12 August 2020

News Flash

‘स्त्रिया लिहू लागल्या..’

स्त्रियांचे सुरुवातीचे लेखन स्त्रियांच्या तत्कालीन प्रश्नांच्या संदर्भातच होते. स्त्रिया त्यांच्या स्वाभाविक भाषेत लिहीत. विचारांचा ठामपणा, आपले मत

| March 21, 2015 03:25 am

sanwadस्त्रियांचे सुरुवातीचे लेखन स्त्रियांच्या तत्कालीन प्रश्नांच्या संदर्भातच होते. स्त्रिया त्यांच्या स्वाभाविक भाषेत लिहीत. विचारांचा ठामपणा, आपले मत स्पष्टपणे मांडणे, एकंदर सामाजिक परिस्थिती, रीतिरिवाज, स्त्रियांना होणारा त्रास, त्यावरचे उपाय यावर अतिशय प्रगल्भतेने लिहीत.
‘स्त्रि यांविषयी लेखन’ ते ‘स्त्री-एक लेखक’ हा टप्पा विकसित होण्यासाठी काही काळ जावा लागला. याला अपवाद एकच म्हणता येईल. महात्मा फुले यांची विद्यार्थिनी मुक्ताबाई हिचा ‘ज्ञानोदय’मध्ये ‘मांग-महारांच्या दु:खाविषयी निबंध’ हा लेख. १८५५ मध्येच प्रसिद्ध झालेला मुक्ताबाईंचा हा लेख खरोखरीच काळाच्या पुढचा होता.
  परंतु सामाजिक वातावरणात हळुहळू होणारे अनुकूल बदल, समाजसुधारणांविषयी सतत होणाऱ्या चर्चा-घडामोडी स्त्रियांच्या कानावर येत असणारच. स्त्री ही जात्याच शहाणी, सुज्ञ, परिस्थितीचा योग्य अंदाज घेणारी असल्याने (या विषयी कोणाचे दुमत होणार नाही) स्त्रियांनाही मनाने जाग येत होतीच. स्त्रियाही एकत्र यायला, मोकळय़ा हवेत यायला उत्सुक होत्याच. त्या दृष्टीने काही प्रयत्न स्त्रियांनी केले होते. सावित्रीबाई फुले यांनी १८५२ मध्येच ‘महिला सेवा मंडळाची’ स्थापना करून स्त्रियांसाठी तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. सदाशिवराव गोवंडे व सार्वजनिक काका (‘उंच माझा झोका’ या मालिकेत आपण सार्वजनिक काकांना बघितले आहे.) या दोघांच्या बायकांनी सरस्वतीबाई गोवंडे व सरस्वतीबाई जोशी यांनी ‘स्त्री विचारवती सभेची’ पुण्यात स्थापना केली होती. स्त्रियांना सभेसाठी यायला घरातून विरोध होण्याची शक्यता विचारात घेऊन सभा विष्णूंच्या देवळात जमण्याचा सुज्ञ विचारही त्यांनी केला. स्त्रिया एकत्र येऊन पुस्तकाचे वाचन करीत. विविध विषयांवर चर्चा करीत. निमंत्रण पत्रिका छापून त्यांनी चैत्र गौरीचे हळदीकुंकूही आयोजित केले होते. स्त्रियांच्या प्रगतीसाठी काही संस्थाही प्रयत्नशील होत्याच. प्रार्थना समाजाच्या वतीने स्त्रियांसाठी दर रविवारी दुपारी सभा भरवली जाई. स्त्रियांना विविध विषयांवर माहिती दिली जाई. स्त्रियांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात. त्यानंतर पं. रमाबाई यांचे महाराष्ट्रात आगमन झाले. त्या पुराणांवर व्याख्याने देत. तेव्हा ‘प्रत्येकाने घरातील एका स्त्रीला बरोबर आणली पाहिजे, नाही तर सभेच्या मुख्य ठिकाणी बसता येणार नाही.’ अशी अट घातली होती. अगदी प्रसिद्ध गणितज्ज्ञ
कै. केरूनाना छत्रे यांच्यासाठीसुद्धा  पं. रमाबाई यांनी आपली अट मागे घेतली नव्हती! लवकरच
पं. रमाबाईंनी ‘आर्य महिला मंडळाची’ स्थापना केली. आनंदीबाई जोशी अमेरिकेतून डॉक्टर होऊन मायदेशी परत आल्या. या सर्व घटनांचे परिणाम समाजावर स्त्रियांच्या मनावर निश्चितपणे होत होते.
‘आपली बायको शिकलेली असावी.’ अशी इच्छा त्या काळातील तरुण पिढीच्या मनात निर्माण होऊन अनेकांनी बायकोला घरी शिकवायला सुरुवातही केली होती. पुण्यात स्त्रियांना मॅट्रिक्युलेशनपर्यंत शिक्षण देणारी ‘हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स’ ही शाळा म्हणजे आजची पुण्यातील ‘हुजुरपागा शाळा’ सुरू झाल्याने स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण होत होते. परिणामी स्त्रियांच्याही मनात आपले विचार लेखनातून व्यक्त करण्याची ऊर्मी जन्म घेऊ लागली. परंतु सुरुवातीला आपले लेखन प्रसिद्ध होण्यासंदर्भात स्त्रियांच्या मनावर दडपण कसे होते, याबाबत काशीबाई कानिटकरांचा अनुभव अतिशय बोलका आहे.
गोविंदराव कानिटकर यांच्या प्रोत्साहनाने काशीबाई लेखन, वाचन शिकल्या. प्रार्थना समाजाच्या रविवारी असणाऱ्या स्त्रियांच्या सभांना घरात ‘देवदर्शनाला जाते’ असे सांगून त्या जाऊ लागल्या. ‘कालच्या स्त्रिया व आजच्या स्त्रिया’ हा काशीबाईंचा निबंध ‘सुबोध पत्रिकेत’ छापून आला. अंक घरी आला. बैठकीवर सासऱ्यांच्याच हातात पडला. त्या वेळेच्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन काशीबाई करतात, ‘‘ते माझे नाव वर्तमानपत्रात आलेले पाहून मला फार भीती वाटली. हातपाय कापायला लागले. तोंड कोरडे झाले व आता काय परिणाम होईल, या कल्पनेने भयंकर चित्र दिसू लागले. हा परिणाम कशाचा! जुन्या नव्या मतांच्या विरोधाचा. ’’ त्यानंतर काशीबाईंना घरात अवघड व श्रमाची कामे देण्यास सुरुवात झाली.
  १८८१ सालच्या काशीबाई कानिटकर यांच्या अनुभवाकडे प्रातिनिधिक म्हणून पाहता येईल. अशा दडपून टाकणाऱ्या परिस्थितीत स्त्रियांनी लेखन सुरू केले. याच काशीबाई कानिटकरांनी ‘रंगराव’ ही कादंबरी तर डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहिले. तात्पर्य हेच की, ज्ञानाचा उजेड व आत्मविकासाची वाढ दिसल्यावर स्त्रियांना आता थांबता येणार नव्हते. स्त्रियांची लेखनाची व्यक्त होण्याची ओढ दबून राहणार नव्हती. १९८१-८२ च्या आसपास स्त्रियांनी लेखनाचा श्रीगणेशा केला, असे सर्वसाधारणपणे म्हणता येते.
 एक मात्र विशेष. स्त्रियांच्या लेखनासाठी जसा काही काळ जावा लागला तसा  त्यांनी संपादनकार्यात यावे म्हणून जावा लागला नाही. अनेक स्त्रिया संपादनासाठी पुढे आल्या. १८८६ मध्ये आनंदीबाई लाड यांनी ‘आर्य भगिनी’चे संपादन सुरू केले. ‘हे मासिक पुस्तक मिसेस राधाबाई आत्माराम सगुण यांच्या आश्रयाने स्त्रियांकरिता एका स्त्रीकडून छापून प्रसिद्ध होत आहे.’ अशी नोंद पहिल्या अंकावर आहे, तर आनंदीबाई लाड यांनी ‘संपादकीय’मध्ये सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. ‘स्त्री शिक्षण प्रसाराचे साधन स्त्रीने पत्करले आहे’ असे आपल्या लोकांना हे पहिलेच उदाहरण आहे. त्यासाठी कुलीन स्त्रियांनी व स्वदेश हितेच्छू गृहस्थांनी उदार आश्रय देऊन उत्तेजन द्यावे, अशी सविनय प्रार्थना आहे.’
  ‘आर्य भगिनी’च्या पहिल्या अंकात ‘लग्नाच्या चाली’, ‘लवकर लग्न करण्याची चाल’ इत्यादी विषयांवर लेख प्रसिद्ध झाले होते. परंतु आनंदीबाईंचे ‘आर्य भगिनी’ अल्पायुषी ठरले. परंतु ‘टीचर प्रकाशन’च्या वतीने माणकबाई लाड यांनी १८८९ मध्ये ‘आर्य भगिनी’चे संपादन जाणीवपूर्वक सुरू केले. पहिल्या अंकातच माणकबाईंनी स्त्रियांना लेखनासाठी आवाहन केले. ‘‘यात स्त्रियांनी लिहिलेल्या लेखास ‘ते स्त्रियांनीच लिहिले आहेत’ अशी माझी पक्की खात्री झाल्यास अवश्य जागा मिळेल. स्त्रियांना माझे सांगणे हेच आहे की, विद्या संपादन करून नीतीने वागावे. हाच उत्तम दागिना आहे आणि तो मिळविण्यास प्रत्येक स्त्रीने झटावे.’’
अन्य मासिकांचे संपादकसुद्धा स्त्रियांना लेखनासाठी प्रोत्साहन देत. ‘गृहिणी’ मासिकाचे संपादक मोरो विठ्ठल वाळवेकर लिहितात, ‘तथापि यात आमची एक इच्छा आहे. आमच्या ‘गृहिणी’स गृहिणीच्या लेखांनी शोभा यावी. कच्चे लेख आमच्याकडे आले आहेत. आम्ही ते व्यर्थ जाऊ न देता, दुरुस्त करून त्यांचे म्हणून प्रसिद्ध करू. जर ‘गृहिणी’ स्वतंत्रपणे चालविण्यास स्त्रिया योग्य होऊन सिद्ध होतील, तर आमचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. ‘गृहिणी’ मोठय़ा संतोषाने मोठय़ा समारंभाने त्यांच्या स्वाधीन करू. तो दिवस स्त्री-शिक्षणाच्या इतिहासात जडावाच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा होईल असे आम्ही समजू.’
लेखनासाठी या प्रकारे होणारे आवाहन, स्त्री शिक्षणाला कमी होणारा विरोध इत्यादींच्या परिणामांतून स्त्रियांनी हातात लेखणी घेतली. त्यानंतर कधी खाली ठेवलीच नाही. प्रथम कविता, स्फुट लेखन, संवाद, लेख, प्रासंगिक लेख, पत्रे लिहिता लिहिता स्त्री लेखनाचा विकास, विस्तार होऊ लागला.
साहजिकच स्त्रियांचे सुरुवातीचे लेखन स्त्रियांच्या तत्कालीन प्रश्नांच्या संदर्भातच होते. स्त्री शिक्षण, लग्नाच्या चाली, हुंडय़ाची घातक चाल, बालविवाह, स्त्रियांची स्थिती या सारख्या विषयांवर स्त्रिया लिहीत होत्या. १८९० नंतर स्त्रियांची नावे प्रसिद्ध होऊ लागली. कांताबाई तर्खडकर, पिरोजबाई कोठारी, सोन्याबाई गाडेकर, लीनाबाई शामराव, सीताबाई लांडगे इत्यादी लेखिकांची पहिली पिढी नियतकालिकांतून पुढे येत होती. स्त्रिया त्यांच्या स्वाभाविक भाषेत लिहीत. विचारांचा ठामपणा, आपले मत स्पष्टपणे मांडणे, एकंदर सामाजिक परिस्थिती, रीतिरिवाज, स्त्रियांना होणारा त्रास, त्यावरचे उपाय इत्यादींविषयी अतिशय प्रगल्भतेने लिहीत. ‘लग्नाच्या चाली’विषयी आनंदीबाई म्हणतात, ‘‘बालविवाह केल्यापासून आई-बापांस आम्ही मुलांचे ऋणमुक्त झालो असे वाटते.. परंतु हे त्यांचे विचार खोटे आहेत. या जगात पुरुषांस खरे भूषण म्हटले म्हणजे विद्या, कीर्ती व सुलक्षणी स्त्री आणि विद्वान मुले. तसेच स्त्रियांस विद्वान पती, विद्या, उद्योग व सुलक्षणी मुले. हे या जगात खरे भूषण आहे. अमुक वर्षी मुलांचे व अमुक वर्षी मुलीचे लग्न करावे, हे ठरविल्यास लोकांचे फार कल्याण होणार आहे?’’
‘स्त्रियांची स्थिती’ या लेखात तर कांताबाई तर्खडकर यांनी बालाजरठ विवाहावर परखड टीका केली आहे. ‘‘६० वर्षांचा थेरडा व दहा वर्षांची बायको! एकीकडे लाळ गळत आहे. दात पडले आहेत. अंगास दरुगधी येतच आहे. आज मरणार की उद्या मरणार या वळणावर येऊन पोचला तरी बेहत्तर! तिथे बिचारी ती मुलगी त्याच्या कितपत आज्ञेत वागेल.. एकंदरीत पाहता बालपणी लग्ने झाल्याने हजारो प्रकारची नुकसानी होऊन संततीची, संपत्तीची अब्रूची व सर्व देशाची धुळधाणी होते. याकरिता अबलांचीच काय, परंतु सबलांचीही हानी पुष्कळ होते. यामुळेच दोघांची स्थिती सुधारण्यास या गोष्टीचा किती अवश्य विचार झाला पाहिजे, हे मी वाचकांवर सोपवते.’’
‘बालविवाह’ या लेखात तर सीताबाई लांडगे यांनी आईवडिलांनाच खडे बोल सुनावले आहेत. ‘‘वर पाहण्याच्या वेळी आईबापांचे लक्ष मुलीच्या हितापेक्षा आपल्या सोयीकडेच विशेष असते. एकदा लग्न करून दिले म्हणजे आपण सुटलो, असे त्यांस वाटत असते. सारांश, मुलींची लहानपणी लग्ने करण्याची चाल बंद होईल तर आपल्या समाजास फारच फायदा होईल. मात्र नुसती लग्ने मोठेपणी केली म्हणजे आटोपले असे नाही, तर त्यांना योग्य ते शिक्षण देण्यासाठीही आईबापांनी झटले पाहिजे. त्यांना शिकविण्याची योग्य व्यवस्था केली पाहिजे. जर लहानपणी सुशिक्षण मिळाले तर तशा वयांतही लग्न करण्यास विशेष बाधा नाही.’’
विचार व्यक्त करण्याबरोबर लेखिका काही उपायही सुचवीत हे वाखाणण्याजोगे होते. उच्चवर्गीय गरीब स्त्रियांना उपजीविकेचे कोणतेच साधन नव्हते. कष्टकरी स्त्रियांप्रमाणे गिरणीत काम किंवा भाजीपाला विकण्याचे काम त्या करू शकत नाहीत. तेव्हा अशा अनाथ, गरीब स्त्रियांना माणकबाई लाड ‘शिवणकामाचा मार्ग’ सुचवतात. ‘‘परोपकारी स्त्रियांनी व पुरुषांनी अशा गरीब व अनाथ स्त्रियांकरिता एक शिवणकामाची कंपनी काढावी आणि त्यांनी केलेली शिवणकामे त्या कंपनीत विकून त्यांचे पैसे त्यांना आणून द्यावेत.’ ज्यांना शिवणकाम येत नसेल त्यांनी शेवंताबाई निकांबी यांच्या शाळेत जाऊन शिकावे.’’ असा सल्लाही माणकबाई लाड देतात.
‘लग्नात गरीब-श्रीमंत यांना हुंडय़ाच्या बाबतीत एकच नियम असावेत. एखाद्या श्रीमंताच्या मनात, मुलीस व जावयांस जास्ती देणे असेल तर त्यांनी लग्न झाल्यानंतर द्यावे.
परंतु ती देणी लग्नासंबंधी नसावी. म्हणजे गरीब गरिबास फार सुलभ होऊन ज्या अबला आहेत त्यांचे कल्याण होईल,’ असे स्त्रियांनी एकोणिसाव्या शतकात व्यक्त केलेले विचार वाचनात येतात. तेव्हा त्या काळातील स्त्रियांची प्रगल्भता जाणवून मन थक्क होते.    ल्ल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 3:25 am

Web Title: women began to write
Next Stories
1 आधार फक्त पाटीतल्या भाजीचा
2 प्रवास १२ हजार कि.मी.चा
3 ‘येस वी कॅन’
Just Now!
X