ch21पारंपरिक कल्पनांतून स्त्रियांनी बाहेर यावे, स्वतंत्रपणे विचार करावा. यासाठी संपादक जे प्रयत्न करीत होते, त्या प्रयत्नांना स्त्रिया जाणीवपूर्वक, जागरूकपणे प्रतिसाद देत होत्या. ही एक प्रकारे स्त्रियांमधील परिवर्तनाची पावतीच होती!
स्त्रिया लिहित्या झाल्या आणि मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या बऱ्याच पायऱ्या स्त्रीने ओलांडल्या. वैचारिक दृष्टीने विकसनशील अवस्थेत असणाऱ्या स्त्री मनाची मशागत एकाच वेळी विविध दिशांनी सुरू होती. काळही पोषक होता. स्त्रियांनी विकासाची नवीन दिशा त्वरित पकडली. स्त्रियांच्या विचारांत बदल होऊ लागले. पारंपरिक कल्पनांतून स्त्रियांनी बाहेर यावे. स्वतंत्रपणे विचार करावा. यासाठी संपादक जे प्रयत्न करीत होते, त्या प्रयत्नांना स्त्रिया जाणीवपूर्वक, जागरूकपणे प्रतिसाद देत होत्या. ही एक प्रकारे स्त्रियांमधील परिवर्तनाची पावतीच होती! असा अर्थ नाही की स्त्रियांच्या मनात कधी द्वंद्व निर्माण झाले नाही. स्त्रिया नव्या-जुन्यात घुटमळल्या नाहीत. (उदा. ‘स्त्रियांना घरकामाचा मोबदला मिळावा का?’ अशा विषयांवर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या.) परंतु एकंदर दिशा विकासाकडे निश्चितच जाणारी होती. प्रसंगी काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या काही मोजक्या स्त्रिया होत्या. उदा. शकुंतला परांजपे, ताराबाई मोडक, इंदिरा मायदेव, माई वरेरकर. अशा स्त्रिया काळापुढचा विचारही व्यक्त करीत. त्यातून स्त्रियांना जागृतीचा नवा मार्ग दिसत होता.
स्त्रियांच्या सर्वच लेखनातून युग संवेदनेचे, नवविचारांचे दर्शन होत होते. परंतु स्त्रियांच्या प्रतिसादातून त्यांच्या मनोविकासाची दिशा स्पष्ट होते. स्त्रियांचा प्रतिसाद एक बाजू तर स्त्रियांचे लेखन नाण्याची दुसरी बाजू असे म्हणता येईल. स्त्री-मनाशी होणाऱ्या संवादातून स्त्री-मनाला येणारी जाग, सामाजिक संकेत, रूढी, बदलते जीवन, प्रश्न, कायदेशीर तरतुदी, स्त्रियांचे हक्क, साहित्य, चित्रपट, राजकारण इत्यादी सर्व स्तरांवर येत होती. ती ‘जाग’ समजून घेण्यासाठी काहीशा वेगळय़ा वाटेने गेले पाहिजे. ‘विधवा स्त्रियांनी कुंकू लावावे का?’ या कांता गौरीच्या पत्रावर संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या होत्या. पत्रव्यवहारातून प्रेरणा घेऊन स्त्रियांनी हाती घेतलेला उपक्रम आपण बघितला. परंतु पारंपरिक, सांकेतिक कल्पनांतून स्त्रिया मनाने कशा बाहेर पडत होत्या याचा प्रत्यय ‘विधवांची एक हितचिंतक भगिनी’ या टोपणनावाने लिहिलेल्या पत्रात येतो. धर्मशास्त्रात काय म्हटले आहे याचा काथ्याकूट करण्यापेक्षा आज इष्ट काय आहे, हे पाहून योग्य दिसेल ते करावे. असे मत प्रारंभी व्यक्त करून चहा बिस्किटे स्नानापूर्वी खाणे, मुंज करूनही संध्या न करणे. पुरुषांनी जानवे न घालणे इत्यादींना कुठे शास्त्र आड येत नाही. मग विधवांच्या कुंकवालाच शास्त्र का आड यावे? असा विचार व्यक्त करतात. विधवा स्त्रिया अधिक पराधीन असतात. तेव्हा ज्या कुटुंबात आधुनिक विचारांची मंडळी असतील त्यांनी प्रथम सुरुवात करावी, असे पत्र लेखिकेने सुचवले.
शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक १९३५ सालच्या पाश्र्वभूमीवर काहीसा क्रांतिकारकच विचार व्यक्त करतात. अकोल्यातील भगिनींनी केलेल्या उपक्रमाचे ताराबाई कौतुक करतात. परंतु कुंकू लावण्याच्या प्रथेविषयी त्या स्वतंत्र विचार मांडतात. ‘कुंकू हे कशाचे द्योतक आहे, याचा विचार केला पाहिजे. ज्याची पाळेमुळे खोल गेली आहेत अशा स्त्रियांच्या गुलामगिरीचे, पुरुषावलंबित्वाचे ते द्योतक अथवा चिन्ह आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.. कोणीच कुंकू लावू नये व सर्वास श्रीमती या एकाच उपनावाने संबोधण्यात यावे. असा ठराव केल्यास त्या योगे स्त्रियांची स्वतंत्र व्यक्ती या नात्याने उभे राहण्याची तयारी लवकर होईल, असा विचार पत्राच्या शेवटी त्या व्यक्त करतात.
वेगाने बदलणाऱ्या समाजजीवनात सामाजिक तसेच पोशाखाविषयीचे संकेतही वेगाने बदलतात. नवीन बदलांना सहजतेने स्वीकारण्याची समाजमनाची तयारीसुद्धा एकीकडे झालेली असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्रियांचा पंजाबी पोशाख. नवतरुणी ते मावशी, आत्याच काय तर आजी मंडळीसुद्धा आनंदाने ‘पंजाबी पोशाखात’ वावरत आहेत. परंतु त्यासाठी बराच काळ जावा लागला होता. स्त्रियांनी पारंपरिक नऊवारी साडी नव्हे लुगडं वापरावं का गोलसाडी (विकच्छ) नेसावी. यावर काळाच्या एका टप्प्यावर चर्चेचे मोहळ उठले होते. बदलत्या काळाबरोबर गोलसाडी पुढे येत होती. चित्रपटातील नायिका गोलसाडीत दिसू लागल्या. तत्कालीन तरुण पिढीतील स्त्रियांना ‘गोल पातळाचे’ आकर्षक वाटणे सहजच होते. परंतु तेव्हा ती फॅशन होती. श्रीयुत गद्रे यांनी आपल्या लेखातून प्रथम या विषयावर चर्चा केली. मीनाक्षी कोल्हटकरांनी ‘महाराष्ट्रीय स्त्रियांनी पोशाख कसा करावा? सकच्छ की विकच्छ’ या विषयावर लेख लिहिला. स्त्रीच्या संपादकांनी वाचकांच्या प्रतिक्रिया मागविल्या. पत्रांचा पाऊस पडला. परंतु त्यातून विचारांच्या अनेक छटा व्यक्त झाल्या. नवे वळण, सोय, सौंदर्यदृष्टी याबरोबर समाजाच्या विचारांची दिशा व्यक्त झाली. उदा. ‘वेष परिवर्तनास सबल कारण- विकच्छ धारिणी’, ‘सकच्छ पद्धतच सोयीस्कर’, ‘सुखसोय, सौंदर्य सधन व काटकसर तिन्हीचा मिलाप’, ‘निरनिराळय़ा तऱ्हा आम्हा स्त्रियांना हव्या’, ‘सकच्छ नेसलेली स्त्री नीटनेटकी आकर्षक दिसते.’ यासारख्या प्रतिक्रिया बरोबर नव्या-जुन्याचा मेळ घालणाऱ्या प्रतिक्रियाही होत्याच. लक्ष्मीबाई प्रधान यांनी दोन्ही प्रकारच्या साडय़ा स्त्रियांनी वेळ-प्रसंगानुसार वापराव्या असे सुचवले. घरकामात सकच्छ तर घराबाहेरच्या समारंभात विकच्छ. पुरुष जसे धोतरात व बाहेर सुटाबुटात वावरतात, तशी पद्धत सुशिक्षित स्त्रियांनी पाडावी. बदलत्या काळाप्रमाणे समाजातील पोशाखात बदल होणे अपरिहार्य आहे. तो तरुण पिढीने अमलात आणल्यास त्यास गौण मानण्यात अर्थ नाही. यावर शकुंतलाबाई परांजपे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे परखड विचार व्यक्त केले. ‘माझ्या मते पोशाख हा समयोचित असला पाहिजे. सकच्छ की विकच्छ हा वाद घालण्यात काय अर्थ आहे? सभेला, सिनेमाला, फिरायला जाताना विकच्छ पातळ सुंदर दिसते. पण स्वयंपाक करताना, धुणी धुताना, वाढताना, दळताना, कवायत घेताना सकच्छ लुगडेच सुरेख, सुटसुटीत दिसते. आणि कवायत करताना, टेनिस खेळताना, पोहताना पातळ किंवा लुगडे दोन्हीला रजा देऊन विजारीवजाच काही तरी पोशाख करणे सोयीचे असते!’
स्त्रियांच्या पोशाखावरून इतक्या क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या; तर स्त्रियांना घरकामाचा मोबदला मिळावा का, यावर चर्चा झाली असल्यास नवल नाही. वाचकांना आठवत असेल, याच वर्षी ८ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने ‘चतुरंग’ने ‘गृहिणीचे श्रममूल्य आणि मानसिकता’ या विषयावर सर्वेक्षण केले. ‘घरकामाचा मोबदला मिळावा का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक स्त्रिया घोटाळल्या, गांगरल्या होत्या. अनेक जणींना मोबदला मिळाला तर घरी काम करणाऱ्या मोलकरणींशी बरोबरी होईल असे वाटत होते. २०१५ साली जर स्त्रियांच्या मनात द्वंद्व असेल तर १९४४ साली असल्यास नवल नाही. ‘स्त्री’ने मागवलेल्या प्रतिक्रियामध्ये असे प्रश्न विनाकारण उत्पन्न करणे हे संथपणे चाललेल्या जीवनात खळबळ उत्पन्न करणे होय. अशा तत्कालीन स्त्रीची मानसिकता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया प्राधान्याने होत्या. ‘स्त्री’च्या अस्तित्वाचे महत्त्व, आपल्या हक्काची जपणूक आपणच करावी लागते. या विषयीचे भान इंदिरा मायदेव व्यक्त करताना म्हणतात. ‘कष्टाचे मोल करता येत नाही म्हणून हा प्रश्नच बाजूला सारणे योग्य नव्हे. पतीच्या मासिक प्राप्तीपैकी थोडा तरी हिस्सा पत्नीला हक्काने व आपल्या इच्छेनुसार खर्च करण्यास मिळाला पाहिजे. ही गोष्ट निर्विवाद आहे. स्त्री जर संसाराची जोखीम पुरुषाच्या बरोबरीने वाहते, तर तिला असे का वाटू नये. या बाबतीत एक कायदा करता येणार नाही, पण संसाराची आबाळ करून स्त्रियांनी आर्थिक स्वातंत्र्याकरता नोकरी करू नये असे जर पुरुषांना वाटत असेल तर त्यांच्याकरिता काही तरी आर्थिक व्यवस्था करण्यास त्यांनी (पुरुषांनी) तयार असले पाहिजे.’
सामाजिक विषयांप्रमाणेच कथात्म साहित्यातील चित्रण, व्यक्तिरेखा इत्यादीविषयी स्त्रिया आपला प्रतिसाद संपादकांना कळवत. ‘घराबाहेर’ या कथेत नायिका समाजसेवेसाठी घर सोडते. आपली कर्तव्ये सांभाळून स्त्रीने कार्य करावे. सामाजिक चळवळीत सर्वस्व द्यायचे तर स्त्रीने विवाह करू नये! असा एकंदर प्रतिक्रियांचा सूर असताना इंदिरा गोगटे यांनी वेगळा विचार व्यक्त केला. भावी काळ सुखी करण्यासाठी वर्तमानकाळात काहींना आपल्या सर्वस्वाची आहुती द्यावी लागते. युग विचार क्रांतीचे. अनुराधाला आपल्या स्वार्थी जीवनाचा वीट आला होता.. ज्या वेळी आमच्यातील काही स्त्रिया उच्च ध्येयाने प्रेरित होऊन ‘घरटय़ाबाहेर’ पडतील तेव्हाच पतीला पत्नी वासनापूर्तीचे साधन किंवा श्रीमंतीचे प्रदर्शन न वाटता खरोखरीच देवता आहे असे वाटेल.
स्त्रियांची विस्तृत होणारी वैचारिक कक्षा त्यांच्या प्रतिसादातून व्यक्त होते. वाचक स्त्रियांच्या अशा नानाविध विचार करणाऱ्या प्रतिक्रियांबरोबरच स्त्रियांचे लेख हे त्याही पेक्षा किती तरी महत्वाचे आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे वेध घेतला पाहिजे.
डॉ. स्वाती कर्वे -drswati.karve@gmail.com

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !