समाजवादी नाही आणि वित्तीय भांडवलशाहीपण नाही अशा पर्यायी अर्थव्यवस्थेच्या शोधात आजची स्त्री आहे. पुरुषांचा ‘कर्तव्यकठोरपणा’ स्त्रियांनी स्वीकारला तर ‘पुरुषांनी स्त्रीची भावनाशीलता’ स्वीकारली पाहिजे का? आणि त्यासाठी वेळ देता यावा म्हणून दोघांच्याही कामाचे तास कमी करणे, स्पध्रेचे वातावरण कमी करणे, शरीर व मानवाच्या आतील खाजगी गाभ्यामध्ये बाजारपेठेचे महत्त्व कमी करणे आवश्यक वाटत नाही का?
गि रीश कुबेर यांनी २३ फेब्रुवारीच्या ‘चतुरंग’मध्ये अर्थशास्त्रामध्ये स्त्रिया प्रावीण्य, किंबहुना नोबेल पारितोषिक का मिळवू शकलेल्या नाहीत याची कारणमीमांसा दिलेली आहे. त्यात स्त्रिया भावनाशील असतात म्हणून त्या आíथक प्रश्नांची उत्तरे शोधताना ‘डावीकडे’ वळतात म्हणजेच समाजवादी विचारसरणीच्या चौकटीत लोककल्याणकारी कार्यक्रम शासनातर्फे राबविले जावेत असे मानतात. आणि सामाजवादी चौकट तर आता निकालात निघाली आहे. त्यामुळेच त्यांची दखल घेतली जात नाही, अशी लेखाची मांडणी केली आहे. त्यांनी ज्या दोन अर्थशास्त्रज्ञ स्त्रियांची दखल घेतली गेली त्यांची नावे दिली आहेत; शार्लोट गिलमन आणि एलिनोर ओस्त्रोम. मला वाटते की त्या दोन्ही अर्थशास्त्रज्ञांचे वैशिष्टय़ त्यांनी समजावून घेतलेले दिसत नाही. त्यांनी प्रचलित अर्थशास्त्राच्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला म्हणूनच त्यांची दखल घेतली गेली तीही बऱ्याच काळानंतर. आणि असे म्हटले तर त्याही एका अर्थाने डाव्याच होत्या, कारण त्यांनीही स्त्रिया आणि वंचित ग्रामीण समूह यांच्या विकासाचा मार्ग शोधायचा प्रयत्न केला. थोडक्यात त्यांनी प्रश्नाची मांडणीच मानवी हक्कांच्या परिप्रेक्ष्येतून केली. म्हणजेच कुबेरांच्या मते भावनाशील पद्धतीने केली. आणि आज जगाला त्याचीच गरज आहे.
श्रीमंत आणि गरीब यांच्यात जी प्रचंड दरी निर्माण झाली आहे त्याची दखल न घेता केवळ विकासाचे प्रचलित निकष लावून जे अर्थशास्त्रज्ञ विकासाचे आराखडे तयार करतात किंवा केवळ बाजारपेठेला मध्यभागी ठेवून आपले सिध्दान्त मांडतात, त्यांचीच दखल घेतली जाते यात नवल ते काहीच नाही, कारण आजचे ते चलती नाणे आहे. त्यात ‘कर्तव्यकठोरता’ कसली आहे ते माझ्या लक्षात येत नाही. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत जर त्यांना घराबाहेर पडून आíथक स्वायत्तता मिळवायची असेल तर घरातील सर्व कामे बाजारपेठेवर सोपवून निर्धास्त राहून समाजजीवन सुरळीत चालेल का हा प्रश्न आजपर्यंत कोणी कसा विचारला नाही याचेच मला आश्चर्य वाटत आले आहे. अनेक स्त्रिया ज्या या बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये यशस्वी झाल्या आहेत त्यांच्या पाठराखीण दुसऱ्या स्त्रियाच आहेत, आई, सासू किंवा स्वयंपाकीण, मोलकरीण, नर्स. पण त्यांच्या पाठराखीण कोण?
 मी स्वत: शार्लोट गिलमनचे पुस्तक ‘दि यलो वॉलपेपर’ वाचून स्त्रीवादी झाले. बुद्धिमान स्त्रीला काही न करता घरात बसून राहावे लागले तर तिचा कसा कोंडमारा होतो, ती जवळजवळ वेडी होते याचा प्रत्ययकारी अनुभव तिने व्यक्त केला आहे. तो मला भावला कारण मीही त्याच परिस्थितीतून गेली होते. तिचे उत्तर आहे की स्त्रियांना अर्थव्यवस्थेमध्ये सामावून घ्या, त्यांच्या गुणांना, कार्यक्षमतेला वाव द्या. प्रश्न आहे तो हे कसे केले जावे. समाजवादी परिप्रेक्ष्येतून सांगितले गेले की शासनाने मुलांना सांभाळण्यासाठी पाळणागृहे करावीत, कामाच्या ठिकाणी कॅन्टीन्स असावीत. वृद्धाश्रम असावेत वगरे. बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्थेला हे मान्य नाही. जास्तीतजास्त तंत्रज्ञान, घरगुती कामासाठी यंत्रे, व बाजारात मिळणारे प्रक्रिया केलेले अन्न आणले की स्त्री मुक्त होईल आणि बौद्धिक व शारीरिक श्रमाची कामे करू लागेल. सिमॉन दि बोव्हे म्हणते तसे की पुरुषांनी संस्कृती घडविली, कारण त्यांना ‘धोका पत्करायची’ (risk taking) संधी मिळाली. शिकारीच्या निमित्ताने संचार करता आला. स्त्रीला मुलांना जन्म देणे आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेसाठी हाताने खणून शेती करून टोळीला स्थर्य देणे हेच काम करावे लागले. म्हणूनच ती सल्ला देते की बाईने बाहेर पडून ‘धोका पत्करायला’ शिकले पाहिजे. वेळप्रसंगी मुलेबाळे, कुटुंब यांना तिलांजली दिली तरी चालेल. क्रिटिकल मास सिध्दान्त सांगतो की काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा यशस्वी बुध्दिमान स्त्रियांच्या संख्येतून पर्यायी दमदार सिद्धान्त देणाऱ्या अर्थशास्त्रज्ञ स्त्रिया निर्माण होणे कठीण आहे.
एलिनोर ओस्त्रोम हिने पर्यायी अर्थशास्त्रीय सिध्दान्त दिला पण तो केवळ शोकेसच राहिला. कारण या बाजारपेठेवर आधारित अर्थकारणामध्ये समुदायांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर नसíगक संपत्तीचे व्यवस्थापन करावे यासाठी द्यावा लागणारा कालावधी उपलब्ध करून देण्यासाठी लागणारा धीर (patience) कोणाकडे नसतोच. शासनाकडेही नाही आणि नसíगक संपत्ती सरकारी मदतीने कब्जात घेण्यासाठी टपून बसलेल्या भांडवलदारांकडे तर नाहीच नाही. आणि अर्थात या (catching up syndrom) पसे मिळविण्याच्या स्पध्रेमध्ये स्थानिक लोकही सामील होतात. तेही एका बेटावर राहात नसतात. आपल्याकडेच उदाहरण आहे की धनंजय गाडगीळांनी चालू केलेली सहकार चळवळ या स्पध्रेच्या आणि राजकीय फायदा ओरबडण्याच्या युगात कशी अस्ताला गेली आहे. आजकाल एक नवा सिध्दान्त पर्यावरणीय चळवळीमध्ये रूढ होतो आहे. कमी आंचेवर सावकाश शिजविलेले अन्न अधिक रुचकारक असते. तसेच कमी गतीने निर्माण करता येणारी वीज ही ‘पर्यावरणीयदृष्टय़ा कमी हानीकारक’ अधिक असते. तसेच काहीसे विकासाचे आहे. विकासाची फळे सर्वांपर्यंत पोचायची असतील तर सावकाश आणि सर्वाना घेऊन सहभागी पद्धतीने विकास झाला पाहिजे हे एलिनोर ओस्त्रोमचे सूत्र आहे.
किंबहुना विज्ञानामध्येही स्त्रिया मागे का याचा जेव्हा शोध घेण्याचा स्त्री शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला तेव्हाही असे लक्षात आले की बेकनने संशोधनासाठी नव्या वैज्ञानिक पद्धतीचा पाया घातला आणि केवळ पंचेंद्रियांनी जे अनुभवता येईल आणि सिद्ध करता येईल तेच खरे सत्य अशी मांडणी केली. या प्रकारात त्याने अनुभवजन्य व अनेक वर्षांच्या निरीक्षणातून तार्किक पद्धतीने निघू शकणाऱ्या  निष्कर्षांना त्याज्य ठरविले. विशेषत: स्त्रीच्या शारीरिक व मानसिक अनुभवांना त्याने स्थानच नाकारले, विशेषत: शेती व आरोग्य अणि औषधी विज्ञानात. देकार्त या समाजशास्त्रज्ञाने तार्किक क्षमता ही फक्त बुद्धीमध्ये असते, जाणिवेमध्ये नसते असा सिध्दान्त मांडून ज्यांना ज्यांना बुद्धी नाही त्यांना जाणीव नाही असे तत्त्वज्ञान उभे केले आणि त्याचा प्रभाव म्हणून त्या काळी वसाहतवादाचे समर्थन करणारे संकल्पनाविश्व (ideology) तयार झाले. वासाहतिक लोकांना शहाणे करणे ही आपली ईश्वरानेच सोपविलेली जबाबदारी आहे असे मानले गेले. त्याचा परिणाम म्हणून स्त्रीबद्दलची प्रतिमाही तयार झाली. स्त्री ही निसर्गाच्या जवळ असते. म्हणून वासाहतिक काळ सुरू होण्याआधी तिला मंत्र तंत्र किंवा जादूटोणा करणारी चेटकीण समजले गेले. किंवा औद्योगिक क्रांती झाल्यानंतर वसाहतींमधून लूट आणि वाढावा येऊ लागल्यानंतर गृहिणी, अकृतिशील मनुष्यप्राणी अशी तिची गणना होऊ लागली. थोडक्यात तिला अभिकत्रेपण नाकारले गेले. नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा ती वैज्ञानिक क्षेत्रात काही करू बघत होती तेव्हा तेव्हा तिचे पाय ओढले गेले. तिने निर्माण केलेली गृहीततत्त्वे नाकारली गेली. आजही अनेक स्त्रिया वैज्ञानिक नसíगक चक्रामध्ये फार हस्तक्षेप करण्याच्या विरोधात आहेत. परंतु आजचे विज्ञान हे निसर्गावर विजय मिळविण्याच्या पुरुषी आकांक्षेवर व बाजारपेठीय स्पध्रेच्या आणि पेटंट्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. तेथेही स्त्रिया मागे पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेगळ्या पद्धतीने जाणारे विज्ञान हवे आहे.
 थोडक्यात समाजवादी नाही आणि वित्तीय भांडवलशाहीपण नाही अशा पर्यायी अर्थव्यवस्थेच्या शोधात आजची स्त्री आहे. आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक श्रमामध्ये तिचा वाटा कसा उचलला जाईल, मुलांचे संगोपन, वृद्धांची सेवा, ज्याला आजकाल ‘केअर इकॉनॉमी’ म्हटले जाते तिची सोय कशी लावली जाईल याचा ती विचार करत आहे. ही अर्थव्यवस्था पूर्णपणे बाजारपेठेवर अवलंबून राहू शकत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. विशेषत: प्रक्रिया झालेले पॅकेज्ड अन्नपदार्थ हे आरोग्यदायी नसतात, मॅडकाऊ आजार आणि आता युरोपमध्ये चíचत असलेल्या बीफ्मध्ये घोडय़ाचे मांस मिसळून तयार केलेले स्वस्त अन्नपदार्थ जे प्रामुख्याने गरिबांच्या खाण्यात येतात, त्यावर भिस्त ठेवून स्त्रियांनी घराबाहेर पडावे असे म्हणता येत नाही. याचा अर्थ कुठेतरी पुरुषांचा ‘कर्तव्यकठोरपणा’ स्त्रियांनी स्वीकारला तर ‘पुरुषांनी स्त्रीची भावनाशीलता’ स्वीकारली पाहिजे असाच निष्कर्ष निघू शकतो. आणि त्यासाठी वेळ देता यावा म्हणून दोघांच्याही कामाचे तास कमी करणे, स्पध्रेचे वातावरण कमी करणे, शरीर व मानवाच्या आतील खाजगी गाभ्यामध्ये बाजारपेठेचे महत्त्व कमी करणे आवश्यक वाटत नाही का? अशा स्त्री अर्थशास्त्रज्ञांच्या शोधात आम्ही आहोत.

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!