पाल्र्याच्या सुप्रसिद्ध साठय़े कॉलेजमधून मी २०१०मध्ये निवृत्त झाले. रसायनशास्त्र हा विषय मी शिकवत असे, पण त्या बरोबरीनेच साहित्याची आवडही जपलेली होती. मात्र निवृत्तीनंतर या प्रांतात काही करता येईल का, याची चाचपणी करत असतानाच माझी मुलगी ऋजुता दिवेकर हिचे दुसरे पुस्तक ‘विमेन अ‍ॅण्ड द वेटलॉस तमाशा’ हे इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाचा अनुवाद करण्याची संधी मला ‘अमेय प्रकाशन’तर्फे मिळाली. हे पुस्तक अनुवाद करण्यास काही अडचण येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण लेखिकेशी मी २४ /७ कधीही संवाद साधू शकत होते! त्यानंतर ‘अमेय’कडूनच मला ‘द कम्प्लिट गाईड टु बिकिमग प्रेग्नंट’ या  डॉ. फिरुझा परीख यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद करण्यासंबंधी विचारणा झाली. डॉक्टरांविषयी आदरभाव मनात होता. ‘अशक्य ते शक्य’ करण्याच्या त्यांच्या जिद्दीची, चिकाटीची, प्रयत्नांची प्रशंसा मनोमन करत होते. त्या सुमारालाच ‘अनुबंध’ ही टी.व्ही.वरील मालिका त्यातील ‘सरोगसी’मुळे गाजत होती. परंतु त्याबद्दल अनेक समज-गरसमजही समाजात निर्माण झालेले होते. हे पुस्तक मराठीत आले तर अनेक स्त्रियांना विशेषकरून ज्या वंध्यत्वावर उपचार घेत आहेत, त्यांना योग्य ती माहिती मिळेल व या प्रगत तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यास त्यांना भावनिक, मानसिक बळ मिळेल असे वाटत होते.
परंतु स्त्रीरोगांविषयीचे प्रगत तेही तांत्रिक व्याख्यांनी भरलेले पुस्तक असेल तर आपल्याला अनुवादित करता येईल का? अशी शंका मनात येत होती. मग मी माझ्या डॉक्टर भाऊ-वहिनींकडून काही संकल्पना समजून घेण्याचे ठरवून हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय शब्दकोषाचा आधार घेतला.
अनुवाद करताना मला आलेल्या शंकांचे समाधान मी डॉ. फिरुझांकडूनच करून घेण्याला पसंती दिली. कारण अनुवादकाची बांधीलकी मूळ लेखकाशी असणे फार महत्त्वाचे आहे.
सहा महिने अनुवादाचे काम करताना मी या पुस्तकाची सरोगेट मदर कधी झाले ते माझे मलाच कळले नाही. खरं तर अनुवादकाची भूमिका सरोगेट मदरचीच हवी. गर्भधारणेत सहभाग नाही, पण गर्भाचे पोषण मात्र करायचे. तद्वत अनुवादकाने मूळ लेखकाच्या लिखाणावर आपल्या भाषेचे संस्कार करून पुस्तकनिर्मिती करावयाची. या काळात डॉक्टरांच्या ज्ञानाविषयी, संशोधनाविषयी जाणून मी प्रचंड प्रभावित झाले. तसेच मूल होण्याविषयी समाजात असलेल्या गरसमजांमुळे स्त्रियांना जो शारीरिक व मानसिक त्रास भोगावा लागतो ते जाणून मन हेलावले. वंध्यत्वाची समस्या असली तर त्यासंबंधीची कारणे जाणून घेण्यास व योग्य उपचारांची दिशा ठरविण्यास हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
chaturang@expressindia.com
आई होण्यासाठी..
मी गेली २५ वष्रे ‘वंध्यत्व व त्यासंबंधातील उपचार’ या क्षेत्रात काम करत आहे. या टप्प्यावर आपला अनुभव पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडावा; जेणेकरून अनेक जोडप्यांना याचा फायदा होईल असे वाटले व लेखन सुरू झाले. त्यातूनच गरोदरपणाविषयीच्या सर्व शंकांचं निवारण करणारं तसेच वंध्यत्व आणि त्या बाबतच्या उपचारांसंबंधीचं सहजसोप्या भाषेतलं विश्लेषण करणारं ‘द कम्प्लिट गाईड टु बिकिमग प्रेग्नंट’ हे पुस्तक तयार झालं आणि लिहिण्याचे पुरेपूर समाधान देऊन गेलं. पुस्तकात वंध्यत्वनिवारणाचा विषय मांडला असून मूलभूत प्रजनन संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल सुरुवातीला माहिती देऊन वंध्यत्वाला कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात, या विषयांवर मी विस्तृत लेखन केले आहे. वंध्यत्वावर कोणकोणते उपचार किंवा तंत्रे वापरली जातात हे सांगण्याबरोबरच ‘आयव्हीएफ’ मध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या प्रयोगशाळेशी संबंधित सर्व प्रक्रियांबाबतची माहितीही त्यात समाविष्ट केली आहे. पुस्तकात आवर्जून काही सक्सेस स्टोरीज सांगितल्या आहेत, त्यातून निश्चितपणे धीर आणि आशा मिळू शकेल.
– डॉ. फिरुझा परीख
(इंग्रजी पुस्तकाच्या मूळ लेखिका)