घडलं इतकंच की त्या दोघी भर बाजारात गुडघ्याइतका घट्ट स्कर्ट घालून आल्या. या घटनेत काही वादग्रस्त आहे का? नाही ना, पण ते भारतात. मोरोक्कासारख्या मुस्लीमबहुल देशात ही घटना म्हणजे..  त्या दोघी अशा ‘बेताल’, ‘लज्जास्पद’ वागताहेत म्हटल्यावर तिथल्या काही व्यापाऱ्यांनी त्यांना घेरलंच आणि त्या किती निर्लज्ज आहेत म्हणून शिव्याच द्यायला सुरुवात केली. प्रकरण इतकं ताणलं गेलं की पोलिसांना बोलावण्यात आलं आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वागल्याबद्दल त्या दोघींना तुरुंगात डांबण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी थेट न्यायालयात पेश करण्यात आलं. ही घटना १६ जूनची.
मोरोक्कोच्या पीनल कोड ४८३ नुसार जर त्या दोघींवर हा गुन्हा दाखल झाला तर किमान दोन वर्षांची कैद निश्चित होती. झालं! तिथल्या स्त्री अधिकार मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. न्यायालयाच्या बाहेर विरोधकांनी जोरदार नारे द्यायला सुरुवात केली. मोरोक्का जरी मुस्लीम देश असला तरी आता जागतिकीकरणाचे, स्वातंत्र्याचे वारे तिथेही पोहोचले आहेतच. त्यामुळे पारंपरिक कट्टरवादी आणि सुधारणावादी असे सरळ सरळ दोन तट इथेही नांदताहेत. एखाद्या स्त्रीने असा स्कर्ट घालणं हा गुन्हा होऊच शकत नाही, त्यामुळे हा खटलाच हास्यास्पद असल्याचं बोललं जाऊ लागलं. ऑनलाइन इंटरनेट पिटिशन दाखल करण्यात आली, त्या वेळी थोडय़ाथोडक्या नाही तर २७ हजार लोकांनी या खटल्याच्या विरोधात सह्य़ा दिल्या.
खरं तर या घटनेला हवा दिली ती जेनिफर लोपेझनं. मे महिन्यात मोरोक्को फेस्टिव्हलमध्ये तिचा एक कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण स्थानिक दूरचित्रवाणीवरून दाखवण्यात आलं होतं. आता जेनिफरचं गाणं आणि नृत्य म्हटल्यावर ते    अश्लीलतेकडे (?) झुकणार नाही हे शक्य होतं का? पण बहुधा हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना ना ते लक्षात आलं ना ते प्रक्षेपित करणाऱ्याला (की ते वेड पांघरून..) या प्रक्षेपणावर थेट मोरोक्कोच्या पंतप्रधानांनीच आक्षेप घेतला असल्याचे आणि हा गंभीर अपराध असून ही एकूणच घटना लज्जास्पद आहे. यामुळे  मोरोक्को देशांच्या दृक्श्राव्य कायद्याचा भंग तर झालाच पण धार्मिक आणि नैतिक मूल्यांना धक्का पोहोचला असल्याची त्यांची भावना असल्याचे बीबीसीने सांगितलं. प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. तर संबंधित मंत्र्यांवर टीका तर झालीच, पण त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली.
आता ही घटना अशी ताजी ताजी असतानाच त्या दोघींनी (त्यातली एक २३ वर्षीय तर दुसरी २९) हे ‘पराक्रम’ केले. अगादीर भागातल्या इनेझगानेच्या भर बाजारात ‘उत्तेजित करणारे अश्लील’ कपडे घालून आल्या. मग काय स्त्रीही पडदानशीन असली पाहिजे, तिच्या शरीराचा इंचभरही भाग उघडा राहता कामा नसे, अशी विचारसरणी असणाऱ्यांना त्या दोघींचे हे कपडे अश्लील वाटणारच. पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊ लागलेल्या या देशात अशा कपडय़ांची खरं तर सवय व्हायला हवी, तशी होतेही आहे. म्हणूनच या अटकेचे वृत्त समजताच २०० वकिलांनी त्याच्याविरोधात भूमिका घेतली आणि १३ जुलैला त्या दोघींची अखेर या आरोपातून सुटका झाली..
झालं ते असं झालं. पण त्यामुळे एक नक्की कळलं की स्त्रीच्या विशिष्ट कपडे घालण्यावर आजही तेथे आक्षेप घेतला जात असला तरी यापुढे तो कायम टिकणार नाही. मात्र स्त्रीचं हेच स्वातंत्र्य इतर बाबतीतही मान्य व्हायला हवं, कारण बदलत्या जगाच्या पाश्र्वभूमीवर आपणच आपली नजर बदलायला हवी यांचा दृष्टांत तिथल्या कट्टरवाद्यांना झाला तरच तिथल्या स्त्रियांना स्वातंत्र्यासाठी आंदोलनं करावी लागणार नाहीत.
तो होईल अशी ग्वाही तरी या घटनेनं नक्कीच दिलीय.

तिचं विसरणं.. हरवणं..
खूप वर्षांपूर्वी एका चित्रपट महोत्सवात ‘अवे फ्रॉम हर’ हा चित्रपट पाहिला होता. साठीतलं ते आनंदी जोडपं. हळूहळू त्याच्या लक्षात येतं की तिची स्मरणशक्ती कमी होते आहे. इतकी की घासून झाल्यावर भांडी ती फ्रिजमध्ये ठेवायला लागते. शेवटी तिला रुग्णालयात दाखल केलं जातं.  काळ पुढे जात राहतो. हळूहळू ती त्यालाही विसरू लागते. तिच्या चेहऱ्यावरचे अनोळखी भाव त्याला अस्वस्थ करत जातात. पुढच्या वेळी जेव्हा तो तिला भेटायला जातो तेव्हा ती त्याला पूर्णपणे विसरलेली असते. तिला असं स्वत:पासून दूर जाताना बघण्यापेक्षाही तिच्यासारख्याच स्मरणशक्ती हरवलेल्या दुसऱ्या पुरुषांशी तिची जवळीक त्याला उद्ध्वस्त करून जाते, पण तरीही तिच्या प्रेमापोटी तिला तो तसं जगू देतो.. आणि निमूट माघारी फिरतो..
अल्झायमर या आजाराशी ही माझी पहिली भेट होती. रुग्णांचं  बौद्धिकदृष्टय़ा विकलांग होत जाणं याच्याही पेक्षा आपल्या जवळच्या कुणालाच आपल्याला ओळखता येत नाही किंवा आजूबाजूचे सगळेच अनोळखी कसे, हा अनुभव त्या व्यक्तीसाठी किती भयानक असू शकतो, हे प्रकर्षांने जाणवलं आणि म्हणूनच जेव्हा कळलं की अल्झायमर वा बुद्धीभ्रंश या आजाराच्या सर्वात जास्त बळी स्त्रिया असतात, तेव्हा त्यातली भावनिक भयानकता अधिकच स्पर्शून गेली. कारण पुरुषांच्या तुलनेत स्त्री अधिक भावनाशील असते, हे आत्तापर्यंत सिद्धही झालंय.
अमेरिकेत गेली आठ वर्षे अल्झायमर असोसिएशनतर्फे अभ्यास, संशोधन सुरू आहे. आज तेथील ५० लाख लोक अल्झायमरने आजारी असून त्यातील दोनतृतीयांश इतक्या स्त्रिया आहेत आणि २०१५ पर्यंत ही संख्या तीन कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. पूर्वीच्या संशोधनानुसार स्त्रीचं पुरुषांपेक्षा जास्त जगणं, हे यामागचं कारण मानलं जायचं, मात्र इतरही अनेक कारणं पुढे येत आहेत. त्यात स्त्रीचं डाएट आणि व्यायामातील वेगळेपण, अ‍ॅनेस्थेशिया देऊन झालेल्या शस्त्रक्रिया, हळूहळू कमी होणारी स्मरणशक्ती व नवीन काही शिकण्यातली अक्षमता  असणारा आजार या साऱ्या गोष्टी अल्झायमरकडे नेणाऱ्या ठरतात आणि त्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रीमध्ये जास्त आहेत. मात्र अद्याप हे सारे अंदाज आहेत. स्त्रियाच या रोगाच्या अधिक शिकार का होतात, याचं ठोस कारण अद्याप मिळालेले नाही. मात्र कॅनिफोर्निया-सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातील क्रिस्टिन यांच्या संशोधनानुसार स्त्रीचं नैराश्याला बळी पडणं आणि सतत तणावाखाली राहणं हे सुद्धा यामागचं कारण असू शकतं. आज जगभरातही ६५ वयानंतरच्या सहातील एक स्त्री आणि ११ तील एक पुरुष या आजाराला बळी पडतो, असं म्हटलं जातंय.
वय वाढलं की अनेक आजार गळामिठी घालू लागतात, त्यातलाच हा अल्झायमर. अलीकडे जास्तच वाढत चाललेला दिसतोय. साठी-पासष्टीला जरी तो रुग्णाला स्वत:च्या पूर्णत: कवेत घेत असला तरी त्याची लक्षणं म्हणे पंधरा-वीस वर्षांपासूनच दिसायला लागतात. तेव्हा तरुण वा प्रौढांनी आत्ताच जागरूक होणं आणि अशी काही लक्षणं दिसल्यास वेळीच उपाय करणं हाच त्यावर तोडगा आहे. अन्यथा वयाच्या त्या टप्प्यावर आपल्या माणसांमध्ये असूनही त्याच्यात नसण्याचा अनुभव विदारकच नाही तर उद्ध्वस्त करणाराच असू शकतो. त्या व्यक्तीला आणि त्यांच्या जवळच्यांनाही!
आरती कदम –   arati.kadam@expressindia.com