वसंत आबाजी डहाके – vasantdahake@gmail.com

पितृसत्ताक संरचना ओलांडण्याची इच्छा असली, तरी सर्वाना ते जमत नाही. ‘पायाची दासी’पासून ‘सहचरी’पर्यंत आपण पोचलो आहोत ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. तरीही सर्व धार्मिक कर्मकांडांत पुरुषाला उजवे स्थान असते. त्याने पुढे जायचे, स्त्रीने मागून, त्याच्या पावलांवर पाऊल टाकत यायचे, हे मनातून नष्ट झाले नाही. सर्वच क्षेत्रांत- राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक- हीच स्थिती आढळते. अद्याप ‘मी’ आणि ‘तू’ची जागा ‘आम्ही’, ‘आपण’ यांनी घेतलेली नाही. अजूनही ती ‘इतर’च आहे.

Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

स्त्रीप्रमाणे पुरुष हेदेखील सामाजिक-सांस्कृतिक रचित आहे. पितृसत्ताक, पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत पुरुष केंद्रात असतो, तर स्त्री परिघावर असते. ती दुय्यम, इतर, ‘दि अदर’ असते. परंपरेने चालत आलेल्या व्यवस्थेत सामान्यत: हीच स्थिती दिसते. पुरुषांची कामे, स्त्रियांची कामे अशी विभागणी चालत आलेली आहे. पुरुषाचे क्षेत्र बाहेर असते, तर स्त्रीचे घरात.  ऋतुप्राप्ती, गर्भधारणा, अपत्यसंभव या गोष्टी केवळ स्त्रीच्याच आहेत. मानवप्राण्यांत ही तिची अधिक क्षमता आहे, पण तीच तिची दुर्बलता बनलेली आहे. व्याध अवस्थेत पुरुषाने शिकार करायला जाणे, स्त्रीने मुलांचा सांभाळ करणे, त्यांना भरवणे अशी विभागणी असावी. कृषी अवस्थेत स्त्रीचा मोठाच सहभाग होता. तथापि मुलांचा सांभाळ हे तिचे कर्तव्य अटळच होते. कुटुंबात, समाजात अशी कामांची विभागणी असली व काही अंशी दुय्यम समजली जाणारी कामे तिला करावी लागत असली तरी, एक गोष्ट कोडय़ात टाकणारी आहे. ती म्हणजे जगभर आढळलेल्या मातृदेवता!

स्त्रीच्या ठिकाणी  विलक्षण असे सामथ्र्य आहे याची जाणीवही आरंभकाळातील मानवसमूहात असावी. खरे तर पुरुषांची आणि स्त्रियांची, दोन्ही कामे महत्त्वाचीच आहेत. तरी त्यांत तरतमभाव निर्माण झाला. शिकारीची, शेतीमधली कष्टाची कामे पुरुषांची, शारीरिक बळाची आवश्यकता असलेली, तर स्त्रियांची कामे घराशी निगडित, प्रकृतीने नाजूक स्वरूपाची, असे मानले जाऊ लागल्यानंतर पुरुष के ंद्रात आला आणि स्त्री परिघावर गेली. विशिष्ट अवस्थांमध्ये जे योग्य होते, ते सर्वच अवस्थांमध्ये योग्य ठरले, नियमांमध्ये रूपांतरित झाले. कुटुंबप्रमुख पुरुष आणि समाजप्रमुखही पुरुषच. पुरुष सूर्य, स्त्री चंद्र. अशी द्विमुखी विरोधके तयार झाली. पुरुषाचे स्थान वर राहिले, स्त्रीचे खाली. कित्येक शतके अशीच गेली. शारीरिक सामर्थ्यांच्या दृष्टीनेच केवळ स्त्री दुर्बल आहे असे नव्हे, तर बुद्धीच्या दृष्टीनेही ती मंदच आहे अशी समजूत रूढ झाली. अशा अपसमजुती दूर करण्यासाठी स्त्रियांना आणि पुरुषांनाही बरीच शक्ती खर्च करावी लागली हा इतिहास आहे.

महात्मा जोतिबा फुले, ताराबाई िशदे, गोपाळ गणेश आगरकर, आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, शरद जोशी इत्यादी व्यक्ती संस्मरणीय आहेत. स्त्रीवादी चळवळींचाही मोठाच वाटा आहे. अलीकडच्या शाहीन बाग आंदोलनाविषयी बरीच मतमतांतरे आहेत; तथापि एक गोष्ट तर निश्चितच आहे, थंडीवाऱ्यात, रात्रीबेरात्री, घरापासून दूर एखाद्या मदानात कित्येक दिवस बसून राहणे ही सोपी गोष्ट नाही. महात्मा गांधींच्या आंदोलनात स्त्रियांचा मोठा सहभाग होता. तिथपासून भारतातील विविध आंदोलनांत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यातून स्त्रीच्या स्थितीत आणि पुरुषाच्या मनातील स्त्रीचे रूप बदलण्यास प्रारंभ झाला.

मी पारंपरिक पुरुषसत्ताक घरात जन्माला आलो. त्या वेळी आमच्या घरात आई आणि केशवपन केलेली बालविधवा आत्या या दोन स्त्रिया होत्या. वडील आणि त्यांचा धाकटा भाऊ हे दोन पुरुष होते. आमचे वडील उग्र किंवा रागीट नव्हते. तरीदेखील त्यांची धाकटी भावंडे त्यांच्या समोर येत नसत आणि आली तरी खाली मान घालून बोलत. त्या दोघांचाही घरात आवाज नव्हता. आम्हाला झोपवताना झोपाळ्यावर झोके घेत काका उंच आवाजात गाणी म्हणत असे आणि आमची ताईआत्या आम्हाला गोष्टी सांगताना बोलत असे, हा अपवाद. आईचे आणि वडिलांचेही बोलणे फारसे होत नसे. मात्र ते तिच्यावर कधी संतापले होते असा प्रसंग आठवत नाही. आम्हाला वडिलांचा धाक किंवा दरारा कधीही वाटला नाही. आमच्यावर ते क्वचितच रागवत, अगदी माझा धाकटा भाऊ लोकांच्या गोठय़ात जाऊन त्यांची वासरे सोडीत असल्याच्या तक्रारी आल्यावरही ते त्याला रागवत नसत. चंद्रपूरला गेले की आमच्यासाठी ते पुस्तके आणत. त्यांचे शिक्षण जेमतेमच झालेले होते, तरी त्यांना वाचनाची आवड होती. ‘दैनिक महाराष्ट्र’ हे वर्तमानपत्र आमच्याकडे पोस्टाने येत असे. साप्ताहिके, मासिकेही ते आणत असत. विचाराने ते प्रगत होते. अन्य जातीच्या घरी ते जेवत आणि अस्पृश्यता पाळत नसत. मात्र आपल्या धाकटय़ा विधवा बहिणीचा पुनर्वविाह ते करू शकले नाहीत. आईला विहिरीवरून पाणी आणावे लागायचे. डोक्यावर पितळी कळशी, चरवी भरून ती आणायची. एकटीला तिला हे झेपेनासे झाले तेव्हा काका मदत करायचा; पण वडिलांनी कधीही एखादी कळशी किंवा बादली भरून पाणी आणले नाही.

माझ्या दोन मोठय़ा बहिणींचे नवरे भिन्न प्रकृतीचे होते. सर्वात मोठय़ा बहिणीच्या यजमानांपुढे त्यांची बायकोच नव्हे तर मुलेही चळचळा कापत. आम्ही त्यांच्यासमोर गेलो तरी ते केव्हा काय बोलतील याचा नियम नसे. ते खरे पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचे पुरस्कत्रे होते. मात्र आमच्या वडिलांशी त्यांचे वागणे अत्यंत आदराचे होते. वडिलांची प्रकृती ठीक नव्हती तेव्हा आग्रहाने त्यांनी आपल्या घरी त्यांना बोलावून घेतले, हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि रोज सकाळ-संध्याकाळ त्यांची विचारपूस करण्यासाठी ते जात असत. तेवढय़ामुळे त्यांच्याविषयी माझे मत बरे झाले होते; पण तरीही त्यांच्याशी माझा चांगला संवाद कधीच झाला नाही. मोठय़ा बहिणींपकी धाकटय़ा बहिणीचे यजमान स्वभावाने प्रेमळ होते. त्यांच्याशी माझी गट्टी जमली होती. ते स्वत:ला वाचायला ‘मौज’  साप्ताहिकाचे अंक आणत असत, दिवाळी अंक आणत असत. कित्येक वर्षांनंतर ‘मौज प्रकाशनगृहा’त बसून ‘मौज’ दिवाळी अंक, साप्ताहिकाचे अंक चाळत असताना लहानपणी आपण काय-काय वाचले होते त्याची त्यांना आठवण झाली. ते आपल्या बायकोशी, मुलांशी प्रेमाने वागत असत. पितृसत्ताक पद्धतीचेच हे दोन परस्परविरोधी असे प्रतिनिधी होते.

पुढे प्रभाशी (गणोरकर)ओळख झाल्यानंतर तिच्या आईवडिलांविषयीच्या बऱ्याच हकिकती समजल्या. बाह्य़ संरचना पितृसत्ताक पद्धतीचीच होती; परंतु वडिलांचे आईशी वागणे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि सन्मानाचे होते. मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि मान्यतेच्या, अधिकाराच्या पदांवर असावे अशी त्यांची आकांक्षा होती. काका (प्रभाचे वडील) हा प्रभाच्या मनातला आदर्श पुरुष असावा. त्यांच्यासारखे वागणे मला कधीही जमले नाही. यात थोडी भूमिकांच्या अदलाबदलीचीही (रोल रिव्हर्सलचीही) सरमिसळ असावी. आम्ही तरुण होईतो जग पुष्कळच बदलत गेले. घरातली कामे स्त्रियांची, बाहेरची कामे पुरुषांची असा काही प्रकार उरलेलाच नाही. तरीही ही दोन्ही प्रकारांतली कामे असतातच. घरी, कुटुंबात वाढत असतानाच काका प्रभाला विविध कामे सांगत असत. घरातल्या मोठय़ा मुलाने करायची बरीच कामे ही मुलगी करीत होती. कुटुंबाला आधार देण्याचे कामही मोठय़ा मुलग्याप्रमाणे ती करीत होती. तथापि आई-काकांच्या मनात मुलगा हा गंड असावा. पितृसत्ताक पद्धतीची संरचना हाडीमाशी खिळलेली असते. अद्यापही भारतीय कुटुंबात मुलग्याचे स्थान महत्त्वाचे राहिलेले आहे. सर्व धार्मिक कर्मकांडांत पुरुषाला उजवे स्थान असते. त्याने पुढे जायचे, स्त्रीने मागून, त्याच्या पावलांवर पाऊल टाकत यायचे, हे मनातून नष्ट झाले नाही. सर्वच क्षेत्रांत- राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक- हीच स्थिती आढळते. पितृसत्ताक  संरचनेत घट्ट झालेली मूल्ये, विशेषत: नतिक संकल्पना नष्ट झालेल्या नाहीत.

आमच्यात, वैयक्तिक पातळीवर, बदल झाला. मुलगी, मुलगा असा भेद आम्ही केला नाही. मुलग्याने तर स्वत:च्या नावापुढे आईचे व वडिलांचे नाव लावायची पद्धती सुरू केली. त्याच्या पदवी प्रशस्तिपत्रांवर हीच नावे आहेत. इथे आणखी एक मोठा रोल रिव्हर्सलचा भाग आहे. पीएच.डी.पर्यंतच्या पदव्या प्राप्त करून, वरिष्ठ वैज्ञानिकाच्या पदावर काम करून, पूर्णवेळ अपत्यसंगोपनाच्या कामाला त्याने वाहून घेतले. घरातली सर्व कामे तो करतो, सर्व प्रकारचा स्वयंपाक त्याला येतो. वैज्ञानिक संशोधनही सुरूच असते. आमचे वडील आणि आमचा मुलगा एवढय़ा काळात किती मोठा बदल झाला हे आपण पाहतच आहोत.

या सर्व उदाहरणांतून कुटुंबातला पुरुष दिसतो. पितृसत्ताक संरचना असली तरी सर्व पुरुष सारखे नसतात. सर्व पुरुषांच्या मनात स्त्रीचे एकच एक विशिष्ट रूप असते असेही नाही. पितृसत्ताक संरचना ओलांडण्याची इच्छा असली, तरी सर्वाना ते जमत नाही. (शेवटच्या उदाहरणात ती चौकट ओलांडल्याचे जाणवते.) ‘पायाची दासी’पासून ‘सहचरी’पर्यंत आपण पोचलो आहोत ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. सांस्कृतिक रचिताची जाणीव खोलवर झाली, की त्या रचिताचा निरास करण्याची प्रक्रियाही सुरू होते.

जगातल्या, भारतातल्या, मराठीतल्या कादंबरीकारांनी स्त्रीचित्रण केलेले आहे. हरी नारायण आपटे, श्रीधर व्यंकटेश केतकर, वामन मल्हार जोशी, उद्धव शेळके इत्यादी पुरुष कादंबरीकारांनी पितृसत्ताक संरचनेतील स्त्रियांच्या स्थितीचे चित्रण केलेले सहज आठवते. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमधील स्त्रियांविषयी मी एक लेख लिहिला होता. त्यातली काही वाक्ये येथे देतो –

जीएंच्या कथेतील समाज पुरुषकेंद्री आहे. एखाद्या कुटुंबात पुरुषाची सत्ता नसली तरी एकंदरीत मूल्यव्यवस्था पुरुषकेंद्री आहे. जीएंच्या कथेतील स्त्रियांनी ही मूल्यव्यवस्था स्वीकारलेली आहे. तिच्याविरुद्ध विद्रोह करण्याचे सामथ्र्य त्यांच्यात नाही. व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्ती आणि व्यक्तींचा समूह यांच्या अनुकूल-प्रतिकूल संबंधांतून उत्पन्न होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांचा अन्वयार्थ सामाजिक-आíथक संरचनांच्या पातळीवर लावता येतो. प्रत्येक सामाजिक संरचिताला सांस्कृतिक संरचिताचा स्तर असतो. एका पुरुष लेखकाचे आपल्या समाजाविषयीचे आकलन या दृष्टीने जीएंच्या कथांकडे पाहता येते.

मराठीतील अनेक कवींनी स्त्रीविषयक कविता लिहिल्या आहेत, प्रेमकविताही भरपूर आहेत; शृंगारिक, प्रणयकविताही खूप आहेत. मीही काही प्रेमकविता लिहिल्या आहेत, पण त्यांना रूढ अर्थाने प्रेमकविता म्हणता येईल की नाही, याविषयी मीच साशंक आहे. मराठीतल्या कवींच्या प्रेमकवितांचा माझ्यावर काहीही प्रभाव पडला नाही. नाही म्हणताना एक लक्षात येते, की काही प्रगत विचारांच्या उर्दू, िहदी आणि मराठी कवींच्या कवितेतील स्त्रीविषयक भावनेचा जरूर स्पर्श झाला. त्यातही प्रेमाशिवाय जगात आणखीही काही दु:खे आहेत, असे कवितेतला पुरुष आपल्या प्रेयसीला सांगतो तेव्हा पितृसत्ताक पद्धतीने स्त्रीची घडण कशी केली आहे, हेच आपल्याला जाणवायला लागते. जगातल्या विविध दु:खांची जणू तिला काही जाणीवच नाही किंवा ती होऊच दिलेली नाही.

माझ्या मनातही स्त्रीची एक प्रतिमा आकार घेत होती. स्त्रीचे शरीर व स्त्रीचे मन या दोन्ही गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत होत्या, वाटत आहेत.

समाजात, कुटुंबात पुरुषाचे स्थान वरचे, स्त्रीचे खालचे असे मला वाटत नाही. त्या दोघांमध्ये प्रेमाचे नाते असले पाहिजे. अन्य कोणत्याही स्त्रीविषयी सौहार्द आणि सन्मानाची भावना असली पाहिजे. आज समाजात ज्या काही भयंकर घटना घडताहेत त्यांत स्त्रीच्या मनाची अजिबातच पर्वा नाही, तिच्या सन्मानाची जाणीव नाही असे दिसून येते. आपल्याला हे मिळाले पाहिजे, संमतीने नसेल तर जबरदस्तीने बळकावले पाहिजे असेच बहुतेक घटनांमधील पुरुषांचे वागणे दिसते. पितृसत्ताक पद्धतीचे विष किती खोलवर भिनलेले आहे हे आपल्याला समजते. पुरुषाचे स्त्रीविषयीचे कामाकर्षण कधीही संपणारे नाही. त्यामुळे सन्मानाची, सौहार्दाची जाणीव रुजली पाहिजे. आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही दृष्टीने मागे नाही. अशा वेळी आपल्याच प्रजातीतील दुसरा भाग दुसरा, ‘दि अदर’ असू नये. अद्याप ‘मी’ आणि ‘तू’ची जागा आम्ही, ‘आपण’ यांनी घेतलेली नाही. अजूनही ती ‘इतर’च आहे.