19 March 2019

News Flash

कमांडो :

ज्या मुलींना शिक्षण घेण्यापासूनच काय, पण घरातूनही एकटं बाहेर पडायला बंदी आणणाऱ्या, त्यांचं जगणं असह्य़ करणाऱ्या तालिबान्यांचा, दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी

| May 23, 2015 01:01 am

womanyaज्या मुलींना शिक्षण घेण्यापासूनच काय, पण घरातूनही एकटं बाहेर पडायला बंदी आणणाऱ्या, त्यांचं जगणं असह्य़ करणाऱ्या तालिबान्यांचा, दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आता पाकिस्तानमधील तरुणी स्वत:ला सक्षम करीत कमांडो फोर्समध्ये दाखल होत आहेत आणि स्वतबरोबर समाजाच्या संरक्षणासाठी उभ्या राहात आहेत. नियतीचा उफराटा न्याय म्हणतात तो असा. तालिबान्यांच्या दृष्टीने स्त्रियांचा जन्म म्हणजेच पाप तिथे स्त्रीचा आदर शक्यच नव्हतं. त्या पाकिस्तानातल्या  वाढत्या  दहशतवादाच्या विरोधात पहिली महिला कमांडोंची तुकडी तयार होते आहे.
पाकिस्तान पोलिसांच्या तैनातीत तयार होत असलेल्या पहिल्या ३५ जणींची कमांडो तुकडी नुकतीच अत्यंत कडक प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली आहे. एनबीसी न्यूजमध्ये म्हटल्याप्रमाणे बाहेर सुमारे ५० डिग्री सेल्सीयस इतकं तप्त वातावरण, फक्त डोळे उघडे राहातील एवढीच मोकळी जागा बाकी पूर्ण शरीर काळ्या गणवेषात बंद, अनेकदा एका हातात पेलवणार नाहीत अशी ऑटोमेटिक ग्रेनेड लॉन्चरसारखी जड शस्त्रे चालवणं, पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत विश्रांती न घेता चालू असलेलं प्रशिक्षण यातून या कमांडो तावूनसुलाखून नुकत्याच बाहेर पडल्या आहेत.  २३ वर्षांची मेहरीन या प्रशिक्षणाबद्दल इतकी उत्सुक आणि निश्चयी होती की लग्नाच्या सहाव्या दिवशी या प्रशिक्षण वर्गाला हजर राहिली. तिच्या मते, असे शिक्षण म्हणजे तुमच्यातल्या धाडसाला आणि शौर्याला मिळालेली संधी असते.
 पाकिस्तानात २००२ पासून दहशतवादी हल्ल्यात किमान ५ हजार लोकं मृत्युमुखी पडले आहेत. पोलीसही खूप मोठय़ा प्रमाणात मरण पावले आहेत. २२ वर्षीय निसा गुल म्हणते, ‘‘आमच्या देशाची हालत खरंच वाईट आहे. कोणत्याही काळात, कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही स्थितीत संकटाचा मुकाबला करणं म्हणजे कमांडो. आज आम्ही आमच्या देशाच्या कमांडो आहोत.’’
 पाकिस्तानमधल्या या तरुणी त्यांच्या देशाच्या कमांडोज् बनल्या आहेत. अबलेचं हे सबलेत झालेलं रूपांतर पाहाता स्त्री सक्षमीकरणाचा आणखी कोणता पुरावा हवा.

डगमगती पावलं
दारू पिणं चांगलं की वाईट हा प्रश्नच रद्दबातल व्हावा इतकं याचं वेड समाजमनात झिरपलेलं आहे. अगदी स्त्रीमनातही, तेही देशोदेशीच्या! दारूला दारू म्हणणं हे तर केव्हाच डाऊन मार्केट झालंय इतकं त्याचं उदात्तीकरण केलं गेलं. त्याचमुळे ड्रिंक्स घेणं हा स्टेटस सिम्बॉल कधी झाला हे भल्याभल्यांनाही कळलं नाही. त्यातच अल्कोहोल कंपन्यांच्या संभाव्य ‘लेडी पॉवर’ खेचण्याच्या क्लृप्त्यांमुळे चमचमत्या, फसफसत्या, रंगबीरंगी ड्रिंक्सच्या प्रेमात या लेडिज् आपसूक पडल्या. पण त्या नुसत्याच पडल्या नाहीत तर आज कोसळण्याच्या अवस्थेत पोहोचल्या आहेत.
धम्माल मस्तीच्या कल्पना ‘काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या’ यातच आक्रसत गेल्यात. त्याचाच परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. ‘ओईसीडी’च्या अहवालानुसार इंग्लंडचं या बाबतीतलं प्रगतिपत्रक श्रीमंत देशाच्या तुलनेत केव्हाच नापास ठरलंय. तिथल्या टीन एज मुलींनी टीन एज मुलांनाही याबाबतीत मागे टाकलय.  मध्यमवर्गीय नोकरी करणारी तरुणी तर ऑफिस सुटल्यावर आपल्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर पबमध्ये जाणं इष्ट कर्तव्य मानते कारण ती त्यांच्यातलीच आहे, हे दाखवणं ही प्रत्येकीची प्रोफेशनल गरज झालीय म्हणे.
पण अल्कोहोल घेण्याचं सर्वाधिक घातक प्रमाण आहे ते उच्चशिक्षित तरुणींमध्ये. व्यसनाधीन पाचामधल्या चार तरुणी या उच्चशिक्षित असतात. मोठय़ा मोठय़ा हुद्दय़ांवर कामाला असतात. त्यांचं म्हणणं, ‘‘आमचंही आयुष्य पुरुषांपेक्षा वेगळं नाही. नोकरीत प्रगती करायचीय किंवा सोशल नेटवर्किंग वाढवायचंय तर पुरुषांच्या बरोबरीनं, त्यांच्यासारखंच वागायला हवं.’’ स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांची ही सर्वात काळी बाजू असावी! शिवाय पद मोठं म्हणजे जबाबदाऱ्याही मोठय़ा. त्याचा वाढता ताण ‘सहन’ करण्यासाठी धोक्याची पातळी ओलांडून या सुशिक्षित तरुणींनी आपलं आयुष्य ‘ड्रिंक्स’च्या हवाली केलंय.
 स्त्री पुरुष दोघांनाही या व्यसनाने आपल्या जबडय़ात इतकं घट्ट धरलंय की गेल्या तीस वर्षांत लीव्हरच्या आजाराने मरणाऱ्यांची संख्या ५०० पट वाढली आहे. हा आकडाच इतका बोलका आहे की खरं तर तो ऐकूनच खाडक्न उतरेल एखाद्याची
(संदर्भ- ओईसीडी – ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिकअँड कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंटचा अहवाल. )

मेन विल बी मेन
मेन विल बी मेन याचा प्रत्यय आपल्याला अनेक ठिकाणी येतच असतो. विशेषत: बायको आणि बायकांच्या बाबतीतलं पुरुषाचं वागणं हे टिपीकल टील्ल  Men will be men  मधलंच असतं अनेकदा! मध्यंतरी टीव्हीवरही या टॅग लाइनच्या काही गमतीशीर जाहिराती येत होत्या. एक तरुण घाईघाईत लिफ्टमध्ये शिरतोय. समोरून धावत येणाऱ्या एका प्रौढ जोडप्यासाठीही तो थांबत नाही. १८ व्या मजल्यावर जाईपर्यंत त्याची अस्वस्थता कधी वर पोहोचतोय याच्याही पलीकडे गेलेली असते. लिफ्ट अखेर थांबते.
.. हळूहळू लिफ्टचं दार उघडतं आणि समोरून एक नवयौवना डौलात लिफ्टच्या दिशेने येते. मग काय, आपल्याला उशीर झालाय हे मनाआड करून तिच्याबरोबरच तो पुन्हा त्या लिफ्टमध्ये शिरतो. लिफ्ट खाली खाली उतरत जाते अन् तो मनाने खाली खाली.. तळमजल्याला पोहोचल्यावर पुन्हा दार उघडतं तेव्हा तेच मगाचंच जोडपं उभं असतं, आता खाऊ की गिळू नजरेने पाहात..  पण तो मात्र मस्त पुरुषी मस्तीत!
दुसरी एक जाहिरात. दोघं मित्र बसलेत. एकाचा चेहरा पार पडलेला. दुसरा त्याचं मूक सांत्वन करतोय. इतक्यात त्याची बायको हाक मारते. तो उठतो. मित्र समजूत घालत म्हणतो, ‘होतं असं कधी कधी.’ इतक्यात दुसरा मित्र येतो. त्याचा दु:खी चेहरा पाहून त्या बसलेल्या मित्राला विचारतो, ‘याला काय झालं?’ मित्र पडलेल्या चेहऱ्याने सांगतो, ‘त्याच्या बायकोची ऑफिशल टुअर.. एक आठवडय़ाची होती. पण.. कॅन्सल झालीय.’ पाश्र्वभूमीला वाजतं, मेन वील बी मेन!
 हे आठवण्याचं कारण म्हणजे हाच प्रत्यय सध्या चीनमधल्या ‘ऑल फिमेल व्हाइट स्वान वुमन राफ्टिंग रेस्क्यू टीम’ला येतोय म्हणे. समुद्रात राफ्टिंग वा पोहोण्यासाठी आलेल्या लोकांच्या संरक्षणासाठी ही संपूर्ण स्त्रियांची टीम दक्ष असते. या दक्षता समितीने सध्या गुप्त कॅमेऱ्याची मागणी केलीय. शरीरावर लपवलेल्या या कॅमेऱ्यात अशा ‘लबाड’ पुरुषांना बंदिस्त करणं त्यांच्यासाठी गरजेचं झालंय. कारण काही पुरुष म्हणे मुद्दाम समुद्रात उडी मारून बुडायचं नाटक करतात. बुडलेल्यांना आधार द्यायला या कन्यका लगेच धाव घेतात आणि त्या लबाडांचा ‘हेतू’ साध्य होतो. अर्थात बाईचा सिक्स सेन्स तिला धोक्याची सूचना देतोच. त्यामुळे या तरुणींना या लबाडांचा अंतस्थ हेतू लक्षात यायला लागला आणि त्यांनी त्याविरुद्ध तक्रारच केली. त्या
तक्रारींचं प्रमाण वाढत गेलं आणि त्यांना हे गुप्त कॅमेरे देण्यात येत आहेत. या गुप्त कॅमेऱ्यांच्या मदतीने या लबाडांच्या हालचालींवर नजर ठेवता येणं शक्य होणार असून असा कुणी सापडला की या कॅमेऱ्यातील फुटेज त्यांच्या विरुद्धचा पुरावा म्हणून वापरला जाणार आहे.
 या दक्षतेमुळे आंबटशौकिनांच्या कृत्याला चाप लावला जाणार आहे हे खरं असलं तरीही, चीनमधल्या पुरुषांच्या या वागण्यामागे मुलांच्या तुलनेत जन्माला आलेल्या सव्वा तीन कोटी जास्त मुली तर कारणीभूत नसाव्यात ना, हासुद्धा विचार करण्याजोगा मुद्दा आहे!
आरती कदम -arati.kadam@expressindia.com

First Published on May 23, 2015 1:01 am

Web Title: women commandos against terrorism in pakistani