उष:प्रभा पागे

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

अरुणाचलमधील सीमावर्ती अभोर टेकडय़ांच्या आणि सियांग नदीच्या खोऱ्यांतील जीवशास्त्राचा अभ्यास, संशोधन करण्यासाठी २७ दिवसांची एक मोहीम पार पडली. या मोहिमेमुळे त्या भागांतील निसर्गाची स्थिती कशी आहे, तिथली जंगलं आणि तिथले वन्यजीव यांची विविधता काळजी करण्यासारखी आहे की नाही, तिथे संवर्धनाचे काय उपाय योजता येतील आणि तेथील जैवविविधता कशी अबाधित राहील याचा अभ्यास केला गेला. जीवशास्त्र, भूशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांचा अभ्यास हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. जैवविविधतेचे पाळणाघर असलेल्या अभोरच्या टेकडय़ा आणि परिसरातील संशोधन मोहिमेवरचा हा खास लेख नुकत्याच झालेल्या वन्यजीव सरंक्षण सप्ताहानिमित्ताने..

निसर्गसंवर्धनाची पहिली पायरी म्हणजे निसर्गाविषयीची जाण, निसर्गाचा अभ्यास आणि संशोधन. भारताच्या उत्तर पूर्वेकडील सीमावर्ती भागातील एक टेकडय़ांचा प्रदेश, त्याला अभोर हिल्स किंवा आदी हिल्स म्हणतात. अरुणाचल प्रदेशातील हा भाग म्हणजे सियांग, दिबांग या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा भाग, आदी, मिश्मी अशा आदिवासींची इथं वस्ती आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे अन्य भारतांतील लोक इथं फारसे येत नाहीत. कित्येक वर्षे दळणवळणासाठी इथे रस्तेही नव्हते. या प्रदेशाला लागून चीनची हद्द आहे. या भागाचं मुख्य ठिकाण आहे ‘पासीघाट’. १९११ ऑक्टोबर ते १९१२ एप्रिल या काळात त्या वेळच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्या भागावर वर्चस्व बळकट करण्याच्या हेतूनं इथे त्या कामगिरीवर एक मोहीम पाठवली.

त्यांत राजकीय मुत्सद्दी होते. या मोहिमेची जोडमोहीम म्हणून व शास्त्र संशोधन, भूरचना विज्ञान संशोधन आणि मानववंशशास्त्र संशोधन असा त्रिविध आणि सर्वसमावेशक हेतू मनात ठेवून दुसरी मोहीम आखली गेली. त्यात अर्थात काही निसर्ग शास्त्रज्ञ होते. त्या काळातील ती अशा प्रकारची पहिली मोहीम होती आणि त्या शतकात ती एकमात्र ठरली. या मोहिमेचा वृत्तांत काही प्रसिद्ध झाला नाही. मात्र त्यातील जीवशास्त्रीय निरीक्षणे १९१२ ते १९२२ या कालावधीत ‘रेकॉर्ड्स ऑफ द इंडियन म्युझियम’ या जर्नलमध्ये १३ भागांत प्रसिद्ध झाली. या जर्नलमध्ये त्यांनी या अभोर टेकडय़ांच्या भागाला ‘कंट्री ऑफ हाय ट्री जंगल्स’ असे म्हटले आहे. योगायोग असा, की अभिजीत दास ‘सर्प’ विषयावर पीएच.डी. करत असताना ही निरीक्षणे त्याच्या पाहण्यात आली आणि या भागांत १०० वर्षांनंतर आपण पुन्हा निसर्ग अभ्यास मोहीम आखावी असे त्याच्या मनाने घेतले. पण हे स्वप्न पूर्ण व्हायला २०१८ चा सप्टेंबर महिना उजाडला. एव्हाना अभिजीतची डॉक्टरेट होऊन तो वन्यजीव संस्थान, डेहराडून इथे शास्त्रज्ञ म्हणून काम करू  लागला होता.

सुविख्यात निसर्ग छायाचित्रकार धृतिमान मुखर्जी हाही या भागांत जायला उत्सुक होता. मोहीम ठरली. त्यासाठी आर्थिक साहाय्यही मिळाले. मोहीम सर्वसमावेशक व्हावी म्हणून यामध्ये वन्यजीव संस्थानामधील अन्य शास्त्रज्ञही सामील झाले. विवेक सरकार हा फुलपाखरं-कीटकसृष्टीचा अभ्यासक आणि ‘सिकाडा’ या कीटकविषयाचा सखोल संशोधक. सिकाडा कुठेही असो, हा त्याला बरोब्बर शोधून काढतो. त्यानं ध्यासच घेतला आहे. विशेष म्हणजे सिकाडाच्या अनेक जाती त्यानं शोधून काढल्या आहेत. मेघालयातील ‘सिकाडा’ हा त्याच्या पीएच.डी.चा विषय आहे. ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’. डेहराडून (डब्ल्यूआयआय) च्या ‘वर्ल्ड हेरिटेज सेंटर’मध्ये तो साहाय्यक म्हणून काम करतो. डॉ. बिवाश पांडव यांचा ओरिसाच्या किनाऱ्यावरील सजीवसृष्टी आणि सागरीजीव कासव, मासे यांचा अभ्यास आहे. ‘टायगर प्रोजेक्ट – वाइल्ड लाइफ फंड ऑफ इंडिया’चे ते समन्वयक होते आणि छत्तीसगडमधील हत्ती हा त्यांचा सध्याचा अभ्यास विषय आहे. तेही ‘डब्ल्यूआयआय’मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. डॉ. मनोज नायर हे आय. एफ. एस. ऑफिसर, पण सध्या काही काळ  ‘डब्ल्यूआयआय’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू आहेत. ‘ड्रॅगन फ्लाय, दामजेल फ्लाय’ या कीटकांमधील एका गटाचे ते तज्ज्ञ आहेत. डॉ. नवेन्दू पागे हासुद्धा ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’मधील शास्त्रज्ञ. वनस्पती सृष्टीचा हा जाणकार. पश्चिम घाटांतील सदाहरित जंगले हा त्याचा अभ्यास विषय. भारतात विविध ठिकाणी त्याने वनस्पती सृष्टीचा अभ्यास केला आहे.

सियांग व्हॅलीमध्ये जीवशास्त्र, भूशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांचा अभ्यास हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. सियांग व्हॅलीमधील या मोहिमेचा कालावधी सप्टेंबर १८ ते ऑक्टोबर १८ च्या दरम्यान २७ दिवसांचा होता. संशोधनाबरोबरच नवनवीन जीवशास्त्रीय नमुनेसुद्धा त्यांनी गोळा केले. मनोज नायरना शतकापूर्वीच्या ब्रिटिश मोहिमेतील ड्रॅगन फ्लाय वगैरेचे नमुने (स्पेसिमेन) पाहायला मिळाले. बऱ्याच नवीन आणि दुर्मीळ अशा स्पेसिजची त्यांनी नोंद केली. काही नमुने मात्र कोडय़ात टाकणारे होते. सियांग नदीकिनारी माजलेल्या झाडीवर एक वेगळ्या रंगाची, मोठी, झुळझुळती पंखाची, गुलाबी रंगाची दामजेल फ्लाय. त्यांनी यापूर्वी कोठेच पाहिली नव्हती; फोटो घ्यायच्या आधी रानकेळीच्या झुडपांत ती दिसेनाशी झाली. काही संधी अशा हुकल्या की हुकल्याच!

अभिजीत दासला मात्र सर्पाचे विविध प्रकार दिसले. पासीघाटजवळ ‘पोबा’चे संरक्षित जंगल आहे. या जंगलांत पाण्याचे कितीतरी प्रवाह वाहते आहेत. अभिजीतला पाण्यातील साप दिसले, वेगळ्या प्रकारचा ‘किलबॅक’ साप दिसला. मुख्य म्हणजे या सापांच्या राहत्या ठिकाणी अभिजीत त्यांचे फोटो घेऊ शकला. रात्रीच्या वेळी त्याला तीन प्रकारचे वेगळे साप आणि जलचर दिसले. ‘देरिंग’ अभयारण्यातील गवताळ भागांत अनेक प्रकारचे सरडे, पाली, घोरपडी, बेडूक त्यांनी पाहिले. त्यांच्या चाहूलखुणा, सरपटत जाण्याचे मातीवरील पट्टे, नखांच्या खुणा, ठसे, यावरून कोणकोणते प्राणी गेले याचा त्यांना अंदाज बांधता आला. काही प्रत्यक्ष दिसलेही. वनस्पती, झाडेझुडपे, वाहते झरे, नदीकाठ ही सजीवसृष्टीची पाळणाघरे असतात. सगळ्या पाणथळ जागी, झाडापानांवर कितीतरी विविध बेडूक त्यांनी पाहिले, नोंदले. आकूची, रानहळदीची ओली पाने, बेडकांच्या खास आवडीची. झाडांखाली पडलेली पाने ही लहान बेडकांची ठिकाणे. पाण्याच्या बाजूने, कडेकपारीतून, झाडांवर वाढणारे नेचे सरीसृपांच्या आवडत्या जागा. कॅस्केड बेडूक तर वरून कोसळणाऱ्या पाण्यांत असतात. बेडकांची विविध सृष्टी त्यांना इथे आढळली. ओढय़ांतील बेडूक, शेतांतील बेडूक म्हणजे आदिवासींच्या जिभेची चंगळ. पासीघाटच्या बाजारांत असे बेडूक विकायला ठेवलेले असतात. रस्त्यावर वाहनाखाली येऊन मरणाऱ्या बेडकांची, सापांचीही संख्या बरीच आहे. जे प्राणी जंगलात दिसले नाहीत, उदा. हरणे, भेकरे, माकडे आणि अन्य बरेच, त्यांचे मृत अवयव, कवटय़ा, मुखवटे आदिवासींच्या घराबाहेर टांगलेले होते.

उडती खार, मोठ्ठी खार यांची शिकार हा तिथल्या आदिवासींच्या हातचा मळ आहे. तिथल्या पोरांच्या हातांत ‘गलोली’ असतात, त्यांनी ते शिकार करतात. मोठी माणसे फासे तयार करून जंगलात ठेवतात, त्यात बरेच प्राणी सापडून मरतात. मोठय़ा लोकांच्या हाती आता बंदूकही आहे. या लोकांची हीच जीवनशैली आहे. शिकार करून पोट भरणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शिवाय आता पोटासाठी नव्हे तर पैशांसाठी चोरटी शिकार केली जाते आहे. विवेक सरकारचे सिकाडावर लक्ष होतेच, पण त्याचा फुलपाखरांचाही अभ्यास असल्याने त्याला अनेक प्रकारची पूर्वी न पाहिलेली फुलपाखरे दिसली, पण तो बेहद्द खूश झाला तो ‘पतंगांवर’ म्हणजे ‘मॉथ्स’वर. ‘मॉथ्स’मध्ये इतकी विविधता त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदाच पाहिली.

विवेक सरकारचं आवडतं पुस्तक कॅप्टन डब्ल्यू. एच. इव्हान्स यांचं ‘द आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियन बटरफ्लाइज.’ (१९३२) अभोर हिल्स भागांत गेल्या शतकांत सुरक्षा खबरदारी म्हणून ब्रिटिशांनी काही सैन्य ठेवले होते. त्या सैन्यामधील दोघा अधिकाऱ्यांनी वैयक्तिक आवडीमधून या भागांतील फुलपाखरांचे नमुने गोळा केले होते. इव्हान्स यांनी या नमुन्यांचा अभ्यास करून नवीन ७४ प्रकारांचा परिचय करून दिला. त्यामुळे विवेक अभोरच्या फुलपाखरांचा अभ्यास, ओळख करून घेऊ शकला. तसेच दिव्यांचा सापळ्यासारखा उपयोग करून घेतल्यामुळे त्याला बहुसंख्य पतंगांची ओळख करून घेता आली. त्यानं ३०० पतंगांच्या जातींची नोंद केली.

डॉ. नवेन्दू पागे यांचा वनस्पती सृष्टीविषयी अभ्यास आहे. अभोर प्रदेशांत सियांग नदीचे  खोरे आणि पोबा संरक्षित क्षेत्र, माऊलिंग राष्ट्रीय उद्यान या भागांतील वनस्पती वैविध्याची नोंद त्याला ठेवायची होती. पूवरेत्तर हिमालयांचा गाभा असलेल्या या भागांत २७ दिवस राहून वनसृष्टीचा अभ्यास करणे हे कोणत्याही संशोधकाचे स्वप्न असते. या मोहिमेने त्याचे हे स्वप्न पुरे झाले. या भागातील वनस्पतीविषयी यापूर्वी अगदी थोडे संशोधन झाले होते. त्याच्या नोंदीही पुरेशा नव्हत्या. शतकापूर्वीची एक नोंद मात्र आहे. ती अशी, ‘द बॉटनी ऑफ अभोर हिल्स’, लेखक आय. एच. बर्किल. या टेकडय़ांच्या प्रदेशांत इतकं जीववैविध्य कसं काय? याबद्दल नवेन्दू म्हणतो, की याची कारणे संमिश्र असतात. त्या त्या भागांतील हवामान, भूतकाळातील आणि सध्याची भूरचना, हवामानात बदल करणाऱ्या घटना, नैसर्गिक आपत्ती, यांत ती कारणे सापडतात. अरुणाचलचा हा भाग म्हणजे भारतीय उपखंड (जलवेष्टित) पूर्व हिमालय आणि इंडो-मलाया भूभाग यांचे संगमस्थल आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या सजीवसृष्टीची या ठिकाणी सरमिसळ होते. भारतीय उपखंड आणि आशिया खंड हे एकमेकाशी संलग्न नव्हते. त्यांची आपापली  विशिष्ट अशी सजीवसृष्टी होती. पण आफ्रिका खंडापासून भारतीय उपखंड विलग झाले, उत्तरेकडे सरकत आशियाच्या भूखंडावर आदळले आणि एकमेकाशी संलग्न झाले. या संलग्नपणामुळे सजीवांच्या जाती, उपजाती एकमेकांत मिसळल्या. या आदळण्यामुळे दोन्हीमधील भूभाग उंचावला गेला, त्या भागावरील समुद्र ओसरून गेला. मधला उंचावलेला भाग, म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगा निर्माण झाल्या. दोन्ही बाजूच्या सजीवसृष्टीला केवढा तरी नवीन भूभाग मिळाला आणि त्या सृष्टीनं हातपाय पसरले. नव्या वातावरणात ही सृष्टी उत्क्रांत झाली. काही वनस्पती मात्र आपल्या जागी अडकून पडल्या. खोल दऱ्या आणि उंच पर्वत ओलांडणे त्यांना जमले नाही. कालांतराने या प्रजातींमध्ये बदल होत गेले. एका प्रजातीपासून अनेक प्रजाती निर्माण झाल्या. सजीवसृष्टीमध्ये विश्वास बसू नये एवढी विविधता निर्माण झाली. म्हणूनच हा उंचावलेला पर्वतमय प्रदेश ‘जैवविविधतेचं पाळणाघर’ झाला.

पासीघाटच्या दक्षिणेला आहे ‘पोबा’ हा संरक्षित जंगलाचा भाग. एकेकाळी विस्तीर्ण असलेल्या जंगलाचा उरलेला, अवशिष्ट भाग म्हणजे हे जंगल. सुपीक सपाट भाग, प्रवेशाची सुलभता यामुळे या भागावर अतिक्रमण करून शेती करणे मानवाला सोपे  होते. त्यामुळे आता इथे जंगल तुलनेने कमी आहे. आता तो भाग राखीव असल्याने तिथे जंगलतोड होत नाही. या जंगलातील वैशिष्टय़पूर्ण वृक्ष म्हणजे ‘हॉलॉक’. हा ऐन वृक्षाचा एक प्रकार (मायरिकार्पा) ही झाडे उंचउंच वाढतात. माथ्यावर त्यांचे दाट छत्र बनते. त्यामुळे वृक्षांच्या पायतळी, जंगलातील भूमीवर, सूर्यप्रकाश पोचत नाही. ‘पोबा’च्या एकसुरी, सपाट भूभागावर विपुल ओढे, झरे, पाण्याचे प्रवाह वाहात असतात. आर्द्रता आणि सावली या गोष्टी आवडणाऱ्या वनस्पतींची या वृक्षांखाली दाटी झाली आहे. त्यांतील एक म्हणजे टक्का इंटिग्रिफोलिया किंवा पांढरे वाघूळ फूल. या फुलाची दोन दले (ब्रॅक्ट्स) वाघुळाच्या कानाप्रमाणे दोन बाजूने दिसतात आणि फुलाचे लांब तंतू (टेंटॅकल्स) वाघुळाच्या मिशांसारखे दिसतात. म्हणून हे वाघूळ फूल. दुसरी आकर्षक वनस्पती म्हणजे केशरी रंगाचे बाणासारखे दिसणारे फुलाचे तुरे असलेला ग्लोब्बा मल्टीफ्लोरा याला ‘डान्सिंग फ्लॉवर’ म्हणतात. हे रानआल्याच्या कुळांतील आहे. या वनस्पतीचे वैशिष्टय़ म्हणजे ती आईवडिलांप्रमाणे आपल्या नवजात पिल्लांची काळजी घेतात. या वनस्पती नवजात पिल्लांना मुळे आणि पाने फुटेपर्यंत आपल्यापासून वेगळे करत नाहीत. पाने आणि मुळे फुटलेली ही पिल्ले आईवेगळी झाली की इतर वनस्पतींपेक्षा वेगाने वाढतात. जगण्याच्या आणि नवनिर्माणाच्या स्पर्धेत जिंकतात.

सियांग नदीतीरावरील मध्यम उंचीच्या जंगलांचाही नवेन्दूने अभ्यास केला. ही जंगले ३०० मीटरपासून १४०० मीटपर्यंतच्या उंचीवर पसरलीत. इथं पाऊस जास्त आणि हवा दमट असते. पाण्याचे प्रवाह बारमाही खळखळत असतात. अभोर टेकडय़ांमधील प्रजातींमध्ये सर्वात जास्त विविधता इथे आढळते. उष्णकटिबंधातील सीताफळ म्हणजे अ‍ॅनॉलसी कुळांतील अनेक प्रकार इथे वाढतात. जोडीला रुंदपर्णी ओक, चेस्टनट अशी फॅगसी कुळातील समशीतोष्ण कटिबंधातील झाडे असे दोन्ही प्रकार इथे नांदतात. याचं कारण विषुववृत्तीय आणि समशीतोष्ण कटिबंधातील अशी दोन्ही प्रकारची हवामान परिस्थिती इथे एकत्र नांदते. आपल्या परिचित आणि आरामदायी हवामानातून थोडं बाहेर पडून नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याची त्यांची तयारी असते. बदलत्या परिस्थितीशी ती समरस होतात, त्यानुसार आपल्यात बदल करण्याची त्यांची तयारी असते.

या टेकडय़ांच्या पायथ्याचं जंगलही वैशिष्टय़पूर्ण आहे. डिप्टेरोकार्प कुळांतील होपिया शिंगकेंग हा वृक्ष लढाऊ वृत्तीचा आहे. इतर वृक्षांच्या वाढीच्या चढाओढीत हा नेहमीच वरचढ ठरत आघाडी घेतो. मोठय़ा संख्येने हे शेजारीशेजारी वाढतात. अगदी ६०० मीटर उंचीपर्यंत हे आढळतात. या कुळांतील इतर झाडेही आक्रमक आणि आपले वर्चस्व टिकवून असतात. अंदमानच्या जंगलात ही झाडे बहुसंख्येनं दिसतात. ही उपजात आदी किंवा अभोरच्या टेकडय़ांमधील विशिष्ट भागांतच आढळते. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीए) च्या नाहीशा झालेल्या वृक्षांच्या यादीत याचा समावेश केला आहे. पण तो उल्लेख काढला जाऊन माहिती अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्याचे अस्तित्व तिथे आहे हे अभ्यासकांना कळणे गरजेचे आहे. मोहिमेच्या कालावधीत नवेन्दू याला अनेक दुर्मीळ वृक्ष आढळले. त्यांचा उल्लेख कोठेच नसल्याने ती झाडे अनोळखी राहिली आहेत. व्हायटोकिया ही वनस्पती जेस्नेरियसी या कुळातील आहे. ‘आफ्रिकन व्हॉयलेट्स’ या नावानं ती ओळखली जाते. या प्रजातीमध्ये फक्त पाच-सहा उपजाती आहेत. त्याला असमान पाने आणि नळीसारखी फुले असतात. भारताच्या संदर्भात हा उल्लेख व फाइंडिंग महत्त्वाचे आहे. कारण आजपर्यंत या गटांतील झाडे फक्त चीनमध्ये आहेत, असं मानलं जात होतं. हा नवीन शोध मोहिमेत लागला.

ढग पांघरलेले माऊलिंग राष्ट्रीय उद्यान

माऊलिंगच्या राष्ट्रीय उद्यानात ही शोधमोहीम तंबूंमध्ये १० दिवस विसावली. इथले कमी उंचीवरील जंगल मध्यम उंचीवरील जंगलाशी साम्य सांगणारे आहे. माऊलिंगमधील एक टेकडीची धार चढत चढत २००० मीटर उंची दाखवते. या मोहिमेतील ही सर्वात उंच जागा. मोहिमेतील सदस्य वपर्यंत आले आणि त्यांनी आपली निरीक्षणे नोंदवली. धार चढून वर आल्यावर सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. इथली जंगलाची रचना, मांडणी (कम्पोझिशन) खालच्या उंचीवरील जंगलापेक्षा पूर्णत: वेगळी आहे. झाडांची वाढ खुंटलेली होती आणि ती ओक, ऱ्होडोडेंड्रॉन अशी रुंद पानी प्रकारांतील होती. झाडांची खोडे ही त्यांच्यावर वाढणाऱ्या वनस्पतींनी भरून गेली होती. शेवाळ, नेचे आणि ऑर्किड झाडाच्या आधाराने जगतात आणि हवेतील आद्र्रता, बाष्प, पोषक द्रव्ये पावसाचे पाणी घेऊन वाढतात.

या मोहिमेदरम्यान सापडलेल्या काही वनस्पती खरोखर विस्मयकारक होत्या. फुलांच्या रचनेतील वैविध्य, जगण्यासाठी बाह्य़ परिस्थितीप्रमाणे आपल्यांत बदल घडवून आणण्याची क्षमता किंवा पोषकद्रव्ये मिळवण्याची त्यांची पद्धत सगळेच विस्मयकारक होते. तेरडा (इम्पेशंट बाल्सम) मांसल पानाचे हे झुडूप बहुतेकांना माहीत आहे. आकर्षक रंग, आकार आणि रचना असलेल्या या फुलाचे बी म्हणजे टपोरी शेंग असते. तुमचा हात लागला रे लागला की ती चटकन फुटून आतील बिया उधळते. हवेच्या झुळकीने फुलपाखरांच्या स्पर्शानेदेखील ही बी आत उधळली जाते. म्हणजे बीजप्रसाराची ही निसर्गाची युक्तीच की.

सौंदर्यखनी बेगोनिया; याला पावसाच्या पाण्याचा ओलावा हवा असतो. दंवही चालते, आदी टेकडय़ांच्या या प्रदेशांतील बेगोनियाची पानेही फुलाइतकीच आकर्षक आहेत. सह्य़ाद्रीमध्येही पावसाळ्यांत दगडावर उगवतात.  बॅलॅनोफोरा – सगळ्याच वनस्पनींना हिरवी पाने नसतात, त्यामुळे अन्न तयार करण्याची यंत्रणा त्यांच्याजवळ नसते. त्यापैकी हे एक वनस्पती जगातील ही ‘जळू’ आहे जणू! एखाद्या वनस्पतीच्या मुळावर ही वाढतात. त्याच वनस्पतीपासून जीवनरस शोषून वाढतात, पुनरुत्पादन करतात. म्हणजे परजीवी असतात. अभोर जंगलात ही परजीवी वनस्पती आकर्षक लाल रंगानं लक्ष वेधून घेते.

जेस्नेरियाड – या कुळांतील वनस्पती फुले, क्षुपे (हर्ब) ही खालपासून वपर्यंतच्या उंचीवर सर्वत्र आढळतात. वाहत्या पाण्याच्या कडेने किनाऱ्याकडेने ओल्या खडकांवर आणि झाडाच्या ओल्या खोडावर त्याची आकर्षक फुले आढळतात. अभोर टेकडी प्रदेशांत सर्वत्र ही फुले फुलतात.

फुकटे प्रवासी – झाडावरचे (एपिफाइट्स)

जमिनीवर पाय न ठेवणाऱ्या या वनस्पती सारं आयुष्य झाडावरच काढतात. आकर्षक अ‍ॅगापेटिसची बारीक पानांची फांदी आणि सुंदर, आकर्षक पेल्यासारखी फुले अरुणाचलमध्ये बहुतेक ठिकाणी आढळतात. आपल्या केसाळ मुळांनी ती झाडांना-खोडांना घट्ट धरून ठेवतात.

अरुणाचलमधील सीमावर्ती अभोर टेकडय़ांच्या आणि सियांग नदीच्या खोऱ्यांतील २७ दिवसांच्या या जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यास संशोधन मोहिमेचे महत्त्व अशासाठी, की सर्वसामान्यांनी कधीही न पाहिलेली जैवविविधता शोधून त्यांचा परिचय ते शास्त्रीयजगताला करून देतात. मुख्य म्हणजे दुर्लक्षामुळे अशा भागांतील निसर्गसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये तर त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे याकडे ते सगळ्यांचे लक्ष वेधतात. बेकायदेशीर जंगलतोड, जमिनीवरील जंगल तोडून-जाळून तिथं शेती करायची, निसर्गहानीचा विचार न करता केलेले बांधकाम, जलविद्युत योजना ही निसर्गसंपत्तीवरील संकटे आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की आपण निसर्गात काय गमावतो आहोत याची किंमत कळण्यापूर्वीच निसर्ग नष्ट होऊ नये, यासाठी अशा मोहिमा गरजेच्या आहेत.

या मोहिमेतील निरीक्षणांतून सदस्यांना आढळून आले, की सियांग नदी खोऱ्यांतील या प्रदेशांत ‘झूम’ पद्धतीच्या शेतीसाठी जमिनीवरील जंगलं तोडली जात आहेत. इथली जंगले ही ‘प्रायमरी’ म्हणजे प्राचीन आणि निसर्गनिर्मित आहेत. हा मोठ्ठाच निसर्गवारसा आहे. तो सांभाळला गेला पाहिजे. जळणासाठी विशिष्ट झाडे कापली जाणे हाही धोका इथल्या जंगलांना आहे. त्यामुळे जैवविविधता धोक्यात येईल. एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे ‘बुशमीट’ची अंदाधुंद शिकार आणि तीसुद्धा क्रूर पद्धतीने केली जाते आहे. त्यांना पकडायला सापळे लावतात. यांत सापडून त्या प्राण्याचे हालहाल होतात. सांबराच्या शिकारीमुळे या भागांतील त्यांची संख्या कमी झाली आहे. लहान-मोठ्ठे पक्षी, उंदीर, चिचुंद्री, लॉरिस, उडणारी खार, मोठ्ठी खार, बेडूक, सरडे साप या सगळ्याची शिकार होते आहे. या भागांतील माकडे तर शिकार करून जवळजवळ संपलीच आहेत. काही वर्षांत काही भागातील जंगले, प्राणी, पक्षी नष्ट होण्याचा धोका आहे. त्यासाठी पर्यायी इंधन आणि उपजीविकेची साधने या भागांतील लोकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

अभोर टेकडीप्रदेशांतील या मोहिमेमुळे त्या भागांतील निसर्गाची स्थिती कशी आहे, तिथली जंगलं आणि तिथले वन्यजीव यांची विविधता काळजी करण्यासारखी आहे की नाही, तिथे संवर्धनाचे काय उपाय योजता येतील आणि तेथील जैवविविधता कशी अबाधित राहील हे ठरवता येईल. स्थानिक लोकांच्या सहभागाने जंगले आणि वन्यजीव वाचवणे फार महत्त्वाचे आहे आणि तेही खूप उशीर होण्यापूर्वी!

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com