12 August 2020

News Flash

यत्र तत्र सर्वत्र : शास्त्राच्या दुनियेतील स्त्रिया

आजपर्यंत ‘शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक’ केवळ १८ स्त्रियांना, तर ५४२ पुरु षांना मिळालेलं आहे.

१९२७ मधील ब्रुसेल्स येथील सोलवाय कॉन्फरन्सदरम्यान सर्व पुरुष शास्त्रज्ञांमध्ये एकमेव स्त्री - मारी क्युरी

प्रज्ञा शिदोरे

pradnya.shidore@gmail.com

जगातील शास्त्र शाखांमधल्या STEM – म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्समध्ये स्त्रियांचं प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. भारतातलं हे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे. आपण केवळ नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या लोकांची नावं वाचली तरी आपल्याला हा फरक लगेचच लक्षात येईल. गणितातलं फिल्ड्स मेडल तर आत्तापर्यंत केवळ एकाच स्त्रीला मिळालं आहे. ‘शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक’ १९५८ पासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी दिलं जातं. आजपर्यंत हे पारितोषिक केवळ १८ स्त्रियांना, तर ५४२ पुरु षांना मिळालेलं आहे.

माझ्या मावशीच्या स्वयंपाक घरातून नेहमीच वेगवेगळे सुवास आणि आवाज येत असतात. कधीही गेलं तरी ती तिने केलेल्या एखाद्या नव्या पदार्थाबद्दल सांगत असते. ऋतू, दिवसाची वेळ, आपली प्रकृती यानुसार आपल्याला कोणती गोष्ट आवडेल, पचेल आणि लाभेल हे ती पटकन सांगू शकते. माझी मावशी आहारतज्ज्ञ आहे आणि तिचं कदाचित भाग्य हे की, तिची प्रयोगशाळा म्हणजे तिचं स्वयंपाकघरच आहे.

आज जरी अनेक ठिकाणी स्त्रिया शास्त्राच्या जगात मोठी कामगिरी बजावताना दिसत असल्या तरी त्यांचं प्रमाण अतिशय कमी आणि प्रवास अतिशय खडतर आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीने एक प्रयोग केला होता. त्यामध्ये असं सिद्ध झालं की, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या शाखांमध्ये जरी एक स्त्री आणि पुरुषाचं शिक्षण, पात्रता सगळं सारखं असेल तरी निवड करायची झाली तर कायमच एका पुरुषाला प्राधान्य दिलं जातं. जरी त्यांनी त्या स्त्रीला काम करण्याची संधी दिली तरी पुरुषाच्या तुलनेत तिचा पगार खूपच कमी दिला जातो.

जगातील शास्त्र शाखांमधल्या ज्या आता STEM – म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्स, असं म्हणतात, या शाखांमध्ये स्त्रियांचं प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. भारतातलं हे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे. आपण केवळ नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या लोकांची नावं वाचली तरी आपल्याला हा फरक लगेचच लक्षात येईल. गणितातलं फिल्ड्स मेडल तर आत्तापर्यंत केवळ एकाच स्त्रीला मिळालं आहे. ‘शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक’ १९५८ पासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी दिलं जातं. आजपर्यंत हे पारितोषिक केवळ १८ स्त्रियांना, तर ५४२ पुरुषांना मिळालेलं आहे. ‘पार्टिकल फिजिक्स’ या शाखेत मोठं काम केलेल्या प्राध्यापिका रोहिणी गोडबोले यांना गेल्याच वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी सहसंपादित केलेल्या ‘लिलावतीज् डॉटर्स’ या पुस्तकात भारतातील बाहेर कमी माहीत असलेल्या महिला शास्त्रज्ञांबद्दल विस्तृत लिखाण केलं आहे. त्या म्हणतात की सर्न (CERN), म्हणजे जिथे सध्या ‘हायड्रॉन कोलायडर’वर काम सुरू आहे तिथे त्या काम करत असताना, भारतात या क्षेत्रात स्त्रियांचं प्रमाण खूपच कमी आहे हे प्रकर्षांने जाणवलं. या क्षेत्रात स्त्रियांचं प्रमाण वाढावं यासाठी रोहिणी गोडबोले यांनी ‘जेंडर इन फिजिक्स वर्किंग ग्रुप’ या संघटनेची स्थापना केली. ‘सर्न’मध्ये त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण तर चांगलं होतंच; पण तिथे वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांबरोबरही काम करायला त्यांना मिळालं. कामाच्या ठिकाणी ही विविधता असली की एकूणच कल्पकता वाढते आणि त्या गटाची नवं काही सुचण्याची क्षमताही वाढते, असं प्रा. गोडबोले सांगतात. ‘नासा’मधील मार्गारेट हॅमीलटनसारख्या स्त्री गणितज्ञांची कामगिरी आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तिथल्या कृष्णवर्णीय स्त्री गणितज्ञांच्या कामामुळेच अमेरिका माणसाला चंद्रावर पाठवू शकली ही गोष्ट सर्वश्रुत आहे. असं म्हटलं जातं की, अमेरिकेने तेव्हा दोन सीमा पार केल्या एक- पृथ्वीची सीमा आणि दुसरी- कदाचित अधिक कठीण अशी वर्णव्यवस्थेची सीमा! या विषयावरचा ‘हिडन फीगर्स’ हा चित्रपट सगळ्यांनी जरूर बघावा असा.

संशोधन क्षेत्रातील विविधतेवर, ज्यॉसलीन बर्नेल यांनीही प्रा. गोडबोल्यांसारखंच मत व्यक्त केलं आहे. ज्यॉसलीन बर्नेल हे खगोल शास्त्रामधलं खूप महत्त्वाचं नाव. बर्नेल यांनी पहिल्या ‘रेडियो पल्सार’ या ताऱ्याच्या प्रकाराचा शोध त्यांच्या सहकाऱ्याच्या बरोबरीने लावला आहे. त्यांनी त्यांच्या ‘टेड टॉक्स’मध्ये याविषयी भाष्य केलं आहे. त्या लहान असताना, म्हणजे १९४०-५० च्या त्यांच्या शाळेत मुलांचे आणि मुलींचे सायन्स आणि होम सायन्स असे वेगळे वर्ग होते. कारण मुलांनी घरकाम करणं अपेक्षित नव्हतं आणि मुली शास्त्र शिकून करणार काय, असा प्रश्न होता. कारण तेव्हाचं प्रसिद्ध मासिक म्हणजे ‘द गुड वाइफ्स गाईड’ यामध्ये गृहिणीची कर्तव्ये सांगण्यात आली होती. ‘तुमचा नवरा घरी येण्याच्या आधी घरं स्वच्छ करून ठेवा, मुलांना खायला घालून ठेवा, त्याच्या आवडीचा पदार्थ लगेच त्याला तयार करून द्या. तुमच्या घरगुती बडबडीने त्याला त्रास देऊ  नका. त्याच्याकडचे बोलण्याचे विषय हे तुमच्याकडच्या विषयांपेक्षा नक्कीच महत्त्वाचे असतात. म्हणून संभाषण त्याला सुरू करू द्या आणि पुढे नेऊ  द्या,’ हे आणि असे सल्ले दिले जायचे आणि हे सर्वमान्य होतं. तुम्ही जर ‘मोनालिसा स्माइल’ हा चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये तेव्हाचा काळ, शिक्षित स्त्रिया आणि त्यांच्या मनातलं द्वंद्व हा विषय खूपच सुरेख हाताळला आहे. तर अशा काळात ज्यॉसलीन यांनी त्यांना शास्त्र शिकायचं आहे म्हणून हट्ट धरला. त्यांच्याबरोबर आणखी २ मुलींना शास्त्र शिकवण्याची परवानगी त्यांच्या शिक्षकांनी दिली, पण होम सायन्स हा विषयही शिकायचा ही सक्ती केल्यावरच! नंतर त्या ‘केंब्रिज’ला शिकायला गेल्या तर तिथल्या विद्यार्थ्यांना आपल्याबरोबरीने मुली शिकायला बसणार अशी सवयच नव्हती, त्यामुळे एकत्र काम तर सोडाच; पण त्यांची खिल्ली उडवण्याचं कामच अधिक व्हायचं. ज्यॉसलीन यांच्या मते, शास्त्रज्ञांचा गट जेव्हा सारख्या पार्श्वभूमीचा असतो तेव्हा तो सांभाळायला सोपा असतो, पण त्यांच्याकडून मूलभूत संशोधन खूप कमी होतं. पण गटामध्ये विविधता असली तर तो गट सांभाळायला अवघड असला तरी त्यात कल्पकता अधिक असते आणि त्यामुळे यशाचं प्रमाणही वाढतं.

अशीच अजब गोष्ट आहे कमला सोहनी यांची. कमला सोहनी म्हणजे दुर्गा भागवत यांची सख्खी बहीण. कमला सोहनी यांना शास्त्राचं बाळकडू घरूनच मिळालेलं. त्यांचे वडील नारायण भागवत आणि काका माधव भागवत हे विख्यात रसायनशास्त्रज्ञ. मुंबई विद्यापीठातून भौतिक आणि रसायनशास्त्राच्या पदवी परीक्षेत पहिल्या आल्यावर, उच्च शिक्षणासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट संस्थेत म्हणजे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’, बंगळूरुला जावं हे ओघानंच आलं. त्यांनी प्रवेश मागितल्यावर त्यांना तिथून ताबडतोब नकार आला. कारण १९३३ मध्ये, तेव्हाच्या आयआयएस बंगळूरुच्या संचालकांना, म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांना, एक स्त्री शास्त्रज्ञ योग्य पद्धतीने संशोधन करू शकेल का याबद्दल शंका होती. केवळ त्या स्त्री आहेत म्हणून दिलेला हा नकार त्यांना मान्य नव्हता. म्हणून त्यांना प्रवेश देईपर्यंत रमन यांच्या कार्यालयात सत्याग्रह करायचं ठरवलं. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि रमन यांनी त्यांचा प्रवेश मान्य केला; पण २ अटींवर – एक- पहिलं वर्ष त्यांना त्यांच्या कामाला कोणतीही अधिकृत मान्यता मिळणार नाही, हा काळ त्यांच्यासाठी उमेदवारीचा काळ असेल आणि जर त्यांचं काम संचालकांना पसंत पडलं तरच त्यांचा प्रवेश ग्राह्य़ धरला जाईल. दुसरी अट म्हणजे, त्यांच्या तिथे असण्याने, तिथल्या इतर पुरुष शास्त्रज्ञांचं लक्ष त्या विचलित करणार नाहीत ही. या दोन्हीही अटींची पूर्तता करून कमला सोहनी यांनी ‘बायोकेमेस्ट्री’ या विषयात आयआयएस बंगळूरुमधून आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं. एवढंच नव्हे तर रमन त्यांच्या कामावर एवढे खूश झाले की, त्यांनी यापुढे या संस्थेमध्ये स्त्रियांना प्रवेश देण्यामध्ये कधीही आडकाठी केली नाही. कमला सोहनी यांचं डाळींमधल्या प्रथिनांबद्दलचं संशोधन आणि आदिवासी मुलांमध्ये कुपोषण रोखण्यासाठी नीरेवर केलेलं काम हे सुपरिचित आहे.

शास्त्र आणि संशोधनामधलं स्त्रियांचं प्रमाण, याच विषयावर मी दीप्ती सिधये हिच्याशी बोलत होते. दीप्ती सध्या भौतिकशास्त्रात संशोधन करते आणि पुण्यातील ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठा’त भौतिकशास्त्राची प्राध्यापिका म्हणून काम करते. लहान मुलांना आणि विशेषत: मुलींना शास्त्र या विषयाची गोडी लागावी म्हणून ती स्तंभलेखनही करते. आमच्या बोलण्यामधून भारतात मुली शास्त्र संशोधनात मागे का आहेत याची कारणं शोधायचा आम्ही प्रयत्न केला. तर भारतात शास्त्र शिक्षणाच्या क्षेत्रात महिला मोठय़ा प्रमाणात आहेत, पण प्रत्यक्ष संशोधनात त्यांचं प्रमाण ८ टक्के ते ९ टक्क्यांच्या वर नाही. तिच्या मते, दुर्दैवाने भारतात तसंही आवडीने शास्त्र आणि संशोधन हा विषय घेणारे एकूणच लोक च  कमी आहेत. त्यात स्त्रियांचं प्रमाण आणखीनच कमी आहे. म्हणजे आपल्याकडे कोडर्स असतील, पण काही तंत्रज्ञान नव्याने शोधणारे खूप कमी आहेत. दीप्तीच्या मते, संशोधनाच्या कामात कष्ट खूप आणि त्या प्रमाणात पैसा आणि यश नाही आणि यश मिळेलच याची खात्रीही नाही. अशा परिस्थितीमुळे संशोधन क्षेत्रात येणाऱ्यांचं प्रमाण कमी होतं. शिक्षणाचा साधारण प्रवास बघितला तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मुलींचं प्रमाण खूप कमी नाही. आयआयटीमध्ये जरी ९-१० टक्के एवढंच प्रमाण असलं तरी इतर महाविद्यालयांमध्ये टक्का एवढा कमी नाही; पण हे शिक्षण संपेपर्यंत साधारण लग्नाचं वय होतं आणि पीएचडीच्या या पहिल्या पायरीपर्यंतच खूपशा मुली गळतात आणि कुठे तरी याच विषयातली नोकरी करणं पसंत करतात. मुलींकडून करियर आणि घर या दोन्हींची अपेक्षा असते. हे दोन्हीही सांभाळून काम करणाऱ्यांची उदाहरणं आपल्याकडे आहेत; पण वैयक्तिक आयुष्याबद्दलची ही मानसिकता इतर क्षेत्रांप्रमाणेच, शास्त्र संशोधनाच्या क्षेत्रामध्येही आड येतेच. या क्षेत्रात तुम्ही खूप काळासाठी संशोधनापासून सुट्टी घेऊ  शकत नाही. त्यामुळे मुलं झाली की संशोधकांच्या गटात पुन्हा जागा मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते आणि बऱ्याचदा यात त्या अपयशी ठरतात. इथे कुठेही घरून काम करण्याची मुभा नाही. त्यामुळे इतर क्षेत्रासारखी कामं करण्याची लवचीकता इथे नाही. ही कथा फक्त भारतातच आहे असं नाही. काही वर्षांपूर्वी दीप्तीची ‘विमेन इन फिजिक्स’ याविषयीच्या परिषदेत भाग घेण्यासाठी निवड झाली होती. तिथे भेटलेल्यांमध्येही साधारण हीच चर्चा होती. इथे विकसित किंवा विकसनशील असा फरक नाही. जर इथे काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात मदत होईल अशा यंत्रणा निर्माण झाल्या तर स्वेच्छेने संशोधन क्षेत्रात येणाऱ्यांचं प्रमाण नक्कीच वाढेल असं वाटतं. नंतर महत्त्वाचं म्हणजे संशोधन क्षेत्रात महिला या कायमच अल्पसंख्य असतात, मुद्दाम नाही, पण नकळतपणे त्यांना यामुळे अनेक संधी नाकारल्या जातात. टिम हंट या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने गमतीत एक भाष्य केलं होतं. ‘‘जेव्हा मुली ‘लॅब्ज’मध्ये असतात तेव्हा तीन गोष्टी होतात, तुम्ही त्यांच्या प्रेमात पडता, त्या तुमच्या प्रेमात पडतात आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यावर टीका करता तेव्हा त्या रडतात.’’ पुढे त्यांनी हे वाक्य मागेही घेतलं, पण यातून एकूण समाजातली मानसिकता समोर येते. असं असताना आपल्या समोर येणारी उदाहरणंही कमी होतात. माध्यमांमध्ये, सीरियल्समध्ये महिला शास्त्रज्ञ हा खिल्ली उडवण्याचाच विषय झाला आहे. ‘बिग बँग थिअरी’ या शोमध्ये न्यूरोसायंटिस्ट एमी अतिशय गबाळी दाखवलेली आहे, त्याच्यातले इतर संशोधक पुरुष हे त्यांच्या सहकाऱ्यांना अनेकदा नॉन मेल्स म्हणाले आहेत. आपल्याला वाटतं त्यापेक्षा अशा प्रतीकांचा प्रभाव खूप खोलवर होत असतो.

भारतातील मुलींसमोर स्त्री शास्त्रज्ञांची मोठी उदाहरणं समोर यावीत, मुलींचा विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनीयरिंग आणि गणित या विषयाकडे कल वाढावा म्हणून भारत सरकारच्या ‘महिला आणि बालविकास मंत्रालया’तर्फे महिला शास्त्रज्ञांच्या नावाने देशातील मोठय़ा संस्थांमध्ये ११ अध्यासनांची (Chairs) स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. कमल रणदिवे, डॉ. इरावती कर्वे, डॉ. अर्चना शर्मा, डॉ. जानकी अम्मल,

डॉ. दर्शन रंगनाथन अशी नावं आहेत. जगभरात महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण वाढावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपण एक समाज म्हणून स्त्रियांना त्यांच्या त्यांनी स्त्री म्हणून पार पाडण्याच्या पलीकडे बघायची सुरुवात केली तर आपलाही हातभार या प्रयत्नांना लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 4:01 am

Web Title: women in the world of the scriptures yatra tatra sarvatra chaturang abn 97
Next Stories
1 गद्धेपंचविशी : आयुष्याच्या टोलेजंग इमारतीचा पाया
2 इच फॉर इक्वल २०२० : जागर समानतेचा!
3 मानवतावादी!
Just Now!
X