मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

अरुणाला पडलेला प्रश्न गंभीरच होता. नवरा उत्तम कमावत असलेल्या, सुखवस्तू स्त्रीला आपली स्वत:ची काही ओळख कमवावीशी वाटू शकते की नाही?  बरं, त्यासाठी त्या स्त्रीनं मनापासून काही धडपड के ली, तरी त्याला ‘भरल्यापोटी, वेळ घालवण्यासाठी के लेला टाइमपास’ म्हणून हिणवलं का जातं? म्हणजे, ‘श्रीमंत पतीची राणी’ असणं हेही अडचणीचं आहे की काय?.. असे उलटसुलट विचार मनात येऊ लागले, तसा अरुणानं सरळ वत्सलावहिनींच्या ‘व्वा हेल्पलाइन’लाच फोन लावला.

a woman saves life of mother or bitch fell in well video goes viral on social media
महिलेने वाचविला विहीरीत पडलेल्या आईचा जीव, बाहेर येताच कुत्रीची पिल्ले… पाहा VIDEO
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

त्या दिवसाची सुरुवातच काहीशी चकमकीनं झाली. चहाच्या कपातलं वादळ वगैरे! अरुणाच्या मैत्रिणीनं घरच्या घरी सुरू केलेल्या साडी व्यवसायाला पाच र्वष पूर्ण झाल्याबद्दल संध्याकाळी कौतुक सोहळा योजला होता. सकाळपासून अरुणा मनानं त्यातच होती. तरी उघडपणे ‘‘वाटलं नव्हतं नै, ती एवढा व्याप धंद्याचा वाढवेल.’’, ‘‘केवढा स्टॉक असतो तिच्याकडे.’’, ‘‘देशभरातले विणकर संपर्कात असतात तिच्या.’’, ‘‘दरवर्षी नफा वाढतोच आहे म्हणे.’’, ‘‘आता शोरूम काढायचं चाललंय.’’असं पुटपुटणं सुरूच होतं. त्यावर तिचे नवरोजी पचकलेच, ‘‘तिला काय, घरी तुमची एक भिशी ठेवलीन् की दहा साडय़ा सहज खपवता येतात. ज्या खपणार नाहीत त्या स्वत: नेसायच्या. तिकडे नवरा बोटीवर राहून, कष्ट करून, पैसे पुरवत असेलच. ते वाढवलेन तरी आनंद, घालवलेन तरी आनंद. स्वत: आनंदात राहा म्हणजे झालं, एवढंच म्हणत असणार तो.’’

‘‘ ए, असं नाही रे. आफ्टर ऑल, बिझिनेस आहे ना?’’ अरुणा म्हणाली.

‘‘ कु णास ठाऊक! ‘हॉबी-कम-बिझिनेस’ असेल बहुधा.’’ .. नवरा.

‘‘तुला काय माहीत? तू पाहिलंयस तिचं बॅलन्सशीट?’’ .. अरुणा.

‘‘पाहायला कशाला पाहिजे? ‘पांचो उंगलिया घी शक्कर में’ म्हणावं अशी तुझी मैत्रीण. भिशी केली काय आणि साडय़ा विकल्या काय,

न विकल्या काय.. चलता हैं!’’.. नवरा.

नवरा शाब्दिक खोडय़ा काढण्याच्या मूडमध्ये होता. एकानं दुसऱ्याचं एकही वाक्य खाली पडू द्यायचं नाही, या तत्त्वावरची असली खटकेबाजी दोघं हल्ली खूपदा करत असत. घरच्याघरी करमणूक! पण आज मात्र अरुणा उचकली. ‘‘ती न खपलेल्या साडय़ा नेसते, तसाच तूही तुझ्या न खपलेल्या फेरोक्रीट टाक्या डोक्यावर घेऊन फिरतोस का रे?  तू फेरोक्रीट टाक्यांच्या बिझिनेसमध्ये सक्सेसफुल आहेस ना, म्हणून म्हटलं.. तुला ते सगळं जमेल. बायकांना योग्य ते श्रेय देणं मात्र.. त्यातही सुखवस्तू बायकांना..’’

अरुणा, तिचं घर, तिचा परिसर, बराचसा मित्रपरिवार हे सगळं सुखवस्तू गटातलं होतं. उद्याच्या किंवा आयुष्यभराच्याही साध्या जेवणाची चिंता नसणारे. पण त्यामुळेच त्यांच्यापैकी अनेकांच्या बायकांच्या चिंता वाढल्या होत्या. आपण नक्की काय केलं की ते बाहेरच्यांना दखल घ्यावंसं वाटेल?, आपल्या कोणत्या कर्तबगारीच्या आड आपली आर्थिक सुस्थिती येणार नाही? हे अनुत्तरित प्रश्न सारखे पुढय़ात ठाकलेले.

शेजारचा बंगलाही याच पठडीतला. आउटहाउसमध्ये नवऱ्याचं करसल्लागाराचं ऑफिस. बायको गाण्यातली. रियाज ऐकू यायचा खूपदा. रोज सकाळी अकराच्या सुमारास लगबगीनं बाहेर जाताना दिसायची. पण आज दुपारी दोनच्या सुमारास कडक उन्हात बाई निघालेल्या. जुने शेजारी असल्यानं अरुणानं खिडकीतूनच प्रश्न टाकला, ‘‘का हो, एवढय़ा उन्हाच्या बाहेर?’’

‘‘विशारदची तयारी चाललीये ना. गुरुजींबरोबर बसते रियाजाला रोज.’’ बाई.

‘‘सकाळी अकराला असायची ना वेळ?’’

‘‘हो. पण बदलावी लागली. हल्ली आमच्या ऑफिसला अकरा वाजता चहा पाठवावा लागतो. चहाची ने-आण बॉय करतो यांचा, पण घरून सगळी फिल्डिंग लावणारी मीच. खरं आता दुपारच्या जेवणानंतर, भरल्यापोटी माझा आवाज लागत नाही चांगला, श्वास कमी पडतो.. पण काय करणार?’’

‘‘ऑफिसच्या चहाची वेळ अगोदर नाही का करता येणार?’’

‘‘साहेबांना रुटीन ब्रेक झालेलं चालत नाही. आधी त्यांचं तंत्र सांभाळायचं, मग माझा टाइमपास, असं म्हणतात..’’

‘‘संगीत विशारद होणं हा टाइमपास आहे?’’

‘‘हं.. एका अर्थी. यंदा नाहीच जमलं तर पुढच्या वर्षी कर म्हणताहेत. आपलं बायकांचं वेगळं पडतं ना हो.’’ असं म्हणत त्या पुढे सरकल्याही.

काय पडतं? एक प्रपंच गळ्यात पडला की स्वत:चं सगळं मागे पडतं?, की पडतं घेण्याचं सुरक्षित वळण पडतं?, असे प्रश्न त्या स्वत:ला पडू देत नसाव्यात. पण अरुणा थोडा वेळ तरी नक्कीच विचारात पडली. मुळात कुटुंबाला, नवऱ्याला तिच्या तिनं निवडलेल्या कामाबद्दल आदर का नसावा? त्यातून काहीच मिळत नसेल त्यांना?

दुपारी एका स्त्रीविषयक मासिकाच्या संपादकांचा फोन आला. त्यांनी आयोजलेल्या एका कथास्पर्धेचं परीक्षण करू शकाल का, हे विचारण्यासाठी. अरुणा त्या मासिकाची पहिल्यापासून वाचक आणि नैमित्तिक लेखिका होती, परिचयाचीही झाली होती. तरीपण परीक्षक होणं? ती आढेवेढे घेणार तोच समोरून खुलासा आला, ‘‘तुम्ही व्हा हो एक परीक्षक मॅडम. बाकी इकडून आमची टीम असेलच तुमच्या मदतीला.’’

‘‘पण १००-१२५ कथा वाचायच्या, त्यांचं मूल्यमापन..’’

‘‘संख्येचं टेन्शन घेऊ नका हो. बहुतेक एण्ट्रीज बायकांच्याच असणार. म्हणजे दुपारी लोळून मासिक वाचणाऱ्यांच्या. शहरी, आरामशीर जगणाऱ्यांच्या. एकेक नजर टाकलीत तरी येईल अंदाज एकेका कथेचा.’’

‘‘हा एक दृष्टिकोन झाला, पण एखादीला खरंच जीव तोडून काही महत्त्वाचं सांगायचं असेल तर..’’

‘‘क्वचितच असेल असं. बाकी काय, फावला वेळ घालवण्याचं हे हक्काचं ठिकाण नाही का? कितीसं चांगलं असणार?’’

‘‘तसं काय हो, पुष्कळ वेळा पुरुषांनी वेळात वेळ काढून लिहिलेलं लेखनही कचकचीत वाईट असतंच की.. वेळ घालवायला, ए.सी. रूममध्ये, कोचावर बसून लिहिलं की ते वाईटच व्हावं असा काही नियम आहे?’’

यावर ते संपादक फारसं काही बोलले नाहीत. ‘‘लगेच कथांची फाइल पाठवून देतो.’’ वगैरे बोलून आवरतं घेत गेले. आपलं काम परस्पर-परभारे, फुकटात करून घेण्याचं संपादकीय कौशल्य तर त्यांच्यात होतं. शिवाय महिलांचं मासिक चालवत असूनही महिलांच्या लेखनाबद्दल पुरेसा अनुदारपणाही होताच. कसं हाताळावं यांचं काम? अरुणा विचार करत राहिली.

विचित्रसं ‘पेट्रनायझिंग’- सांभाळून घेण्याचा आव.. विचित्रसं शंकेनं बघणं.. घाईनं शिक्के मारणं.. बायकांच्या संसारेतर कामगिरीचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणारच नाही का कधी? विशेषत: ज्यांना आर्थिक सुरक्षा देणारे जोडीदार आहेत त्यांच्या कामगिरीचं? सुबत्तेमुळे त्या इतर काही अलंकार, दागिने हवे तेव्हा हवे तसे घालू, बदलू शकतात. तेवढय़ा अलंकरणापुरतंच महत्त्व का त्यांच्या धडपडीला?

संध्याकाळी साडीवाल्या मैत्रिणीकडच्या मेळाव्याला छानपैकी तयार होऊन अरुणा निघणार तेवढय़ात तिचा तरुण मुलगा काहीतरी कामासाठी अवचित घरी आला. तिची लगबग बघून म्हणाला, ‘‘आज काय भिशी? गेट टूगेदर? गॅदरिंग?’’

‘‘नाही रे, आज कौतुक सोहळा आहे मैत्रिणीचा. ती एवढय़ा उशिरा धंद्यात शिरून शोरूमपर्यंत मजल मारत्येय म्हणजे..’’

‘‘मग हॉटेलांच्या ‘हॅपी अवर्स’मध्ये तरी ठेवायचंत ना मम्मा! आजकाल खूप हॉटेलं तुमच्यासारख्या ‘कम्फर्टेबल’ बायकांसाठी ‘हॅपी अवर्स’ ठेवतात. कुठे एक लेख छापला, एक गाणं यूटय़ूबवर आपणच टाकलं, की द्यायची जंगी पार्टी. हाफ रेट. बायकांचीपण चैन होते, हॉटेलांनापण कमी गर्दीच्या वेळी धंदा मिळतो. एक ‘फील गुड फॅक्टर’ तर येतोच ना.. एन्जॉय.’’ मुलगा बुटाची लेस आवळून बांधताना वरवर म्हणाला. त्याचं हे असलं उडतपगडं विधान ऐकून अरुणाला ‘फील गुड’ तर वाटलं नाहीच, उलट आपल्या गळ्याभोवती काहीतरी आवळलं जातंय असं वाटलं. एकदा ‘खाऊनपिऊन सुखी’ घर ‘पटकावल्यावर’ बाईनं फक्त खाण्यापिण्यातच (किंवा खिलवण्यात वगैरे) रमावं, हा विचार या पिढीपर्यंतही तसाच झिरपलाय? आणखी कशासाठी बाई धडपडू शकते, त्यानं तिची जिद्द, आत्मविश्वास, अहंकार सुखावू शकतो, एखादीची ती गरज असते, असं वाटतच नाही का कु णाला?

छानसा पुष्पगुच्छ घेऊन ती संध्याकाळच्या मेळाव्याला गेली. तिथे फुलं, मिठाई, वातावरण सगळंच खूप उत्साहवर्धक होतं. साडीवालीच्या नवऱ्यानं बोटीवरूनच इथे कु णाकु णाला सूचना देऊन सगळं करून घेतलं होतं म्हणे. एवढी संपन्नता.. पण बोलता बोलता पुढे आलेला मुद्दा काही तेवढा उत्साहवर्धक नव्हता.

‘‘तुझ्या व्यवसायाचा पाचवा वाढदिवस एवढा झगमगीत, तर शोरूमचं उद्घाटन म्हणजे घरचं कार्यच मानाल गं तुम्ही लोक!’’ कु णीतरी म्हणालं.

त्यावर मात्र साडीवालीनं म्हटलं, ‘‘नाही. तो विचार सोडतोय आम्ही.’’

‘‘आम्ही.. म्हणजे?’’

‘‘नवरा तयारच नाही त्या उपक्रमासाठी. म्हणतो, भर बाजारात वगैरे उतरण्याची नसती जोखीम नको. आपल्याला काही कमी आहे का, की त्यासाठी रिस्क घ्यावं? मला आपलं वाटायचं, डबक्यात डुंबणं खूप झालं, घरून थोडा पाठिंबा, मदत मिळाली तर खूप खोल पाण्यात पोहून दाखवू, काहीतरी अ‍ॅचिव्ह करून बघू. पण पुन्हा वाटलं, गाळात गेलो तर आपल्यामुळे आणि मोठ्ठे तीर मारले, तर ‘तिला काय, घरून भक्कम आधार आहे,’ असंच म्हणणार ना बरेचसे लोक?  त्यापेक्षा आहे असंच थोडी र्वष करू आणि देऊ सोडून.. शेवटी राहिलेल्या साडय़ा वाटून घ्यायला सगळ्या असूच! काय गं?  आतापासून आपापल्या आवडीच्या साडय़ा हेरून ठेवणार का? ’’ ती हसत म्हणाली. पण पूर्वी आपल्या भावी शोरूमची स्वप्नं रंगवताना तिच्या डोळ्यांत जी चमक असायची ती कुठेच नव्हती. किती बायकांनी अशी किती स्वप्नं सोडून दिली असतील आजवर? आणि यांना कशी ‘काहीच भव्य स्वप्नं बघता येत नाहीत,’ असं ऐकूनही घेतलं असेल बरं? अरुणाला हा प्रश्न सारखा टोचत राहिला. मग तिनं वत्सलावहिनींशीच मन मोकळं केलं.

‘‘वत्सलावहिनी, एखाद्या बाईचा नवरा सुस्थितीत असणं ही तिची अडचण ठरू शकते का हो?’’

‘‘छे हो.. ते तर तिचं कौतुक किंवा भाग्य ठरेल ना? ‘श्रीमंत पतीची राणी, मग थाट काय तो पुसता?’ असं गाणंसुद्धा नव्हतं का जुन्या ‘शारदा’ नाटकात?’’

‘‘ ते नाटकाचं सोडा, वास्तवात बघा. वरच्या झगमगाटाकडे सगळ्यांची नजर लागते, आतलं पोकळपण चटकन दिसत नाही. आत आत पोकळ होत जातात यामुळे काही बायका.’’

‘‘असं होतं का? सगळ्यांचं?’’ वत्सला- वहिनींनी विचारलं.

‘‘काहींचं नक्कीच होतं. म्हणजे विचारबिचार करण्याची नस्ती सवय असणाऱ्यांचं तरी. वास्तविक हे उलट हवं ना?’’

‘‘कसं?’’

‘‘ज्यांना उभं आयुष्य ऐषारामात काढता येईल, त्यांना जीव तोडून काहीतरी करावंसं वाटतंय याचं कौतुक व्हायला हवं. उलट त्यांचं मानसिक खच्चीकरण.. ‘वेळ जात नाही’ म्हणून करता वगैरे. किंवा उबवलेली दु:खं सांगत बसू नका, हेही.’’ अरुणा म्हणाली.

‘‘आपल्याकडे आर्थिक संपन्नता येतेच लोकांच्या डोळ्यावर. धनिक तो गुन्हेगार. रस्त्यावर पायी चालणारा गाडीत बसलेल्याकडे रागानं बघतोच ना.. त्याचं हे वेगळं रूप समजा.’’

‘‘प्रश्न बायकांनी काही समजण्याचा नाहीये वत्सलावहिनी. जगानं बायकांना समजून घेण्याचा आहे.’’

‘‘अवघड आहे. एवढय़ा समजदारीची अपेक्षा अवघड आहे. मुळात आपल्याकडे रोजच्या जगण्याचे गंभीर प्रश्न असताना तरी फारच अवघड.’’

‘‘मान्य. ते प्रश्न सर्वात प्रथमच. पण कु णाला जगण्याचा प्रश्न मोठा, तसाच कु णाला सन्मानानं जगण्याचाही मोठा. हा सन्मान आपला आपण मिळवलेला हवा, असं वाटणाऱ्या बायांनी काय फक्त उपेक्षेचं, उपहासाचं धनी व्हावं?’’

‘‘हे बघा, एकदम जगाबिगाला बदलायची भाषा नको. अशा बायकांनी आधी स्वत: ठाम राहावं. एकमेकींच्या पाठीशी एकजुटीनं उभं राहावं. नेटानं असं काही करून दाखवावं, की जगाला दखल घ्यावीच लागेल. आहे तयारी?’’ वत्सलावहिनींनी ठासून सांगितलं.

‘‘करावी लागेल,’’ अरुणाही पुटपुटली. कुठपासून सुरुवात करावी या विचाराला लागली.