11 July 2020

News Flash

आम्ही उपरे, वंचित..

नृत्य-गायन, कसरत, जादू आदी कला सादर करणारी नट ही संपूर्ण भारतात विखुरलेली भटकी जमात आहे. भारतातली त्यांची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत आहे.

| March 28, 2015 02:41 am

नृत्य-गायन, कसरत, जादू आदी कला सादर करणारी नट ही संपूर्ण भारतात विखुरलेली भटकी जमात आहे. भारतातली त्यांची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत आहे. फक्त दहा टक्के साक्षरता, ९८ टक्के लोक बेघर, भूमिहीन आहेत. पुण्यातल्या त्यांच्या संपूर्ण वस्तीतील एकही मूल शाळेत जात नाही. १०० टक्के निरक्षरता. मुलींची लग्नं १३-१४ व्या वर्षी केली जातात. आपल्याच देशात उपऱ्या असणाऱ्या ‘नट’ वा ‘डोंबारी’ जमातीविषयी.

२५ जानेवारीची संध्याकाळ. चौकात सिग्नलला वाहने थांबली. हातात टाचण्या लावलेल्या कागदी राष्ट्रध्वजांचा जुडगा घेऊन प्रत्येक वाहनाजवळ घाईघाईने जाण्याचा प्रयत्न करणारी सहा-सात वर्षांची मुलगी. मी बसलेल्या रिक्षाजवळ आली आणि म्हणाली, ‘‘मॅडम, अपने देश का झेंडा ले लोना, देश का झेंडा देश के लिये ले लोना मॅडम.’’ मी काही बोलायच्या आत रिक्षाचालक म्हणाला, ‘‘किस का देश? जिनका देश है वो लोग रास्ते पे ऐसे झेंडा नहीं बेचते मुन्नी.’’ शेजारी चार-पाच वर्षांची मुले-मुली रस्त्यावरच पटापट कसरतीचे खेळ करून ‘कार’ वाल्यांकडे हात पसरत होते.  एक प्रश्न चमकून गेला, ‘खरंच गेल्या ६७ वर्षांत काय झालंय यांच्या स्वातंत्र्याचं?’
   उत्सुकतेपोटी तिथेच उतरून चौकशी केली. काही अंतरावर झाडाखाली गळ्यात ढोल अडकवून उभी असलेली सुखबाई त्यांच्यापकी दोघांची आई असल्याचे कळले. तिच्या कडेवर एक लहान मूल होतेच. तिच्याकडून कळले की ती ‘नट’ जमातीची आहे. त्यांचा ‘डेरा’ (पालांची वस्ती) लोणी येथे आहे. सध्या ते लोक पुणे शहरातल्या चौकाचौकात किंवा पुण्याहून नगर, सोलापूर, कल्याण दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडय़ांत आपल्या मुला-मुलींच्या कसरतीच्या आधारे भिक्षा मागून कुटुंबाची उपजीविका करतात.
लोणी गावात शिवशक्ती हॉटेलच्या बाजूला सडकेलगत असलेल्या खासगी जागेवर नट समाजाच्या सुमारे ६० पालधारकांची वस्ती. सुमारे २० वर्षांपासून ते इथे आहेत. भोवतीच्या निरनिराळ्या यात्रांच्या काळात ‘खेल-तमाशा’ दाखविण्यासाठी तात्पुरते जावे लागत असले तरी पालासकट सारे सामान उचलून न्यावे लागते. अशा तऱ्हेने आजही अहमदनगर येथील यात्रेला सुमारे २० कुटुंबे गेलेली. उरलेल्या पालातून सुखबाई नटसह तेथील महिलांशी गप्पा झाल्या.
लहान मुला-मुलींतर्फे सार्वजनिक ठिकाणी कसरतीचे खेळ करणे हेच त्यांच्या उपजीविकेचे परंपरागत साधन आहे. महिला आणि लहान मुली याच कामी जुंपलेल्या असतात. दोरीवर चालण्याचे व इतर अवघड कसरतीचे काम मुलींकडूनच करून घेतले जाते. लहान मुलांकडून जमिनीवरच्या कसरती करून घेतल्या जातात. वयाच्या दीड-दोन वर्षांपासूनच त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. वयाच्या चौथ्या वर्षांपासून मुलीच्या खेळ-कौशल्याचे प्रदर्शन सुरू होते. एकाच लोखंडी िरगमधून आईसोबत मुला-मुलींचे देह एकत्र बाहेर काढणे, शरीराची कमान, घडी करणे किंवा कोलांटी उडी मारणे अशा कसरती करताना पोटात अन्न असून चालत नाही. त्यामुळे दिवसभर ते पोट भरून जेवतही नाहीत. थोडे थोडे हलके किंवा द्रवरूप अन्न घेतात. पाचव्या वर्षी मुलगी दोरीवरच्या सर्व कौशल्यात पारंगत होते. जास्तीत जास्त वयाच्या बारा वर्षांपर्यंत हा दोरीवरचा खेळ चालू रहातो. कसरत करताना तोल जाऊन पडणे, जास्त वजनाच्या मुलींना झेलताना चूक होऊन हात-पाय मोडणे, मृत्यू येणे असे अपघात झाल्याचे अनुभव आहेत. म्हणून जमिनीवरची ताकदवान व दक्ष व्यक्ती आणि दोरीवरच्या मुलीचे वजन याचा समतोल पाहूनच हा खेळ केला जातो.
काही कारणाने या खेळासाठी कौशल्यवान मुलांची गरज भासली तर वस्तीतल्या इतर नातेवाइकांकडून त्यांची मुले भाडय़ाने घेतली जातात. संपूर्ण वस्तीतील एकही मूल शाळेत जात नाही. शंभर टक्के निरक्षरता. मोठी मुले चौकाचौकात उभे राहून कॅलेंडर, खेळणी, चित्रकलेच्या वह्य़ा, प्रसिद्ध नियतकालिके, महापुरुषांचे तथा देवादिकांचे फोटो इ. वस्तू विकायचे काम करतात. तर तेरा-चौदा वर्षांच्या झाल्या की मुलींची लग्नं केली जातात. पंधराव्या वर्षांपर्यंत लग्न नाही केले तर समाज आईवडिलांना नावे ठेवतो.
मुलीच्या आईबाबांना लग्नासाठी विशेष खर्च करावा लागत नाही, कारण हुंडा द्यावा लागत नाही. मुलाकडचे लोक मागणी घालायला मुलीच्या घरी जातात. मुलीच्या बाजूने संमती मिळाली की, मुलाकडून लग्नाच्या खर्चापोटी मुलीला ठरावीक रक्कम देऊनच मुलगा परत फिरतो. मुलाच्या ऐपतीप्रमाणे किमान वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाते.
यातून मुलीच्या बाजूने लग्नासाठी आवश्यक कपडय़ांची खरेदी करावी, असा संकेत आहे. शिवाय लग्नाच्या आदल्या रात्री मुलाची वरात येते ती दोन्ही बाजूच्या लोकांच्या जेवणाची सामग्री घेऊनच. या सामग्रीत किमान ‘दाल, चावल और लकडी (सरपण)’ या तीन वस्तूंचा पुरेसा साठा असतो. लग्नातल्या कपडय़ापासून भोजनापर्यंतच्या खर्चाचा कसलाही बोजा मुलीच्या बाजूवर टाकला जात नाही. विधवांच्या किंवा घटस्फोटित महिलांच्या पुनर्वविाहास परवानगी आहे.
वस्तीवर पाण्याची सोय नाही. स्नान व कपडे धुण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून दर मंगळवारी लवकर पहाटे ओढय़ावर जाऊन कपडे धुण्याबरोबर त्या स्नान करून येतात. अशाही परिस्थितीत महिलांची बाळंतपणं पालातच होतात. सर्व महिलांना दवाखान्याची गरज नसते असे त्यांचे मत आहे. अडचणीचे वाटले तर दवाखान्यात जाण्याची त्यांची तयारी आहे. एकोणीस-वीस वर्षांच्या मुली तीन लेकरांच्या आई झालेल्या दिसल्या. कुटुंबनियोजनाचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. मुलगा वा मुलगी यांच्या जन्मानंतर ते सारखाच आनंद साजरा करत असले तरी मुलीच्या जन्माचे विशेष स्वागत होते. जेवढी लहान मुले जास्त तेवढे आíथक उत्पन्न  जास्त असा त्यांचा हिशोब आहे. लग्न ठरणे-होणे आणि जन्म या प्रसंगी सामुदायिक आनंद साजरा केला जातो. यात जेवण तर असतेच परंतु पुरुषांसह  स्त्रियादेखील दारू पितात. मुला-मुलींची नावे ठेवण्याची त्यांची मानसिकता किंवा पद्धत मात्र मजेशीर वाटली. नाशिक येथे मुलीचा जन्म झाला तर तिचे नाव ठेवले नाशिक. पुण्यात जन्म झाला म्हणून तिचे पूनम. काहींची नावे तर अधिक वेगळी. िहदूधर्मीय असूनही रुखसार, सनाया, हसिना, मुस्कान, कबीर, प्रिन्स अशीही नावे ठेवलेली आढळली.
चोहीकडचा अनुभव घेऊन, कायद्यांचा व लोकांचा कमीत कमी त्रास होईल असे ठिकाण निवडण्याकडे त्यांचा कल असतो. कारण मध्यंतरी म्हैसूर, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई या ठिकाणी त्यांच्यापकी काही महिलांना, भिक्षा प्रतिबंधक कायदा आणि बालमजुरी विरोधी कायद्याचे कारण सांगून तुरुंगात टाकले गेले तर मुला-मुलींना बालसुधारगृहात पाठविण्यात आले. त्यांना सोडविण्यासाठी जामिन मिळाला नाही म्हणून शिक्षा न होताच शिक्षेच्या काळापेक्षा जास्त काळ त्यांना तुरुंगात रहावे लागले.
त्यांचा कला जपणारा परंपरागत व्यवसाय बेकायदेशीर ठरविला गेला. जगण्याचा पर्याय दिला नाही. अशा पेचात सापडलेले हे नट लोक छत्तीसगडमधील बिलासपूरचे रहिवासी असल्याचे सांगतात. तिथे यांचा देव आहे. शिवाय बिरादरीचे काही प्रमुख पंच लोकही तिथे स्थायिक आहेत. म्हणून आम्ही बिलासपूरचे अशी त्यांची व्याख्या आहे. तिथे स्थावर मालमत्ता काहीच नाही. जातात तिथे पालात राहतात, तसे बिलासपुरातही पालातच रहावे लागते. तिथे त्यांना ‘डनचढा’ (दोरीवर किंवा दांडय़ावर चढणारे) असे म्हणतात. जन्माष्टमीचा सण ते मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. होळीचा सण साजरा करण्यासाठी मात्र ते दरसाल बिलासपूरला जातात. ‘बिरादरी (जात) पंचायती’ ची कामे या काळात तिथे होतात. लग्न, विधवांचे विवाह, आíथक व्यवहार किंवा घटस्फोट याबाबतीत तिथे निर्णय घेतले जातात. सर्व स्त्री-पुरुषांचे म्हणणे ऐकून घेतले जाते व सर्वासमक्ष न्याय जाहीर केला जातो.
पंचायतीतर्फे तिथे मंडप, भांडी, जागा, सरपण व मनुष्यबळ स्वस्तात व सोयीने मिळण्याची व्यवस्था असल्यामुळे बहुतेक सर्वाची लग्ने तेथेच होतात. डेऱ्यावरील पंचायतीत स्त्रियांचा भरणा जास्त असतो. जे हजर आहेत ते सारे पंच आहेत असे समजले जाते. जो चुकीचे काम करतो त्याला ज्येष्ठ व्यक्तीकडून थप्पड मारली जाते. पोलीस केस होईल असे प्रकरण असेल तर त्याला नीट समजावून आíथक दंड आकारला जातो. या रकमेतून डेऱ्यातील सर्व लोकांना जेवण दिले जाते.
 भारतात यांची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत आहे. भारताच्या पातळीवर या जमातींतकेवळ दहा टक्के साक्षरता आहे. छत्तीसगडच्या शासकीय सर्वेक्षणानुसार राज्यात नट जमातीच्या एकूण ७५,८८५ लोकसंख्येपकी स्त्री-पुरुष मिळून २८ साक्षर आहेत त्यापकी ७ मॅट्रिक पास आहेत. ९८ टक्के लोक बेघर, भूमिहीन असून भारतीय आहेत, परंतु कोणत्याच राज्यात त्यांना प्रादेशिक हक्क नाहीत. महाराष्ट्रात नटच्या तत्सम डोंबारी जमात आहे.
नट ही संपूर्ण भारतात विखुरलेली भटकी जमात आहे. संस्कृत भाषेत ‘नट’ या शब्दाचा अर्थ नाचणारा. नृत्य-गायन, कसरत-सर्कस, हातचलाखी-जादू इत्यादीपकी कला सादर करून लोकांची करमणूक करणे हा नट जमातींचा परंपरागत व्यवसाय होय. विभागवार वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जमातींचे मूळ निश्चित नसले तरी ‘डोम’ या जातीचा हा विस्तार आहे असे समजले जाते. हा व्यवसाय करणाऱ्या गटास वेगवेगळ्या ठिकाणी डोमार, डोंबार डोंबारी, बाजीगर, ब्रिजवासी नट, बजानिया नट, भांमती नट (मती गुंग करणारे), राज नट, भाटनट, कबुत्रीनट, पुरवानट, पेरणानट, गुलगुलिया, डंकचिघा, खेळकरी, इ. नावाने ओळखले जाते. प्रादेशिक भाषेशिवाय बागरी, नाटी, मथिली, मगाही, ब्रज ह्य़ा यांच्या स्वतंत्र बोली भाषा आहेत.
 महाराष्ट्रातले ओळखपत्र तुमच्याकडे नाही, शिवाय तुम्ही परप्रांतीय समजले जाता याबाबत छेडले असता कुमारीबाई म्हणाली, ‘‘हम तो देश-विदेश घुम चुके हैं. कन्याकुमारीसे नेपाल तक गये और आये. सभीने हमें अनिवासी ठहराया. हम जिसे हमारा गांव कहते हैं वो बिलासपूर भी हमें अपना नहीं मानता क्यों की साल में एक ही बार हम वहाँ जाते हैं. बच्चों को पढमना चाहते हैं. हमें कोई आरक्षण मत दो पर रहने के लिये खुद का मकान दो. बच्चों का हुनर देख के खेलकूद का ट्रेिनग दो, ताकी हमारी बच्चियां रास्ते पे खेल करना छोडम् के काम्पिटिशन में खेल सके. देश का नाम करें, हमारा नाम करें. पर इस देश को हमारी जरुरत नहीं हैं. किसी राज्य का या अपने देश का दिल इतना बडम नहीं हैं जो हम जैसे लोगों को उनमे समा ले सके. हमे गंदगी समज के किसी एक राज्य ने वहां से बाहर फेका, फिर दुसरे ने.. फिर तिसरे ने..अब तो जहां फेका वहां का सूरज हमारा..’’
अ‍ॅड.पल्लवी रेणके – pallavi.renke@gmail.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2015 2:41 am

Web Title: women deprived of every right
Next Stories
1 चरितार्थासाठी गायीची मदत
2 तुणतुण्याची सुटता साथ..
3 आसवेच स्वातंत्र्याची ..
Just Now!
X