रती अग्निहोत्री या अभिनेत्रीने घरात तिच्यावर होत असणाऱ्या हिंसाचाराची तब्बल ३० वर्षांनंतर तक्रार नोंदवली आणि कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. घरातील चार भिंतींमध्ये होणाऱ्या कौटुंबिक गोष्टी घराबाहेर जाऊ नयेत याचा विचित्र अट्टहास आणि आपले कुटुंब किती सुखी आहे याचे बाहेरच्या जगात चित्र रंगवणे हा सध्याच्या जगातील मोठा खेळ झाला आहे. यामुळे कदाचित घरातील छिद्रे झाकली गेली तरी नाती मात्र कायमची हरवून जातात आणि अनेकदा ती स्त्री आपला आत्मसन्मान, आत्मविश्वास कायमची हरवून बसते. हा सामाजिक दुटप्पीपणा सांगणारे दोन लेख एक वकिली नजरेतून आणि एक मानसोपचारतज्ज्ञांच्या नजरेतून.

घराच्या चार भिंतींत होणारा अत्याचार, हिंसाचार आणि अन्याय याला ‘डोमेस्टिक व्हायोलन्स’ असे म्हटले जाते. व्हायोलन्सचे शब्दश: भाषांतर ‘हिंसाचार’ असे केले जात असल्याने या कायद्याबद्दल गरसमजच जास्त आहेत. त्यातून हा कायदा केवळ स्त्रियांच्या सुरक्षेसाठी असल्याने त्याविरुद्ध प्रचार जास्त केला जातो. शिवाय हा कायदा ‘लीव्ह इन रिलेशनशिप’मधली जोडप्यांनाही लागू होत असल्याने या कायद्याची व्याप्ती वाढली आहे. दुर्दैवाने महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षिततेच्या बाबतीत आपल्याला खूप काळजी आहे, असे दर्शवणारा आपला समाज घरगुती हिंसाचाराकडे मात्र घरगुती मामला म्हणून कानाडोळा करतो. हा विरोधाभास स्त्री हक्क चळवळीला कायमच मागे खेचणारा राहिला आहे.
आपला समाज पितृसत्ताक आहे. त्यानुसार स्त्री-पुरुषांच्या भूमिका आणि सामाजिक स्थान निश्चित केलेले आहेच. तेही समजा वादापुरते योग्य आहे असे मान्य करायचे म्हटले तरी एकीकडे स्त्रियांचे प्रमुख काम चूल-मूल व घर-संसार सांभाळणे म्हणायचे आणि त्या क्षेत्रातील त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी देणाऱ्या कायद्यालादेखील विरोध करायचा म्हणजे ‘चित भी मेरी व पट भी मेरी’ असाच न्याय झाला हे का लक्षात येऊ नये? घरातली सारी कामे आनंदाने, हसतमुखाने तिने करावीत, घरातील सर्वाची काळजी घ्यावी, सणसमारंभ, पाहुणेरावळे सांभाळावेत, घराबाहेर अर्थार्जन वा करिअर करून कुटुंबाच्या आर्थिक स्थर्य व प्रगतीस हातभार लावावा, मुलांच्या अभ्यास-करिअरकडे लक्ष द्यावे, त्याबरोबरच आकर्षक दिसावे अशा आणि त्याबरोबर येणाऱ्या असंख्य बारीकसारीक व्यवधानांची प्रमुख उत्तरदायी आजही स्त्रीच आहे. बरे, हे सारे तिने अतिशय सेवाभावी वृतीने ‘इदं न मम’ अशा निल्रेपपणे करावे. हे सारे ती यशस्वीपणे पार पाडते आहे की नाही यावर नजर ठेवायला आणि त्याचे २४ तास मूल्यमापन करण्यासाठी घरातील प्रत्येक जण सज्ज असतो.
सध्या कुटुंब समुपदेशक आणि मानसशास्त्रीय समुपदेशक जे कौटुंबिक समुपदेशन करतात त्यांच्याशी बोलले तर असे लक्षात येते की, स्त्रियांवर सध्या ‘आदर्श पत्नी, सून आणि आई’ बनण्याचा प्रचंड तणाव दिसतो. घरातील कुठल्याही समस्येचे कारण स्त्री आणि प्रत्येक समस्येला उत्तर शोधण्याची जबाबदारीही तिचीच. त्यात कुठेही ती कमी पडली किंवा हे आदर्श स्त्रीत्वाचे ओझे वाहण्याचे तिने नाकारले तर तिला नात्यांची, कुटुंबाची आणि घराची दारे बंद केली जातात हे आजच्या स्त्री जीवनाचे खरे वास्तव आहे. एकदा लग्न झाले की तिचे ‘मी’पण संपायला हवे आणि गोड शब्दात सांगायचे तर ‘दुधात साखर मिसळावी तशी ती सासरी विरघळून जायला’ हवी. तिला आत्मसन्मान, स्वाभिमान आणि अस्मिता असणे हा तिचा संसारातला सर्वात मोठा दुर्गुण. जोडीदाराचे वागणे पटत नाही किंवा अत्याचार सहन करणार नाही म्हणून त्याविरुद्ध ठोस भूमिका घेणे किंवा नवऱ्याच्या आणि सासरच्यांच्या विरोधात जाऊन स्वत:च्या निर्णयावर ठाम रहाणे हा विवाहित स्त्रीचा सर्वात मोठा गुन्हा ठरतो आणि त्याची ‘शिक्षा’ म्हणून घटस्फोटाची तयारी तिने ठेवावी असे २१व्या शतकातील मुंबईसारख्या मोठय़ा शहरातलेदेखील चित्र आहे.
आजही जन्माला येणाऱ्या बाळाची िलगचिकित्सा करण्यास नकार दिल्याबद्दल वा सोनोग्राफीमध्ये मुलगी आहे कळल्यावर भ्रूणहत्येस नकार दिल्याबद्दल उच्चशिक्षित, उच्च पदावर काम करणाऱ्या स्त्रियांनादेखील घटस्फोट घेण्यास भाग पाडले जात आहे. स्त्रीने स्वत:चा संपूर्ण पगार नवरा वा सासू-सासऱ्यांच्या हाती देऊन लागतील तसे पसे मागून घेण्यास नकार देणे, तिने दिलेल्या पशातून काय खर्च होत आहे किंवा काय गुंतवणुकी केल्या जात आहेत हे विचारणे, नवऱ्याचा पगार वा कौटुंबिक आर्थिक बाबीत लक्ष घालणे हा तिचा चोंबडेपणा वा पशाचा हपापलेपणा दर्शवतो आणि त्यावरून भांडणे होत असतील तर त्यात नवऱ्याची किंवा सासरच्यांची चूक नसते असे मानण्यात येत असेल तर यात कुठे आला त्या स्त्रीचा आत्मसन्मान? बाहेर १०-१२ तास काम करून घरात परत आल्यावर पदर खोचून घरातली सारी कामे तिने नोकर न ठेवता करणे इतकीच जर आदर्श स्त्रीची व्याख्या मर्यादित असेल तर महिला सबलीकरण नेमके कशाला म्हणायचे?
एवढेच नाही तर तिचे असे वागणे नवऱ्याचा छळ या सदरात मोडते. अशा छळाच्या कारणांसाठी घटस्फोट द्यायचे तिने नाकारले तरी त्यातही तिचंच कसे चुकतंय, ती कशी आडमुठी,
हेकेखोर आणि आपले तेच खरे करणारी आहे, असेही म्हटले जाते. ‘नाही त्याला राहायचं ना मग कारण काही का असे ना, तिने परस्पर सहमतीने घटस्फोट देऊन टाकायला हवा’
आणि तसे न करता स्वत:च्या हक्कांसाठी लढायचे म्हटले तर स्त्रीच दुराग्रही आणि दुराभिमानी ठरते. ‘चांगली आदर्श स्त्री’ या व्याख्येमध्ये बसण्याच्या आणि स्वत:ला बसवण्याच्या प्रयत्नात स्त्रीयाही इतक्या अडकल्या आहेत की असे करताना वर्षांनुर्वष आपण कुठल्या वैचारिक हिंसाचाराचा बळी ठरतो आहोत आणि त्यापेक्षाही आपणदेखील आपल्यावरच अत्याचार करतो आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. अगदी इंद्रा नूयीसारखी जगातील सर्वात हेवा करण्यासारख्या पदावर असलेल्या स्त्रीच्या सर्व गुणावगुणांचे मूल्यमापन हे जोवर ती घराच्या उंबरठय़ाच्या आत किती ‘आदर्श’ आहे यावरच ठरत असेल तर महिला सबलीकरणाच्या चर्चा आपण थांबवलेल्याच बऱ्या.
आजच्या घडीला विविध कौटुंबिक आणि घरगुती हिंसाचाराच्या खटल्यातून समोर येणाऱ्या कथा पहिल्या तर थोडय़ा फार फरकाने कौटुंबिक कलहांचे हेच चित्र दिसते. एकीकडे सरसकट स्त्रीला दोष देणारे आपण, स्त्री हक्क, स्त्री स्वाभिमान आणि स्त्री सन्मानाची जपणूक कशी करणार आहोत हा प्रश्न कुणालाच पडत नाहीए का? बरे, या चार िभतींच्या आतल्या समस्या वा असे विचार हे फक्त अशिक्षित वा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गातच दिसतात, हा आणखी एक गरसमज. सर्वसाधारणपणे समाजातील अगदी खालच्या आर्थिक स्तरातील वर्गाच्या घरांना चार िभतीच नसतात. परंतु उच्च, आर्थिक स्तरातील वर्ग जो एरवी घराबाहेर समाजात अतिशय सुशिक्षित, उच्चभ्रूपणाचा बुरखा पांघरून बाहेर पडतो त्यांच्यासाठी मात्र त्यांनाही या ‘चार िभतीतल्या समस्या’ आहेत हे मान्य करणेच फार कठीण जाते. खालच्या वर्गातील स्त्रिया जितक्या असोशीने आपल्या कुटुंबातील समस्या लपवण्याचा आणि कौटुंबिक कलह झाकण्याचा प्रयत्न करतात तितकाच, किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रयत्न करण्याचा दबाव उच्चभ्रू घरांतील स्त्रियांवर असतो. घरगुती हिंसाचाराच्या घटना आपल्याबाबतीत घडत आहेत हे सांगणे स्त्रियांना स्वत:लादेखील अतिशय अपमानकारक वाटते. मूळात गृहसौख्याची संपूर्ण जबाबदारी तिची मानली गेल्याने लग्न टिकले नाही तरी आणि तिलाच अत्याचार सहन करावा लागत असला तरी त्याबद्दल स्वत:लाच दोषी ठरवण्याची स्त्रियांची मानसिकता बनलेली असते. आजही खटल्यासाठी येणाऱ्या ५० टक्के स्त्रिया किंवा त्यांच्याबरोबर आलेली पुरुष मंडळी ‘पोलिसात किंवा कोर्टात न जाता काही करता येणार नाही का?’ ‘तुम्ही नोटीस पाठवून पहाता का? असे हमखास विचारतात. वयाने मोठी, जाणती, सुशिक्षित आणि लौकिकार्थाने यशस्वी मंडळीदेखील आता हे प्रकरण कोर्टात गेलं तर समाजात आपली अब्रू जाईल, लोक काय म्हणतील किंवा आमच्या घरात हे असं कधी घडलं नाही हो किंवा आता हिच्या धाकटय़ा बहिणीची लग्ने कशी होणार किंवा धाकटय़ा भावंडांचे कसे होणार, असे म्हणून अक्षरश: रडत मनाने कोसळताना दिसतात. त्यामुळे देखील स्त्रिया घरगुती िहसाचाराच्या तक्रारी करताना दोनदा विचार करतात. आणि मुलं मोठी होऊन स्वतंत्र झाल्यावर थोडासा धीर एकवटून अन्यायविरुद्ध दाद मागावी तर इतके वष्रे अन्याय सहन करत गप्प राहिली याचा अर्थ तिच्यावर अन्याय होतच नव्हता इथपासून ते तिचेच बाहेर लफडे असणार इथपर्यंत लावला जाऊ शकतो. यात कुठे आला स्त्रियांचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान आणि सबलीकरण?
घरातील चार िभतींमध्ये होणाऱ्या कौटुंबिक गोष्टी घराबाहेर जाऊ नयेत याचा विचित्र अट्टहास आणि आपले कुटुंब किती सुखी आहे याचे बाहेरच्या जगात चित्र रंगवणे हा सध्याच्या जगातील मोठा खेळ झाला आहे. आपल्या नात्यासंबंधात, घरगुती देवाणघेवाणीत काही चुकतंय आणि कदाचित समुपदेशकांच्या मदतीने यातून तोडगा काढून नाती सुधारता येतील इतक्या साध्या उपायाकडे केवळ समाजापासून लपवण्यासाठी पाठ फिरवली जाते आहे. अत्याचार करणारा अत्याचार करतच राहतो आणि आपल्या कुटुंबाची बाहेर लाज जायला नको म्हणून सहन करणारा सहन करत राहतो. यामुळे कदाचित घरातील छिद्रे झाकली गेली तरी नाती मात्र कायमची हरवून जातात, संबंध कायमचे दुरावतात. पण हीच दुनियादारी असे मानून लग्न आणि कुटुंब पुढे रेटण्याकडे आपला जास्त कल असतो. हा सामाजिक दुटप्पीपणा घराघरातून जाणवतो. अशी आतल्या आत कुढणारी माणसंच नव्हे तर कुटुंबंच्या कुटुंबं आपल्याला आजूबाजूला दिसतात. आणि गंमत म्हणजे अशाच व्यक्ती आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र यांवरील अतिभावनात्मक आणि नाती अमानवीय पद्धतीने उदात्तीकरण करणाऱ्या कवितांना, पोस्ट्सना फेसबुकवर किंवा व्हॉटसअपवर भरभरून दाद देताना देखील दिसतात.
घरगुती हिंसाचार यात काय काय येऊ शकतं याच्या उदाहरणांची कायद्यात दिलेली यादी पाहिली तर अशा घटना आजच्या युगात घडत आहेत यावर आपला विश्वास बसणार नाही. यापकी कोणती ना कोणती घटना कमी-अधिक गंभीर स्वरूपात स्त्रियांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सहन करायला लागलेली असू शकते. पितृसत्ताक समाज पद्धतीत स्त्रियांचे घरातील आणि समाजातील दुय्यम स्थान त्यांनी स्वीकारावे हाच अत्याचाराचा मूळ उद्देश असतो. असा सातत्याने होणारा व सहन करावा लागणारा अपमान त्याविरुद्ध आवाज उठवण्याची; स्वत:च्या आत्मसन्मानासाठी खंबीरपणे उभे राहण्याची त्या स्त्रीची इच्छाशक्तीच मारून टाकतो. ज्या स्त्रियांचे अशा प्रकारे कुटुंबातच मानसिक खच्चीकरण होत असेल अशा स्त्रिया उठून समाजात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागतील आणि त्यांचे सबलीकरण होईल अशी अपेक्षा ठेवणेसुद्धा हास्यास्पद ठरेल. स्त्रियांच्या सबलीकरणाची लढाई घरापासून सुरू होते आणि त्यासाठी घरगुती हिंसाचारविरोधी कायदा नुसता महत्त्वाचाच नाही तर आणखी कडक करण्याची गरज आहे. या सगळ्या वास्तवाकडे डोळसपणे आपण कधी पहाणार आणि खरोखर महिला सबलीकरणाची वाटचाल कधी करणार हा खरा प्रश्न आहे.
घरगुती हिंसाचार म्हणजे नेमके काय याची घरगुती हिंसाचारविरोधी कायद्यात व नियमावलीत दिलेली काही उदाहरणे :

Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला
Spiritual guru and founder of the Isha Foundation, Sadhguru Jaggi Vasudev, has undergone emergency brain surgery
मोठी बातमी! अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेंदू शस्त्रक्रिया

अ) शारीरिक िहसाचार
१. मारणे
२. थप्पड मारणे
३. प्रहार करणे
४. चावणे
५. लाथ मारणे
६. चिमटा काढणे
७. धक्का मारणे
८. ढकलणे किंवा
९. इतर कोणत्याही रीतीने शारीरिक वेदना देणे किंवा इजा करणे.

ब) लिगक िहसाचार
१. बळजबरीने संभोग करणे.
२. संभोगविषयक किंवा इतर कोणतीही अश्लील चित्रे किंवा साहित्य पाहण्यासाठी बळजबरी करणे.
३. अनसíगक संभोग करण्यास भाग पाडणे

क) शाब्दिक किंवा
भावनिक िहसाचार.
१. घरातल्या स्त्रीचा अपमान
२. शिवीगाळ
३. स्त्रीचे चारित्र्य किंवा वर्तणूक इत्यादींवर आरोप करणे
४. मुलगा न होण्यावरून तिचा अपमान करणे
५. हुंडा न आणल्यावरून तिचा अपमान करणे
६. स्त्रीला किंवा तिच्या ताब्यातील मुलाला शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत जाण्यास प्रतिबंध करणे
७. स्त्रीला नोकरी करण्यास प्रतिबंध करणे
८. स्त्रीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे
९. स्त्रीला किंवा तिच्या ताब्यातील मुलाला घराबाहेर जाण्यास प्रतिबंध करणे
१०. सर्वसाधारण रोजच्या दिनक्रमात तिला एखाद्या व्यक्तीस भेटण्यास प्रतिबंध करणे
११. स्त्रीला विवाह करण्याची इच्छा नसताना विवाह करण्यासाठी बळजबरी करणे
१२. स्त्रीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्यास प्रतिबंध करणे
१३. त्याच्या/ त्यांच्या पसंतीच्या विशिष्ट व्यक्तीशी विवाह करण्यासाठी स्त्रीवर बळजबरी करणे
१४. आत्महत्या करण्याची धमकी देऊन तिला तिच्या मनाविरुद्ध वागण्यास भाग पाडणे.

ड) आर्थिक हिंसाचार
१. घरातल्या स्त्रीला स्वत:च्या आणि तिच्या मुलांच्या निर्वाहासाठी पसे न देणे
२. त्या स्त्रीला आणि तिच्या मुलांना अन्न, वस्त्र, औषधे इत्यादी न देणे
३. स्त्रीला तिची नोकरी सोडण्यास वा नोकरीवर जाण्यास मनाई करणे
४. ज्यायोगे तिला नोकरी करणे अशक्य होईल अशा प्रकारे स्त्रीला त्रास देणे
५. स्त्रीला नोकरी स्वीकारण्यास परवानगी न देणे
६. स्त्रीचे वेतन/मजुरी इत्यादीपासूनचे उत्पन्न हिरावून घेणे
७. स्त्रीचे वेतन/मजुरी इतर उत्पन्न इत्यादी तिला वापरू न देणे
८. स्त्री राहात असलेल्या घरातून तिला बळजबरीने बाहेर काढणे
९. स्त्रीला घराच्या कोणत्याही भागात प्रवेश करण्यास किंवा त्याचा वापर करण्यास बंदी करणे
१०. स्त्रीचे कपडे, वस्तू किंवा सर्वसाधारण घरगुती वापराच्या वस्तू वापरण्यास तिला मनाई करणे (ज्यायोगे तिची गरसोय होईल)
११. ज्या भाडय़ाच्या घरात स्त्री राहात असेल त्याचे भाडे आदी न देणे (ज्यायोगे स्त्रीला घराबाहेर पडावे लागेल).
अ‍ॅड. जाई वैद्य