22 November 2019

News Flash

फणी करंडा ते राष्ट्रीय संचलन

‘स्त्री’ मासिकाच्या पहिल्या अंकावर फणी करंडय़ाच्या पेटीपाशी बसून प्रसाधन करणारी ‘स्त्री’ होती. तर १९४७ च्या २०० व्या अंकावर हसतमुखाने आत्मविश्वासाने हातात तिरंगी झेंडा घेऊन संचलनात

| May 30, 2015 01:01 am

ch20‘स्त्री’ मासिकाच्या पहिल्या अंकावर फणी करंडय़ाच्या पेटीपाशी बसून प्रसाधन करणारी ‘स्त्री’ होती. तर १९४७ च्या २०० व्या अंकावर हसतमुखाने आत्मविश्वासाने हातात तिरंगी झेंडा घेऊन संचलनात सहभागी घेणारी स्त्री होती. फणी करंडा ते राष्ट्रीय संचलनापर्यंतच्या सर्वागीण संक्रमणादरम्यानची ही बदलती स्त्रीरूपं.

‘‘तुमच्या पत्नीला चकित करून तिची कळी खुलविण्याची एक युक्ती तुम्हाला सांगू का? तिचे नाव ‘स्त्री’ मासिकाच्या वर्गणीदारांत तिच्या नकळत नोंदवा.’’
‘किलरेस्कर’ जुलै १९३०च्या अंकात ‘स्त्री’ मासिकाची जाहिरात प्रसिद्ध झाली. लगेचच किलरेस्करवाडी येथील पोस्ट ऑफिसवर मनिऑर्डर्सचा पाऊस पडू लागला. पंधरा दिवसांत एक हजार वर्गणीदार ‘स्त्री’ला मिळाले. आजपासून ८५ वर्षांपूर्वी १९३० साली स्त्रियांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या नवीन मासिकाला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसादच अतिशय बोलका, स्त्रीमनाची काळाबरोबर वाढलेली ‘संवादाची भूक’ आणि ‘काळाची बदलेली गरज’ व्यक्त करणारा होता.
स्त्रियांच्या दृष्टीने प्रारंभीची ज्ञानदान वा वैचारिक प्रगतीची गरज बदलून गेली होती. सर्वच स्तरांवर एकाच वेळी, वेगाने बदलणाऱ्या काळात, एकाच वेळी विविध प्रकाराने संवाद करणाऱ्या ‘सखी’ची, ‘मैत्रिणी’ची गरज स्त्रियांना होती.
बाहय़ वातावरणात समाजजीवनात अनेक प्रवाह एकाच वेळी उसळत होते. स्त्रियांच्या संदर्भातसुद्धा नवीन घडामोडींना वेग आला होता. सांस्कृतिक जीवनात नवपरिवर्तन येत होते. राजकीय स्तरावरची ‘स्वातंत्र्य चळवळ’ देशप्रेमाला नवीन उधाण देत होती. सर्वच प्रवाहांच्या परस्परांवर होणाऱ्या परिणामांतून सांस्कृतिक वातावरण, सांस्कृतिक जीवनाचा ‘कायापालट’ घेऊ लागला. एकंदरीत काळ सतत ‘हॅपनिंग’चा होता. स्त्री जीवनावरही सर्व घटनांचे परिणाम पूर्वीपेक्षा वेगाने, तीव्रतेने होत होते. स्त्रियांचे अनुभवविश्व, जीवन क्षेत्र विस्तृत होत होते. एकोणिसाव्या शतकात १८५० नंतर स्त्री जीवनाच्या उत्क्रांत होणाऱ्या जीवनाच्या वाटचालीचा उत्कर्षांपर्यंत जाणारा टप्पा या सर्व मंथनातून स्वातंत्र्य प्राप्तीच्या घटनेपर्यंत आकाराला आला.
सर्वात महत्त्वाचा परिणाम राजकीय दृष्टीने झालेल्या बदलांचा स्त्रियांच्या मनोरचनेवर झाला. गांधीयुगाची सुरुवात, स्वातंत्र्य चळवळीचे नवे पर्व, सत्याग्रह आंदोलने यांनी भारलेले असताना म. गांधीजींच्या प्रेरणेने आणि आवाहनाने स्त्रिया राजकीय क्षेत्रातील कार्यात सहभागी होऊ लागल्या. प्रभातफेऱ्या, धरणे आंदोलन, चरखा आंदोलन, इत्यादी उपक्रमांतून हिरिरीने काम करू लागल्या. स्त्रीमनात नवीन ऊर्जा निर्माण झाली. अनसूयाबाई काळे, यशोदाबाई भट, मालिनी सुखथनकर इत्यादी स्त्रिया आघाडीवर होत्या. काँग्रेस, हिंदू महासभा इत्यादी राजकीय पक्षांनी महिला शाखा सुरू केल्याने राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत गेली.
काही वर्षांपूर्वी ‘नाटकांत स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी कराव्यात का?’ अशी चर्चा होत होती. १९१३ सालच्या ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटात राजाच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य घ्यावे या विचारांनी दादासाहेब फाळके यांनी एका स्त्रीला तयार केले होते. परंतु काही स्त्रियांनीच स्टुडिओत येऊन संबंधित स्त्रीला ‘वाळीत टाकण्याची’ धमकी देत आपल्याबरोबर परत नेले होते. त्याच मराठी समाजात लक्षणीय बदल झाला. संगीत क्षेत्रात हिराबाई बडोदेकर, नाटय़ क्षेत्रात ज्योत्स्ना भोळे, चित्रपटात दुर्गाबाई खोटे यांनी काम करण्यास सुरुवात केल्याने कलाक्षेत्राच्या रूपाने नवं अवकाश स्त्रियांसमोर खुलं झालं होतं.
स्त्रियांचे लेखन, संपादन आता समाजात रुळले होते. स्त्रियांच्या लेखनाला उत्तम प्रतिसाद मिळत होता. लेखिका, कलाकार, कवयित्री अशी स्त्रियांना ओळख मिळाली. जाणीवपूर्वक लेखन करणाऱ्या स्त्रियांची पिढी पुढे येत होती. ‘कळय़ांचे नि:श्वास’ व्यक्त करण्याची ओढ लागली होती. स्त्री-शिक्षणाचा विस्तारही लक्षणीय होता. मोठय़ा संख्येने स्त्रिया महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळत होत्या. म. कर्वे यांच्या महिला विद्यापीठातून ‘गृहीतगमा’, ‘प्रदेशायगमा’ या पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मालतीबाई बेडेकर, कृष्णाबाई मोटे, कमलाबाई देशपांडे, गोदावरी केतकर यांची पिढी कार्यरत झाली होती. स्त्रियांच्या संघटित कार्याच्या दृष्टीने तर मोठा पल्ला गाठला. स्त्री-परिषदांच्या रूपाने स्त्रिया संघटित कार्यात उतरल्या. स्त्रियांचे हक्क, अधिकार, शिक्षण इत्यादींविषयी विचार व्यक्त करून ठराव मांडत होत्या. १९२७ मध्ये पुण्यात पहिली अखिल भारतीय महिला परिषद भरली. मध्यवर्ती परिषदेच्या प्रभावातून सर्व राज्यांत, जिल्हा, तालुका स्तरांवरही ‘परिषद’ कल्पनेचा वेगाने विस्तार झाला. बरोबरीने स्त्रियांची ‘महिला मंडळे’, ‘वनिता समाज’ स्थापन झाले. स्त्रियांच्या संघटनांचे जाळे वेगाने विस्तृत झाले. अगदी कनिष्ठ पातळीवरही स्त्रियांना एकत्र आणून बांधून ठेवण्याचे काम महिला मंडळे करीत. नव्या युग संवेदनेचा फैलाव होऊन स्त्रियांच्यात नवीन जाग येत होती.
१९२९ साली ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ संमत झाला. त्यापाठोपाठ स्त्रियांचा वारसा हक्क, दत्तक घेण्याच्या हक्काची चर्चा सुरू होती. एकीकडे ‘वुमन स्पोर्टस् असोसिएशन’ची स्थापना होऊन स्त्रियांच्या शारीरिक शिक्षणाचा विचार पुढे येत होता. तेव्हाच दुसरीकडे र.धों. कर्वे यांचे संततिनियमनाचे कार्य समाजात क्रांती करण्यास पुढे येत होते. तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित मुक्ती आंदोलनाने वेग घेतला. डॉ. आंबेडकरांनी प्रारंभापासून स्त्रियांनाही आंदोलनात उतरण्याचे आवाहन केल्याने दलित स्त्रीसुद्धा जागृत होऊ लागली.
यांसारख्या सर्व प्रवाहांतून सांस्कृतिक जीवनाचा पोत बदलत होता. १९३० ते १९४० च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेल्या महायुद्धाने बदलांना गती व नवे संदर्भ दिले. महागाई, महानगरांची वाढ होऊ लागल्याने परंपरागत जीवनव्यवस्थेला छेद गेले. स्त्रियांच्या नोकरीची गरज निर्माण झाली.
साहजिकच सर्व दिशांनी येणाऱ्या संक्रमणाला स्त्रियांना सामोरे जायचे होते. अनेक बदल समजून घेत पुढे जायचे होते. वैचारिक प्रगल्भता, समकालीन युगसंवेदनेचे स्त्रियांना भान देणे व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करणे ही ‘काळाची गरज’ संपादनासाठी पुढे येणाऱ्या पिढीला तीव्रतेने जाणवत होती.
प्रवाही समाजजीवनात वेग येत असताना स्त्रियांना बरोबर घेऊन जायचे होते. स्त्री-जगाचे प्रबोधन करायचे होते. परंतु शिक्षकाची भूमिका बदलून सहयोगी सहकार्याची भूमिका घ्यायची होती. नवविचारांना व्यक्त होण्याला चालना द्यायची होती. धार्मिक कल्पनांपासून सौंदर्यदृष्टीपर्यंत स्त्रियांच्यात फेरबदल घडवून आणायचा होता.
संपादकांनाही काळाचे भान येत असल्यानेच स्त्रियांच्या नियतकालिकांचे अंतरंग पालटणे स्वाभाविक होते. नव्हे, ते आवश्यक होते. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली होतीच. वातावरणात निर्माण झालेल्या तप्ततेने ‘स्त्री’ मासिकाला जन्म दिला. संपादक शंकरराव किलरेस्कर यांनी कालसुसंगत नवसंकल्पनेचा ‘स्त्री’च्या रूपाने आविष्कार केला. ऑगस्ट १९३० मध्ये!
‘स्त्री’च्या प्रत्यक्ष आगमनापूर्वी ‘किलरेस्कर’ मासिकात १९२६ पासून प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्त्रियांचे पान’मधून मासिकाचे वेगळेपण खुणावत होते. गंगाबाई जांभेकर संपादन करीत असल्या तरी त्यामागे धोरण शंकरराव किलरेस्कर यांचेच होते. ‘स्त्रिया व स्वदेशी संसाराची मांडणी’, ‘सुगृहिणीकशी असते’ हे विषय वाचकांसमोर ठेवताना विवाह जुळवणे बिकट प्रश्न आहे. विवाह कसे जुळवून आणावेत, यावर स्त्रियांनी उपाय सुचवावेत म्हणून संपादक आवाहन करीत होते. मे १९२९ चा किलरेस्करचा महिला विशेषांक ‘स्त्री’च्या आगमनाची वार्ता देणारा, ‘स्त्री’च्या नवरूपाची साक्ष पटवणाराच होता. संपादकीयात शं. वा. किलरेस्करांनी स्त्रियांचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी लिहिले, ‘आमच्या राष्ट्राला सध्या कर्तृत्ववान महिला हव्या आहेत. स्त्रिया अधिक कर्तबगार होऊन स्वत:वरील जबाबदारी पार पाडण्यास समर्थ झाल्या पाहिजेत. ‘आम्ही बोलून चालून बायका. आमच्या हातून काय होणार?’ असे पालुपद स्त्रियांनी सोडून दिले पाहिजे. हातपाय जोडून स्वस्थ बसल्याने कोणाला काय करता येईल? पण प्रयत्न केला असता कोणी गोष्ट असाध्य आहे. कर्तृत्वशक्तीचा बुद्धिमत्तेचा सगळा वाटा परमेश्वराने पुरुषांच्या हवाली केला आहे काय? मग आमच्या हातून काहीही व्हायचे नाही असे कोणत्याही स्त्रीने उद्गार काढणे चूक नव्हे काय?’ असे म्हणून संपादकांनी संगमेश्वर येथे हनुमान जयंतीची मिरवणूक पुरुषांकडून निघत नाही. हे पाहताच स्त्रियांनी पुढे घेऊन रथ ओढत नेला. ही हकीकत सांगितली. स्त्रियांना लिहिते करण्यासाठी ‘आदर्श संसार पेला’ स्पर्धा ठेवली. यवतमाळच्या यशोदाबाई भट यांच्या ‘माझा संसार मी कसा करते’ या लेखाला प्रथम क्रमांक मिळाला. चांदीचा पेला मिळाला. ‘स्त्रियांची योग्यता’, ‘संसार सांभाळून देशसेवा’, ‘मधल्या वेळाचे मोल’ हे स्त्रियांचे लेख प्रसिद्ध केले. ‘राणी चन्नमा’, महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या चित्रपटात काम करणाऱ्या कमलादेवी यांनी आपल्या आत्मकथनातून स्त्रियांना कला क्षेत्रातील नवीन वाट दाखवली.
‘सुशिक्षित स्त्रिया या व्यवसायात शिरल्या तर त्या हिंदी चित्रपटांचा दर्जा नि:संशय वाढवतील. परंतु सुशिक्षित स्त्रियांनी या व्यवसायात शिरण्याइतकी आमच्या समाजाची मने अजून तयार झाली नाहीत. दुर्दैवी स्त्रियांना सुदैवी होता येईल असे मात्र हे क्षेत्र आहे. चरितार्थ चालवता येईल इतकी कमाई या व्यवसायात त्यांना करून घेता येईल. मी माझा संसार आज सुखाने चालवीत आहे. शिवाय माझा लौकिक झाला तो काही कमी नाही,’ असा दिलासाही कमलादेवींनी दिला.
संपादकांनी केलेल्या ‘नवसंवादाची’ साक्ष स्त्री-वाचकांना पटली. ‘‘महिला विशेषांकाला उत्तम प्रतिसाद मिळालेला बघूनच संपादकांना स्त्रियांसाठी स्वतंत्र नवीन मासिक सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. यावरून मला हे स्पष्ट दिसून आले की, स्त्रियांचे जग अगदी निराळे असून स्वतंत्र आहे. एवढय़ासाठी त्यांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे, त्यांच्या आवडत्या विषयांविषयी माहिती देणारे महाराष्ट्रीय स्त्रियांसाठी मासिक काढल्यास तेही यशस्वी झाले पाहिजे. सामाजिक सुधारणेच्या बाबतीतही स्त्रियांचे मासिक मोलाची सेवा करू शकेल!. ‘स्त्री’ हे सुटसुटीत नाव मला एकदम सुचले.’’ असे शंकरराव किलरेस्कर त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलेच आहे.
‘किलरेस्कर’ने आयोजित केलेल्या लेखकांच्या मेळाव्यातसुद्धा नवीन मासिकाच्या कल्पनेला पाठिंबा मिळाला. ‘स्त्रियांच्या हितासाठी वाहिलेले उपयुक्त, स्फूर्तिदायक व मनोरंजक मासिक’ या उपशीर्षकाने ऑगस्ट १९३० मध्ये ‘स्त्री’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. विविध विषयांवर स्वतंत्र पद्धतीने संवाद करणारी नवीन मैत्रीण स्त्रियांना मिळाली. लेखिकांना, विचारवंतांना एक व्यासपीठ मिळाले. स्त्रियांच्या मासिकांतील आशय-विषयांचा क्षेत्रविस्तार घेत गेला.
‘स्त्री’च्या मध्यवर्ती प्रवाहाला ‘महिला’, ‘भगिनी’, ‘नवगृहलक्ष्मी’, ‘वनिताविश्व’ इत्यादी मासिकांच्या रूपाने अनेक प्रवाह, उपनद्यांप्रमाणे मिळाले. वाट मोकळी होत विस्तृत झाली. संवादाची लय बदलत गेली. स्त्रीच्या बौद्धिक, मानसिक वाटचालीच्या, समाजवास्तवाच्या रूपबदलाच्या खुणाही साहजिकच उमटत गेल्या.
‘स्त्री’च्या पहिल्या अंकावर फणी करंडय़ाच्या पेटीपाशी बसून प्रसाधन करणारी ‘स्त्री’ होती. तर १९४७ च्या २००व्या अंकावर हसतमुखाने आत्मविश्वासाने हातात तिरंगी झेंडा घेऊन संचलनात सहभागी होणारी स्त्री होती. फणी करंडा ते राष्ट्रीय संचलनापर्यंतच्या सर्वागीण संक्रमणातील विविधस्वरूपी संवादाला स्वतंत्रपणे जाणून घ्यायचे आहे.
डॉ. स्वाती कर्वे

First Published on May 30, 2015 1:01 am

Web Title: woman
टॅग Woman
Just Now!
X