प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळवलं असलं तरी स्पर्धात्मक खेळ या क्षेत्रावर आजही पुरु षांचंच वर्चस्व राहिलेलं आहे. याची कारणं अनेक आहेत. मुख्य आहे ते मानसिकतेचं आणि आता तर त्यातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याचंही. जोपर्यंत या दोन्ही बाबतीत फरक पडत नाही तोपर्यंत स्त्रीला क्रीडा क्षेत्रात पाय रोवण्यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे; पण क्रीडा क्षेत्रातल्या या बरोबरीच्या स्पर्धेमध्ये पुरुषांना मागे टाकत ती लवकरच जिंकणार आहे यात काही शंकाच नाही..

अगदी गेल्याच वर्षीची गोष्ट, आम्ही माझ्या मैत्रिणीकडे एकदा जेवायला गेलो होतो.  तिचे कुणी नातेवाईकही आलेले होते. आमच्या गप्पा संपत असताना तिची जुळी मुलं- इरा आणि आदित्य आपापली फुटबॉल प्रॅक्टिस संपवून घरी आली. साधारण ८ वी-९ वीत असतील ते. शाळा, खेळ वगैरे गप्पा झाल्यावर त्या नातेवाईक जोडप्यानं इराला थेट विचारलं, ‘‘अगं, शाळा करतेस सकाळी, मग क्लास आणि मग हा फुटबॉल.. झेपतं का तुला हे सगळं?’’ आत्ताच आपल्या संघासाठी ‘विनिंग गोल’ क रून आलेल्या इराला तो प्रश्न काही वेळ कळलाच नाही. आदित्य तिच्याकडे हसून बघायला लागला. त्याला बहुतेक या प्रश्नाचा रोख कळला असावा. मग ते काका माझ्या मैत्रिणीला म्हणाले, ‘‘अगं, नाच वगैरे शिकव तिला, किंवा गाणं, एखादं वाद्य, असं काही तरी; पण खास करून तिच्या या वयात असले खेळ तिला झेपायचे नाहीत. कशाला शरीराची हेळसांड!’’

यावरून मला काही वर्षांपूर्वी एका सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या कंपनीच्या अफलातून जाहिरात कँपेनची आठवण झाली. ‘त्या’ दिवसांत पांढरे कपडे घालून इकडेतिकडे उडय़ा मारणाऱ्या, कितीही त्रास होत असला तरी ‘फ्रेश’ दिसणाऱ्या मुली नव्हत्या त्या जाहिरातीत. त्यात अनेक लोकांना ‘मुलींसारखं पळून दाखवा’ असं सांगण्यात आलं. त्यातल्या जवळजवळ सर्व मुलांनी (आणि मुलींनीही) आपले केस सावरत, हळूहळू, इकडेतिकडे बघत, बावळटपणाचे हावभाव करून पळण्याचा अभिनय केला. मग हाच प्रश्न लहान मुलींना विचारण्यात आला. त्यातल्या बहुतेक मुलींनी मात्र ‘मुलींसारखं पळून दाखवा’ म्हटल्यावर जोरात धावायचा अभिनय केला. त्या विचारत होत्या, ‘‘मुलींसारखं पळायचं, म्हणजे तुम्हाला जेवढं जोरात पळता येईल तेवढय़ा जोरात पळायचं. बरोबर ना?’’ एखादी गोष्ट ‘मुलींसारखी’ करणं यात काही तरी कमीपणा आहे असं आपल्याला कधीपासून वाटायला लागलं? असं  या ‘रन लाइक अ गर्ल’ कँपेनमध्ये विचारण्यात आलं होतं.

ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील ‘ग्रीस, ऑलिंपिया’मध्ये स्पर्धात्मक खेळ हे फक्त पुरुषांसाठीच आणि तेही राजघराणातल्या पुरुषांच्या मनोरंजनासाठी खेळले जायचे. स्त्रियांना हे खेळ बघायलादेखील मज्जाव होता; मग भाग घेणं दूरच राहिलं. स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत बरोबरीचं स्थान मिळवलं असलं, तरी स्पर्धात्मक खेळ या क्षेत्रावर आजही पुरुषांचंच वर्चस्व राहिलेलं आहे. स्त्रियांची घरातली, कुटुंबातली भूमिका, समाजानं त्यांच्याकडे कशा पद्धतीनं बघावं, समाजाचे त्यांच्यासाठीचे ठोकताळे आणि ‘मुलगी म्हणजे नाजूक, तिला जपायला हवं’ या आणि अशा अनेक गैरसमजांमुळे मुलग्यांच्या तुलनेत मुली सुरुवातीलाच क्रीडा क्षेत्रात कमी प्रमाणात येतात आणि मग सगळंच गणित बिघडत जातं. एक साधा प्रयोग करून बघा. तुमच्या कोणत्याही आवडत्या खेळाचं नाव इंटरनेटवर शोधून बघा. त्या संबंधातले फोटो शोधा. बहुतेक करून फोटो तुम्हाला पुरुष खेळाडूंचे दिसतील, कारण एकूण खेळांना मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या तुलनेत जेमतेम ४ टक्के प्रसिद्धी ही स्त्रियांच्या खेळांना मिळते आणि ‘एअर टाइम’ केवळ १.५ टक्के . प्रेक्षक नाहीत म्हणून प्रसिद्धी नाही, म्हणून जाहिरातदार नाहीत, म्हणून खेळाला पैसा नाही, खेळाडूंना मानधन नाही, मान नाही. म्हणूनही स्त्री खेळाडू येत नाहीत. काही खेळ सोडले, तर स्त्रियांच्या खेळांना कधीच प्रतिसाद मिळत नाही. क्रीडा क्षेत्रातल्या स्त्री खेळाडू अशा आर्थिक दुष्टचक्रात अडकलेल्या आहेत.

जगभरात पुरुष आणि स्त्री खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये, बक्षिसाच्या रकमेमध्ये आजही मोठी तफावत आहे. २०१९ मध्ये

पी. व्ही. सिंधू जगभरातल्या सर्व स्त्री खेळाडूंपैकी सर्वात अधिक मानधन मिळवणाऱ्यांच्या यादीत तेराव्या क्रमांकावर आली आहे. ती या यादीतली भारतातील एकमेव स्त्री आहे. या आकडय़ांशी जर पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाची तुलना केली तर नेमका फरक लक्षात येतो. २०२० च्या मानधनाच्या एकत्रित आकडेवारीनुसार पहिल्या क्रमांकावर आहे टेनिसपटू रॉजर फेडरर. या यादीत पहिली स्त्री आहे ती २९ व्या क्रमांकावर आणि ३३ व्या क्रमांकावर आहे सेरेना विल्यम्स. म्हणजे १०० खेळाडूंच्या या यादीत केवळ दोन स्त्रिया आहेत- टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि नाओमी ओसाका. सेरेना ‘विम्बल्डन’ आणि

‘फ्रें च ओपन’सारख्या स्पर्धामध्ये पुरुष आणि स्त्री विजेत्यांना समान मानधन मिळावं यासाठी प्रयत्न करत होती. आता या मुख्य स्पर्धामध्ये तरी समान मानधनाचा नियम आला आहे; पण आजही या क्षेत्रातले अनेक लोक म्हणतात, की स्त्रियांच्या टेनिस स्पर्धा कमी वेळ चालतात, त्या बघणारा प्रेक्षकवर्गही कमी आहे, म्हणून त्याला जाहिरातींमधूनही कमी महसूल मिळतो, मग स्पर्धकांना समान मानधन कशासाठी?

कॅस्टर सेमेन्यासारखे एकाच वेळेला सुदैवी आणि दुर्दैवी खेळाडू खूप कमी असतात. या २९ वर्षांच्या दक्षिण आफ्रिकी धावपटूला केवळ एकच गोष्ट माहीत होती, ती म्हणजे जेवढं जोरात धावता येईल तेवढं जोरात धावायचं. एवढं, की तिच्या या वेगवान पायांनी तिला ऑलिंपिकमध्ये ८०० मीटरच्या शर्यतीत २ स्पर्धामध्ये लागोपाठ सुवर्णपदकं मिळवून दिली; पण तिच्या या सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या असामान्य शरीराला गेली दहा र्वष घृणास्पद वागणुकीचा, चर्चेचा सामना करावा लागला आहे. २००९ मध्ये तिला ‘वर्ल्ड चँपियनशिप’चा किताब मिळाल्यावर ‘अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन’नं ती नक्की स्त्री आहे की पुरुष याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांच्या अहवालाचे तपशील हे गुप्ततेच्या पडद्याखाली आहेत; पण तिला जर स्त्री गटाच्या खेळांमध्ये भाग घ्यायचा असेल, तर तिला आपल्या शरीरातील पुरुषी संप्रेरकांची (अर्थात ‘टेस्टॉस्टेरॉन’ची) पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न करणं बंधनकारक आहे. या निर्णयाचा फटका कॅस्टरला फक्त खेळासंदर्भातच बसला नाही, तर तिच्या खासगी आयुष्यावरही तो परिणाम करणारा आहे. ‘टेस्टॉस्टेरॉन’ची ही पातळी साध्य होण्यासाठी तिला ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’देखील करावी लागली आणि त्याचे तिच्या शरीरावर भयंकर दुष्परिणाम झाल्याचं ती सांगते.

निसर्गत:च पुरुषी संप्रेरकांची पातळी अधिक असल्यामुळे २४ वर्षांची भारतीय धावपटू द्युती चंद हिलाही बऱ्याच दिव्यांचा सामना करावा लागला आहे. द्युती ओडिशातील जाजपूर जिल्ह्य़ातली आहे. तिच्या कुटुंबात सहा बहिणी आणि एक भाऊ यांसह एकूण नऊ जण आहेत. वडील कपडे शिवायचं काम करतात. स्वाभाविकपणे धावपटू होण्यासाठी द्युतीला खूप संघर्ष करावा लागला. तिची मोठी बहीण सरस्वती चंद हीसुद्धा राज्यस्तरीय ‘स्प्रिंटर’ म्हणून खेळलेली आहे. बहिणीचं धावणं पाहून द्युतीनंही धावपटू होण्याचा निर्णय घेतला, असं ती सांगते. घरची गरिबी असल्यामुळे जर आपण शाळेकडून कोणत्या तरी खेळात सहभागी झालो तर शिक्षणाचा खर्च शाळा उचलेल आणि मग पुढे जाऊन खेळाडूंसाठीच्या कोटय़ामधून एखादी नोकरीही मिळू शकेल, हे द्युतीच्या लक्षात आलं आणि तिनं खेळाकडे अधिक लक्ष केंद्रित केलं. द्युतीनं ‘१०० मीटर स्प्रिंट’ या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदवलेला आहे आणि २०१८ मध्ये झालेल्या आशियायी खेळांमध्ये २ रौप्य पदकंही मिळवलेली आहेत; पण ‘हायपर  अँड्रोजेनिझम’ या विशिष्ट ‘मेडिकल कंडिशन’मुळे २०१४  मध्ये एक स्त्री म्हणून कोणत्याही क्रीडा प्रकारात भाग घेण्यास तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा तिचं वय होतं केवळ १८ र्वष. त्यामुळे ती २०१४ च्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’ आणि ‘एशियन गेम्स’मध्ये भाग घेऊ शकली नव्हती. या निर्णयाविरुद्ध तिनं २०१५ मध्ये स्वित्झरलँडच्या ‘कोर्ट ऑफ आर्ब्रिटेशन फॉर स्पोर्ट्स’ म्हणजे ‘कॅस’कडे याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि ती या प्रकरणात जिंकलीदेखील. आधीच्या नियमानुसार ‘टेस्टॉस्टेरॉन’ संप्रेरकाची पातळी अधिक असलेल्या स्त्री धावपटूंना याआधी ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ करणं बंधनकारक होतं. आता १०० मीटरच्या स्पर्धेला हा नियम लागू केला जात नाही. द्युती म्हणते, की पुरुष खेळाडूंच्या तुलनेत स्त्री खेळाडूंना स्पर्धाच्या आधी अनेक चाचण्या कराव्या लागतात. त्यांचा ‘हार्मोन काऊंट’, ‘बॉडी फॅट’ या सगळ्याच्या चाचण्या केल्या जातात. स्पर्धेआधीच्या अशा चाचण्यांमुळे त्यांचं मानसिक स्थैर्य ढासळतं. ती असंही सांगते, की प्रत्येक व्यक्ती ही समान नसते. जर एखादीच्या शरीरात एखाद्या संप्रेरकाचं प्रमाण निसर्गत:च अधिक असेल तर त्यासाठी कोणतेही उपचार घेणं हे अनैसर्गिकच आहे. गेल्या वर्षी द्युतीनं ती समलैंगिक असल्याचा खुलासा केला. त्यामुळे ती भारतातली पहिली उघडपणे समलैंगिक असलेली खेळाडू ठरली आहे. द्युतीनं दहा वेळा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. आज १०० मीटर धावणे प्रकारात ती आशियातील पहिल्या क्रमांकाची महिला ‘स्प्रिंटर’ आहे. तिचं लक्ष आता २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिककडे लागलेलं होतं; पण सध्याच्या ‘करोना’ संकटामुळे आता तिला त्यासाठी आणखी एक वर्ष थांबावं लागणार आहे.

भारतात क्रीडा क्षेत्रातील परिस्थिती हळूहळू बदलते आहे. स्त्री क्रिकेटपटूंच्या स्पर्धानाही प्रेक्षक मिळावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांसारख्या खेळाडू अनेकींना प्रेरणा देत आहेत. दीपा कर्माकरसारख्या ‘जिमनॅस्ट’चं उदाहरण पाहून अनेक मुली या खेळाकडे वळत आहेत; पण ज्या देशात ५५ टक्के स्त्रिया या ‘अ‍ॅनिमिक’ (रक्तक्षय झालेल्या) आहेत त्या देशात स्त्री खेळाडूंची नावं अशी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असणार असं दुर्दैवानं वाटतं.

‘झेपतं का’ असं विचारणारे ते काका मला पुन्हा कधी भेटले, तर त्यांना सांगायचं आहे, कोणताही नृत्य प्रकार, वादन, गायन यासाठी जी जिद्द आणि चिकाटी लागते तेवढीच कोणत्याही खेळात सर्वोत्तम बनायला लागते. त्यामुळे अशा समाजाला ज्या ‘स्त्रीसुलभ’ कला वाटतात त्यामध्ये फक्त मुलींनी जावं हा अट्टहास टाळायला हवा. नाही तर आपण भारतीय पुढच्या पिढीतल्या कित्येक डायना एडलजी, सानिया मिर्झा, पी.टी. उषा, पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मेरी कोम, फोगट भगिनी यांना  गमावून बसू.