काही अपरिहार्य कारणाने घेतलेल्या नोकरीतील ब्रेकनंतर जेव्हा स्त्रीला पुन्हा परतायचं असतं, तेव्हा तिच्यासाठी ते सोपं नसतं, निदान आपल्या देशात तरी नाही. काही वेळा तडजोडी करत तर काही वेळा करिअरचं स्वरूप पूर्णत: बदलून तिला नवी इनिंग खेळावी लागते. आज तरी तो तिच्यासाठी संघर्षच आहे. तिची ही वाट तिलाच शोधावी लागत असली तरी याच पायवाटेचा पुढे हमरस्ता  होईल यात शंका नाही.
दगदग, धावपळ करीत नोकरी-करिअरचा गाडा हाकताना मध्येच असा एक अनिवार्य क्षण येतो- जो ‘तिच्या’ नियंत्रणाच्या पलीकडचा असतो आणि मग तिच्या करिअरला एक कचकचीत ब्रेक लागतो..तिच्या इच्छेनं वा अनिच्छेनं, पण बहुतांशवेळा इतरांच्या गरजेपोटी! या ब्रेकच्या पोतडीतही तिच्यासाठी निवांतपणा नसतोच, – बाळाचं संगोपन, नवऱ्याच्या बदलीनंतर उभे ठाकलेले स्थलांतर किंवा घरातील ज्येष्ठांची आजारपणं.. या किंवा अशा अनेक प्रसंगी तिला आपल्या ‘करिअरिस्टिक’ आयुष्याचा वेग संथ करावा लागतो.. तर काही जणींना जीव ओतून केलेल्या नोकरीत अल्पविराम घ्यावा लागतो.. कधी दोन-तीन वर्षांचा तर कधी त्याहूनही अधिक!  

.. जेव्हा तिच्या घरी थांबण्याच्या अपरिहार्यतेची निकड सरते आणि पुन्हा तिला नोकरी- करिअरमध्ये परतायचं असतं, तेव्हा तिला पुन्हा स्पर्धेच्या रिंगणात स्वत:ला सिद्ध करावं लागतं! त्या कसोटीच्या क्षणांत मधल्या वर्षांचा ‘अवकाश’ तिला तिच्या करिअरच्या पुनर्प्रवेशाच्या वेळेस दरीसारखा भासतो- ‘तंत्रज्ञान पुढे गेलंय, सहकारी बदललेत, कामाचं आणि पर्यायाने कार्यालयीन अपेक्षांचंही स्वरूपही बदलंलय! आपण मात्र तिथेच.. नोकरी सोडली, त्या क्षणाच्या काठापाशी थांबलेलो. कसा तग लागणार आपला यात..’ असं स्वगत तिला अस्वस्थ करत असतं.. तिचा आत्मविश्वास डचमळत असतो..
परदेशात मात्र ब्रेकनंतर करिअरकडे पुन्हा परतू इच्छिणाऱ्या स्त्रियांसाठी- ज्या प्रक्रियेला तिथे ‘रिटर्नशिप’ असं संबोधलं जातं, खूपसे साहाय्य गट कार्यरत असतात. अशा स्त्रियांना समुपदेशन करणं, कामाकडे पुन्हा परतताना त्यांनी कुठली तयारी करायला हवी, याची नेमकी कल्पना देणं या गोष्टी हे गट करतात. इतकेच नव्हे, तर गेल्या सहा-आठ महिन्यांमध्ये पाश्चात्त्य देशांमधील ‘मॉर्गन स्टॅनली’, ‘मेटलाइफ’सारख्या अनेक बडय़ा कंपन्यांमध्येही ‘विमेन रिटर्नर्ससाठी’ चार नव्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे मात्र, संस्थात्मक पातळीवर आजही अशा तऱ्हेचे जोरकस प्रयत्न दिसून येत नाही.. आणि म्हणूनच आजही तिच्या करिअरच्या आयुष्यातल्या ‘कमबॅक’साठी तिलाच झगडावं लागतं- क्वचित पहिल्यांदा केलेल्या प्रयत्नांहून अधिकच. अशाच काही ‘कमबॅक’ केलेल्या स्त्रियांचे हे अनुभव, आजही स्त्रियांसाठी ही वाट अवघड आहे का? यावर विचार करायला लावणारे.
सिव्हिल इंजिनीअर असलेल्या आसावरी जोशीने पतीसोबत सात वर्षे अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. साहजिकच तिच्या करिअरमध्ये तिला ब्रेक घ्यावा लागला, कारण ‘डिपेंडंट व्हिसा’मुळे तिला तिथे काम करता येत नव्हते. दोन मुलेही लहान.. मुंबईत असतानाच्या सततच्या व्यग्र रुटिनची तिला तिथे राहून राहून आठवण यायची.. मग या ब्रेकच्या काळातलाय दीड वर्षांत आसावरीने एमएस पूर्ण केलं. सात वर्षांच्या परदेशातील वास्तव्यानंतर जेव्हा आसावरी आणि तिचं कुटुंब पुण्यात स्थायिक झालं, तेव्हा आसावरी पुन्हा नोकरी शोधू लागली.. आठ वर्षांच्या ब्रेकनंतर संधी मिळेल का, याबद्दल ती साशंक होती.. सुरुवातीच्या अनुभवाच्या जोरावर तिला एका लहानशा फर्ममध्ये नोकरी मिळाली.. छोटी कंपनी, प्राथमिक पातळीवरचं काम. मात्र, ती हे काम मनापासून एन्जॉय करत होती.. वर्षभरानंतर अधिक चांगली संधी म्हणून ‘ट्रॅफिक इंजिनीअर’ या पदावर एका मोठय़ा कंपनीत ती रुजू झाली. मात्र काम मुंबईत असायचं. वर्षभर पुणे- मुंबई अपडाऊन करत तिने नोकरी केली..कंपनीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. आज आसावरी ‘फॉच्र्युन ५००’ च्या यादीत समाविष्ट असणाऱ्या कंपनीत काम करतेय..तिचं काम तिला आवडतंय! ‘करिअरच्या सात वर्षांच्या मोठाल्या ब्रेकने काय शिकवलं?’ असं विचारलं असता आसावरी सांगते, ‘भारतात परतल्यानंतर कुटुंबाची गरज म्हणून नव्हे तर माझ्या बौद्धिक गरजेखातर मी नोकरी करू लागले.. माझ्या वयाच्या, माझ्या अर्हतेहूनही कितीतरी कमी असणारे लोक माझ्याहून कितीतरी पुढे गेले होते.. व्यवस्थापकीय पदांवर कार्यरत होते. मी मात्र इंजिनीअर स्तरावर काम करत होते. पण मी आनंदानं भरपूर काम करत राहिले.. कामाद्वारे आदर संपादन केला. माझ्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या.. यातील एकूण एक जबाबदाऱ्या व्यवस्थितरीत्या पार पाडून मी माझा आत्मविश्वास उंचावला. मागे वळून पाहिलं तर वाटतं, या ब्रेकमुळे मी माझ्या क्षेत्रात हवी तितकी ‘टेक्निकल डेप्थ’ संपादन करू शकले नाही.. माझ्या वयाचे आणि अर्हतेचे जे आहेत, त्यांचं वेतन आणि माझं वेतन यातही तफावत आहे.. त्यांची बढतीही अधिक वेगानं होते हेही खरंच, पण मी घेतलेल्या ब्रेकमुळे मला मुलांना त्यांच्या न कळण्याच्या वयात वेळ देता आला.. नवा देश पालथा घालता आला.. याचंही मोल माझ्यासाठी अधिक आहे..’’
 ‘आज जेव्हा स्त्रिया नोकरीत ‘ब्रेक’ घेतात, तेव्हा पुन्हा कामावर परतताना त्यांना त्याच पदाची, त्याच वेतनाची अपेक्षा असते. अशा वेळी आपले प्राधान्यक्रम, भावनिक गरजा आणि भौतिक गरजा लक्षात घेऊन काम पत्करावं. नोकरी-करिअरमध्ये परतताना संघर्ष करण्याची तयारी हवी. पैसे कमी मिळतील, हेही लक्षात घ्यायला हवं,’ असं मिथिला दळवी यांनी आपला अनुभव सांगताना सांगितलं. त्या सध्या पालकत्व आणि भावनिक विकास या संबंधात मुलं आणि पालकांसोबत काम करणाऱ्या ‘वाद-संवाद’ या संस्थेच्या संस्थापक-संचालक आहेत. त्या टाटा इलेक्ट्रिक कंपनीमध्ये ‘रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेन्ट’ विभागात उपग्रह संबंधित प्रकल्पावर काम करत होत्या. त्यातल्या ‘ब्रेक’चा अनुभव कथन करताना त्यांनी सांगितलं, ‘मुलाच्या संगोपनासाठी हाय प्रोफाइल करिअरमधून ब्रेक घेणं हे माझ्यासाठी अनिवार्य होतं. याच कालावधीत पतीच्या नोकरीसाठी काही वर्षांकरता अमेरिकेला जाणंही ठरलं. मात्र करिअरमधून ‘ब्रेक’ घेताना, मनाच्या तळाशी एक कुठेतरी नक्की विश्वास होता, की काही वर्षांनी जेव्हा करिअरमध्ये परतायचं ठरवेन, तेव्हा अनेक गोष्टी करता येतील. नक्की मार्ग सापडेल. शून्यापासून पुन्हा सुरुवात करण्याची माझी पूर्ण तयारी होती. अमेरिकेतून परतल्यानंतर घराचं व्यवस्थापन करतानाच समुपदेशन, भावनिक विकास     
यासंबंधीचा अभ्यास केला. संपादन केलेल्या ज्ञानाला प्रयोगात रूपांतरित केले. यासंबंधित सुमारे २०० मुलांसोबत काम केल्यानंतर ‘वाद-संवाद’ हे व्यासपीठ उभे राहिले. ‘व्हीजेटीआय’मध्ये शिकवल्यामुळे मी मुलांशी ‘कनेक्ट’ व्हायला शिकले.  माझं अभियांत्रिकीचं शिक्षण मला प्रयोगशीलता तपासायला मदत करत होतं. अशा तंत्र आणि मानवी स्वभावासंबंधातील मी संपादन केलंलं ज्ञान मला मुलांसोबत काम करताना उपयोगी पडतं. आजही जेव्हा सॅटेलाइट लॉन्चिंगच्या बातम्या वाचते, तेव्हा मन भरून येतं. पण मुलाच्या आयुष्याला सकारात्मक बदल घडायला मी मदत करू शकले, याचा आनंद त्याहूनही मोठा आहे.’
 गरोदरपणातील गुंतागुंत, बाळाचं संगोपन यासाठी अनेकींना ब्रेक घ्यावा लागतो. ‘वाचा’च्या मुख्य प्रकल्प समन्वयक मेधाविनी नामजोशी यांनाही याच कारणासाठी आपल्या कामातून वर्षभराचा ब्रेक घ्यावा लागला होता. त्यांनी सांगितलं, ‘‘आज प्रत्येक क्षेत्र इतक्या वेगाने बदलतंय की त्यात ब्रेकनंतर परतायचं असेल तर त्यातील घडामोडींशी, तंत्रज्ञानाशी अपडेट राहायला हवं. अन्यथा आधीचे पद, त्या पातळीचे काम तुम्हाला करायला मिळणं अवघड आहे. त्यामुळे ब्रेक घेण्यापूर्वीच जर तुम्ही पुन्हा कामावर परतणार आहात याची खात्री असेल तर दरम्यानच्या काळात घरच्या घरी एखादा ऑनलाइन कोर्स करणं, दूरशिक्षण अभ्यासक्रम करणं सहज शक्य असतं. मुळात आपण ब्रेक कशासाठी घेतला आहे, त्याची आपल्याला स्पष्टता हवी आणि पुन्हा कामाकडे परतताना मनाशी पक्कं हवं की, नवीन जबाबदारी स्वीकारली की पहिली जबाबदारी कमी करायला लागणार आहे आणि तेही अपराधीभाव न ठेवता, तार्किक विचार करून. मी घरासाठी पैसे मिळवते, वगैरे ठीक आहे. पण काम केल्याने मला आनंद मिळतो आणि मी आनंदी असले की मी घराला खूश ठेवू शकते.. हा संवाद प्रत्येकीने मनाशी केला की तिचा संघर्ष कमी होतो.’
 केवळ करिअरिस्टच नाही तर खासगी, शासकीय नोकरी करणाऱ्यांपैकीही अनेकजणींना कुठल्या ना कुठल्या कारणापायी ब्रेक घ्यावा लागतो, हातातली नोकरी सोडावी लागते. अशा वेळी तीन-पाच वर्षांनी पुन्हा नोकरी करताना कुठल्या समस्या येतात, यावर बोलताना एका खासगी कंपनीत मनुष्यबळ विकास विभागात काम करणाऱ्या शैलजा राणे यांनी सांगितलं, ‘जुळी मुलं आहेत, हे गर्भारपणात कळलं तेव्हाच त्यांच्या संगोपनासाठी मी नोकरी सोडायची, असं ठरवलं. माझी मुलं शाळेत जाऊ लागली आणि मग मी पुन्हा नोकरी शोधू लागले. नव्याने नोकरी करताना लक्षात आलं की, मधल्या वर्षांत कार्यालयीन वेळा, कामाचं स्वरूप, संगणकाचे अद्ययावत प्रोग्राम्स असे बदल झाले आहेत. या बदलांशी जुळवून घ्यावं लागलं. खूप गोष्टी नव्याने शिकाव्या लागल्या. त्यासाठी कार्यालयात काही वेळा अधिक वेळ थांबायलाही लागलं. पण आता सारं सुरळीत झालंय. सहा वर्षांनंतर पुन्हा मी माझ्या नोकरीत रुळू शकते, हा आत्मविश्वास मला आला आहे. एक मात्र नक्की की, जेव्हा तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणासाठी नोकरी सोडता, तेव्हा हा केवळ गरज सरण्यापुरता काही कालावधीसाठी घेतलेला ‘ब्रेक’ आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. म्हणजे ब्रेकमध्येही तुम्ही तुमच्या क्षेत्रात काय नव्या घडामोडी चालल्या आहेत, याविषयी सतर्क राहता.. यासाठी तुम्ही तुमच्या जुन्या सहकाऱ्यांशी संपर्कात राहा.. ‘ असा सल्लाही शैलजा यांनी दिला.
 एका खासगी विमा कंपनीत काम करणारी वैदेही सावंत हिने मुलं लहान असताना घर – नोकरीची दुहेरी कसरत जमत नाही, म्हणून नाइलाजाने नोकरी सोडली. सात वर्षांनी फावला वेळ हाताशी मिळू लागला, तेव्हा पुन्हा नोकरी करावी, असा विचार तिच्या मनात बळावू लागला. पण तितक्या सहजतेने नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या. वैदेही सांगते, ‘नोकरीच्या मुलाखतीच्या वेळेस सात वर्षांचा गॅप का घेतलात? पुन्हा नोकरी सोडणार नाहीत ना? असे प्रश्न अंगावर यायचे. मग मी मला काय जमेल, काय करायला आवडेल, याचा नीट विचार केला. आज मी एका बडय़ा सौंदर्यप्रसाधन कंपनीची वितरक बनले आहे. माझं कौटुंबिक कामाचं गणित जुळवून मला माझ्या या कामासाठीही पुरेसा वेळ देता येतो.. ‘ब्रेक’नंतर परतताना तुम्ही आधीचेच काम करायला हवे, असे काही नाही. तुम्हाला आणखी काय काय जमू शकते, याचा विचार तुम्ही करायला हवा.. मात्र, पूर्ण विचारांती हा निर्णय घ्यावा.’ असंही वैदेहीनं सांगितलं. वैदेहीसारखा अनुभव अनेकींचा आहे. त्याच नोकरीत पुन्हा जाणं अनेकींना शक्य होत नाही. काही जणींनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले तर काहींनी संस्था सुरू करून आपल्या कलांना-छंदांना वाव द्यायलाही सुरुवात केली आहे.
 पुढील शिक्षणासाठी माध्यमाच्या क्षेत्रातून ब्रेक घेत आपलं एमबीए शिक्षण पूर्ण करून नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या योगिता देसाई यांनी करिअरमध्ये पुन्हा परतताना स्त्रियांनी कुठली तयारी करायला हवी, याकडे लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या, ‘नोकरीच्या बाजारपेठेत पुन्हा दाखल होताना जरी हे आपलं कार्यक्षेत्र असलं तरी आपण आता नव्या आणि बदललेल्या कौशल्यांच्या क्षेत्रात प्रवेश करत आहोत, याची जाणही असायला हवी. ‘कम्फर्ट झोन’च्या पलीकडच्या क्षेत्रात प्रवेशताना आपल्याला अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागणार आहेत आणि काही तडजोडी कराव्या लागणार आहेत, याची खूणगाठही मनाशी बांधायला हवी. तुमचे आधीचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी संपर्कात राहा. योग्य संधी शोधण्यासाठी नेटवर्किंगचा फायदा होतो. किंवा अशा व्यक्तींच्या संदर्भाने एखाद्या नोकरीच्या ठिकाणी तुमची वर्णीही लागू शकते. तुमचा रिझ्युमे नव्याने लिहा.. मधल्या वर्षांत तुम्ही कुठल्या गोष्टी कमावल्या आहात, याचाही समावेश तुमच्या बायोडेटामध्ये आवर्जून करा. एक मात्र नक्की, की ‘ब्रेक’नंतर पुन्हा नोकरी मिळवताना कुठल्याशा कंपनीतील कुठलासा एचआर व्यवस्थापक तुम्हाला विचारण्याआधी तुम्ही स्वत:च्या मनाला विचारायला हवं की मला पुन्हा काम का करायचंय? वित्तीय कारणाखेरीज इतर कुठलंही कारण असेल तर तुम्ही तुमच्या करिअरमधल्या पुनप्र्रवेशाच्या निर्णयाचं विश्लेषण करायला हवं. जर व्यक्तिगत जबाबदाऱ्यांसाठी तुम्ही नोकरी सोडली असेल तर कामाचं स्वरूप महत्त्वाचं ठरतं. जर ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा लवचीक वेळा अशा पर्यायांकडे तुमचा ओढा असेल तर त्याबाबत स्पष्टता असलेली बरी!’
  पुन्हा नव्याने नोकरीच्या बाजारपेठेत आपलं पाऊल रोवू इच्छिणाऱ्या अनेकींना   आपला करिअरमधला ‘ब्रेक’ डाचत असतो.. आत्मविश्वास तोकडा पडत असतो आणि इतक्या वर्षांनंतर आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील भूमिका समाधानकारकरीत्या पार पाडू शकू का, या विचाराने त्या अस्वस्थ असतात.. अशा बुद्धिमान स्त्रियांना पुन्हा एकवार त्यांच्या करिअरमध्ये रुळायला मदत करणं हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर त्या क्षेत्रासाठीही हितकारक ठरू शकतं, हे आज अमेरिकेने सिद्ध केलंय. तिथल्या ‘रिटर्नशिप फम्र्स’मध्ये करिअरमध्ये पुनप्र्रवेश करू इच्छिणाऱ्या स्त्रियांची अर्हता, कौशल्य, अनुभव लक्षात घेत त्यानुसार सुरुवातीला अशा स्त्रियांना अंशकालीन कन्सल्टिंग प्रोजेक्ट दिली जातात. कामाच्या ठिकाणच्या साहचर्याच्या वातावरणात प्रशिक्षण, समुपदेशन आणि कॉर्पोरेट नेटवर्कमध्ये प्रवेश झाल्याने त्यांच्या बोथट झालेल्या व्यावसायिक आत्मविश्वासाला आणि कौशल्याला धार येते. त्या खरोखरीच आव्हानात्मक काम करू शकतील का, हे अजमावणाऱ्या काही चाचण्या दरम्यानच्या काळात घेतल्या जातात आणि त्यातील कामगिरीही त्यांना जोखता येते..   या सगळ्यामुळे या स्त्रियांचा प्रत्यक्ष करिअरमधील पुनप्र्रवेश सुकर बनतो. आपल्याकडे दुर्दैवाने अद्याप स्त्रियांच्या ‘कमबॅक’चा इतका गांभीर्याने विचार केला गेलेला नाही.
परंतु आज ज्या संख्येने स्त्रिया नोकरी, करिअरमध्ये परताना दिसत आहेत किंवा परतण्याचा विचार करीत आहेत ते पाहता तो दिवस दूर नाही, असं नक्की म्हणावंसं वाटतं.    

a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!