, की संपलं सगळं. सगळ्यातून मुक्तता. नकोच तो त्रास.’ इतका बालिश विचार करणाऱ्या व्यक्ती दयेला पात्र नसून खरंतर त्यांची चांगली कानउघडणी केली पाहिजे. याचा अर्थ आत्महत्या या एकंदरीत प्रकाराबाबत आपण असंवेदनशील असावं किंवा त्याकडे सहानुभूतीने पाहूच नये असं मुळीच नाही. पण स्वत:चं स्वत:शी असणारं नातं इतक्या निर्घृणपणे संपवताना, आपण एक अविवेकी पाऊल उचलतोय, त्याचे सखोल परिणाम आपल्याशी संबंधित सगळ्याच पातळीच्या व्यक्तींवर, नात्यांवर होतील; हेच जर लक्षात येत नसेल, तर ते कडक शब्दांत सांगणेही गरजेचेच ठरते.

अगदी लहान, तरुण मुलंसुद्धा सर्रास बोलताना आढळतात. ‘मी स्वत:च्या हातावर चाकूचा वार करून घेतला.’ किंवा ‘मी अमूक-तमूक दहा गोळ्या खाल्ल्या.’किंवा ‘मी कितीतरी वेळ गच्चीच्या कठडय़ावर उभं राहून बघितलं.’

घरातली कोणी एक व्यक्ती अशी इतकी हळवी झालीये, मनाने नाजूक झालीये म्हणताना बाकी मंडळी हवालदिल होतात. त्या व्यक्तीला सर्वतोपरी आनंदी ठेवण्याचे प्रयत्न चालू होतात. जरा ‘खुट्ट’ झालं की आहेच डोक्यावर टांगती तलवार. इतरांना वेठीस धरत, सतत धमकावत, स्वत:ला हवं ते साध्य करत, एका स्वार्थी आनंदात आत्मकेंद्रित होऊन जगणे, इतकंच काय ते अशांसाठी शिल्लक राहतं. एकंदरीत स्वत:चा जीव सांभाळणे ही स्वत:ची जबाबदारी नसून इतरांची आहे ही त्यामागची मानसिकता. आत्महत्येचं किंवा एकंदरीतच सर्व प्रकारच्या आत्मक्लेशाचं चालू असलेलं, झालेलं, आतापर्यंतचं उदात्तीकरण हेसुद्धा त्यामागचं महत्त्वाचं कारण.

आता थोडंसं मनाच्या, मेंदूच्या अगदी आत शिरून बघू या, की आत्महत्येचे विचार येतात तेव्हा नेमकं काय घडतं. आयुष्य संपवावंसं वाटतं याचाच अर्थ आता आयुष्यात करण्यासारखं, जगण्यासारखं काहीच नाही, याहीपेक्षा ‘मला ज्या पद्घतीने आयुष्य जगायचं होतं, त्यात मला सपशेल अपयश आलंय, माझ्या सगळ्याच योजना फसल्यात आणि ही हार मी स्वीकारूच शकत नाही,’ हा विचार. या हरलेल्या व्यक्तीला, म्हणजे मला स्वत:ला, यात बदल करता येणं केवळ अशक्य. हे बदल करत असताना, कोंडी फोडताना किंवा या हरलेल्या, अपयश आलेल्या स्थितीतून नंतर येतं ते प्रचंड नराश्य आणि वैफल्य. कोणत्याही प्रसंगापुढे, स्थितीपुढे, छातीठोकपणे उभं राहून त्याचा सामना करण्याची इच्छाच संपून जाते किंवा इथे सामना हा केवळ प्रसंग, व्यक्ती, घटना असा न राहता त्याचं गुणोत्तर संपूर्ण आयुष्याशी मांडलं जाऊन, ती झुंज निर्णायक ठरवली जाते. अर्थात त्यामुळे ‘इथे जिंकणं हे अपरिहार्य आहे,’ हेच डोक्यात बसतं. त्यातून आपण स्वत:चंच मूल्यमापन करून त्यानुसार ठोकताळे मांडत राहतो. इथे आपण अगदीच कुचकामी आहोत, परिस्थिती हाताबाहेर गेलीय, त्यात कोणत्याही उपायाने कोणताच बदल घडणार नाही किंवा हे मला मान्य नाही, हे काहीसं समोर आलं, की चालू होतात ते आत्मघाताचे नकारात्मक विचार.

यात आणखी एक, त्यामानाने दुर्लक्षित राहिलेली बाब म्हणजे स्वत:वरचं फाजील प्रेम. ‘आपणच श्रेष्ठ’ असे काही गंड किंवा ‘मी म्हणेन तीच पूर्वदिशा.’ असा टोकाचा हेकेखोर स्वभाव, प्रचंड आत्मप्रौढी, त्यातून आपसूक झालेली ‘ग’ची बाधा, आपले विचार, धारणा यांवर नको इतका विश्वास आणि त्यासाठी कमालीचा चिवटपणा, त्यांना धक्का लागू नये म्हणून केलेल्या इतर तडजोडी, त्यातही आपल्या धारणा बरोबरच आहेत हे भासवण्याचा, ते तसेच समजण्याचा टोकाचा प्रयत्न, त्यातून इतरांना काही त्रास होत असल्यास, नात्यांमध्येही ताण निर्माण होत असल्यास, त्याकडे केली जाणारी डोळेझाक.

आपल्या आयुष्यासाठी, एकंदर परिस्थितीसाठी, ते न स्वीकारता सतत इतरांना, परिस्थितीला दोष देत राहणे (हे आसपासच्या अनेक व्यक्तींमध्ये दिसते.) यात अगदी जवळच्या नात्यांपासून ते समाजव्यवस्थेत काम करणारी एखादी व्यक्ती असे कोणीही असू शकते. शिवाय ‘माझ्या आयुष्यात मला आनंद देण्यासाठी इतरांनी झटलेच पाहिजे.’ हा विचार, तसे न झाल्यास ‘आपल्यावर कोणाचे प्रेम नाही’ किंवा ‘सगळे दुर्लक्ष करतात’ अशा समजुती करून घेणे. आयुष्यात काही बाबतीत येणारी विफलता, जसे मत्री, प्रेम, किंवा जोडीदाराकडून लैंगिक भावनांची गळचेपी, इत्यादी. यांच्यासोबत काही न्यूनगंड, भयगंड, मानसिक आजार, काही अप्रिय आपत्ती जसे नैसर्गिक आपत्तीमध्ये कुटुंबाला गमवावे लागले अशा व्यक्ती, बलात्कार किंवा तीव्र अत्याचारासारख्या घटना, व्यावसायिक, आर्थिक अपयश ही आणि अशी कित्येक कारणं, त्यासोबत येणारा मनाचा आलेख आत्महत्येला कारणीभूत असतो.

बऱ्याचदा न्यूनगंडातूनच आत्महत्या होतात असा समज होऊ शकतो परंतु त्याही शिवाय वर सांगितलेल्या आत्मसंतुष्ट प्रवृत्तीमुळे देखील त्या किंवा त्यांचे प्रयत्न घडतात. त्यातही केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी बरेच प्रकार घडताना दिसतात. त्यातला ठळक प्रकार म्हणजे जोडीदाराला किंवा घरच्या व्यक्तींना सतत या भयाच्या पडद्याआड ठेवणे. तसंच यासाठी सध्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या प्रसारमाध्यमांचा चपखल संदेशवाहक म्हणून वापर करणे. जसे की, अत्यंत बाळबोधपणे सतत याच संदर्भातल्या वेगवेगळ्या पोस्ट्स टाकून इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न. व्हॉटस्अ‍ॅपवर ठेवलेले विचित्र स्टेटस, जसे की ‘‘आत्महत्या’ हा आत्मघात नसून ज्यांनी लक्ष दिलं नाही अशा लोकांकडून घडलेला खून आहे.’ किंवा ‘आता एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे या जगातून कुठे इतरत्र जाऊन नंदनवन फुलवणे.’ किंवा ‘माझं प्रेम तुला मी मेल्यानंतर तरी कळेल ही अपेक्षा’, किंवा ‘मला लाथाडणं आता कोणालाच शक्य होणार नाही कारण मी या जगात नसेन.’ किंवा ‘हे जग माझ्यासाठी नाही, मी निघालो / निघाले.’

आता वाचताना जरी हे सगळं खूपच हास्यास्पद वाटत असेल तरीही जेव्हा असं काही बघण्यात, वाचण्यात येतं, तेव्हा त्या व्यक्तीच्या आजूबाजूचं विश्व ढवळून निघतं. खरं तर हे सगळं सांगणारी व्यक्ती एक फारच मनोरंजक खेळ खेळत असते. एकीकडे मला कशात रस नाही, कोणाला माझ्यात नाही किंवा काहीही कारणाने ‘मला उर्वरित आयुष्य नको’ असं म्हणत, भासवत असली तरीही दुसरीकडे त्याचवेळी स्वत:च्याच अशा कृतीतून अक्षरश: ओरडून-ओरडून, हात पसरून, असहाय होऊन मदत मागत असते, की माझ्याकडे लक्ष द्या, मला गोंजारा, कुरवाळा, इत्यादी. म्हणजे खरं तर त्या व्यक्तीला हे असं स्थान मिळालं, ही अशी वागणूक मिळाली, की पुरेसं असतं, बाकी आत्महत्या वगैरे उगीच आपलं तोंडी लावण्यासारखं. लगेच सर्व परिचित, स्नेही; ‘काय झालं, बरं आहे का’ किंवा ‘मी आहे’ वगैरे लिहायला सुरू करतात तसं यांचा ‘स्व’ सुखावतो आणि मग हेच सगळे विचार पसार होतात.

आपल्या आयुष्यात काय होतंय, काय घडतंय, याला ‘इतरांची वागणूक’ हेच केवळ कारण देऊन आपण राहिलो तर खरंच काही करता येणार नाही. परंतु स्वत:चा आनंद, समाधान, प्रेम, या जशा स्वत:लाच वाटणाऱ्या भावना तसंच दु:ख, विशाद, चिंता, वैषम्य यादेखील स्वत:लाच वाटणाऱ्या भावना. भावनाविरहित निल्रेप व्यक्ती असूच शकत नाहीत. यामुळे त्या आहेत, का आहेत आणि काढून टाकूयात का, असे स्तोम माजवण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा त्या आहेत, अध्येमध्ये डोकं वर काढून त्रास देणारच, हे एकदा मान्य केलं की ते उत्तम. यातून सतत इतरांना वेठीस धरणे, दोषी ठरवणे; त्यातून मला आयुष्य जगावंसं वाटत नाही त्याला इतर लोक कारणीभूत आहेत हे ठरवणे किती फोल आहे हेसुद्धा लक्षात येईल.

आत्महत्येची प्रवृत्तीच तयार होऊ शकते का? तर हो. बऱ्याच मानसिक आजारात ती दिसू शकते किंवा अशी प्रवृत्ती हाच एक आजार देखील असू शकतो. बऱ्याचदा काही जणांना कोणत्याही प्रकारची अनिश्चितता, किंवा अस्थिरता सहन होत नाही. किंवा सर्वच बाबींवर ठाम उत्तर हवे असे वाटते. उदा. माझ्या एका स्त्री रुग्णाला कायम प्रश्न पडे, ‘डॉक्टर मृत्यूनंतर नेमकं काय असतं हो? या विचाराने सतत मरणाचेच विचार माझ्या डोक्यात राहतात, आणि कधीकधी ते शोधण्यासाठी आपणच मरून बघावे असंही वाटतं. कधीकधी हे विचार हाताबाहेर जातात. भीती वाटते, की मी खरंच आत्महत्या करेन!’ बऱ्याच उपचारांनी तिच्यातील हे विचार बदलण्यात यश आलं. परंतु असं कोणत्याही एकाच विचारशैलीवर किंवा कल्पनेवर तिथेच ठाम राहिलेल्या मनाला उपचारांची गरज नक्कीच असते. तिथे तो नुसता स्वभाव आहे असं म्हणून कसं चालेल?

आता आपण सुरुवातीला पाहिलेल्या उदाहरणाकडे जाऊ या. सहजीवनात दोघांमध्ये होणारा संघर्ष हा प्रकार म्हटलं तर तसं अलीकडे सहज जवळपास प्रत्येक घरात दिसणारा. बाहेरून सगळं उत्तम दिसणारा हा डोलारा टिचकी मारली तर कोसळेल असा. कशामुळे? यांच्याच उदाहरणात बघायचं झालं, तर लग्न ठरवून झालेलं. आई-वडील आणि सर्वाच्या पसंतीने. दोघंही इतके उच्चशिक्षित असले तरीही, दोघांचाही परीघ म्हटलं तर फारच आखूड. घरात मिळालेले रीतिरिवाज, चांगलं-वाईट, अशा धाटणीतून संस्कार म्हणवणाऱ्या सगळ्यांचं बाळकडू. त्यातून हे महाशय देशोदेशी फिरून आले, कामात प्रगती केली, राहणीमान पुढारले, आधुनिक झाले तरी विचार मात्र बुरसटलेलेच राहिले. पत्नी आणि त्यांच्यामधली दरी लग्नापासूनच कधी मिटली नाही. बायकोविषयीदेखील काही समजुती मनात पक्क्य़ा. तिने घरच्यांशी कसे वागावे किंवा एकंदरीत कसे राहावे वगैरे. अगदी असंच चित्र त्यांच्या पत्नीचंही. चार मत्रिणी सोडल्या तर बाकी जग कुठे आहे, आपले विचार आपण बदलायला हवेत का? वगैरे बाबींशी तिचं काहीच नातं नसल्यासारखी ती आदर्श पत्नी, आई म्हणून इतकी वर्ष संसार करतेय. तिच्या लेखी कामेच्छा किंवा लैंगिक आयुष्य हा आयुष्यातला सगळ्यात टाकाऊ आणि घाणेरडा भाग. त्यामुळे गरज म्हणून मुलं झाल्यानंतर तिने यासाठी जोडीदाराला नकार द्यायला, त्यावरून त्याला टोचून बोलायला सुरुवात केली.

सुरुवातीपासूनच दोघेही आपापल्या घरच्यांच्या डोक्याप्रमाणे चालणारे असल्याने त्यांच्यात कायमच बेबनाव. या नकारांमुळे ते अधिकच चिघळले. संसार करत एकमेकांसोबत राहताना, आपण एकमेकांना समजून घ्यावे किंवा संवाद साधावा अशी गरजच त्यांना कधी वाटली नाही. कामेच्छा सतत दाबली गेल्यामुळे पतीची घुसमट झाली. पण त्यावर ‘आपले विचार, परिस्थिती बदलून तोडगा काढू.’ यापेक्षा पत्नीच्या डोक्यावर खापर फोडत त्यांनी ‘तिच्यामुळे मी याचा विचार करतो.’ हे सहज सांगितले.

कोणत्याही जोडीदारात बेबनाव असतो तिथे कितीतरी गोष्टी कारणीभूत असतात पण केवळ समाजाला दाखवण्यासाठी उत्तम चित्र रेखाटून तेच कसं योग्य हे स्वत:लाच पटवत राहण्यात काय अर्थ? तेसुद्धा कोणासाठी? असे कित्येक संसार मग अर्ध्यावर आल्यावर संपून जातात. इथे ‘कोण चूक कोण बरोबर’ यापेक्षा परिस्थितीनुसार त्यातून मार्ग काढून त्यात आनंद शोधता येणं गरजेचं आहे.

जगत असताना समस्या येणारच. त्यावर स्वत:ला संपवणे हा उपाय नक्कीच नाही. विषेशत: हे जवळच्या म्हणवणाऱ्या नात्यांमध्ये ताण आहे म्हणून घडत असेल, तर आत्महत्या शंभर टक्के टाळता येतील. तुमच्या आसपास अशी एखादी दुखावलेली, आयुष्यातल्या आनंदापासून दुरावलेली व्यक्ती असेल, तर तिला बोलतं करा. त्यातून हे सगळं वाचून अशा व्यक्तीला एक सकारात्मक, डोळस दृष्टिकोन देता यावा, हाच या लेखाचा उद्देश.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com