मालवणी मधील विषारी दारू  प्रकरणामुळे दारूविक्रीच्या धंद्यात निम्न वर्गातील महिलांचा मोठय़ा प्रमाणात असलेला सहभाग जसा समोर आला तसा दारू पिण्यातलाही. दारू, अमली पदार्थच नव्हे तर तंबाखू, तपकीर, गुटकाजन्य पदार्थामुळे या महिलांमधील व्यसनाधीनता गेल्या दहा वर्षांत तिपटीने वाढली आहे. ही वाढती संख्या म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. ती वेळीच नाहीशी करण्यासाठी खूप संवेदनशील हाताळणी करावी लागेल, मात्र त्यासाठी तितकीच कठोर पावलेही उचलावी लागणार आहेत.

मुंबईतल्या मालवणीमधील विषारी दारू प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली, कारण बेकायदेशीर असलेला दारूचा धंदा कसा राजरोस सुरू होता, त्याची व्याप्ती किती खोलवर होती, पोलिसांचा कसा त्यात सहभाग होता, याच्या एकामागोमाग एक सुरस धक्का देणाऱ्या कथा समोर येऊ लागल्या. परंतु सगळ्यात मोठी धक्कादायक बाब ठरली ती म्हणजे या दारूविक्रीत असलेल्या महिलांच्या इतक्या मोठय़ा सहभागाची आणि ही विषारी दारू पिऊन मेलेल्यांमध्येही महिला असण्याची!
पोलिसांनी अटक केलेल्या दारू विक्रेत्यांपैकी जवळपास ८० टक्के दारू विक्रेत्या या महिला होत्या. दारूच्या बेकायदेशीर धंद्यात महिलांचा सहभाग हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. दारूसारख्या वज्र्य मानल्या जाणाऱ्या व्यवसायात आर्थिकदृष्टय़ा निम्न वर्गातील या महिला का सक्रिय आहेत? त्यांनी या धंद्याला का आपलंसं केलं आहे? पुरुषांच्या मक्तेदारीच्या या बेकायदेशीर धंद्यात त्या सगळ्यांना तोंड देऊन कशा उभ्या आहेत? या साऱ्या प्रश्नांनी सगळ्यांना विचार करायला लावलं आहे. महिलांमधील गुन्हेगारी मानसिकतेचा अभ्यास केला तर या प्रश्नांची उत्तरं एकामागून एक उलगडत जातात..
त्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरते ती सामाजिक परिस्थिती. गुन्हेगारी कारवायांमध्ये महिलांचा सहभाग तसा फारसा नव्हता. मात्र बदलत्या काळाप्रमाणे त्यांचं स्वरूपही बदलत गेलं, जात आहे. आता अनेक बेकायदेशीर आणि अनैतिक धंद्यात महिलांचा सहभाग असतो. किंबहुना, त्यांचीच भूमिका त्यात प्रमुख असते. मुंबईतले बरचशे कुंटणखाने या महिला चालवतात. पिटा कायद्याची (अनैतिक देहव्यापार प्रतिबंधात्मक कायदा) कारवाई जेव्हा होते, तेव्हा त्यात सर्वाधिक महिला असतात. कारण महिलाच इतर महिलांना या व्यवसायात ओढत असतात. अमली पदार्थाच्या व्यवहारातही महिला आढळून येतात. एरवी सर्वसामान्यांच्या घरातही वज्र्य असलेल्या दारूच्या तेही बंदी असलेल्या हातभट्टीच्या व्यवहारात महिला सर्रास असतातच. अर्थात, ज्या महिल्या या दारूविक्रीच्या व्यवसायात आहेत त्या आर्थिकदृष्टय़ा निम्न वर्गातल्या आहेत. पण याला कारणीभूत ठरते ती सामाजिक परिस्थिती. हातभट्टीची दारू ही घरच्या घरी बनवली जाते, म्हणजे तसा तो घरगुती धंदा. त्यामुळे महिलांची भूमिका मदतनीसाची असायची. ग्रामीण पट्टय़ातील काही समाजात घरी हातभट्टीची दारू बनवून ठेवली जायची. त्याचा वापर सणासुदीला, पाहुणे आल्यावर होत असायचा. त्यामुळे त्या घरातील महिलांचा सहभाग आपसूकच असायचा. मात्र सामाजिक, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक महिला दारूविक्रीच्या धंद्यात येऊ लागल्या. त्या सगळ्या श्रमिक वर्गातल्या असतात. त्यांचे नवरे याच धंद्यात असतात, मात्र ते केवळ विक्रीचे काम करतात. कॉर्पोरेट भाषेत सांगायचे झाले तर त्या धंद्यातील फ्रंट ऑफिस असतात आणि त्यांचे पती बॅक ऑफिस. दारू बनविणे, वाहतूक करणे आदी कामं महिलाच करतात. याशिवाय ज्या अन्य महिला या धंद्यात असतात त्यापैकी अनेकींचे नवरे वारलेले तरी असतात किंवा अनेकींना नवऱ्यांनी सोडलेले असते. काही जणी तर ‘ठेवलेल्या’ असतात. या सगळ्या जणींचे शिक्षण अर्थातच नसतं. त्यामुळेच हेच काम त्यांना सोपं वाटतं. अनेक जणी तर वयस्कर असतात. शिवाय झोपडपट्टय़ांमध्ये दारू विकण्यासाठी चकाचक बार लागत नाही. घरात ती सहज लपवून ठेवता येते. दारू घरात बसून विकणं सोप्पं असतं. दारूविक्री करणाऱ्या महिला या स्थानिक असतात. त्यांच्याकडे येणारे ग्राहकही त्याच भागातले असतात. पोलिसांशी त्यांचं संधान असते, स्थानिक गुंडांशी सलगी असते, ग्राहक परिचित असतात. त्यामुळे हा धंदा त्यांच्यासाठी तसा सुरक्षित असतो.
महिलांमध्ये नैसर्गिक उपजत अनेक गुण असतात, त्यामुळे अप्रिय घटनांना सामोरे जाताना या गुणाचा त्या वापर करतात. परिस्थितीनुसार त्या धीट बनतात, भाषा धाडसी होते, कुणालाही भिडण्याची प्रवृत्ती बळावते, स्त्रीसुलभ लज्जा नावाची नैसर्गिक प्रवृत्ती बाजूला ठेवून दोन हात करण्याची हिंमत अंगी बाणवते. पोलिसांनी छापे घातले की त्यांना ‘मॅनेज’ करण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली आढळते. त्यामुळे या महिलांचे एक वेगळेच रूप या व्यवसायात बघायला मिळते आहे.  
आज महिला दारू विक्रेत्यांची संख्या मोठी दिसत असली तरी ती वाढण्यामागे आपल्या व्यवस्थेची निष्क्रियताही तितकीच  कारणीभूत आहे. महिला दारू विक्रेत्यांवर कारवाई करायची तर महिला पोलीस हवेत. पूर्वी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची (डब्ल्यूपीसी) संख्या अपुरी होती. (आताही रात्रीच्या कारवाईच्या वेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासतो) त्यामुळे या दारू विक्रेत्या महिलांवर कारवाई करायला जाता येत नव्हतं. त्यामुळे त्यांचे फावले. महिला पोलिसांच्या कमतरतेमुळेच या महिला मोठय़ा प्रमाणावर आपला जम या धंद्यात बसवू शकल्या हे पोलीसही मान्य करतात. पुढे हाच कित्ता त्यांची पुढची पिढी गिरवू लागली असून मुली, पुतण्याही या धंद्यात येऊ लागल्या आहेत. काळाच्या ओघात निडर झालेल्या या महिलांवर कारवाई करताना म्हणूनच सावध राहावे लागते. कारण त्या  कुठल्याही स्तराला जाऊन कांगावा करतात. पूर्वी ज्या कलमाअंतर्गत या महिलांवर कारवाई केली जायची ते कलम जामीनपात्र होते. त्यामुळे कारवाई झाली तरी लगेच त्या जामिनावर सुटून बाहेर येत आणि पुन्हा हा धंदा राजरोस सुरू व्हायचा.
याशिवाय अधिकाधिक महिला या धंद्यात येण्यामागे कारण ठरलं ते तिचं बाई असणं. मोठमोठय़ा बारमध्ये आकर्षक सजावट, उंची वातावरण लागतं, मात्र झोपडपट्टय़ांमध्ये महिला दारू विकते हीच आकर्षणाची बाब असते. त्यामुळे ग्राहक त्याच आकर्षणापोटी त्यांच्या गुत्त्यावर जातात. ‘भाभी’, ‘आंटी’, ‘अम्मा’ नावानं त्यांचे गुत्ते प्रसिद्ध असतात. त्यांच्या गुत्त्यावर जाऊन उभ्या उभ्या दारूचे ग्लास संपविणं किंवा पार्सल नेणं याच दोन गोष्टी असतात. तिथे बसून दारू पिण्याचा प्रश्नच नसतो, त्यामुळे दारुडय़ांकडून त्यांना त्रास झाल्याच्या घटना सहसा घडत नाहीत. शिवाय या महिला तशा बिनधास्त असतात. त्यांचेही ‘बाऊंसर’ आसपास असतातच. त्यांच्या नादी लागण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. कुणी केलाच की या महिलांच्या रौद्र रूपाला त्यांना समोरं जावं लागतं.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, या महिला आपल्या सौंदर्याचाही फायदा करून घेतात. दहिसरच्या केतकीपाडय़ात दारूचे गुत्ते चालविणाऱ्या दोन महिला देखण्या होत्या. त्या जोरावर त्यांनी पोलिसांनाही जाळ्यात ओढलं होतं. वेश्याव्यवसायात शरीरच विकावं लागतं, तो धोका दारूविक्रीच्या धंद्यात नसतो. अर्थात, धंद्याला संरक्षण देण्यासाठी याच देहविक्रीचा वापर वेगळ्या पद्धतीनं केला जातोही, पण खरा धंदा हा दारूविक्रीच असतो.
बारबाला आणि वेश्यांना आपल्या मुली आपल्या धंद्यात याव्यात असे कधीच वाटत नाही. त्या कटाक्षाने आपल्या मुलींना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण दारूविक्रीच्या धंद्यात उलट आहे. परंपरेप्रमाणे या महिला दारूचा धंदा करतात आणि आपल्या मुलींनाही या धंद्यात आणतात. मालवणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली ममता राठोड (३०) ही महिला वयाच्या विशीत असल्यापासून या धंद्यात आहे. तिच्या आजीपासून हा ‘वारसा’ तिला मिळाला होता. अशा अनेक जणी आहेत.
मालवणीकांडात १०४ जण बळी गेले. त्यात १४ महिलासुद्धा होत्या. म्हणजे दारू पिणारे केवळ पुरुष नव्हते, तर महिलासुद्धा होत्या. या दारू विक्रेत्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनोखी क्लृप्ती शोधून काढली होती, ती म्हणजे महिलांचाच गुप्तहेर म्हणून केलेला वापर. कुठल्याही महिलेला आपल्या पतीने दारू पिणे आवडत नाही. त्या रागाचा फायदा घेऊन पोलिसांनी अशा महिलांनाच गुप्तहेर म्हणून तयार केलं. या महिलांच्या बैठका घेतल्या. त्यांच्या वस्त्यांना भेटी दिल्या आणि छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या धंद्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले. हा महिला गुप्तहेराचा प्रयोग भलताच यशस्वी झाल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले. त्यामुळे बरीच गुपिते उघडकीस आली.
दारूविक्री व्यवसायाबरोबरच अमली पदार्थ विक्रीमधलेही महिलावर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. अमली पदार्थाचा व्यवहार दोन वर्गात होतो. उच्चभ्रू वर्ग आणि निम्न वर्ग. त्यामुळे अमली पदार्थाच्या व्यवसायात ज्यांना ‘पेडलर’ म्हणतात, त्या या महिलाच असतात. बहुतांशी त्या परित्यक्ता, विधवा असतात. उपजीविकेचे साधन काही नसते. त्यामुळे त्या हा मार्ग निवडतात.
दारू विक्रेत्या महिलांवर या वेळी प्रथमच भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३२८ म्हणजेच विष देऊन जीवितास धोका उत्पन्न करणे हे कलम लावण्यात आले आहे. त्यात किमान शिक्षा दहा वर्षांची आहे. या महिलांना दारूविक्रीच्या धंद्यातून बाहेर काढणं सोपं नाही. पण कडक कारवाई करून त्याला आळा घालता येऊ शकेल आणि तो घालायला हवाच.
इतक्या मोठय़ा संख्येने महिला या व्यवसायात येतात, कारण त्यांचं सुटत असलेलं आर्थिक गणित. त्यांना इतर पर्यायी व्यवसाय, धंदे उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने त्यांचे सक्षमीकरण होऊन त्या या गैर धंद्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वा त्यांच्याविषयी विचार करण्यासाठी पुन्हा एकदा मालवणी विषारी दारू प्रकरणासारखं एखादं कांड घडावं लागेल, ते जास्त भयंकर ठरेल!

सुहास बिऱ्हाडे – suhas.birhade@expressindia.com