24 September 2020

News Flash

मैत्र जीवाचे!

ठिकठिकाणच्या वाचकांनी पाठवलेले त्यांच्या भिन्नलिंगी मैत्रीचे  हे काही प्रातिनिधिक अनुभव.

स्त्री-पुरुष मैत्रीकडे पूर्वी ज्या एका वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जायचं, तितकी अवघडलेली परिस्थिती आज दिसत नाही.

स्त्री-पुरुष मैत्रीकडे पूर्वी ज्या एका वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जायचं, तितकी अवघडलेली परिस्थिती आज दिसत नाही. अनेक मुलंमुली सहजपणे भिन्नलिंगी मैत्री करतात आणि मोकळेपणानं निभावतातही. यंदाच्या मैत्री दिनाच्या निमित्तानं स्त्री-पुरुषांमधल्या निखळ मैत्रीचा सोहळा ‘चतुरंग’मधून (१ ऑगस्ट) साजरा करण्यात आला. या वेळी अशा मनापासून जपलेल्या किंवा संकोचामुळे घुसमटून जपता न आलेल्या स्त्री-पुरुष मैत्रीचे किस्से पाठवण्याचं आवाहन वाचकांना करण्यात आलं होतं. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला . त्यातलेच ठिकठिकाणच्या वाचकांनी पाठवलेले त्यांच्या भिन्नलिंगी मैत्रीचे  हे काही प्रातिनिधिक अनुभव. काही हेवा वाटावा असे, तर काही शहाणं करून सोडणारे ..

इतरांनीही सहज स्वीकारलेली मैत्री

मी आणि माझा मित्र शालेय सोबती. दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकणारे. पण तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे आम्ही एकमेकांशी अजिबात बोलायचो नाही. कोकणातल्या एका खेडेगावात १९८९ मध्ये अशीच परिस्थिती होती. गावचे काही अलिखित नियम, परंपरा, चालीरीती यामध्ये एका मुलाची आणि एका मुलीची मैत्री बसणं शक्यच नव्हतं, पण माझ्या बाबतीत हा योग सहज जुळून आल्यासारखं झालं. अकरावीसाठी मी मुम्ंबईत माझ्या नातेवाईकांकडे राहायला आले.  तोही आला. दोघांनाही गावाची ओढ वाटतच होती. मुंबईतलं मोकळं वातावरण अनुभवायला मिळालं आणि त्या सहजतेनं आमची छान मैत्री झाली.  सुट्टीत गावाला गेल्यावर आम्ही आमच्या इतर दोस्त मंडळींबरोबर भरपूर वेळ एकत्र घालवायचो. पत्ते, समुद्रावर फिरणं, खूप भटकंती..  हळूहळू आमच्यात एक नवीन नातं तयार होत होतं. यात तारुण्यातलं आकर्षण अजिबात नव्हतं.  पत्रही लिहायचो एकमेकांना आम्ही. नंतरच्या वयात आम्ही दोघंही आमच्या आमच्या संसारात गुरफटलो.  फोन नसण्याचे दिवस होते ते, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू शकलो नाही, पण नंतर ‘फे  सबुक’वर त्यानं मला शोधलं आणि परत अखंड गप्पांचा रतीब सुरू झाला. मधली संपर्काविना गेलेली र्वष जाणवलीच नाहीत. हा माझा मित्र अतिशय हळव्या मनाचा, पण तरीही ठाम मतं असलेला. समोरच्याला छान समजून घेणारा. शांत, विचारी, आधी दुसऱ्याचा विचार करणारा. कविता करणारा. माझ्यासारख्या रागीट मुलीला त्यानं छान समजावत हळूहळू माझ्या स्वभावात शांतपणा आणला. अजूनही आम्ही एकमेकांपासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही. अडचणीच्या वेळी आम्हाला एकमेकांची आठवण येते. कधी कुठल्या कारणानं मन बैचेन असेल तर याला फोन करायचा.  फोन संपेपर्यंत माझी ‘बॅटरी चार्ज’ होते.  वेगवेगळ्या शहरांत राहून न बोलताही आम्ही एकमेकांना छान वाचू शकतो. अजून ही गेट टुगेदरला भेटल्यावर दोघंच जरासा वेळ एकत्र घालवण्यासाठी कुठेतरी उनाडून येतो, पण आम्हाला कुणालाही काही समर्थन द्यावं लागलं नाही की कुणाच्याही मनात किंतु परंतु आला नाही.  मी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कु टुंबातली मुलगी आणि तो एका सधन मराठा कुटुंबातील मुलगा, पण तेव्हाची आर्थिक परिस्थिती, जात-पात आमच्या या मैत्रीतले अडसर बनले नाहीत. माझ्या आई-बाबांनी आमची मैत्री ही मैत्री म्हणूनच स्वीकारली. त्याला कुठलंही ‘लेबल’ लावलं नाही.  हे नातं आताच्या वयापर्यंत टिकवण्यात माझा नवरा आणि त्याची बायकोही तितकेच सहभागी आहेत. त्या दोघांनीही कधी कुठलंच किल्मिष नाही ठेवलं. कुठलाही संशय नाही घेतला. त्याच्यामुळे मला मैत्री खूप छान कळली..  छान निभावताही आली..

– वीणा

निर्लेप मनाची मैत्रीण

सकाळी फिरायला जायचो तिथं माझ्या गतीनं चालणारी ती एकटीच होती. त्यातून तिची माझी ओळख झाली आणि आम्ही खास मित्रमैत्रीण झालो. माझ्या पत्नीला आमच्या मैत्रीचा हेवा वाटायचा. मैत्रीण स्वत: आर्टिस्ट , दिलखुलास, संवेदनशील, सुखवस्तू, दिसायला सुंदर असूनही निगर्वी अन् साधी, निर्लेप. माझी पत्नी गेली तेव्हा मी जगणं विसरत चाललो होतो. ही रोज ‘वॉक’ला भेटायची. मी पडेल चेहऱ्यानं तर ती उत्साहानं बोलणारी. ‘‘तुम्ही आजपर्यंत जसं जगला आहात तसं इतरांना जगायला मिळालंय का? कुणी तरी एक जण आधी जातो ते आपल्या हातात नसतं, मस्त जगा हो,’’ असं सांगून मला तिनं माणसात आणलं अन् हसायला शिकवलं. मी ५९ आणि ती ४६ची आहे. वेगळेच ऋणानुबंध जुळले आहेत. माझ्या लेखनाला स्फूर्ती देणारी ती पहिली समीक्षक आहे. मी त्यांचा ‘फॅमिली फ्रें ड’ झालो आहे. फोनशिवाय अचानक तिच्या घरी जाऊन सर्वाशी छान गप्पा मारू शकतो, हेच आमच्या मैत्रीचं यश!

  – डॉ. बी. व्ही. कुलकर्णी

आमचं घट्ट व परिपूर्ण नातं

मी आणि माझा मित्र, आमची मैत्री आम्ही सध्या ज्या ऑफिसमध्ये काम करतोय तिथली. सुरुवातीच्या काळात आमच्या दोघांचेही विभाग वेगवेगळे असल्यानं  केव्हातरी कामापुरतं बोलणं व्हायचं, पण फारच जुजबी. थोडय़ा दिवसांत मी ऑफिसमध्ये रुळू लागले, सगळ्या कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबर सुसंवाद वाढला, पण हा जेमतेमच बोलायचा.  कामात अतिशय प्रामाणिक, जबाबदार, कष्टाळू. अडलेल्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार, हे त्याचे गुण मी काम करताना जवळून अनुभवत होतेच.  पण कामाशिवाय कु णाशीही बोलणं त्याला आवडायचं नाही. दुसऱ्या वर्षी अनपेक्षितपणे आम्हा दोघांना एका प्रोजेक्टसाठी निवडलं गेलं.  मी खूशच झाले. त्याला म्हटलं, ‘हा प्रोजेक्ट आपण दोघं मिळून यशस्वी करतोय बस्स.’ हे ऐकून तो थक्क नजरेनं माझ्याकडे बघतच बसला.  प्रोजेक्टच्या निमित्तानं आमचं बोलणं सुरू झालं आणि एकमेकांबद्दल विश्वास वाटू लागला. तो मनातलंही बोलू लागला. पण त्याची एक खंत होती, पुरुष-स्त्री मैत्रीकडे समाज निकोप मनानं पाहात नाही. म्हणून तो नेहमी मुलींशी बोलणं टाळत असे. आमचे स्वभाव भिन्न असल्यानं असेल कदाचित आमची मैत्री घट्ट होत गेली. दरम्यान, एका अपघातात त्याचा डोळा निकामी होण्यापासून वाचला, कारण मी वेळेवर त्याला डॉक्टारांकडे घेऊन गेले. तेव्हापासून तर त्याची या स्त्री-पुरुष मैत्रीकडे बघण्याची नजरच बदलली. आमच्या निखळ मैत्रीला आता आठ र्वष पूर्ण झालीयेत, आमच्यातला हा बंध स्नेह, काळजी, नि:स्वार्थीपणा आदी पैलू्ंनी समृद्ध व तितकाच परिपक्व झालाय. आजही आम्ही मानसिक, भावनिक, आर्थिक व कुठल्याही  प्रसंगांत एकमेकांसोबत ठामपणे उभे असतो  व सदैव राहू यात शंका नाही.

 – स्नेहल  साटम

परस्परविश्वासातून टिकलेलं नातं

मी १९६८-६९ मध्ये ‘बनारस हिंदू युनिव्हर्सिटी’मध्ये एम.ए. करत असताना आमचा नऊ जणांचा गट होता. पाच मुलं आणि चार मुली. आमचं बाहेर खाणं, चित्रपट बघणं, असे बरेच कार्यक्रम एकत्र चालत. कधी तरी आम्ही तिथल्या संस्कृतीला साजेसं पानाच्या टपरीवर जाऊन पानही खात असू.  अंतिम परीक्षा झाल्यावर सगळे पांगले. त्या काळाला अनुसरून पत्रव्यवहार सुरू झाला. तो काही र्वष टिकला. मी लग्न होऊन मुंबईला आले. एक मित्र आय.पी.एस. सेवेत निवड होऊन महाराष्ट्रात रुजू झाला. निवृत्त व्हायच्या काही र्वष आधी तो पुण्यात आला आणि माझा बराच गोतावळा तिथे असल्यामुळे भेटी वाढल्या. माझे पती यात क्वचितच असत. नवीन भाषा शिकायची आवड आणि संस्कृतचं प्रेम हा आमच्या मैत्रीतला समान दुवा होता. एकदा त्याला एका मीटिंगसाठी मुंबईला यायचं होतं. मुक्काम जेमतेम चोवीस तास. त्यानं मला त्याच्या वरळीच्या गेस्ट हाऊसवर रात्री जेवायला बोलावलं. अंधेरीहून वरळीला जाऊन गप्पा मारत जेवून परत यायचं म्हणजे अर्थातच उशीर होणार होता. मी माझ्या पतीला या कार्यक्रमाबद्दल सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, ‘‘किल्ली घेऊन जा.’’ असा विश्वास असेल तरच अशी मैत्री टिकते. मला ती टिकवता आली याचा आनंद आहे.

– नंदिनी बसोले

   मैत्रीचा संस्कार

मोह, शारीरिक आकर्षण, व्यवहार या पलीकडची मैत्री मी अनुभवली याचा मनापासून आनंद होतो.  एका नामांकित संस्थेत मी गेली १९ वर्षे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे व तर माझा हा मित्र एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे. माझे शालेय शिक्षण कन्याशाळेत झाले, पण अभियांत्रिकी पदवी घेताना मैत्रिणीचा मित्र म्हणून आयुष्यात आलेला तो पहिला पुरुष मित्र होता. पुढे तो याच मैत्रिणीचा जोडीदार झाला त्यामुळे आमच्या नात्यात अधिकच मोकळेपणा आला असावा. आज आमच्या मैत्रीला २५ र्वष पूर्ण झाली. वाढदिवस, भेटी हे सर्व तर होतच राहिलं, पण ‘करोना’काळात आमच्यातले संवाद वाढले आणि  व्यक्त होण्यासाठी आमच्यातील नात्याचं महत्त्व आणि गरज दोघांनाही कळली. महत्त्वाचं म्हणजे आमची ही मैत्री माझ्या जोडीदारानंही स्वीकारली आहे. निखळ मैत्री होऊ शकते याचा संस्कार नकळत माझ्या १६ वर्षांच्या मुलीवर झाला याचं मला समाधान आहे.

– व्ही. एस. खारोटे-चव्हाण

आयुष्याच्या उत्तरार्धातली मैत्री

‘मैत्र जीवाचे’ या शीर्षकाखाली ‘चतुरंग’नं वाचकांना भिन्नलिंगी मैत्रीच्या साक्षात्कारी अनुभवांबद्दल लिहायचं आवाहन के लं खरं; पण आयुष्यातील सहस्रचंद्राचा टप्पा पार पडलेल्या पिढीच्या आमच्यासारख्या लोकांनी याबद्दल काय लिहावं, असा प्रश्नच पडतो. आमच्या लहानपणी मुलामुलींच्या शाळा वेगवेगळ्या असल्याकारणानं मुलींशी मैत्री तर सोडाच, साधी ओळखही व्हायची नाही. पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयातही हाच कित्ता गिरवला गेला, कारण तिथे सगळे मुलगेच. अभियंता झाल्यावर कारखान्यातल्या नोकरीमुळे हा वनवास संपेना. एकूणच भिन्नलिंगी मैत्रीसाठीचं वातावरण मिळालंच नाही. विवाहबद्ध झाल्यावर सहचारिणीलाच मैत्रिणीची भूमिका करावी लागली. नंतर आयुष्यात फार उशिरा का होईना, पण हा योग आला. मी नोकरीनिमित्त नाशिकला असताना कंपनीच्या सदनिके त एकटाच राहात होतो. त्या इमारतीत प्रत्येक मजल्यावर दोनच सदनिका होत्या आणि माझ्या शेजारच्या सदनिके त एक मध्यमवयीन स्त्री एकटीच राहात होती. एके दिवशी संध्याकाळी मी कामावरून येऊन घरी निवांत बसलो असताना दारावरची बेल वाजली.  दारात ती शेजारची स्त्री समोर उभी होती. तिनं मला आपलं नाव सांगून तिची अडचण सांगितली. तिच्या घराच्या दरवाजाचं लॅच लागलं होतं आणि चावी आतमध्येच राहिली होती. अडचणीत असणाऱ्याला मदत करणं हे कर्तव्य असल्यानं मी तिला माझ्या घरात बसायला सांगितलं आणि चावी बनवणाऱ्याला शोधून आणून तिच्या घराचं दार उघडलं. पुढे आमची चांगलीच दोस्ती जमली. कुठलाही आडपडदा न ठेवता आम्ही एकमेकांना सुखदु:खात साथ देत राहिलो. नाटक, चित्रपट एकत्र  बघू लागलो. माझ्या जेवणाचा प्रश्नही तिनं मिटवला. एकमेकांच्या निखळ मैत्रीत दिवस चांगले चालले होते. काही वर्षांनंतर  माझी बदली झाल्यामुळे मला नाशिक सोडावं लागलं, तेव्हा तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबेचनात. आता आम्ही फोनवर एकमेकांची खुशाली विचारतो किंवा एकाच गावात असल्यास भेटतो.

– आर. टी. एम.

मैत्रीचं दुसरं पर्व

२००५ मधली गोष्ट.  एके दिवशी माझ्या वर्गमित्राचा मला फोन आला. माझ्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखाच्या संदर्भात तो होता. त्याबद्दल बोलून झाल्यावर तो म्हणाला, ‘जरा इकडे बोल’. कोणाशी म्हणून विचारण्याच्या आतच एका स्त्रीचा आवाज आला, ‘हॅलो, मला ओळखलंस का?’  पन्नास वर्षांनंतर माझ्या शाळेतल्या माझ्या स्पर्धक मैत्रिणीशी फोनवर गाठ पडत होती. मग शालेय जीवनातल्या काही गमतीदार आठवणी निघाल्या. फोन ठेवता ठेवता म्हणाली, ‘आयुष्याच्या सुरुवातीला भेटलो होतो. आता एकदम संध्याकाळी भेटतो आहोत.’ त्या फोननंतर आमच्या मैत्रीचं दुसरं पर्व सुरू झालं. दोघंही आपापल्या कौटुंबिक जीवनात चांगल्यापैकी स्थिरावलेले होतो. दोघांनाही आजी-आजोबा हे पद प्राप्त झालं होतं. आता शालेय जीवनातली स्पर्धेची भावना नव्हती. उलट आयुष्यातल्या एकमेकांच्या प्रगतीबद्दल कौतुकमिश्रित आदर होता. आम्हा दोघांना लेखनाचा छंद असल्यामुळं आपापल्या लेखनासाठी एक हक्काचा समविचारी वाचक व टीकाकार मिळाला होता. २००५ मध्ये सुरू झालेलं हे पर्व पुढे १३ र्वष कायम राहिलं. २०१८ मध्ये वृद्धापकाळामुळं तिचं निधन झालं, पण तिच्या कुटुंबीयांशी निर्माण झालेले मैत्रीसंबंध अजूनही टिकून आहेत.. त्या अर्थी हे तिसरं पर्व.

 – शरद कोर्डे, ठाणे 

नात्यास नाव आपुल्या..

‘तिचं’ लग्न होऊन दोन र्वष होत आलीत, पण आजही आमच्या नात्यात काडीमात्र फरक पडलेला नाही. पाच वर्षांपूर्वी मानसीची आणि माझी भेट झाली. दोघंही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळे १०-१२ तास अभ्यासिकेत सोबतच असायचो. त्यामुळे ओळख झाली आणि पुढे मैत्री. कॉलेजला एका गाडीवर जाण्यापासून ते एकाच डब्यात जेवणापर्यंत आणि सोबत सिनेमाला जाण्यापासून ते मॉलमध्ये शॉपिंगपर्यंत सर्व काही एकत्रच होऊ लागलं.  लोक काय म्हणतील या विचारानं आम्ही कधीही आमच्या मैत्रीची घुसमट होऊ दिली नाही, कारण आम्हाला आमच्या मर्यादा ठाऊक होत्या. मानसीनं प्रेमविवाह के लाय आणि तिला जोडीदारही आमच्यासारखाच मनमोकळ्या स्वभावाचा, निखळ आणि निव्र्याज मैत्रीची जाण असलेला आहे. त्यामुळं आता आम्ही तिघंही चांगले मित्र आहोत.  कुसुमाग्रज ‘छंदोमयी’मध्ये म्हणतात, नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही. पण खरंच नाव द्यावं का?

  – समाधान वडने, हडपसर

लपवाछपवीत मरून गेलेली मैत्री

एकदा दादा म्हणाला, की त्याच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी ‘फेसबुक’वर अजूनही त्याच्या संपर्कात आहेत. मी तेव्हा बी.ए.च्या पहिल्या वर्षांला होते. मीही फेसबुक अकाऊंट सुरू केलं आणि शाळेतल्या मैत्रिणींचा शोध घ्यायला सुरुवात केली. हो फक्त मैत्रिणींचा! कारण मुलांशी मैत्री करायची नाही, असे अप्रत्यक्ष संस्कारच जणू लहानपणापासून मनावर झाले होते. एका मैत्रिणीच्या ‘फ्रेंडस् लिस्ट’मध्ये एक चेहरा ओळखीचा वाटला. नाव वाचल्यानंतर ओळख पटली. त्याच्या अकाऊंटवर पहिल्याच ‘पोस्ट’मध्ये त्यानं बनवलेल्या  शाडूमातीच्या गणपतीचा सुंदर फोटो होता. ओळखीच्या इतर मुलांच्याही पोस्ट पाहिल्या; पण त्यांच्या पोस्ट्समध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये काढलेल्या त्यांच्या स्वत:च्या फोटोंशिवाय इतर काही नव्हतं. मला या वर्गमित्राची ‘इकोफ्रें डली’ मूर्ती फार आवडली आणि मी त्याला ‘फ्रें ड रिक्वेस्ट’ पाठवली. त्या वेळी फेसबुक माझ्यासाठी नवीन होतं. मग आम्ही ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर बोलायला सुरुवात केली. शाळेतल्या आठवणी, शिक्षकांबद्दलचे मजेशीर किस्से, वाचलेल्या पुस्तकांबद्दलची माहिती, एकमेकांच्या आवडीनिवडी, अनुभव अशा अनेक गोष्टी ‘शेअर’ करू लागलो. एका टप्प्यानंतर मात्र आम्ही ‘टिपिकल’ बॉलीवूड चित्रपटांसारखे ‘लव्ह रिलेशनशिप’मध्ये असल्यासारखं बोलू लागलो; पण मग मैत्रीतला गुंता दोघांच्याही लक्षात आला. आम्ही मोकळेपणानं बोलून आपल्यात निखळ मैत्री राहू शकते, असं मस्तपैकी ‘सॉर्ट आऊट’ केलं.

जेव्हा आईबाबांना हे कळलं, ते आधी रागावले आणि मग माझी समजूतही घातली. त्यांच्यापासून हे लपवून ठेवल्याबद्दल मलाही अपराधी वाटलं, त्यामुळे तो चांगला मित्र आहे हे सांगण्याची हिंमत मी करू शकले नाही. अशी लपवाछपवीत आणि संशयाच्या परिघात माझी मैत्री घुसमटत राहिली आणि शेवटी ती मी कायमची गमावली.

– पूनम पाटील  

३० वर्षांची निव्र्याज मैत्री

मैत्रीला वय, लिंग ही बंधनं नसतात. ज्याच्याशी आपले विचार जुळतात, त्याच्याशी मैत्री होते. असंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं. मी अकरावीला महाविद्यालयात प्रवेश घेतला. सहलीच्या निमित्तानं आम्हा सात-आठ समविचारी मुलामुलींचा गट तयार झाला. त्यातही माझे आणि मिलिंदचे विचार अधिक जुळत असल्यानं आमचं विशेष ‘टय़ुनिंग’ जमलं. ते आजतागायत कायम आहे. मिलिंद अभ्यासात हुशार आणि सुस्वभावी होता. मला अभ्यासात येणाऱ्या अडचणी तो चटकन सोडवत असे. अभ्यासाचा कंटाळा असण्याबाबत तो मला रागावतही असे; पण तो वाद आम्ही लवकर मिटवत असू. आम्ही शिकवणीदेखील एकाच शिक्षकांकडे लावली होती. त्यामुळे सायकलनं आम्ही सोबतच शिकवणीला जात असू. एकदा शिकवणी वर्ग सुटायला रात्रीचे ८ वाजले.  मी चांगलीच घाबरले होते. त्या दिवशी मिलिंदला खरं तर शिकवणीवरून सरळ त्याच्या मामाकडे जेवायला आणि तेही बरंच दूर जायचं होतं; पण उशीर झाल्यामुळे तो आधी मला घरी सोडायला आला आणि मगच मामाकडे गेला. या घटनेनं आमची मैत्री अधिकच पक्की झाली. तो कधीही माझ्या विश्वासाला आणि मैत्रीला तडा जाईल असा वागला नाही. आमच्या मैत्रीला जवळजवळ ३० वर्षं झाली; पण आजही ती तेवढीच घट्ट आणि पारदर्शक आहे. दर दोन वर्षांनी आम्ही सहकुटुंब भेटतो आणि मस्त मजा करतो. आमच्यातील निकोप मैत्री अक्षय टिको, हीच प्रार्थना!

 – यशश्री तापस, नागपूर

सर्वांनी स्वीकारलेली मैत्री

मी २४ वर्षांचा असताना माझ्या बहिणीकडे २२ वर्षांची तरुणी गाणं शिकायला यायची. हळूहळू ओळख झाली. मैत्री जुळली. कधी ती संगीताच्या क्लासशिवाय घरी यायची. आमच्या गप्पा, हसणं-खिदळणं चालायचं.  १९८४ ला आमच्या शहरात विधि महाविद्यालय सुरू झालं. मी पदवीधर असल्यानं आणि तिनं नुकतीच पदवी घेतल्यानं आम्ही दोघांनी कायदा शिक्षणाच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतला.  इथे आमच्या मैत्रीला खऱ्या अर्थानं  सुरुवात झाली. आम्ही दोघं एकत्र कॉलेजला जात असू. आम्ही दोघंही तरुण, अविवाहित, भिन्न जातींचे. मी सुरुवातीपासून पुरोगामी विचारांचा, त्यामुळे मला आंतरजातीय विवाह करावयाचा होता. मी घरात, नातेवाईक, मित्र यांच्याकडे हे बोलून दाखवलं होतं, पण तरीही कु णीही आमच्या मैत्रीकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं नाही. माझं गाव, तो कालखंड पाहता आमच्या निखळ मैत्रीला सर्वानी स्वीकारलं हे खरं तर आश्चर्यच!

                 – देवीदास वडगांवकर

तो आणि ती भेदापलीकडे

कॉलेजला असताना मला या लिंगभेदापलीकडच्या मैत्रीचा प्रत्यय आला. दुसऱ्या वर्षांला असताना आम्हा मित्र—मैत्रिणींचा एक छान ग्रुप तयार झाला. त्यात आमचे दोन दाक्षिणात्य मित्रसुद्धा होते.  पुण्यात शिकण्यासाठी आले होते ते. कॉलेजचं कॅन्टीन ही आमच्या गप्पांसाठीची हक्काची जागा असायची. चहा आणि वडापावच्या बरोबरीनं  गप्पांना उधाण यायचं. खाद्यसंस्कृती, पेहराव, कानडी साहित्य यावर विशेष चर्चा होत. ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांच्या साहित्याची ओळख तर मला या दोन मित्रांनी करून दिली. मित्रांमध्ये वावरताना आम्हा मुलींना कधीही अवघडल्यासारखं  झालं नाही. उलट आम्ही सगळे खूप मनमोकळेपणानं व्यक्त होऊ शकायचो एकमेकांपाशी.  मैत्रीत पारदर्शकता असणं फार गरजेचं असतं. मग ‘तो’ आणि ‘ती’ असा भेद उरत नाही.

– सलोनी जोशी

 अकाली कोमेजलेली मैत्री

एखाद्या रोपावर  एखादं  फूल उमलावं, बहरावं आणि अकाली कोमेजून गळावं तशी आमची मैत्री.  त्या वेळी नाशिकच्या वृत्तपत्रात, लोकप्रभा साप्ताहिकात माझ्या काही कथा सलग प्रसिद्ध झाल्या होत्या. आमच्या स्टेट बँकेत काही निमित्तानं लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांचा कथाकथनाचा कार्यक्रम  होता.  त्यांचा परिचय, स्वागत आदी एक कवयित्री करणार होत्या. त्या वेळी त्यांच्याशी ओळख झाली. त्यांनीही माझ्या कथा वाचल्या होत्या. ओळख वाढली आणि त्यांनी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी दुपारी गप्पांसाठी आमंत्रण दिलं. ‘फक्त साहित्यावर चर्चा करायची, खासगी गप्पा नाहीत.’ त्यांनी दटावलं. मी मान्य के लं. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि मैत्री बहरली. त्यांच्याशी चर्चा करताना वेळेचं भान राहात नसे. त्याही काही मासिकांत शेरोशायरी, गझल आदींवर लेख लिहू लागल्या होत्या. त्यांचं वाचन, कविता, कवितेचा उगम, हे सांगतानाच्या त्यांच्या भावमुद्रा, नेत्रातील चमक बघताना मजा वाटे. त्यांचं बोलणं निखळ आनंद देई. मी बँकेत नोकरीला, त्या सरकारी खात्यात. रविवारी त्या मन:पूर्वक माझं स्वागत करायच्या. नवीन काय वाचलं ते मी सांगायचो, त्या नवीन कवितेवर बोलायच्या. अशी ही मैत्री. बँकेच्या नियमाप्रमाणे माझी नाशिकहून बदली झाली. निरोप घेताना पत्र  लिहिणं, पाठवणं यावर काहीच बोलणं झालं नाही. हळूहळू सूर्य अस्तास जावा तशी ही मैत्रीही अस्तास गेली.. त्याचा लालीमा मात्र खूप काळ मनात साठून राहिला होता..

  -अरविंद  खडमकर

निखळ मैत्री

हा माझा मित्र. पण सुरुवातीच्या काळात मी माझ्या मैत्रिणींनादेखील त्या गुंड-मवाल्याशी बोलू नका, असा सल्ला देत असे. पण त्याचा मनमोकळा स्वभावच बेस्ट फ्रें ड होण्यासाठी पूरक होता. आमचं टय़ूनिंग फारच छान जुळलं. आज कॉलेज संपून सात र्वष झाली तरीही, तो मला अगदी जवळचा वाटतो. त्याचे अफेयरचे किस्से असू देत, नाही तर मला माहीत नसलेल्या शिव्यांचे अर्थ, हॉस्टेल बंद होईपर्यंत झिजवलेल्या कॅ न्टीनच्या खुच्र्या असू देत नाही, नाही तर रात्री २-३ वाजेपर्यंत फोनवर मारलेल्या अर्थशून्य गप्पा. प्रत्येक गोष्टीत इतका मोकळेपणा असायचा, की आजही त्यातली मजा जिवंत आहे. खरंच, भाईसारखा मोकळ्या मनाचा, नातं सहजपणे निभावणारा मित्र मला भेटला नसता तर कदाचित कॉलेज लाइफची मजा आणि त्यानंतर आयुष्यभरासाठी पुरणारी निखळ मैत्रीची साथ मला कधीच अनुभवता आली नसती.

    – भाग्यश्री ढगे-मेटकर

यांचीही पत्रं उल्लेखनीय होती –

शैखा (विनता) बेडेकर, स्नेहल करकसे, मानसी, के. एस. जैन, अपर्णा, संदीप चांदसरकर, सचिदानंद संगीत, डॉ. स्वाती  टिके कर, माधुरी कामत, विद्या, भालचंद्र कुलकर्णी, दीपा, श्री श्री, नीना गायकवाड, ओवी लेले, माधुरी बेंद्रे-लोणकर, स्नेहल बाळापुरे, गणेश ढोले, मनीषा चौधरी, अंजली यावलकर, सुलभा उपळावीकर, रमेश  नामदास, गणेश बाबर, अक्षयकु मार शिंदे, कंचन मुरके, आकाश नेवारे, सोमेश पाठक, हेमलता देसाई, वीणा, विवेक पुरंदरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2020 6:05 am

Web Title: woman and man friendship readers sharing their experiences dd70
Next Stories
1 जीवन विज्ञान : रोगप्रतिकारशक्तीची ताकद
2 यत्र तत्र सर्वत्र : गुप्तहेर स्त्रियांची हेरगिरी
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : उरलो उपचारापुरता!
Just Now!
X