१९३० ते १९५० या काळाचा विचार करता, स्त्रियांच्या वैचारिक लेखनाचे क्षेत्र व्यापक व सर्वस्पर्शी होते. स्त्रियांना कार्यप्रवृत्त करण्यापासून कुटुंब नियोजनासारख्या विषयांपर्यंत आणि कायदेविषयक तरतुदीपासून पुस्तक परीक्षणांपर्यंत स्त्रियांनी विविधांगी लेखन केले.

ऑ गस्ट १९३० मध्ये ‘स्त्री’चा प्रथम अंक प्रसिद्ध करताना संपादक शंकरराव किलरेस्कर यांनी स्त्रियांना लेखनासाठी आवाहन करताना स्त्रियांविषयी विश्वासही व्यक्त केला होता. ‘‘..एवढे मात्र नि:संशय, की महिलावर्गासाठी निघणाऱ्या मासिकांत स्त्रियांनी लिहिलेले लेख जितके जास्त असतील तितके चांगले. आमच्या ‘स्त्री’ मासिकाला हा प्रश्न तितकासा अवघड वाटण्याजोगा नव्हता. स्त्रियांचे सहकार्य ‘स्त्री’ मासिकाला भरपूर मिळाले. त्यामुळे ते स्त्रियांचे खरेखुरे आवडते मासिक झाले,’’ असे शंवाकिंनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. कारण खरोखरच स्त्रियांनी संपादकांना भरभरून साथ दिली. आठ वर्षांत २०० स्त्रियांनी ‘स्त्री’ मधून लेखन केले. १९४० सालचा ‘स्त्री’चा दिवाळी अंक संपूर्ण लेखिकांच्या लिखाणाने परिपूर्ण होता.
मात्र ‘स्त्री’ मासिकासोबतच ‘यशवंत’, ‘जोत्स्ना’, ‘रत्नाकर’, ‘मौज’, ‘सत्यकथा’ इत्यादी वाङ्मयीन मासिकांतूनसुद्धा स्त्रिया लेखन करीत होत्या. स्त्रियांची जागृत झालेली संवेदनशीलता होतीच आणि शिक्षणाने त्यांना स्वत:कडे, जीवनाकडे, सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली होती. स्त्रिया स्वतंत्रपणे विचार करू लागल्या होत्या. स्त्रियांनी स्वत:ला पारंपरिक कल्पनांतून मुक्त करावे, ज्ञानी, उद्योगी व्हावे. जीवनाकडे डोळसपणे पाहावे, काळाची गरज व पावले ओळखून स्वत:ला बदलावे; यासाठी स्त्रियांशी संवाद करायला, स्त्रियांच पुढे आल्या. नवीन विषयांकडे वळाल्या. म्हणूनच त्यांच्या लेखनात वैचारिक पातळीवरचे लेखन अधिक होते. वैचारिक लेखनसुद्धा स्त्रियांनी अत्यंत आत्मविश्वासाने केले. परिचयस्वरूपी लेखन म्हटले तरी- परिचयात्मक लेख, मुलाखती, प्रासंगिक लेखन, स्फुट, सदर लेखन स्त्रियांनी केले. कर्तृत्ववान महिलांचे परिचय बहुतांश स्त्रियाच करून देत होत्या. परिषदा, स्त्रियांच्या सभा, उपक्रम इत्यादींचे वृत्तान्त, अहवाल देण्यातून स्त्रिया ‘वृत्तपत्रीय लेखन’ आत्मसात करीत होत्या. महिला पत्रकारितेची पायाभरणी त्यातून झाली. शांताबाई कशाळकर, सरला नाईक, सरला पाटणकर इत्यादी स्त्रिया परिषदांचे वार्ताकन नियमित करीत. ‘संपादकीय’ लेखन तर आता नवे नव्हतेच. प्रसंगी स्त्रिया धाडसी शोध पत्रकारितासुद्धा करीत.
वर्ष १९४२. ‘ज्ञानप्रकाश’मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली. पुणे येथील दाणे आळीत एका वेश्येने आपल्या घरात काही अन्य वेश्यांना कोंडले आहे. पोलिसांनी छापा टाकून स्त्रियांना सोडविले. ही बातमी आनंदीबाई किलरेस्कर यांच्या वाचनात आली. आनंदीबाई किलरेस्करवाडीहून पुण्याला आल्या. पोलिसांच्या विरोधाचा विचार न करता संबंधित स्त्रियांना भेटल्या. आनंदीबाईंविषयी विश्वास वाटल्यावर वेश्यांनी आपली कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली. तीन तास आनंदीबाई त्यांच्या बरोबर होत्या. स्त्रियांची सुटका करून आनंदीबाई परत किलरेस्करवाडीला गेल्या. ‘मगरीच्या मिठीतून सुटका’ असा वेश्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा दीर्घ लेख आनंदीबाई किलरेस्कर यांनी ‘स्त्री’मध्ये लिहिला.
अनेक महत्त्वाच्या विषयांवर स्त्रियांनी लेखमाला लिहिल्या. ‘अमेरिकन स्त्रिया व स्वावलंबन’, ‘प्राचीन आणि अर्वाचीन स्त्री’, ‘इंद्रधनूचा पूल’, ‘महाराष्ट्रीयन स्त्रियांची वाङ्मयीन प्रगती’, ‘दूरदेशीच्या मैत्रिणी’ यांसारख्या विविध विषयांवर स्त्रियांनी लेखमाला लिहिल्या.
स्त्रियांच्या वैचारिक लेखनाचे क्षेत्र व्यापक व सर्वस्पर्शी होते. स्त्रियांना कार्यप्रवृत्त करण्यापासून कुटुंब नियोजनासारख्या विषयांपर्यंत आणि कायदेविषयक तरतुदीपासून पुस्तक परीक्षणांपर्यंत स्त्रियांचे लेखन पसरले होते. ‘समाजस्वास्थ्य’ तसेच ‘जननी’, ‘सवाई जीवन’, (‘लैंगिक जीवनाची शास्त्रीय माहिती देणारी मासिके) सारख्या चाकोरीबाहेरील मासिकांतूनसुद्धा स्त्रिया लिहीत. सांस्कृतिक जीवनाचा उभा-आडवा छेद स्त्रियांनी लेखनातून घेतला, हे विधान अतिशयोक्तीचे होणार नाही. विचारांची सुस्पष्टता, तर्कशुद्ध मांडणी, विषयानुरूप शैली – मग विषय कोणताही असो, हे गुण सर्वच लेखनात होते. कोणासाठी लिहीत आहोत, वाचक कोणत्या सामाजिक स्तरावरचे आहेत, याविषयी जाणीव असे. ‘भगिनी’, ‘मंदिर’, ‘जैन महाराष्ट्र महिला’मध्ये लिहिताना भाषा सोपी समजून सांगणारी ठेवण्याचे भानही होतेच. मराठा समाजातील स्त्रियांच्या उन्नतीतील खाचखळगे स्पष्ट करताना स्त्रियांनी आपल्या मुलांना स्वावलंबनाचे धडे द्यावेत, अशी सूचना पद्मावती असईकर यांनी दिली. ‘पुढच्या पिढीतील स्त्रियांच्या उन्नतीला येणारे अडथळे दूर सारायचे असतील तर आजच्या प्रौढ स्त्रियांनी आपल्या मुलांना प्रथम स्वावलंबनाचे धडे देणे अत्यंत जरुरीचे आहे. ही शिकवण समाजोन्नतीला पोषक होईल. लहानपणापासून ही शिकवण मिळाली तर ते मुलगे पुढे बायकांना चांगले वागवतील व त्या स्त्रियांना समाजाच्या उन्नतीकरता थोडाफार वेळ खर्च करता येईल व भविष्यकाळातील स्त्रियांच्या उन्नतीच्या मार्गातील खाचखळगे भरले जाऊन मार्ग सुकर होईल.’
नवे विचार समोर ठेवताना नवे मार्ग, नवे उपाय सुचविण्याची जबाबदारीसुद्धा स्त्रियांना माहीत होतीच. युद्धभान काळातील बदलत्या जीवन वास्तवाचे विवेचन करताना ‘स्त्रिया आता नोकरी करू लागल्या आहेत. तेव्हा त्यांची मुले सांभाळण्यासाठी कंपनीने पाळणाघरांची सोय करावी अशी सूचना मालतीबाई बेडेकर करतात. पूर्वी महाराष्ट्रीय स्त्रियांची राहणी कशी होती, आता वेशभूषा, केशभूषा, दागिने, स्वयंपाक इत्यादी बाबतीत महाराष्ट्रीय स्त्रियांनी सौंदर्यदृष्टी कशी ठेवावी, स्वत:चे कोणते बदल करावेत हे सांगणाऱ्या पिरोज आनंदकर प्रसंगी स्त्रियांना नवीन व्यवसायाची दिशाही दाखवतात- ‘पण शिवणाचे तीन-तीन वर्षांचे डिप्लोमा घेऊनही, स्त्रिया स्वतंत्रपणे धंदा का करू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. एक सामायिक खोली घेऊन दहा जणी एकत्र येऊन हा धंदा करतील तर बायकांच्या चोळ्या शिवण्यात गुंतलेल्या पुरुषवर्गाला इतरत्र पौरुषाचा उपयोग करता येईल. शिवण शिक्षिकेची नोकरी करण्यास भटकतील. शिवणकाम मागायला लोकांचे उंबरठे झिजवतील, परंतु दहा-बारा जणी एकत्र येऊन सामुदायिक दुकान काढणार नाहीत,’ अशी त्या तक्रारही करतात.     स्त्रियांची स्वतंत्र विचारक्षमता सामाजिक विषयांवरील लेखांतून स्पष्टपणे व्यक्त होते. ‘सर्वागीण उन्नतीच्या दृष्टीने विभक्त कुटुंबात अधिक अवसर मिळतो. प्रौढ-विवाह आता होत आहेत. तेव्हा तरुण-तरुणींना पूर्वीचे नियम कायम ठेवणे इष्ट नाही,’ असे मत गंगुताई पटवर्धन ‘एकत्र का विभक्त’ या लेखात व्यक्त करतात. स्त्रियांना काही व्यवसाय करायचा असेल तर प्रथम आपण स्त्री आहोत हे विसरा, असा कळीचा सल्ला डॉ. सईबाई रानडे देतात. संतती-निदान तीन-तीन वर्षांच्या अंतराने व्हावयास हवे. तरच मागील मुलांची जोपासना नीट होईल. संतती नियमनाच्या साधनांना तकलुबी व बेगडी ठरवू, तर समाज रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. जर लैंगिक ज्ञानाचा प्रसार समाजात झाला तरच बऱ्याच वाईट गोष्टी व त्यांचे परिणाम समाजाला कळू लागतील, असा इशाराच शकुंतला परांजपे यांनी १९४२ साली दिला. तरुण विधवा स्त्रीच्या मनातील द्वंद्व, तिच्या मनात निर्माण होणारी पुन्हा विवाह करण्याची इच्छा, परंतु निर्णय घेण्याची तयारी न होणे, विभावरी शिरूरकरांनी ‘हिंदोळ्यावर’ कादंबरीत चित्रित केले होते. कमलाबाई यांनी कादंबरीच्या परीक्षणात शेवटी महत्त्वाचे भाष्य केले. ‘विभावरीबाईंनी स्त्री हृदयाची पारख बिनचूक केली.. परंतु स्त्रियांचे प्रश्न सोडविले जाण्याची विभावरींनी अपेक्षा ठेवू नये. स्त्रियांचे प्रश्न त्याच सोडवतील. परंतु त्याला बराच अवधी लागेल.’
स्त्रियांनी ललित लेखनही विविध प्रकारचे केले. कविता, नाटय़छटा, प्रवासवर्णन, कथा हे लेखनप्रकार स्त्रियांना अधिक भावत. कादंबरी लेखनाचे प्रमाण तुलनेने कमी होते. कमल बंबावाले यांची ‘बंधनमुक्त’ कादंबरी गाजली होती. पद्मा गोळे, इंदिरा संत, संजीवनी मराठे या पुढील काळात लोकप्रिय झालेल्या कवयित्रींच्या कविता या काळात नियमित प्रसिद्ध होत. ‘पुराणातील वांगी’, ‘नाही तर सारेच फसायचे’, ‘स्त्रियांनी काय तेवढं पाप केलंय!’, ‘पातळ आणायचं ना गडे!’, ‘शांतीला विंचू चावला’ इत्यादी स्त्रीलिखित नाटय़छटा सातत्याने प्रसिद्ध झाल्या. ‘प्रवासवर्णन’पर ललित लेखनही स्त्रियांनी खूप केले. प्रवासात जे अनुभवले, जे बघितले, जो निसर्ग बघितला, ते सारे शब्दबद्ध करण्याच्या ओढीने स्त्रिया ‘प्रवासवर्णनपर’ लेखनाकडे वळल्या. ‘माझा युरोपातील प्रवास’ -कमलाबाई देशपांडे, ‘आमची त्रिस्थळी यात्रा’ -सरस्वती नाईक, ‘माझा गिरसप्पा येथील प्रवास’- गंगूताई सरवटे, ‘काश्मीरमधील भ्रमण’ – विमलाबाई देवधर, ‘आमचा सरहद प्रांतातील प्रवास’ – सुलोचना देऊळगावकर इत्यादी प्रवासवर्णनांना वाचकांनीही पसंती दर्शवली. सर्वात महत्त्वाचे होते स्त्रियांचे कथालेखन. तो काळही वाङ्मयीन दृष्टीने कथालेखनाचा काळ होता. स्त्रियांची ‘कथा लेखिका’ ही ओळख अधिक अर्थपूर्ण बनली. बदलता काळ, बदलती स्त्री, स्त्रीमनात निर्माण होणाऱ्या आकांक्षा, समाजात येणारे प्रेमविवाहाचे नवे वळण इत्यादी समकालीन जीवनाचे पडसाद स्त्रीकथांतून उमटत होते.
‘भाकरी’, ‘कर्तव्याची हाक’ यांसारख्या कथांमधून प्रेम विवाहाचा विषय मांडला आहे. प्रेमविवाह समाजात नुकते होऊ लागले होते. परंतु, घरात त्या विषयी सांगता येत नाही, कोणी तरी बघायला येणार, नायिकेवर दडपण येते. परंतु अनपेक्षितपणे प्रियकरच बघायला येतो, अशी गोड पंचाईतही चित्रित केली आहे, तर सुमती धडफळे यांनी ‘गुलाब’ कथेत मनाविरुद्ध पैशासाठी आई-वडील लग्न ठरवितात. नायिकेला विरोध करता येत नाही. यातून नायिकेची कुचंबणा हुबेहूब रेखाटली आहे. अलंकारिक भाषेचा प्रभाव लेखिकांच्या शैलीवर कसा होता, हेही व्यक्त होतेच. आपली कोंडी सांगताना नायिका म्हणते, ‘आई, सोन्याच्या तुळईला लोखंडाचे खिळे शोभून दिसतील का गं! आणि गुलाबी फुलांच्या परडीत धोतऱ्याचं फूल शोभेल का? आई, हे माझं तत्त्वज्ञान नसून भडकलेल्या अंगातून बाहेर पडत असलेल्या ज्वाला आहेत.’ तर रमा बखले यांनी ‘लेडी डॉक्टर’ कथेत डॉक्टर होऊन काम करणाऱ्या स्त्रीची संसार व व्यवसाय यामध्ये होणारी ओढाताण व्यक्त केली आहे. काळाबरोबर नायिकेची प्रतिमाही बदलत होती. राधाबाई केळकर यांच्या ‘पथ्य’ कथेतील नायिका दुपारी ‘सत्यकथा’ वाचताना दाखवली आहे.
समकालीन स्त्री जीवनाची प्रतिबिंबे स्त्रियांच्या कथालेखनात बघायला मिळतात. स्त्रियांच्या वैचारिक प्रगल्भतेची, विकसित व्यक्तिमत्त्वाची रूपेच स्त्रियांच्या लेखनातून उमटत राहिली. स्त्रियांच्या लेखनानेच संक्रमण काळातील वाटचाल जिवंत केली.
डॉ. स्वाती कर्वे -dr.swatikarve@gmail.com

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!