27 February 2021

News Flash

यत्र तत्र सर्वत्र : सर्वत्र.. स्त्री संचार!

गेल्या शंभर-पन्नास वर्षांचा विचार केल्यास स्त्रीनं प्रत्येक क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे,

आजपर्यंत स्त्रियांनी विविध क्षेत्रांत काय कामगिरी केली, कोणत्या भूमिका बजावल्या, याविषयीचं हे सदर.

प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

गेल्या शंभर-पन्नास वर्षांचा विचार केल्यास स्त्रीनं प्रत्येक क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे, हेच ‘यत्र तत्र सर्वत्र.. स्त्री’!  तिचा सर्वत्र संचार. पुरुषी मक्ते दारी असलेली अनेक क्षेत्रं तिनं लीलया काबीज के ली आणि असं काही कर्तृत्व के लं की तिच्या पुढच्या स्त्री-पिढय़ांसाठी त्या पायवाटेचा आपसूक हमरस्ता तयार झाला. अर्थात हा सारा प्रवास सोपा नव्हताच; किं बहुना आजही नाही. अनेक पातळ्यांवर, टप्प्यांवर तिचा संघर्ष सुरूच आहे.. पण ती चालतेच आहे..  प्रत्येक क्षेत्रातला, अगदी जगभरातला तिचा हा प्रवास सांगणारं हे सदर आज संपत असलं तरी स्त्रीची घोडदौड अशीच चालू राहणार आहे..

हे वर्ष खूप वेगळं होतं. सगळ्याच अर्थानं खूप वेगळं. या सरत्या वर्षांचा विचार करताना मला एडवर्ड लॉरेन्झनं मांडलेली ‘केयॉस थिअरी’ वा ‘बटरफ्लाय इफे क्ट’ पुन:पुन्हा आठवत होता. हा सिद्धांत सांगतो, की अ‍ॅमेझॉनच्या जंगलात एका फुलपाखरानं आपले पंख फडफडवले, तर त्याच्या परिणामानं दूरच्या देशात मोठं वादळ येऊ शकतं. या वर्षी तर एक विषाणू पसरत होता. त्याचा परिणाम सर्वदूर होत होता. गेल्या वर्षी साधारण याच सुमारास चीनच्या हुबेई प्रांतामधून ‘करोना’ विषाणूविषयी बातम्या यायल्या लागल्या आणि बघता बघता त्यानं जगाचा ताबा घेतला. जगभरात घबराट पसरली, अनेक देशांच्या आरोग्यव्यवस्था, अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्या. या सगळ्याचा परिणाम जसा प्रत्येक क्षेत्रावर झाला तसा आपल्या प्रत्येकावरही खोलवर झाला. आपली अनेक गृहीतकं बदलली. आपल्या सामाजिक संबंधांना मोठी कलाटणी देणारं हे वर्ष. या वर्षांतील घटनांच्या  दुष्परिणामांमधून सावरायला आपल्याला पुढची अनेक र्वष लागतील.

साधारण गेल्या वर्षी याच सुमारास ‘यत्र तत्र सर्वत्र’ हे सदर लिहिण्यासाठी तयारी सुरू झाली होती. आजपर्यंत स्त्रियांनी विविध क्षेत्रांत काय कामगिरी केली, कोणत्या भूमिका बजावल्या, याविषयीचं हे सदर. यामध्ये ऐतिहासिक आढाव्याबरोबरच, स्त्रियांनी या क्षेत्रांवर काय परिणाम केले आणि अशी कामगिरी करताना या स्त्रियांमध्ये काय बदल होत गेला, असा विस्तृत विषय होता. यापुढे जाऊन कोणत्याही क्षेत्रांमध्ये घडलेले बदल पाहाताना ते केवळ स्त्री किंवा पुरुष या अंगानं न पाहाता, त्यांना केवळ एक व्यक्ती म्हणून पाहाता येईल का, याचाही ऊहापोह करण्याचा प्रयत्न या सदरात होता. साधारण २५ विविध विषयांची तयारी केली होती. सदराची सुरुवात गेली १५ र्वष युद्धभूमीचं छायाचित्रण करणाऱ्या माझ्या आवडत्या फोटो-जर्नलिस्ट लिंडसी अडारियोच्या कामापासूनच के ली. आज लिंडसी या युद्धभूमीवर ‘करोना’नं कसं थैमान घातलं आहे याचं चित्रण करते आहे. यानंतर विविध चळवळींमध्ये अग्रस्थानी असलेल्या, स्वत:पासून ते जगापर्यंत बदल घडवू पाहाणाऱ्या स्त्रियांविषयी लिहिलं. अशा विषयांवर लिहिताना शब्दमर्यादा असल्यानं अनेक उदाहरणं नाइलाजानं गाळावी लागली याचं वाईट वाटत राहातं.

या सदरात राजकारणात असलेल्या स्त्रियांबद्दल अनेक वेळा लिहिलं गेलं. फिनलँडच्या सना मारीन या तिथल्या पहिल्या स्त्री पंतप्रधान आणि जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या. त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या प्रमुखही सर्व स्त्रियाच होत्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांच्याबद्दलही लिहिलं. एक म्हणजे स्त्री नेतृत्व आणि दुसरं म्हणजे या नेतृत्वानं ‘करोना’ आपत्तीचा सामना कसा केला, या लढय़ात त्या आजही कशा यशस्वी ठरल्या, याविषयी लिहिलं. खरं तर प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती वेगळी. त्याविषयी आपलं एक मत बनवून मग त्यावर भाष्य करण्यात थोडी दमछाक झाली खरी, पण माझ्या अभ्यासाचा मूळ विषय राज्यशास्त्र आणि राजकीय प्रक्रिया हाच असल्यानं हे वाचन परस्परपूरकच ठरलं असं मला वाटतं. त्यानंतर स्त्री शास्त्रज्ञांचं प्रमाण वाढत असूनही शोधनिबंध प्रसिद्ध करणं, नवे प्रकल्प उभे करणं किंवा पारितोषिकास पात्र ठरणं, यामध्ये स्त्रिया का कमी दिसतात, या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मानसोपचारतज्ज्ञांमध्येही स्त्रिया अधिक संख्येनं दिसल्या तरी या विषयात सिद्धांत मांडणी करण्यात त्यांची संख्या कमी दिसते हे जाणवलं. या लेखांत स्त्रियांमध्ये काही गुण अंतर्भूत असतात, जसं सहानुभूती किंवा करुणा, हे वारंवार समोर आलं. अशा गुणांमुळेच त्या दुसऱ्याची शुश्रूषा करण्यामध्येही पुढे असतात हे जाणवलं. मग ‘करोना’च्या निमित्तानं जगभरातल्या अशा अनेक साथींमध्ये स्त्रियांनी कसं काम केलं आहे, याचा आढावा घेतला गेला. ‘करोना’ संकटाचा परिणाम स्त्रियांवर कसा झाला याचाही शोध घेतला.

सारं जग ‘बंदिवासा’त असल्यानं एक वेगळा विषय निवडला. ‘फ्लानस’ किंवा स्त्रियांचं निरुद्देश भटकणं आणि त्याकडे आपण समाज म्हणून कसं बघतो, त्यापुढे ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना प्रत्येकीला कशी जाणवते, हे शोधण्याचा प्रयत्न केला. या अनुषंगानं शहररचनेबद्दलच्या चर्चेत स्त्रियांचा सहभाग असायला हवा हे जाणवलं. याविषयी काम करणाऱ्या काही स्त्री नगररचनाकारांविषयी लिहिलं. या वर्षी रसायनशास्त्रामधलं ‘नोबेल’ हे जेनिफर डूडना आणि इमान्युएल शारम््पॉतिए या दोन शास्त्रज्ञांना मिळालं. त्यांनी विकसित केलेल्या ‘जनुकीय कात्र्यां’च्या (जेनेटिक सिझर्स) मदतीनं कोणत्याही सजीवाच्या जनुकांमध्ये नेमके बदल करणं शक्य झालं आहे. या तंत्रज्ञानाचे अनेक चांगले-वाईट परिणाम, त्यामधली नैतिक बाजू, हे सगळं मांडण्याची संधी या वेळी मिळाली. त्याबरोबरच लुईस ग्लुक या कवयित्रीला साहित्याचं ‘नोबेल’ जाहीर झाल्यानिमित्तानं आंतरराष्ट्रीय साहित्यविश्व आणि साहित्याचं ‘नोबेल’ मिळवणाऱ्या स्त्रिया, यावरही लिहिण्याची संधी मिळाली. या विषयांबरोबरच स्त्री इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, शेफ्स, न्यायव्यवस्थेमधल्या स्त्रिया, फॅशनचं जग आणि स्त्रिया, या सगळ्यांविषयी, प्रत्येकीच्या प्रवासाविषयी लिहिता आलं.

या लेखमालेच्या निमित्तानं अनेक नव्या ओळखी झाल्या आणि पूर्वी कधी, कुठे कार्यक्रमांना भेटलेल्या, सामाजिक उपक्रमांच्या निमित्तानं भेटलेल्या लोकांशी नव्यानं संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येक लेखानंतर निदान एक तरी प्रतिक्रियेचा ई-मेल असा असायचा ज्यामुळे त्या विषयातल्या आणखी अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या, त्याविषयी नवीन वाचन करण्याची प्रेरणा मिळायची.

मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना आहेत, त्यांच्या कामाविषयी लिहायला हवं होतं, असं सुचवणारा मेल चळवळींविषयीच्या लेखानंतर मिळाला. ‘करोना’ संकटाशी विविध भूमिकांमध्ये सामना करणाऱ्या स्त्रिया आणि प्रभावी स्त्री नेतृत्व या विषयांवर सर्वाधिक प्रतिक्रिया आल्या. विविध लेखांमधून मांडलेली परिस्थिती, काही तर्क, उपाय हे योग्य आहेत, हे त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं, की स्वत:च्या विचारांवरचा, लेखनावरचा विश्वासही वाढत असतो. वाचकांच्या प्रतिक्रियांनी असा विश्वास वाढायला खूप मदत झाली. अर्थशास्त्रातील स्त्रियांविषयीच्या लेखावर पुण्याच्या ‘गोखले इन्स्टिटय़ूट’मधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींचा ई-मेल आला. ‘आमच्या पुढच्या करिअरमध्ये काय गोष्टी करायच्या, काय करायच्या नाहीत, कशापासून सावध राहायचं, याविषयी खूप स्पष्टता आली,’ असं त्यांनी लिहीलं होतं. स्वातंत्र्याविषयीच्या लेखावरही अशीच एक प्रतिक्रिया मिळाली.  एका स्त्रीनं तिची नोकरी, आईबाबांपासून वेगळं, एकटं राहाण्याचा निर्णय, सर्वार्थानं जोडीदाराची खात्री पटेपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय, या सगळ्याविषयी खूप मोकळेपणानं, भरभरून लिहिलं होतं. तुलनेनं छोटय़ा शहरातल्या,

२८-२९ वर्षांच्या या मुलीच्या विचारांतील स्पष्टता आणि स्वत:च्या निर्णयांवर खंबीर राहून त्याचे सर्व बरेवाईट परिणाम पचवायची तयारी ही थक्क करणारी होती. अनेक ई-मेल्समध्ये लोकांनी स्त्रियांविषयी काम करणाऱ्या संस्थांशी जोडून घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अशा

ई-मेल्समधून असं लक्षात आलं, की वाचकांना मी स्त्री संघटनांबरोबर काम करणारी किंवा स्त्रियांबरोबर चळवळींमध्ये काम करणारी वाटत होते. माझ्या इतर कामाच्या निमित्तानं मी अशा अनेक संस्था, संघटना आणि चळवळींच्या कामात वेळोवेळी सहभागी झाले आहे, पण या समारोपाच्या लेखाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं, की मी अशा कोणत्याही कामाचा पूर्णवेळ भाग नाही, पण कोणाला काही काम करण्याची इच्छा असेल, तर या विषयांवर काम करणाऱ्या माझ्या परिचितांशी त्यांना जोडून द्यायला मला नक्कीच आनंद होईल.

गेल्या आठवडय़ात या समारोपाच्या लेखाच्या निमित्तानं मी सर्व लेख पुन्हा वाचून पाहात होते. तेव्हा मला माझ्याच विचारांमध्ये झालेले बदल जाणवले आणि अर्थात लेखांमध्ये काही त्रुटीही लक्षात आल्या. सदर सुरू करण्याच्या आधी ‘आता साऱ्याच क्षेत्रांमध्ये स्त्रिया मोठी कामगिरी बजावू लागल्या आहेत, त्यामुळे आपण आता केवळ स्त्री-पुरुष असं बघायला नको’ अशा मताची मी होते, पण जसं जसं वाचन करत गेले, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांशी बोलत गेले, तसं मला माझं मत उथळ वाटायला लागलं. कधी कधी आपण आपल्या आसपासच्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या यशामुळे  एवढे भारावून जातो, की आपल्याला त्यांच्या प्रवासातले खाचखळगे पटकन लक्षात येत नाहीत आणि या गोष्टी सहज शक्य असतात असा समज आपण करून घेतो. कदाचित तसंच काहीसं माझं झालं, हे मी कबूल करते. सदर लिहिताना काही गोष्टी पुन:पुन्हा जाणवत होत्या. अजूनही स्त्रियांवर कळत नकळत अनेक बंधनं असतात. या पारंपरिक भूमिकाही चोखपणे बजावून मग बाहेरच्या जगात काही तरी मोठी कामगिरी केली, की त्याचं कौतुक केलं जातं. जेसिंडा आर्डन असू दे, कमला हॅरिस किंवा अगदी ‘नोबेल’ मिळवणाऱ्या स्त्रिया असोत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलची चर्चाच खूप होताना दिसते, पण या परंपरांच्या वजनाखाली न दबणाऱ्यांना वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. अनेक व्यवस्था अजूनही स्त्रियांना सामावून घ्यायला सुसज्ज नाहीत. त्यांनी जर पारंपरिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतील तर त्यासाठी कामाच्या ठिकाणी पूरक व्यवस्था निर्माण करावी, असं खूप कमी वेळेला केलं जातं. दुर्दैवानं अजून आपण समाज म्हणून स्त्री-पुरुष असा भेद न करता, माणूस म्हणून बघायला तयार नाही असं वाटलं आणि स्त्रिया मात्र घरचं नीट पार पाडा आणि बाहेरही सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वत:ला सिद्ध करत राहा, या दुहेरी ओझ्याखाली दबलेल्या वाटतात. अर्थात हे ओझं केवळ स्त्रियांवरच आहे, असं मी म्हणत नाही, पण त्याविषयी पुन्हा कधी तरी.

अर्थात सदर संपलं म्हणजे अभ्यास संपत नाही, संवाद संपत नाही. बदलत्या पारंपरिक भूमिका, समानता, विविध क्षेत्रांत स्त्रियांनी उमटवलेला ठसा, या विषयांचा आवाका मोठा आहे. त्यात ‘यत्र तत्र सर्वत्र’ हे सदर म्हणजे माझा छोटासा हातभार आहे, असं मी मानते.

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:17 am

Web Title: women progress yatra tatra sarvatra dd70
Next Stories
1 व्वाऽऽ हेल्पलाइन : ना.शा.ची भाषा
2 अपयशाला भिडताना : अल्पविराम
3 पोटगीसाठी यातायात?
Just Now!
X